मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
नाडी ग्रंथांच्या शोधात हिमालय यात्रा
“मी बाबा बोलतोय!” खणखणलेल्या फोन वरून बाबांचा आवाज!
![]() |
आमचे चितळेबाबा |
२ जानेवारी २००३. हलवाऱ्याच्या हवाईदलातील माझ्या वरिष्ठ लेखा अधिकाऱ्याच्या कार्यालयात मी सकाळीसकाळी स्थानापन्न होतो. इतक्यात फोनवरून बाबा बोलायला लागले, “सांगतो ते पटकन लिहून घ्या. ऋषिकेश, श्रीनगर, चमोली, मंडल, असे करत, चौकाटा या गावापाशी - तुंगनाथाचे महादेवाचे मोठे मंदीर आहे. तुम्हास हवे ते गाव या मंदिराच्या पायथ्याशी आहे. तेथे शोध घ्यावा.” मी पटापट लिहून घेताना ते म्हणाले, “दत्त जयंतीच्या दिवशी (१९ डिसेंबर २००२) नाडीग्रंथांच्या शोधाच्या संदर्भात तुम्ही जो प्रश्न टाकलात की पुढील आदेश काय, त्याचे उत्तर मला ध्यानाद्वारे प्राप्त झाले. त्यातून त्या मंदिरात, गावात, भागात, कसे जायचे याची आज्ञा झाली.” पुढे ते म्हणाले, “हे मंदीर तुंगनाथाचे आहे हे नक्की. जारनी किंवा दारनी वा दिरनी असे त्या गावचे नाव असू शकेल. पहा, या महितीवरून तुम्हाला काही शोध घेता येतो का ते. बराय!” म्हणून त्यांनी फोन ठेवायच्या आत मी त्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि फोन खाली ठेवला.
मनात विचारांची गर्दी झाली. आदेश तर मिळाला. त्याप्रमाणे अंमलबजावणी करायला हवीच. हिमालयात जाणार केव्हा? कसे? कोण? गेले तरी भेटणार कोण? बेचैनी वाढली. ते गाव शोधायचे कुठे? ’ऑप्स-रुम’ मधून त्या भागातील नकाशे आणायला एकाला धाडला. तर दुसरा क्षेत्रीय डाक घरामधून गावांची यादी आणायला धावला.
अतिथंडीचे दिवस. गरमागरम चहाचे घोट घेता घेता पुढे आलेल्या कामाच्या फायलींचे गठ्ठे, क्लेम्स, केसेसचा निकाल लावत होतो, पण मन हिमालय़ातील गिरीकुहरात विहरत होते. आठवले, की बाबांनी मला तीन वर्षांपूर्वी एका कागदावर हिमालयात कुठेतरी एका गुंफेत जाण्याचा आदेश दिला होता. मात्र त्याकरता मार्गदर्शक पत्ता तुला तीन वर्षांनी मिळेल म्हटले होते. त्याप्रमाणे आजच बरोबर तीन वर्षे उलटली होती. आपले हवाईदलात राहायचे सहा महिने उरलेत. इतकी कामे आहेत. शिवाय आत्ताच सुट्टीवरून परतल्यामुळे मला पुन्हा सुट्टीचे नावही काढता येणे शक्य नव्हते. ’शक्य नाही’ असे मनाशी म्हणत मी कार्यालयाबाहेर आलो. तेवढ्यात (तेव्हाचा) स्क्वाड्रन लीडर धनंजय खोत (आताचा एअर कमोडोर) येताना दिसला. मला नववर्षाच्या शुभेच्छा देत तो परत वळला.
तेव्हा मी अचानक म्हणालो, "अरे जरा आत ये. मला तुझ्याशी बोलायचे आहे." त्याला बाकी काही न सांगता म्हणालो, "दारणी, जारनी किंवा जीरनी असे नाव हिमालयाच्या प्रदेशात शोधायचे आहे. तू ’ट्रॅकिंग एक्सपर्ट’ आहेस. बघ तुला काही सांगता येते का ते."
