वारी --१ तयारी

(ज्यांची मुले  परदेशात गेली आहेत वा जाऊन स्थायिक झाली आहेत अशाना परदेशगमन हे वारीसारखे नित्यकर्म होते. अशा वारीतील काही अनुभव

    काशीस जावे नित्य वदावे असे जुन्या काळी म्हणजे ६०-७० वर्षापूर्वी (किंवा त्याहीपूर्वी)म्हटले जायचे.त्यावेळीच्या मध्यमवर्गीयांच हे स्वप्न असायच.त्यावेळच्या लोकांची स्वप्नही फारशी उच्च प्रतीची नसायची,त्यातले हे त्यामानाने बरेच वरच्या दर्जाचे ! इंग्रजांच्या काळात इतकी सुरक्षितता होती की काठीला सोने लावून खुशाल काशीयात्रा करून यावे असे त्या लोकांच म्हणण असल तरी इंग्रजान काठीला लावायला सोनच इतक कमी ठेवल होत की काठीला सोन बांधून काशीला जाऊ इच्छिणारा त्याअगोदर स्वर्गाचीच वाट धरायचा.
   पण आता मात्र जो तो काशीलाच काय परदेशातच पळतोय.मात्र स्वतःच्या खर्चाने परदेशी जाण्यापेक्षा परदेशी कंपनीने किंवा आणखी कोणी आमंत्रित केले म्हणून आणि पेपरात फोटो वगैरे छापून येऊन परदेशी जाण्यातली ऐट काही वेगळीच! तसा स्वखर्चाने जाणाऱ्याना फोटोही स्वखर्चाने (जाहिरातीच्या दरात)छापून घेता येतो म्हणा ! सरकारी खर्चाने जाता येण्यासाठी तुम्ही मंत्री अगर किमान नगरसेवक तरी असावे लागते.मग स्वदेशात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीची पहाणी परदेशात करण्याच्या महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात तुमचा समावेश होऊ शकतो.
    मी अभियांत्रिकी पदवीधर असलो तरी त्या काळात अभियंत्याना परदेशी पाठवणे भारतीय कंपन्याना कमीपणाचे (पेक्षा अनावश्यक आणि खर्चिक) वाटे, तरीही जी काही थोडीफार शक्यता असे तीही मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होऊन आपल्या वाट्याला येणार नाही याची काळजी घेतली होती. नाही म्हणायला तशी एक शिष्यवृत्ती होती. त्यात तंत्रशिक्षकाना (त्यावेळच्या) पश्चिम जर्मनीस पाठवण्यात येई. ती शिष्यवृत्ती घेऊन प्राध्यापक प. जर्मनीस जाऊन काय शिकून येत कोणास ठाऊक कारण या योजनेतून जाऊन येणाऱ्या प्राध्यापकानी तेथे काय शिकवण्यात आले याविषयी कधी एक चकार शब्द उच्चारल्याचे ऐकिवात नाही शिष्यवृत्ती देण्यापूर्वी अशी अटच तंत्रशिक्षण खात्याकडून घालण्यात येत असावी.याबाबतीत सर्वच सरकारी खात्याइतकेच किंवा जरा अधिकच हे खाते दक्ष ! ( त्यावेळी अण्णा हजारे यांचे माहितीच्या अधिकारासाठीचे उपोषण व्हायचे होते.) त्यामुळे शिक्षकाने आपली पात्रता वाढवू नये आणि एकाद्याने स्वत: च्या प्रयत्नाने वाढवलीच तर तिचा उपयोग तंत्रशिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तरी करू नये असा दंडकच त्या काळी होता. तरीही मी नुकताच नोकरीला लागल्यामुळे या सगळ्या खाचाखोचा मला माहीत नसल्यामुळे त्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्यावर मी खरेच आपण प. जर्मनीला जाणार अशा गोड धुंदीत काही दिवस वावरलो त्यासाठी जर्मन शिकण्याचा उपद्याप पण केला.पण मंत्री नगरसेवक अशा महत्त्वाच्या व्यक्तीना महत्त्वाच्या कामासाठी परदेशात पाठवण्यातच सरकारच्या परदेशी चलनाची (अक्षरशः)वाट लागत असल्याने प्राध्यापकाना परदेशात पाठवून त्यांचा दर्जा वाढवण्याची चैन सरकारला परवडण्यासारखी नव्हती त्यामुळे माझा परदेश या शब्दाशी संबंध केवळ परदेश शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याना लागणारी शिफारसपत्रे देण्यापुरताच काय तो राहिला पण माझ्या हातावर विधात्याने मारून ठेवलेली परदेशगमनाची रेखा अशी थोडीच वाया जाणार होती? त्यामुळे मुलगा परदेशी गेल्यामुळे का होईना आम्हालाही परदेशगमनाचा योग आलाच पण तो त्यानंतर जवळ जवळ ३५-३६ वर्षानी म्हणजे मी सेवानिवृत्त झाल्यावर !
