बिनाअंड्याचा केळाब्रेड

वरदा व. वैद्य

बिनाअंड्याचा केळाब्रेड (बनॅना ब्रेड)

ब्रेडसाठी जिन्नस :

पूर्ण पिकलेली केळी - २ (मोठी)
मैदा - १ कप
दही - ३ टे.स्पू.
लोणी - २ टे. स्पू. (पाव स्टिक)
सावर क्रीम - ३ औंस
बेकिंग सोडा - पाऊण चमचा
साखर - अर्धा कप + २ टी. स्पू.
दालचिनी पूड - अर्धा टी.स्पू.
मीठ - चिमूटभर
वॅनिला अर्क - अर्धा टी.स्पू. (वैकल्पिक)
आक्रोडांचे तुकडे - पाव कप (वैकल्पिक)

फ्रॉस्टिंगसाठी जिन्नस :

लोणी - २ टे.स्पू. (मऊ)
सावर क्रीम - पाव कप
वॅनिला अर्क - पाव टी.स्पू.
लिंबाचा रस - पाव टी. स्पू.
पिठीसाखर (confectioners' sugar or powdered sugar) - दीड कप
मीठ - चिमूटभर

मार्गदर्शन :

ओव्हन ३०० अंश फॅरनहाईट (१५० अंश सें.) तापमानाला तापायला ठेवा. लोफ पॅनला आतून तेलाचा/लोण्याचा हात लावा वा कुकिंग स्प्रे मारा. एका वाटीत १ चमचा साखर आणि पाव चमचा दालचिनी पूड एकत्र करा आणि हे मिश्रण लोफ पॅनमध्ये तळाशी आणि बाजूंवर भुरभुरा.
एका मोठ्या वाडग्यामध्ये केळी सोलून घाला व ती हाताने लगदा होईपर्यंत कुसकरा. ह्या लगद्यामध्ये (मऊ) लोणी, सावर क्रीम, साखर, दही, वॅनिला अर्क, दालचिनी पूड आणि चिमूटभर मीठ घालून ढवळा. मिश्रण एकजीव होईपर्यंत हॅंड मिक्सरने (नसल्यास चमच्याने फेटल्याप्रमाणे) ढवळा. ह्या मिश्रणात मैदा आणि बेकिंग सोडा घालून आणखी ढवळा. शेवटी आक्रोडाचे तुकडे घालून ढवळा.

हे मिश्रण लोफ पॅनमध्ये ओता आणि ओव्हनमध्ये भाजा. ब्रेड तयार होण्यासाठी पाऊण ते १ तास लागेल. ब्रेडच्या पोटात मध्यभागी खुपसलेली दातकोरणी वा विणायची सुई कोरडी बाहेर आली की ब्रेड झाला समजावे.

ब्रेड झाला की ओव्हन बंद करून ओव्हनचे झाकण अर्धवट उघडून ब्रेड आत ५-१० मिनिटांसाठी राहू द्या. मग बाहेर काढून पूर्ण थंड होऊ द्या व त्यावर फ्रॉस्टिंग ओता.

फ्रॉस्टिंग -
एका मोठ्या वाडग्यामध्ये फ्रॉस्टिंगसाठीचे सर्व जिन्नस एकत्र करून हातमिक्सरने एकजीव होईपर्यंत ढवळा.