मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
कालचक्र
![]() |
पेपर वाचता वाचता मधुवंतीचा डोळा लागला. जेवण जास्त झाले होते. जाग आली तेव्हा तिच्या लक्षात आले की, चिन्मय खेळता खेळता चटईवरच झोपून गेलेला आहे. तिने त्याला अलगद उचलून कॉटवर ठेवले. लोळता लोळता पडू नये म्हणून गादीखाली उशी घातली. ती रिमोट घेऊन हॉलमधे आली आणि तिची आवडती सीरिअल लावली. दोन आठवड्यापूर्वी मेलेली तिची आवडती व्यक्तिरेखा आज तरी जिवंत होणार आहे का, याची तिला उत्सुकता होती. मालिका बघण्याचा मधुवंतीला इतका सराव झाला होता की, पुढे काय होईल याचा विचार करणे तिचे सर्वात आवडते काम होते. मालिका पुढे सरकू लागली. एका दृश्यात नायिकेने कपाटातून तिची गुप्त कागदपत्रे बाहेर काढली आणि ते कपाट पाहताच मधुवंतीला आठवले...आपल्याला कपाट आवरायचंय कितीतरी दिवसांपासून! ’काही ना काही कारणांमुळे राहूनच जातंय. आज कोणीही नाही घरी तर आवरुन घ्यावं. आजची दुपार वाया घालवायची नाही..’ या विचाराने तिने रिमोटने टिव्ही बंद केला.
कपड्यांच्या कप्प्याची आवराआवर झाली. काही भेट-पाकिटे, आहेर म्हणून आलेल्या वस्तूंची थोडी लावालावी केली. कागदपत्रांच्या कप्प्याकडे लक्ष जाताच तिने तिचे नेहमीचे मत पुन्हा एकदा स्वतःशी व्यक्त केले. ‘इतकं सगळं साठवून ठेवण्याची गरज नाही, पण हे अभिजीतला समजतच नाही.’ अनेक फायली खालीवर करता करता तिचे हात धुळीने भरून गेले. पिवळे पान पडावे तसा एक पिवळा कागद हलकेच एका फायलीतून खाली आला आणि जमिनीवर विसावला. मधुवंतीच्या हाताच्या नुसत्या स्पर्शाने त्या जीर्ण कागदाचा एक तुकडा पडला. उत्सुकतेने दुर्लक्षावर मात केली आणि तो कागद तिने हातात घेतला. ते एक पत्र होते.
अक्षरावरून ते मामंजींनी लिहिले आहे, हे मधुवंतीनं ओळखले.
७.७.६४
ती. अप्पा,
शिरसाष्टांग नमस्कार.
मला महाविद्यालयात रुजू होऊन आता महिना उलटून गेला आहे. पत्र लिहायला आत्ता कुठे जरा उसंत मिळत आहे. पहिले सगळे दिवस खाणावळ, प्रवेश कार्ड आणि अशा प्रकारच्या बाबींची चौकशी करण्यात गेले. कॉलेज व होस्टेल असा माझा पद्धतशीर दिनक्रम सुरु झाला आहे. एव्हाना दोन मित्रही झालेत.
बाजीराव एक दिवस थांबला होताच. त्याने सामान लावून दिले. दुस-या दिवशी तो निघत असताना कसंतरी होत होते पण आता सवय झाली आहे. घरापासून दूर येण्याची ही माझी पहिलीच वेळ. आपल्यात बरीच चर्चा झाली होती की, मी बाहेर राहायचं की नाही म्हणून. आईचे म्हणणे होते की, राहू नये. तुमचे व अरविंदकाकाचे म्हणणे होते की, राहावे. त्याशिवाय, जगाचा अनुभव येत नाही. अनुभव यायला सुरुवात झाली आहे, असे वाटते.
आपल्या गावापेक्षा पुण्यात खूप गर्दी आहे. गावाकडे एखादी स्कूटर दिसायची. इथे तर चेतक, लॅम्ब्रेटा अशा कितीतरी स्कूटर्स दिसतात. परवा कॉलेजच्या समोरच स्कूटर जोरात चालविल्यामुळे एकाला पोलिसाने थांबवले. चौकशी सुरु केल्यावर त्याने आठ आणे देऊन सुटकाही करुन घेतली, असे म्हणतात. विषय निघालाच आहे तर माझी सायकल पाठवण्याची आठवण करुन देतो.
