आताशा मन निघतच नाही या शहरातून..

वैभव देशमुख

आता एखादा निरोपच येतो गावाकडून
आणि ढकलत नेतो शहराच्या बस स्टँडवर...

ही केव्हाची सुटलेली असते गाडी स्टँडवरून
तरी मी लटकलेलोच शहराच्या हाताला
हा केव्हाचा मागे पडतो शहराचा आवाज
तरी माझं फिरणं शहराच्या रस्त्यांवरून

ही प्रवासाची वेळ, म्हणजे चिंतांच्या यादीची एक जाडजूड वही...
गाडी जेव्हा थांबते गावाच्या स्टँडवर ; अंधार ठणकत असतो
एका मरगळलेल्या अवस्थेतच उतरतो गावाच्या सडकेवर
आणि आंधळा असल्यागत चाचपडत चालतो
ओळखीचं हसणं नाही, मित्रांचं भेटणं नाही
अंगणांची विचारपूस नाही, चौकातलं थांबणं नाही
तरी अंधार दाट अन शरीर नकोसं होतं
गावातल्या अपेक्षित ठिकाणी पोहोचेपर्यंत
किती उदास करून जातं गावात आपल्या घराचं नसणं
आणि अजूनही वाजतच असते मोबाईलची बेल
होताच येत नाही आउट ऑफ कव्हरेज या शहरापासून...