    आमचे चिरंजीव माझ्यासारखे " असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" म्हणून कोणी आपल्याला परदेशी पाठवील अशा भ्रमात न रहाणारे असल्यामुळे अभियांत्रिकी पदवी प्राप्त होताच आम्हाला पत्ताही लागू न देता त्याने खटपट करून एक दिवस आपण अमेरिकेत जाणार आहोत असे जाहीर केले.अर्थात मला जे जमले नाही ते त्याने जमवल्याचा आम्हाला आनंदच झाला. तो जाऊन दोन वर्षे झाल्यावर तो आता लवकर परत येत नाही अशी खात्री झाल्यावर मात्र एकदिवस आम्हाला जावे लागेल अशी आशा वाटू लागून पारपत्र म्हणजे पासपोर्ट मिळवण्याच्या मागे आम्ही लागायचे ठरवले.अशा बाबतीत चालढकल करण्यात मी पटाईत आहे. पण त्यावेळी मी औरंगाबादला होतो आणि तेथे पासपोर्ट ऑफिस नुकतेच निघाले होते आणि ही बातमी फारच कमी लोकाना माहीत होती इतकी की मी त्या ऑफीसमध्ये गेलो तेव्हा तेथे पासपोर्टसाठी फॉर्म मागायलासुद्धा माझ्याव्यतिरिक्त फक्त एकच गृहस्थ तेथे असलेल्या एकुलत्या एक खिडकीपाशी होता.त्यामुळे फार लांबलचक रांग आहे अशा छान कारणासाठी माझा पासपोर्ट काढण्याचा विचार रद्द करणे मला शक्य झाले नाही. या वेळी आम्हाला परदेशी पाठवण्याचा जणु चंगच दैवाने बांधला होता .
         पारपत्रासाठी अर्ज करण्याचा विहित नमुना मिळाल्यावर तो घरी आणून त्यावर पुरेशी धूळ जमण्याची मी वाट पाहिलीच त्याशिवाय अर्जासोबत जोडावयास लागणाऱ्या एका प्रमाणपत्राची त्रुटी माझ्याकडे होती . म्हणजे आमच्या लग्नाचे प्रमाणपत्र माझ्याकडे नव्हते (.पूर्वी नवराबायकोचा एकमेकावर भरभ्क्कम विश्वास असल्यामुळे अशा प्रमाणपत्राची गरज पडत नसावी) आणि ते मिळवण्यासाठी पुन्हा लग्न करणे शक्य नव्हते.त्यासाठी एक शपथपत्र करून भागणार होते असे या गोष्टीचा अनुभव असणाऱ्या माझ्या मित्राने मला सांगितले पण त्यासाठी लागणाऱ्या स्टॅंपपेपरचा नेहमीप्रमाणे दुष्काळ होता.अर्थात मला चालढकल करायला आणखीच चांगले कारण मिळाले. तेवढ्यात माझ्या आणखी एका मित्राची मुलगी परदेशी गेलेली असल्याने तोही माझ्याशी या विषयावर बोलल्यावर आणि तो माझ्याहूनही चालढकलप्रवीण असताना त्याने पारपत्र काढलेसुद्धा हे ऐकल्यावर मात्र मी एकदम जागृत झालो पण त्याने माझ्यावर आणखी एक बोंबगोळा टाकला. त्याने सांगितले की आपण सरकारी सेवेत असताना पारपत्र काढायचे असल्यास संबंधित खात्याच्या प्रमुखाचे ना हरकत प्रमाणपत्र लागते.म्हणजे थोडक्यात माझ्या थोड्याफार झालेल्या मानसिक तयारीला खीळ घालण्याचे काम या बातमीने केले.