फळांचे टार्ट

वरदा व. वैद्य

फळांचे टार्ट

फळांचे टार्ट करण्यासाठी टार्ट पॅन घरात असणे आवश्यक आहे. टार्ट पॅनचा तळ त्याच्या कडांपासून वेगळा करता येतो.

क्रस्टसाठी जिन्नस :

मैदा - सव्वा कप
लोणी - ९ टे.स्पू. (अर्धा कप +१ टे.स्पू.)
पिठीसाखर - पाव कप

क्रस्ट करण्यासाठी मार्गदर्शन :

ओव्हन ३५० अंश फॅ. तापमानावर तापवत ठेवा. ९ इंची टार्ट पॅनला आतून (कडा व तळ) तेलाचा/लोण्याचा हात लावा वा कुकिंग स्प्रे मारा. लोणी मऊ होण्यासाठी आधीच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा. फूड प्रोसेसरमध्ये वरील सर्व जिन्नस घाला आणि फूड प्रोसेसर पल्सवर चालवून ह्या सर्व जिन्नसांचे गोळे तयार होईपर्यंत पल्स करा. हा गोळा टार्ट पॅनच्या तळाशी व कडांवर सारख्या जाडीचा थर होईल अशा पद्धतीने थापा. काट्याने ह्या क्रस्टला तळावर अनेक ठिकाणी भोके पाडा. त्यामुळे क्रस्ट भाजताना वाफ जाण्यासाठी जागा तयार होईल. टार्ट पॅन ओव्हनमध्ये ठेवून हलका गुलाबी रंग येईपर्यंत, सुमारे १२ ते १५ मिनिटांसाठी भाजा. टार्ट पॅन हात लावण्याइतपत कोमट झाल्यावर क्रस्ट टार्ट पॅनमधून ताटलीत काढा. क्रस्ट ठिसूळ असल्यामुळे तो टार्ट पॅनमधून काढताना विशेष काळजी घ्या. क्रस्ट पूर्ण गार झाल्याशिवाय त्यावर सारण पसरवू नये वा फळांचे तुकडे मांडू नयेत.

सारणासाठीचे जिन्नस :

क्रीम चीझ - ६ औंस
साखर - १/३ कप
लिंबाचा रस - १ टे.स्पू.
वॅनिला अर्क - अर्धा टी.स्पू. (वैकल्पिक)
कूल व्हिप - ४ औंस

सारणासाठी क्रमवार मार्गदर्शन :

पहिले चार जिन्नस एका वाडग्यात घालून हातमिक्सरने एकजीव लगदा होईपर्यंत ढवळा. हा लगदा गार झालेल्या क्रस्टवर सगळीकडे पसरवा. कूल व्हिप थोडे पातळ होण्यासाठी बाहेर काढून ठेवा. मात्र ते फार पातळ व्हायला नको. सहज पसरवता येईल एवढेच पातळ व्हायला हवे. कूल व्हिप क्रीमचीझच्या मिश्रणावर पसरवा.
आता त्यावर वेगवेगळ्या फळांच्या फोडी व काप कलात्मक पद्धतीने मांडा. बहुधा स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, किवी, संत्रे, अननस, सफरचंदे, द्राक्षे वा पीच यापैकी उपलब्ध फळांच्या फोडी व काप वापरले जातात. ह्याव्यतिरिक्त इतर फळे वापरण्यासही हरकत नाही.

अधिक माहिती - टार्टसाठीचा क्रस्ट वाढण्याच्या आदल्या दिवशी करून (फ्रीजमध्ये) ठेवला तरी चालेल. मात्र सारण पसरवणे आणि फळे मांडण्याचे काम वाढण्यापूर्वी जास्तीतजास्त दोन-तीन तास आधी केल्यास चांगले.