नवरात्रीच्या निमित्ताने

सर्वसाक्षी

नवरात्रीच्या निमित्ताने

गणरायांना निरोप दिल्यावर मनाला हुरहूर लागलेली असते. त्या पाठोपाठ पितृपक्षाची सामसूम. प्रत्येक जण मग वाट पाहतो ती घटस्थापनेची! नवरात्र म्हणजे प्रत्यक्ष दसरा - दिवाळीची चाहूल. सर्वत्र नवचैतन्याचे वारे वाहू लागतात आणि सारे उत्साहाने सणांच्या स्वागताला लागतात. घटस्थापना, ललितापंचमी, अष्टमी आणि नऊ दिवस नऊ रात्री धमाल. सायंकाळी भोंडला तर रात्री गरब्याची धूम-धमाल. परंपरागत सोहळ्यांपलीकडे हल्ली काही नवे साजरे होऊ लागले आहे आणि त्यातलेच एक म्हणजे नऊ दिवसांचे नऊ रंग.

म.टा.ने काढलेली ही टूम गेल्या काही वर्षांमध्ये विलक्षण लोकप्रिय झाली आहे. पितृपक्ष संपत येताच म. टा. च्या पहिल्या पानावर नऊ दिवसांसाठीच्या नऊ रंगांच्या नऊ पट्ट्या झळकतात. केवळ महिलावर्गच नव्हे तर पुरुष मंडळीही उत्साहाने नऊ रंगांच्या कपड्यांची जमवाजमव करतात. बहुधा वर्षभर याची आखणी होत असावी. प्रत्येक वेळी कपडा घेताना “कोणता रंग आपल्याकडे नाही?" याची उजळणी होते आणि नवरात्रीला प्रारंभ होताच सकाळी सकाळी सर्वत्र एकजात एकाच रंगाचे प्रवाह ओसंडताना दिसतात, फरक काय तो छटांचा. आमची कचेरीही याला अपवाद नाही. नवरात्रीचे नऊ दिवस रोज उत्साही कर्मचारी त्या दिवशीच्या रंगाचे कपडे घालून येतात. दहा- सव्वा दहाला जमवा जमव सुरू होते आणि बरोबर साडेदहाला समूहचित्रणाचा कार्यक्रम होतो. आधी मुली, मग मुले, मग एकत्र असे चित्रण होते. अकरा वाजायच्या आत समूहचित्राची इमेल रवाना झालीच पाहिजे! मग डोळे लागतात ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळी येणाऱ्या म. टा. कडे. रोज वाट पाहून अखेर एखादा फोटो वर्तमानपत्रात आलेला दिसला की मंडळी धन्य होतात. मनुष्यबळ विकास विभागाचा भार नव्याने स्वीकारल्याने (म्हणजे त्या विभागाने माझा भार घेतल्यामुळे) यंदा चित्रणाची जबाबदारी माझी होती. रोजच्या धकाधकीच्या आणि चाकोरीबद्ध जीवनाला जुंपलेल्या कर्मचाऱ्यांना जरा बदल आणि एक नवा उत्साह देण्यासाठी यंदा आमच्या कचेरीत आम्ही एक अभिनव स्पर्धेचे आयोजन केले होते - ’कार्यासन सजावट स्पर्धा’.

