आमचा पहिलावहिला लांब पल्ल्याचा कारप्रवास

रोहिणी

आमचा पहिलावहिला लांब पल्ल्याचा कारप्रवास

अमेरिकेत आल्यावर बरीच वर्षे आम्ही (चारचाकी) गाडी घेतली नव्हती, कारण विद्यापीठातील बससेवा चांगली होती. घराच्या जवळच बसथांबा होता. विद्यापीठात जाणे येणे व इतर सर्व गरजेच्या ठिकाणी बसमधून जाणे सोयीचे होते. दुसरे म्हणजे मुंबईत वाहन चालवायची वेळ कधीच आली नव्हती आणि तसेही ती वेळ कधी येतच नाही.

२००१ साली अमेरिकेत आल्यानंतर सुमारे चार वर्षांनी आम्ही गाडी खरेदी केली. विनायकने चारचाकी शिकण्याचे काही धडे घेतले आणि थोडा सरावही सुरू केला. सराव केल्यावर आम्ही आमच्या चारचाकीमधून किराणासामान आणि भाजीपाला आणायला जाऊ लागलो. बराच सराव केल्यावर विनायकने परीक्षा दिली आणि त्याला चारचाकी चालवण्याचा पक्का परवाना मिळाला. काही दिवसातच आम्हाला लांब पल्ल्याच्या मुक्कामी जायची संधी मिळाली. विनायकच्या मित्राने एका समारंभाचे निमंत्रण फोनवर दिले आणि म्हणाला "गाडी असल्याने आता तुम्हाला आमच्याकडे यायला काहीच हरकत नाही. तुम्ही याच. " विनायकने जायचे ठरवले तरी पण मी नाखुष होते. मी म्हणाले "आपण विमानाने जाऊ ना, नाहीतर इथेही काही बससेवा असतीलच की त्या गूगलवर शोधू आणि बसने जाऊ." कार असताना बसने प्रवास करण्याची कल्पना विनायकला खूप हास्यास्पद वाटली. मी नाखूष होते याचे कारण मला गाडी अजिबात आवडत नाही. मला बसने किंवा आगगाडीने प्रवास करायला खूप आवडतो. मला भारतात असताना रिक्षाची खूप सवय होती. मी एक नंबरची घाबरट आणि कोणतेही वाहन चालवण्याची आवड नसल्याने सायकलही खूप उशीराने शिकले. सायकल शिकताना खड्ड्यात पडता पडता वाचले. सराव केला नाही. नंतर स्कूटर शिकले पण सराव केला नाही. एक दिवस मामेभाऊ घरी आला तेव्हा त्याने त्याची एम-५० आणली होती. स्कूटर शिकल्याने जणू काही आता आपल्याला गाडी चालवायला यायला लागली असे समजून त्याला विचारले की एक चक्कर मारू का? त्यावर तो म्हणाला "चालेल पण मी तुझ्या मागच्या सीटवर बसेन. तुझा काही भरवसा नाही." गाडी सुरू केली आणि वेग वाढवला तर तो खूपच वाढला आणि मला ब्रेक कसा मारायचा हे लक्षात न आल्याने स्कूटर वाकडीतिकडी होऊन जमिनीवर जोरात आदळली. नशिबाने मामेभाऊ मागे बसल्याने त्याने कसाबसा ब्रेक मारला. या प्रकाराचा मी चांगलाच धसका घेतला होता.

