पिटा चिप्स व हमस

वरदा व. वैद्य

पिटा चिप्स आणि हमस

पिटा चिप्ससाठीचे जिन्नस :

पिटा ब्रेड - ६
ऑलिव्ह तेल - ४ टी.स्पू.
लाल तिखट - अर्धा टी.स्पू.
जिरेपूड - १ टी.स्पू.
किसलेले पारमेजान ची्झ - अर्धा कप
मीठ - चवीनुसार

पिटा चिप्ससाठी क्रमवार मार्गदर्शन :

ओव्हन ३५० अंश फॅ. तापमानाला तापवत ठेवा.

सर्व पिटा ब्रेड अर्धे चिरा. एका वाटीत ऑलिव तेल, लाल तिखट व जिरेपूड एकत्र करा. स्वयंपाकघरात वापरण्यासाठी असलेल्या ब्रशच्या साहाय्याने हे मिश्रण सर्व पिटा ब्रेडच्या तुकड्यांवर एका बाजूने चोपडा. जिरेपूड आणि तिखट तेलात लगेच खाली बसते. तेव्हा प्रत्येकवेळी तेलात ब्रश बुडवतेवेळी ब्रशाने तेल ढवळून घ्या.

आता तेल लावलेल्या पिटाच्या प्रत्येक तुकड्याचे सहा ते आठ त्रिकोणी तुकडे पाडा. हे तुकडे तेल लावलेली बाजू वर येईल असे दोन जेली रोल पॅन वा कुकी शीट्स वा पिझ्झा पॅनवर मांडा. त्यांच्यावर वरून मीठ आणि किसलेले पारमेझान चीझ भुरभुरा.
हे पॅन ओव्हनमध्ये दोन रॅकवर ठेवा. दहा मिनिटांनी पॅनांच्या जागांची अदलाबदल करा (वरचा पॅन खालच्या रॅकवर तर खालचा वरच्या रॅकवर ठेवा.) आणखी ७-८ मिनिटे भाजा आणि पॅन बाहेर काढून चिप्स गार होऊ द्या.

हे चिप्स घट्ट झाकणाच्या डब्यात सुमारे आठवडाभर कुरकुरीत राहतात.

हमससाठी जिन्नस :

उकडलेले छोले - सुमारे १६ औंसाचा एक हवाबंद डबा (वा घरी रात्रभर पाण्यात भिजवून कुकरमध्ये उकडलेले)
ऑलिव्ह तेल - २ टी. स्पू.
तहिनी सॉस (तिळाची पेस्ट) - ३ टी. स्पू. (नसल्यास २-३ चमचे पांढरे तीळ वापरा)
एका छोट्या लिंबाचा रस
मीठ - चवीनुसार
लाल तिखट - अर्धा चमचा (आवडीनुसार कमी-जास्त प्रमाण घ्या)

क्रमवार मार्गदर्शन :

उकडलेल्या छोल्यांचा हवाबंद डबा उघडून त्यातील पाणी एका वाटीत काढा (फेकून देऊ नका). (तहिनी सॉस नसेल आणि पांढरे तीळ वापरणार असाल तर त्याचे मिक्सरमध्ये कूट करून घ्या.) मिक्सरमध्ये छोले, ऑलिव्ह तेल, तहिनी सॉस (वा आधी केलेले तिळाचे कूट) व छोल्यांचे थोडे पाणी मीठ घालून वाटा. छोल्यांचे बाकी पाणी थोडे थोडे गरजेनुसार घाला. मिश्रण दाट चटणीप्रमाणे झाले पाहिजे.
हे मिश्रण वाडग्यात काढून त्यात लाल तिखट मिसळा. वरून कोथिंबिरीची पाने लावून सजवा.

पिटा चिप्ससोबत हमस छान लागते.