घटस्थापनेच्या अलीकडच्या आठवड्यात समस्त कर्मचाऱ्यांना या स्पर्धेची इ-पत्रे गेली. रोज जो रंग त्या दिवसाचा रंग असेल, त्या रंगाची सजावट आपल्या कार्यासनाला करायची. मात्र ही सजावट कटाक्षाने साडेदहाच्या आत संपवून कामाला लागणे बंधनकारक केले होते. जर कुणी काम सोडून सजावट करताना दिसला तर तो भिडू बाद! सकाळी नाही जमले तर दुपारी एक ते दोन या जेवायच्या वेळात मुभा होती. सजावट काय व कशी असावी याची काही कल्पना व अट, बंधन नव्हते, फक्त ती त्या विशिष्ट रंगाची असावी हीच एक अट. माहिती पसरताच उत्साही लोकांनी भाग घ्यायचे ठरविले. हाती कला असलेल्या सहकाऱ्यांनी जमवाजमव सुरू केली, तर कुणी स्वत:च एकट्याने संपूर्ण सजावटीची आखणी केली. प्रतिसाद खरोखरच अपेक्षेबाहेर मोठा होता. अगदी शाळकरी मुलांच्या उत्साहाने कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. अरे हो! पण कुणाची सजावट सर्वोत्कृष्ट हे ठरविणार कोण? अर्थातच ’गुप्त परीक्षक’. हे परीक्षक महाशय दुपारी जेवणानंतर सर्वत्र फेरफटका मारणार, सर्व सजावटी पाहणार आणि सर्व निकषांच्या आधारे त्यांना जी सजावट श्रेष्ठ वाटली ते आम्हाला येऊन सांगणार. मग सायंकाळी साडेपाच - पावणेसहाच्या सुमारास विजेता/ विजेती जाहीर होणार आणि त्याच बरोबर उद्याच्या रंगाची आठवण.

पहिला दिवस निळ्या रंगाचा. या दिवशी बाजी मारली ती अगदी साध्या, सोप्या पण अर्थपूर्ण सजावटीने. कल्पना भारी होती. निळी ओढणी कार्यासनाच्या दर्शनी भागाला टाचली होती. त्या ओढणीच्या मध्यभागी निऱ्या होत्या तर दोहो बाजूंना वर टोकाला टाचले होते आणि देवीच्या साडीचा आभास निर्माण झाला होता. मध्यभागी वर डोळे व कुंकू व जीभ साकारली होती. जीभ धारणीच्या पुठ्ठ्याला स्केचपेनने लाल रंगवली होती, तर डोळे म्हणजे कार्यासनाच्या दर्शनी भागावर कागद अलगद डकविण्याकरता बनविलेले व रंगीत टिकलीत लपविलेले लोहचुंबक होते. पांढऱ्या टिकलीला काळ्या शाईने रंगविले की डोळे तयार आणि कुंकू म्हणजे मोठी लाल चुंबक टिकली.

दुसरा दिवस पिवळ्या रंगाचा. म्हणजे सूर्याच्या तेजाचा. या दिवशी बाजी मारली ती कलात्मकतेने सूर्यफूलाच्या रूपात सजावट केलेल्या कार्यासनाने. सूर्यप्रतिमेसाठी रेशमी पिवळ्या फितींचा वापर मस्त केला गेला होता. जोडीला पिवळ्या फुलांची सजावट. अगदी संगणकाच्या पटलावरही पिवळे चित्र आणि मूषकासनही पिवळ्या रंगाचे.

तिसरा दिवस हिरव्या रंगाचा. या दिवशी विजेत्या सजावटीत हिरव्या सजावटीबरोबर हिरव्या फलकावर ’ए’ ते ’झी’ पैकी प्रत्येक अक्षराने सुरू होणारे देवीचे नाव, रूप व क्षेत्र लिहिले होते. हे वेगळेपण सर्वांना आवडले.

चौथ्या दिवशी राखाडी रंग. या साध्यासुध्या, सौम्य रंगात विजेत्या कलाकृतीने निव्वळ कल्पकता वापरली होती. कार्यासनाच्या उभ्या भागावर झाडे पाने फुले राखाडी रंगात कापून पांढऱ्या कागदावर लावली होती. प्रत्यक्ष पृष्ठभागावर राखाडी शालीची अवघ्या चार पाच घड्यांमध्ये देवीची साडी झाली होती तर मसुराच्या डाळीने स्वस्तिक साकारले होते, राखाडी रांगोळीने चेहरा साकारला होता.