मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
प्रवास एका लेखाचा!
![]() |
अष्टविनायकदर्शन इ-पुस्तिकेचे मुखपृष्ठ |
माझ्या अष्टविनायकदर्शन या पुस्तिकेचा, ४१ रंगीत फोटोंनी समृद्ध इ-बुक अवतार ( ज्याचे मुखपृष्ठ सुरुवातीलाच आहे ) माझ्या लॅपटॉपच्या पडद्यावर दिसत आहे. लॅपटॉपसमोर माझे कुटुंबीय पुस्तिकेचा हा नवा अवतार पाहण्यात गढून गेलेले आहेत. शेजारीच सोलापूरच्या स्वा. सावरकर विचार मंचाने प्रकाशित केलेली ’अष्टविनायकदर्शन- पण जरा वेगळे’ ही आकर्षक स्वरूपात प्रसिद्ध झालेली आणि मी मुळात स्वखर्चाने प्रकाशित केलेली तुलनेने अगदी साधी पुस्तिका शेजारी शेजारी ठेवलेल्या दिसत आहेत; पण मी मात्र माझ्या आंतरिक ऊर्मीतून केलेल्या लिखाणाच्या येथपर्यंत झालेल्या प्रवासाच्या स्मृतींमध्ये हरवून गेलो आहे.
या स्मृती शाळेत वाचलेल्या ’माझी जन्मठेप’ हा ग्रंथ आणि अभ्यासक्रमातील ’दोन शब्दात दोन संस्कृती’ या निबंधांपासून सुरू झाल्या. या वाचनामुळे सावरकरांचा ठसा मनावर कायमचा उमटला, तो एक महान त्याग केलेला देशभक्त आणि पुरोगामी विचारवंत म्हणून. पण त्यांच्याबाबतचे सार्वजनिक ठिकाणी होणारे उल्लेख त्याकाळात तरी या ठशाशी मिळते जुळते नसत. कुणीही उठावे आणि सावरकरांबाबत काहीही बोलावे आणि लिहावे असा तो काळ होता. १९८८ साली प्रा. शेषराव मोरे यांनी लिहिलेले "सावरकरांचा बुद्धिवाद" आणि त्यानंतर ’ सावरकरांचे समाजकारण ’ ग्रंथ वाचले आणि एक सुखद धक्का बसला. २००५ या वर्षापासून सावरकरांच्या झंझावाती आयुष्यातील अनेक घटनांची शताब्दी होण्यास सुरुवात झाली. पण या घटनांची दखल ज्या प्रमाणात घेतली जायला हवी तेवढी ती घेतली जात नाही हे शल्य मनात कायम घर करून असायचे.
२००७ मध्ये लंडनला जायचा योग आला आणि आठवण झाली ती मुकुंद सोनपाटकी यांच्या ’कुछ याद उन्हे भी कर लो’ या लेखाची! ८ जून १९८५ या दिवशी इंडिया हाऊस, ६५, क्रॉमवेल अव्हेन्यू, हायगेट, लंडन या वास्तूवर एक स्मृतीलेख लिहिला गेला. ही वास्तूही त्या योग्यतेची! तिचे दर्शन आपण घ्यायचेच असे ठरवले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधील ज्या इंडिया हाऊस मध्ये चार वर्षे वास्तव्य केले त्या वास्तूचे दर्शन घेण्याचे भाग्य ३ ऑगस्ट २००७ ला मला लाभले. लंडनहून परतल्यावर लंडनमधील इंडिया हाऊसचे मी घेतलेले दर्शन कागदावर उतरवावे असे मला वाटले आणि फेब्रुवारी २००८ मध्ये "दर्शन एका वास्तूचे" या शीर्षकाखाली माझा लेख सोलापूरच्या दैनिक तरूण भारतने छापला. त्या काळातच सावरकर विचार मंचाचे अध्यक्ष श्री. शरद बनसोडे यांनी सावरकरांच्या संदर्भात अनेक दर्जेदार कार्यक्रम सोलपूरात घडवून आणले. त्यावर्षाच्या सुरुवातीला सावरकर साहित्य संमेलन श्री. विवेक घळसासी यांचे अध्यक्षतेखाली पार पडले. अशा वातावरणात सावरकरांचे कार्य आणि विचार तरूण वर्गापर्यंत थोड्या मजकुरात कसे पोहोचवावे ह्याबद्दलचे विचार मनात चालू असायचे. अशा काळात ’गणेशोत्सवाचे वातावरणात अष्टविनायकदर्शन’ हे शीर्षक असलेल्या लेखाची कल्पना सुचली. लेख लिहून काढला. चांगला लिहिला गेला आहे असे माझे मला वाटले [आपला तो बाब्या!]. आमच्या सुशिक्षितांच्या कॉलनीत तो सर्वजण आवडीने ऐकतील म्हणून बक्षीससमारंभाचे आधी एका मुलीकडून सर्वाना ऐकविला. त्या मुलीनेही शेवटपर्यंत छान वाचला. पण, अहाहा! काय विलक्षण प्रतिसाद! वाचन संपताक्षणी टाळ्यांचा कडकडाट, संपले एकदाचे वाचन म्हणून! वाचनादरम्यानही काही सन्माननीय अपवाद वगळता लोक आपापसात गप्पांचा आनंद लुटत होते. काहीजण त्रासलेला चेहरा करून टाळ्या वाजविण्याच्या सुसंधीची वाट बघत होते. पोरे एकमेकांच्या खोड्या काढण्याचा आनंद मनसोक्त लुटत होती. 'आपुलेची मरण पाहिले म्या डोळा' म्हणजे काय ते अनुभवले. आपापल्या पोरांची कौतुके पाहण्यासाठी आलेल्या त्या गर्दीला सावरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला सवड नव्हती. आपण गर्दीला समजून घेण्यात कमी पडलो हेच खरे. तात्पर्य- प्रतिकूल तेच घडेल असे समजून मनाची तयारी ठेवणे हा सावरकरी नियम किती महत्त्वाचा आहे याची प्रचीती आली.