“का सर एकदम मला विचारताय? काही महत्त्वाचे शोधायचे आहे का?” मला राहवेना. मी त्याला थोडक्यात सांगितले. त्यावर तो मला म्हणाला, “हे बाबा म्हणजे आपले चितळेबाबा तर नव्हेत?" आता मला सर्द व्हायला झाले!
"हो, तेच. पण तू कसा ओळखतोस त्यांना? " मी चकीत होऊन विचारले.
"सर, मागे एकदा स्क्वाड्रन लीडर संजय वझेने मला चितळेबाबांबद्दल सागितले म्हणून मी त्यांना भेटलो होतो पुण्यात. आमची भेट बराच वेळ चालली होती. त्यावेळी तुमचे नावही चर्चेत आले. त्यांची दीक्षा घेणार होतो, पण कामाच्या गर्दीत राहून गेले. बाबांचा आदेश आहे तर मग प्रश्नच नाही. मी कामाला लागतो. मी माझे सर्व नकाशे तपासतो. मी त्या भागातील ट्रॅकिंगसाठी खूप माहिती गोळा केली आहे. सर, आपण माझ्या घरी येता का रात्री जेवायला? माझी आईपण आली आहे मुंबईहून. तिच्याशी पण आपली ओळख होईल."
पंधरा मिनिटात ठरले व मी रात्री त्याच्या घरी पसरलेल्या नकाशांच्या भेंडोळ्यातून एक एक गावे शोधत होतो. ऋषिकेश ,श्रीनगर, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग तर मिळाले. चमोली मिळाले म्हणेपर्यंत, "हे पहा गोपेश्वर. त्या नंतर मंडल. तेथूनच पायवाटेने ५ किमीवर अनुसूया मंदिर आहे. मंडलवरून चोपता. तेच बाबा ‘चौकाटा’ म्हणत असावेत. त्यापासून तुंगनाथाचे मंदीर पायी ३ किमी लांब व उंचावर आहे."
धनंजय सारख्या कसलेल्या व हिमालयातील गाव अन गाव माहिती असलेल्या अनुभवी ट्रॅकरला या वस्तीवजा गावांची नावे नकाशात पाहून जणू काही प्रथमच सापडत होती. त्यावरून मला बाबांच्या कथनातील बारकावे इतके अचूक येत असल्याचे पाहून आश्चर्य वाटत होते.
मी अंबाल्याहून निघून हरिद्वारला टाटा सुमोत बसलो. ऋषिकेशच्या वाटेवर गाडी लागली. मागच्या ८-१० दिवसातील घटनांची उजळणी करू लागलो. ऑफिसच्या कामाचा बोजा पाहून मी नाही नाही म्हणत असताना अचानक मला अंबाल्याला कामाला जबरदस्ती पाठवले गेले. शिवाय वर ते काम उरकल्यावर एरव्ही नाना विघ्ने करून हैराण करणाऱ्या माझ्या वरिष्ठांनी काहीही कटकट न करता, ‘संक्रांतीला गंगेत स्नान कर. नोकरीतून गेल्यावर इतक्या लांबवर येणे जमेलच असे नाही. जा फिरुन ये.’ असा ‘आदेश’ दिला. तेव्हा माझे साथीदार मित्र तो आदेश ऐकून चक्रावून गेले होते. बाबांनी फोनवरून बोलल्याला ९ दिवसही पुरे झाले नव्हते आणि मी हिमालयाच्या पायथ्याशी नाडी ग्रंथांच्या पट्ट्यांच्या शोधात फिरायला निघालो होतो! सर्व अद्भुतच घडत होते. मनांत मी म्हणत होतो, ‘ही फक्त सुरवात आहे’.