कुमुद लेले व जेसन अशा दोनच मुली कॉलेजमध्ये आहेत. उंच सायकली घेऊन येतात. कुमुदला जेसन साडीवरुन काहीतरी बोलत असते. म्हणजे, हे मी ऐकलेले नाही. सुधीरने सांगितले. सुधीरला त्याच्या एका मित्राने सांगितले.
संध्याकाळी मी सुधीर व दिनकरबरोबर( हा दुसरा मित्र) डेक्कनवर फिरायला जातो. तिकडे जरा निवांतपणा मिळतो. आमच्यात खूप विषयांवरुन गप्पा होतात. पेट्रोलची किंमत वाढून काही वर्षांत पाच रुपये होणार आहे, असे सुधीर म्हणतो. ‘आपल्याला तर पेट्रोलच परवडणार नाही. मग, स्कूटर कशी परवडेल ?’ हा विचार मनात येतो. सुधीरच्या एका बहिणीचे लग्न झाले गेल्या महिन्यात. तीन हजार रुपये खर्च आला. अप्पा, आपलं गाव बरं असं वाटतं. पण आलोच आहे तर चार वर्षं पुरी केली पाहिजेत.
येत्या आठवड्यात ‘राम और शाम’ला जायचं का, वगैरे दिनू म्हणत होता. अजून ठरवले नाही. तो ‘पिक्चर’ ऐवजी ‘पिच्चर’ असं म्हणतो.
आता पत्र थांबवतो व झोपतो.
ती.आईस, शिरसाष्टांग नमस्कार.
सगळे लाडू संपले. पुढच्या ट्रीपच्या वेळेला बाजीरावाबरोबर आणखी पाठवून दे.
अप्पा, बाजीरावाला सांगा की, मी मजेत आहे. एका ट्रंकेचे हॅंडल तुटले आहे.
तुमचा आज्ञाधारक,
शरद
मधुवंतीने ती फाईल आणखी चाळली. तेव्हा तिच्या हाती आणखी एक पत्र लागले. बर्यापैकी स्वच्छ. चिन्मयच्या बाबांनी, अभिजीतने मामंजींना लिहिलेले.
१५.७.१९९१
ती.बाबा,
शिरसाष्टांग नमस्कार
परवाच्याच एस.टी.डी.कॉलवर सगळे बोलणे झालेच होते. मागे लाईन होती म्हणून मी तुम्हाला सांगून कॉल कट केला.
ऍडमिशन झाल्यावर हुश्श वाटलं. क्लासेसही नियमितपणे सुरु झाले आहेत. या ऍडमिशन्स म्हणजे वैताग आहे. लोकसंख्या वाढत आहे म्हणून सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. मुंबईत प्रॉब्लेमला “लोच्या” म्हणतात. पुण्यात मिळाली असती ऍडमिशन तर बरे झाले असते. थोडक्यात चुकली. सगळे मित्र पुण्यात आणि मी एकटा इथे. ठीक आहे. नाईलाज आहे. फ्लॅट तर मस्तच आहे. तुम्ही आधीच बघून ठेवला होता म्हणून बरे झाले. मुंबईत राहायचे वांधे (हा शब्दही इथलाच) असतात.
आता बर्यापैकी सेट झालो आहे इथे. फी भरल्याची पावती जपून ठेवली आहे. पावती सापडत नसल्याने पूर्वी झालेले गोंधळ लक्षात आहेत.
पुण्यात रस्त्यावर गर्दी असते. इथे लोकलमध्ये आहे. माझ्याबरोबर असलेली सुचरिता गुप्तेही लोकलनेच येते. मेकॅनिकल ब्रँचला सुध्दा बर्याच मुली आहेत. परवा सुचूबरोबर (सुचरिता) “प्रेमकैदी”ला गेलो होतो. नंतर जेवूनच घरी आलो. येताना नवी जीन्स घेतली. सुचूचं सिलेक्शन होतं. तिला स्टेशनवर सोडून फ्लॅटवर आलो.
“हम” पाहिलात? तुमच्या लाडक्या बच्चनचं काही खरं नाही. संपला तो आता. पन्नास वर्षे झाली त्याला. यापुढे एकही सिनेमा पाहू नका त्याचा.
इथे कटिंग प्यायची सवयही लागली आहे. तीन रुपये आहे. तुम्ही पंचवीस पैशांत प्यायचात ना ?