पण मन हार मानायला तयार नव्हते.
स्वप्नरंजनास सुरुवात :
माझे मित्र प्राचार्य रमेश देशपांडे यांनी रामदासांची शिकवण आधुनिक व्यवस्थापनशास्त्राच्या कसोटीसही कशी तंतोतंत उतरते हे फार उत्तम प्रकारे मांडले होते. माझा लेख त्यांना वाचायला दिला. त्यांनी त्यांची पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाला बोलावून त्याला तो वाचून बघण्याचा जवळजवळ आदेशच दिला आणि तो तुला प्रकाशित करायचा आहे हेही अप्रत्यक्षपणे सांगितले. त्यांना तो वाचण्याजोगाच काय पण छापण्याजोगादेखील वाटल्याने माझे पुस्तिकेविषयीचे स्वप्नरंजन इथून सुरू झाले. त्यानंतर सोलापूर आकाशवाणीतील कार्यक्रम अधिकारी श्री. सुनील शिनखेडे यांना तो लेख देण्यासाठी ते मला त्यांच्याकडे स्वतः घेऊन गेले. श्री. शिनखेडे यांनीही सावरकर साहित्याचा शिक्षणकाळात विशेष अभ्यास केला होता. त्यांनाही तो लेख आवडल्याने २६ फेब्रुवारी २०१० ला मी केलेले त्या लेखाचे संक्षिप्त वाचन सावरकर पुण्यतिथीनिमित्त आकाशवाणीवरून सकाळच्या कार्यक्रमात प्रसारित झाले.
त्यानंतर मग प्रकाशकाला फोन करणे, त्याने आश्वासक बोलून आशा पल्लवित करणे, पुन्हा प्रत्यक्षात काहीही न घडणे असे चक्र चालू झाले. बराच काळ असा गेल्यावर व प्रा. देशपांडे यांनी फोन केल्यावर प्रकाशकाने तो लेख आधीच प्रकाशित झालेला असल्याचे सांगून आमची दांडी उडवली. त्याने तो लेख अक्षरलेणं २००९ च्या दिवाळी अंकात छापल्याचे सांगितले. आम्हाला पत्ताच नाही. यावर प्रा. देशपांडे यांनी थोडी नाराजी दाखविल्यावर प्रकाशकाने दिवाळी अंक आणून दिला. लेखाला प्रथमच छापखाना दिसला म्हणायचा! हेही नसे थोडके!
त्यानंतर पुन्हा मजकुरात भर घालून पुस्तक प्रकाशनाच्या आश्वासनाचे चक्र सुरू झाले. प्रत्यक्ष प्रगती काहीच नाही. असे होता होता ६ मार्च २०१० उजाडला. या दिवशी अंदमानात पोर्ट ब्लेअरला पहिले ’सावरकर मराठी साहित्य संमेलन’ होते. त्याला मी उपस्थित राहिलो. त्याच दिवशी संध्याकाळी समारोप चालू होता. हातात आलेली संमेलनाची स्मरणिका उघडली. नजरेत भरली ती "अनोखा अष्टविनायक महिमा" ही ठळक अक्षरे! माझाच "अक्षरलेणं" मधला लेख किरकोळ बदल करून दुसऱ्य़ाच्या नावे छापलेला होता आणि समोर त्यांचाच सत्कार चालू होता! आपला लेख दुसऱ्याने चोरल्याचा संताप व चोरण्याच्या लायकीचे त्यात काहीतरी असल्याचे समाधान अशा संमिश्र भावनांची गर्दी मनात झाली. पण या गोष्टी तेथे उपस्थित करणे मला योग्य वाटले नाही. त्याचवेळी पुण्याच्या वेदविज्ञान मंडळाचे त्यांच्या जून २०१० मध्ये होणाऱ्या निबंधोत्सवाचे माहितीपत्रक कोणीतरी दिले. निबंधाचा विषय होता स्वा. सावरकर. त्यात सहभागी व्हायचे ठरवले.
सोलापूरला परत आल्यावर स्मरणिका प्रकाशित करणाऱ्या संपादकांना सत्य कळवले. माझा लेख आपल्या नावावर छापणाऱ्या सज्जनाला फोन केला. माझ्या एका मित्राचे घरी आम्ही भेटलो. कोर्ट कचेरी करावी इतकी काही मोठी बाब नव्हती; पण सहज म्हणून माझ्या मित्राने कायद्याच्या दृष्टिकोनातून काय घडले आहे हे त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनी फार मार्मिक व्यावहारिक सत्य सुनावले. ते म्हणाले, " कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा आपण दोघेही तो ऐकायला या जगात नसू." तेही खरेच! त्यांनी वस्तुस्थिती संपादकांना कळवली आणि संपादकांनी उरलेल्या स्मरणिकांमध्ये खुलासा करणारे एक पान जोडून तो लेख माझा असल्याचा खुलासा केला. पण मुळात ज्या चारपाचशे स्मरणिका आधीच वाटून झाल्या होत्या त्यावर व उरलेल्यांवरही लेखाचे जागी माझे नाव नाही. पण यावरून माझा लेख वाचण्याजोगा आणि छापण्याजोगाच नाही तर चोरण्याजोगाही आहे याचे मला ज्ञान झाले.
![]() |