वाटेत इतरांशी बोलताना कळले की गोपेश्वरला जाऊन तेथून चोपत्याला जाणे बर्फ न वितळल्याने शक्य नाही. त्या ऐवजी रुद्रप्रयागला उतरून उखीमठला जावे. तेथून चोपत्याला २५-३० किमी जीप-टॅक्सीने त्या भागातील बर्फ वितळले असेल तर एखाद वेळेला जाणे शक्य आहे. प्रयत्न करुन पहावा. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी उखीमठच्या बसमधे चढलो. वाटेत अगस्त्यमुनी आश्रम, कुंडकरन करत उखीमठला ११ वाजता पोचलो. कोणाला पुढील वाट विचारावी असे म्हणत असताना कपाळाला गंध लावलेले एक सद्गृहस्थ भेटले. ते होते सच्चिदानंद मैठाणी. तिथल्या दुकानाचे, हॉटेलाचे मालक. तो दिवस रविवार होता. त्यांना सुट्टी होती. त्यांनी जारनी वा डोरनी-दारणी-झीरनी या तऱ्हेच्या नावाचे गाव या भागात नसल्याचे सांगितले. माझी निराशा झालेली पाहून ते म्हणाले, "तुम्हाला एकांकडे नेतो. त्यांना या भागातील सर्व गावांतील शिवमंदिरांची व पुजाऱ्यांची नावे माहीत आहेत. ते तुम्हाला ‘मक्कूमठ’ येथे भेटतील."
त्यांच्या घर कम हॉटेलात भरपूर भात व उसळ खाऊन त्यांनी ठरवलेल्या जीपने निघालो. दीड-दोन तासांच्या घाटाच्या प्रवासात हिमालयाच्या शिवलिंग, गंगोत्री, बंदरपूँछ अशा अनेक शिखरांचे दर्शन होत होते. वाट फारच धोकादायक होती. शेवटचे ३ किमी रस्ता फारच खराब होता. मध्येच वाळून घट्ट झालेले बर्फाचे ढीग फोडून काढण्याचे, सपाट करण्याचे काम चालले होते. त्यातून जीप जाताना चाके कधी घसरत होती, तर कधी तेथल्या तेथे फिरत होती. करत-करत मक्कूमठ या गावात पोहोचलो. मक्कूमठ म्हणजे चोपत्याच्या वाटेवर १०-१५ किमी अलिकडे खोल घळीप्रमाणे असलेल्या डोंगरांच्या उतारावरचा छोटा कसबा होता. मक्कूमठ हे मार्कंडेय ऋषींचे स्थान मानले जाते. अतिथंडीमुळे चोपता व तुंगनाथ मंदिरांच्या परिसरातील शिवमंदिरांचे मुखवटे घेऊन पुजारी या गावात वस्तीला येतात. नंतर बर्फ वितळले की पुन्हा मंदिरांची कपाटद्वारे उघडली जातात.
गावाच्या जरा अलीकडे सच्चिदानंदांनी गाडी थांबवली. म्हणाले, "इथे केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी नंदकिशोर व महादेवप्रसाद मैठाणी राहातात. ते या भागातील मान्यवर नेते आहेत. त्यांना भेटून पाहू." त्यांनी, “रामसरन नाम का कोई व्यक्ती तुंगनाथ मंदिर के आसपास के शिवमंदिरों में पुजारी नही था, ना ही है।” असे म्हणून चहा पाजून कटवले.
पुढे एका ठिकाणी मंदिरात सच्चिदानंदजी म्हणाले, "या मंदिरात काही मुली आपल्या नखात पाहून अंजनविद्येने भविष्यकथन करतात." ते ही पाहून झाले. मुली अगदीच थिल्लर होत्या त्यांना कशाचेच महत्त्व कळत नव्हते. जारनी डारनी गावाचा पत्ता लागत नव्हता. परत फिरायची वेळ झाली. शिवाय हवामानही गडगडाटाने धमकावू लागले होते. आम्ही परतलो. त्या दिवशी नंतर माझी ओळख सत्यसाईभक्त सर्वेश्वर दत्त सेमवाल यांच्याशी झाली. त्यांनी रात्री राहायला आग्रहाने ठेऊन घेतले. काही लोकांशी त्यांनी संपर्क केल्यावर असे कळले की जारनी किंवा डारनी असे नाही. परंतु टिरणी नावाचे एक गाव–कसबा आहे. त्या ठिकाणी महेशानंद मैठाणी नावाचे एक खूप वृद्ध पुजारी आहेत. त्यांच्याकडे भविष्य ऐकायला अनेकजण येतात. सत्यसाई भक्त सेमवालांनाही आठवले की खूप वर्षापूर्वी त्यांनी वडिलांबरोबर त्यांच्याकडील पट्ट्यावरील भविष्यकथन करताना पाहिले होते.
आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच पुन्हा जीपने निघालो. कालच्या वाटेनेच जीप जात होती. मक्कूमठापाशी गाडी थांबली. आता यापुढील रस्ता पायी असे ठरले. काल भेट दिलेल्या मार्कंडेय मंदिरापासून साधारणपणे अर्धा किमी चालल्यावर एका डोंगराकडे बोट दाखवत सेमवाल म्हणाले, त्या तिथे ते राहातात. धापा टाकत आम्ही डोंगरावर पोचलो. बऱ्याच वर्षांनी भेटी होत असल्याने आमची गरमागरम भात व डाळींच्या उसळीने आव-भगत झाली. अत्यंत थंडी व चढून आल्यामुळे चवीकडे लक्ष होते कोणाचे? जेवणानंतर कळले की तुंगनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शिवमंदिराचे ८६ वर्षाचे वृद्ध पुजारी महेशानंदजी, शिव-पार्वती व गणांची पालखी खांद्यावर घेऊन गावात मिरवायला व दर्शनाला घेऊन गेले आहेत व साधारण महिन्याभराने परततील.
![]() |
पालखी |
त्यांच्या घरातील सर्वजण अतिशय काटक व बळकट होते. पैकी त्यातील एक ७६ वर्षाचे धाकटे भाऊ आर्मीत होते. मी हवाईदलातील अधिकारी असल्याचे ऐकून त्यांनी मला कडक सॅल्यूट ठोकला. त्यांच्याकडील भृगुसंहितेचा ग्रंथ दाखवला. मेरठ छापखान्यातील ती संहितेची पाने मला पूर्वपरिचित होती. याशिवाय काही भूर्जपत्रे आहेत का? या प्रश्नाचे त्यांच्याकडे नक्की उत्तर नव्हते. कदाचित असतील म्हणाले. त्यांना मुलेबाळे होती, पण सध्या कोणी हयात नव्हती. नंतर आम्ही परतलो. रात्री रोजच्याप्रमाणे बाबांना फोनवरून अहवाल सांगितला. "नाथसंप्रदायात परीक्षा कडक असते. आदेश झाला आहे तेवढेच व तेच कार्य करायचे. एका यात्रेत सर्व साध्य कसे होणार? आपण सुरवात केलीत. आता पुढील आदेश काय मिळतो ते पाहू. परतलात तरी चालेल," बाबांचा आदेश झाला.
त्या रात्री सेमवालजींच्या घरात घडत असलेल्या सत्यसाईंच्या अदभूत लीलांच्या कथा व भजनांत आम्ही रात्र जागवली. निघण्याआधी थंडीमुळे केदारनाथ मंदिरातील उखीमठाच्या मंदिरात ठेवलेल्या शिवजींच्या मुखवट्यांचे दर्शन घेतले.
![]() |
उखीमठचे शिवमंदिर |
तेथील पुजारी कर्नाटकातील विजापूरचे असल्याने चकीत व्हायला झाले. त्या मंदिराचा जीर्णोद्धार महासती अहिल्याबाई होळकरांनी केला. त्या वेळेपासून पौरोहित्य करण्यासाठी त्यांनी मराठी लोकांना प्राध्यान्य दिले. त्याचे फळ म्हणजे परंपरागत कानडी मुलुखातील मराठी पुजारी तेथे आजही आहेत. ते मराठी बोलत नाहीत पण त्यांना मराठी असण्याचा अभिमान जरूर आहे.
![]() |
शशिकांत ओक हवाईदलातून निवृत्ती नंतर |
संक्रांतीला ऋषिकेशच्या किनारी गंगेत स्नान करून मी परतलो. पुढे जुलै २००३ मधे निवृत्त झालो. विविध मार्गांनी माझ्याकडे नाडीमहर्षींच्या ग्रंथपट्ट्यांचे आगमन झाले. चितळे बाबांच्या पुढील आदेशाची आता वाट पाहात आहे.
विंग कमांडर (नि) शशिकांत ओक
पत्ता - ए -४/४०४ गंगा हॅमलेट हौ.सोसायटी, विमान नगर, पुणे ४११०१४.
मोः ०९८८१९०१०४९. Email:shashioak@gmail.com