काकाचा अयोध्येला मंदिर बांधायचा हॅंगओव्हर उतरलाय का, त्याला विचारा. त्याला म्हणावं मी व माझ्या वर्गातला अस्लम एकत्र अभ्यास करतो. आणखी एक क्लासमेट चंदनने एक कॉम्प्युटर घेतलाय. कोबोल, बेसिक..असले काहीतरी बोलत असतो. म्हणतो, सगळ्यांच्या हातात काही वर्षांनी कॉम्प्यटुर येणार आहे. मी त्याला सांगतो की, इंजिनिअर्सशी त्याचा काही संबंध नाही. ज्यांना ऑपरेटिंग करायचे आहे त्यांनी शिकणे आवश्यक आहे. त्याचे विचार मला कधी कधी समजत नाहीत.
ती.आईस, शिरसाष्टांग नमस्कार
फोनवर तुझ्याशीही बोलणे झाले होते. मी मजेत आहे.
तुमचाच आज्ञाधारक,
अभिजीत
मधुवंतीचं लक्ष सहज चिन्मयकडे गेलं आणि तिच्या डोळ्यांसमोर एक काल्पनिक इमेल तरळली.
२०२२
दिल्ली
हाय डॅड,
पोस्ट ग्रॅज्युएशनचा सगळा ऍडमिशन प्रोग्रॅम झाला. नाऊ वी आर रनिंग स्मूथली हिअर. यू नीड नॉट बी वरीड.
ही माझी या लॅपटॉपवरुन कदाचित शेवटची मेल असेल. अगदी जुना झालाय आता. एक गिर्हाईकही मिळालंय लॅपटॉपला. नवीनही इथे पाहून ठेवलाय. हायर स्पीड, ग्रेट फॅसिलिटीज. नव्या लॅपटॉपमध्ये कॅमेराही आहे. मोड चेंज केला की क्लिक. तुम्ही पाहिलेत का ते नवे मॉडेल ? इंटरनेट, फॅक्स, टीव्ही, फोन, कॅमेरा सगळे एकाच आयटममधे.
युनिव्हर्सिटीमधल्या एका झाडाखाली बसूनच ही मेल लिहितोय. दिल्ली कॉर्पोरेशनने खास शुद्ध हवा देणारी झाडे लावण्याचे काम हातात घेतले आहे. त्यात युनिव्हर्सिटी प्रेफरन्सवर आहे. खूप जण इथे झाडाखालीच काम करायला येतात. अजून पुण्याइतकी बेकार कंडिशन नाही झालेली. पुणे आणि बंगलोर ही सर्वात प्रदूषित शहरे म्हणून जाहीर झाली आहेत. तुमच्या फोनवरच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला. पण नेटवर बातमी वाचल्यावर बसला - पुण्यात हार्ट स्पेशालिस्ट आणि स्किन स्पेशालिस्टस् ची चांदी ! देशात सर्वाधिक त्वचारुग्ण व हृदयविकारग्रस्त रुग्ण पुण्यात !
कालच पेट्रोल रिचार्ज स्किम सुरु झाली. मोबाईल रिचार्ज करतो ना तसे. पंपावर जाऊन आपला पेट्रोल कोड द्यायचा आणि रक्कम सांगायची. बॅंकेचे कार्ड द्यायचं लगेच रिचार्ज. मी चार लिटरसाठी पाचशे रुपयांचे रिचार्ज मारले.
अनुष्काबद्दल मी तुम्हाला सांगितलेच होते. ती माझ्याच फ्लॅटवर राहते. तिच्यामुळे मला एकटेपणा जाणवत नाही. आम्ही एंजॉय करतो. तिचे आईवडील ठाण्यात असतात. रिटायर्ड आहेत दोघेही. लग्नाबद्दल विचारले होते तुम्ही. सध्या तरी एकत्र राहतोय. लग्नाचं पुढे पाहू, असे ठरवले आहे.
ब्रेकफास्ट कॅन्सल झालाय. झोपायला रात्रीचे तीन वाजतात. मग, जेवण दुपारी चारला होतं. लोकल डॉक्टर म्हणालेत, की हे बरोबर नाही वगैरे.
फेसबुकवर टाकीन बाकीचे अपडेटस्. तुमचा अकाउंट सुरु आहे ना ?
साईनिंग ऑफ.
चिन्मय.
मधुवंतीला पाच मिनिटे कुठलाही विचार करावासा वाटत नव्हता. एक दीर्घ श्वास घेऊन तिने वस्तू भराभरा लावून टाकल्या. कपाट बंद केले. गॅलरीत येऊन मुंग्यांसारख्या माणसांची हालचाल पाहात राहिली. जरा उत्साह येताच ती दुपारचा चहा टाकायला आत गेली. एका एका घोटाबरोबर मनातले चैतन्य फुलू लागले व नकोसे विचार नाहीसे होऊ लागले.