हिरवा पास्ता

वरदा व. वैद्य

हिरवा पास्ता

जिन्नस :

पास्ता - सुमारे ८ औंस (पाव किलो)
पालक पाने - २/३ बचकभर (प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करावे)
पिस्ते - पाव कप
मीठ व मिरपूड - चवीप्रमाणे
ऑलिव तेल - पाव कप
लसूण - १ पाकळी
पारमेजान चीझ - ३-४ चमचे
पाणी - पाव कप

मार्गदर्शन :

थोडे मीठ घातलेल्या उकळत्या पाण्यात पास्ता शिजवा व पास्ता व्यवस्थित शिजल्यावर पाणी काढून टाका.
मिक्सरमधे पिस्त्यांचे कूट करा. त्यात पालकाची पाने, चिरलेली लसूण पाकळी, मीठ, मिरपूड, ऑलिव तेल घालून वाटा. हे मिश्रण सरसरीत करण्यासाठी थोडे थोडे पाणी घालून वाटा. पाव वाटी पाणी लागेलच असे नाही वा कदाचित जास्तही लागू शकेल.
वाढताना शिजवलेल्या गरम पास्त्यावर हे हिरवे मिश्रण घालून वर पारमेजान चीझ भुरभुरा.