मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
एक अर्थ डोळ्यात घेऊन
ती बसलेली असते फूटपाथवर
कपडे घरंगळत असतात तिच्या अंगावरून
फॅशन शोमध्ये घरंगळाव्या सुळसुळीत ओढण्या
बिनकपड्यांच्या हाडकुळ्या मॉडेल्सवरून; तसे
टॅन झालेले तिचे शरीर
निर्भाव पण ताठ असते रोजच
चहूबाजूने भरधाव वाहणाऱ्या वाहनांमध्ये
असे शांत बसताना कुठल्या अध्यात्माचे संगीत
ती ऐकत असते कुणास ठाऊक
परंतु ’आर्ट ऑफ लिव्हींग’चा महत्वाचा पाठ
बिनपैशाने मिळतो गर्दीला
ती कधीच सांभाळताना दिसत नाही
तिच्या कुठल्याच वस्तू गाठोड्यात किंवा काखेत
जसं बिनसामानानंच भागतं तिचं फक्त एका शरीरातच!
कधीतरी रस्त्याबाजूला स्वत:त धुंद
कॅटवॉक करताना दिसते ती,
कानावर येईलसे चाफ्याचे फूल डोक्यात खोचलेली
किंवा कुठल्यातरी गवत-फुलांचा झुपका कानात टोचून
पावलागणिक ती टाकत असते एक एक इच्छा,आकांक्षा मागे
अन फकिराच्या श्रीमंतीनं फुलून येतो तिचा चेहेरा
फक्त तिलाच दिसणाऱ्या कुणा प्रियकराच्या
छेडण्यानं झक्कास लाजते ती अधून मधून
साऱ्या प्रेमिकांना हेवा वाटावा असे असतात तिचे हावभाव तेव्हा
स्वतःचंच अस्तित्व असावं पृथ्वीवर
असा असतो तिचा वावर
या हपापलेल्या जगात तिच्यापर्यंत
फक्त एकच अर्थसंवेदना पोहोचत असते
'आपलं असणं अन् आपला आनंद’
अगदी कुठल्याही आवरणाशिवायचा!