विनायकला गाडीमधून न जाण्याची बरेच कारणे सांगून झाली. शेवटी विनायकने "आता तुझी नाटके पुरे झाली. याहू नकाशा काढ आणि जायच्या तयारीला लाग." असे सांगितले. मी जाम गंभीर झाले होते. मनात म्हणाले, तुला काय! तू फक्त गाडी व्यवस्थित धावते आहे ना इकडेच पाहणार. मलाच नकाशा वाचून दाखवायचा आहे पोथीसारखा! म्हणजे माझी जबाबदारी जास्त! याहू नकाशा आणि मॅपक्वेस्ट नकाशा असे जाण्यायेण्याचे प्रत्येकी दोन नकाशे शोधले, त्याच्या छापील प्रती काढल्या, व नीट अभ्यास केला. नशिबाने दोन्ही नकाश्यांनी जाण्यायेण्याचे रस्ते एकच दिले होते. फरक इतकाच होता की दोन्हीमध्ये जाण्याचा रस्ता येण्याच्या रस्त्याहून वेगळा होता. मैल किती, रस्तेबदल (एक्झिट्स) किती, सर्व पाहिले. त्यात एकूण सहा रस्तेबदल होते. सर्व तयारीनिशी सकाळी ९ ला बाहेर पडलो. गाडी सुरू केली. गाडीला हातानेच ३-४ वेळेला नमस्कार केला, असा नमस्कार तर मी अजूनही करते! माझ्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव बघून विनायक म्हणाला "काळजी करू नकोस. मी पण नवशिकाच आहे त्यामुळे रस्त्यावर जी कमाल वेगमर्यादा ठरवून दिली आहे त्यापुढे नक्कीच जाणार नाही. आणि तूही नकाश्याचा अभ्यास केला आहेस ना, मग काळजी कसली? मी म्हणाले "अरे हो, पण तरीही पहिलाच प्रवास आहे आणि तोही लांब पल्ल्याचा त्यामुळे मला थोडी भीती वाटत आहे." विनायकने कार सुरू केली. मी गाडीच्या मैलांचा आकडा पाहिला आणि तो कागदावर लिहिला. पहिली एक्झिट किती मैलावर येणार आहे त्यावर माझ्या बेरजा वजाबाक्या सुरू झाल्या.

प्रवास ६- ७ तासांचा, साधारण ३५० मैलांचा (५५० किमीचा) होता. गाडी चालवण्याचा कायमचा परवाना मिळून आठवडाच झाला होता. प्रवासाच्या आधीच्या आठवड्यात महामार्गावर जाऊन येऊन थोडा प्रवास केला. एक चाचणी घेतली. जन्मात कधी गाडी चालवण्याची वेळ आली नव्हती आणि महामार्गावर तर अजिबातच नाही. ही चाचणी घेतल्याने माझी भीड थोडी चेपली, पण तरीही पुढे काय अडचणी येऊ शकतील अशी एक भीतीही मनात होतीच. गाडी सुरू केल्यावर थोड्यावेळाने शहर सोडून महामार्गावर जाण्यासाठी एक एक्झिट लागली. ती एक्झिट लागल्या लागल्या माझी बडबड सुरू झाली. "हळू रे! वेग कमी कर! बापरे! किती मोठी एक्झिट आहे!" पूर्णपणे वर्तुळाकार आणि उंचावरून खाली येणाऱ्या रँपवरून जाताना तर मी माझा श्वास रोखून ठेवला होता. आता महामार्गावरून आमची गाडी जलद धावत होती. म्हणजे कमाल मर्यादेपेक्षा कमीच, पण आम्हाला इतकाही वेग नवीन असल्याने जास्त वाटत होता. मजा वाटत होती. एकाच रांगेतून नुसते धावत सुटायचे. कोणताही अडथळा नाही हे पाहून माझी भीड चेपत होती. अचानक विनायकने उजवी रांग सोडून डाव्या रांगेत गाडी आणली आणि वेगही वाढवला. परत माझी बडबड सुरू. "हे काय? डाव्या रांगेत कशाला? वेग कमी कर." पण मी आता जर काही जास्त बोलले तर दोघांच्या चिडचिडीमध्ये अपघात होईल या भीतीने "चुपचाप" बसले. उजव्या रांगेत जो ट्रक होता त्याला ओलांडून त्याच्यापुढे विनायकने गाडी परत उजव्या रांगेत आणली आणि म्हणाला "आता कळाले का मी डाव्या रांगेत का आलो ते? अगं, अशा धुडांना मागे टाकण्यासाठी असे करावेच लागते, नाहीतर आपल्याला "हळूहळू" करत जायला लागले असते." तसे ते मला पटलेही होते पण डाव्या रांगेतून जेव्हा विनायक कार अतिजलद वेगाने ट्रकच्या पुढे नेत होता तेव्हा तर मी खूप "स्तब्ध" झाले होते! हळूहळू माझा आत्मविश्वास वाढत होता. गाडीच्या वेगाने धावण्याची सवय झाली आणि प्रवासाचा आनंदही वाटायला लागला. सर्व एक्झिटा व्यवस्थित पार केल्या. माझे मैलांचे आणि एक्झिटांचे गणितही अगदी बरोबर चालले होते.

इतका वेळ छान चाललेला प्रवास शेवटी थोडा कंटाळवाणा झाला. प्रवास करून बराच वेळ झाला होता त्यामुळे ७४/७६ जोड महामार्ग कधी एकदा संपतोय आणि विल्मिंग्टन शहराचा चेहरा कधी एकदा पाहतोय असे झाले होते. शेवटी एकदाचे आम्ही विनायकच्या मित्राच्या घरी पोहोचलो. घरी पोहचता पोहचता मी विनायकला म्हणाले,"मी उगाचच घाबरत होते. अमेरिकेत लांब पल्ल्याचा प्रवास इतका अवघड नाही तर! आता खूप छान वाटते आहे." त्यावर विनायक मला म्हणाला "तुझा आताचा चेहरा आणि सकाळचा चेहरा असे दोन वेगळे फोटो काढून ठेवायला पाहिजे होते" त्यावर मी "हाहाहा, आता माझा आत्मविश्वास वाढला आहे", असे सांगितले.

दुसऱ्या दिवशीचा निरोप समारंभ आटोपून निघालो. मित्र म्हणाला "जाताना शार्लोटवरून का नाही जात? एकदम सरळ रस्ता आहे" त्याला म्हणालो "नको पहिलाच मोठा प्रवास आहे. हातात असलेल्या नकाश्यावरूनच जातो" गाडी सुरू करून त्याला टाटा,बाय-बाय केले. परतीच्या प्रवासाला निघताना उलटा सीन होता. माझ्या आत्मविश्वासाने खूप उंची गाठली होती. विनायकच्या चेहऱ्याकडे बघितले तर त्याचाही आत्मविश्वास वाढलेला जाणवत होता. परतीच्या प्रवासाचा नकाशा हातात घेऊन बसले. ज्या रस्त्याने आलो अगदी त्याच रस्त्याने परत असा हा नकाशा नव्हता. थोडा वेगळा होता. महामार्ग ७६ वर १२० मैल जायचे होते, नंतर दुसरा रस्ता पकडायचा होता. आम्ही ७४/७६ जोडमार्गाने निघालो आणि १२० मैल गेल्यावर अपेक्षित दुसरा रस्ता कुठे आहे बघायला लागलो. मैल थोडे मागेपुढे होऊ शकतात म्हणून आणखी २५ - ३० मैल पुढे गेलो तरी अपेक्षित रस्ता दिसेना. दरम्यान अशीही ज्ञानप्राप्ती झाली की ७४/७६ जोडमार्ग जाऊन सध्या फक्त ७४ सुरू आहे म्हणजे महामार्ग ७६ केव्हातरी वेगळा झाला आणि त्याचा फाटा कुठे येतो हे नकाश्यात न सांगितल्याने हा गोंधळ झाला होता. समोर शार्लोट शहर ७० - ८० मैल असल्याचे फलक दिसायला लागले. मित्र म्हणाला तसे शार्लोटवरून जाता आले असते पण बरोबर नकाशा नव्हता.