त्यतल्यात्यात सुदैवाची गोष्ट एवढीच होती की असा अर्ज मला आमच्या महाविद्यालयाच्याच कार्यालयात देऊन तो पुढे तंत्रशिक्षण संचालकांकडे पाठवण्याची विनंती केली की भागणार होते आणि अशा लिखापढीत शिक्षकी पेशात असल्याने मी चांगलाच तयार असल्याने असा अर्ज कार्यालयात सादर करून माझे वाट पहाण्याचे व्रत मी इमाने इतबारे चालवले.तेवढ्या काळात लग्नाच्या प्रमाणपत्राविषयी हालचाल करावी असा मी मानसिक प्रयत्न करत होतो कारण शारीरिक हालचाल होण्यासाठी मनाची तयारी आवश्यक असते ना ! पण तेवढ्यात मला आठवले की फार पूर्वी सौभाग्यवतीस तिचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याची इच्छा झाली असताना लग्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता पडली होती. त्यावेळी पाच रुपयाच्या स्टॅंपपेपरवर लग्न केल्याचे शपथपत्र तिला विद्यापीठात सादर करावे लागले होते. माझ्या वकील मित्रानेच तो स्टॅंपपेपर आणून मला कोर्टाची पायरी चढायला लावले होते. न्यायाधीशमहारांजांशी हस्तांदोलन करण्याचा अगाऊपणा माझ्या हातून घडत होता तो त्याने मोठ्या शिताफीने मध्ये पडून टाळला होता. त्या शपथ पत्राची प्रत विद्यापीठास तिने दिली होती अर्थात मूळ प्रत घरातच असण्याची शक्यता होती आणि या वेळी मात्र आमच्या दोघांच्याही व्यवस्थितपणामुळे ते शपथपत्र सापडायला मुळीच त्रास झाला नाही. मात्र हे पाच रुपयाचे प्रमाणपत्र चालते की नाही अशी शंका आम्हा दोघानाही वाटत होती कारण मला तद्विषयक सल्ला देणाऱ्या मित्राला त्यासाठी कमीतकमी वीस रुपयांचा तरी स्टॅंपपेपर लागतो असे सांगण्यात आले होते तरीही आता तरी तेच द्यायचे आणि बघू पुढे काय होते ते असा निर्णय आम्ही घेतला. आणि आम्ही चेंडू तंत्रशिक्षण संचालकांकडे टोलवल्यामुळे सध्यापुरतातरी तो विषय पार विसरून गेलो .
    मला परदेशात जायची मुळीच घाई नाही हे आमच्या तंत्रशिक्षण कार्यालयासही समजल्यामुळे नेहमीची दफ्तरदिरंगाई न करता एक दिवस अगदी अलगदपणे ना हरकत प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या कार्यालयात अवतीर्ण झाले. त्यानुसार मी परदेशात कुठल्याही प्रकारचे गैर वर्तन न करण्याच्या बोलीवर तसे प्रमाणपत्र मला देण्यात येत आहे असे लिहिले होते.मी बायकोसह जात आहे हे कळले असते तर त्यानी अशी शंकाही व्यक्त केली नसती अशी मला खात्री वाटते.
     पारपत्र दाखल करण्यासाठी काही लोक मध्यस्थ वापरतात. हे मध्यस्थ अर्ज कार्यालयात दाखल करण्यापलीकडे काहीच करत नाहीत असा इतरांचा अनुभव आहे. आणि अजूनही औरंगाबादच्या पारपत्र कार्यालयास म्हणावी तशी ऊर्जितावस्था प्राप्त झालेली नसल्याने केवळ अर्ज दाखल करण्यासाठी मध्यस्थाची नेमणूक करावी असे मला वाटले नाही.आता मात्र पारपत्रासाठी अर्ज दाखल करण्यात कसलाच अडथळा न उरल्याने मला दोघांचे अर्ज दाखल करावे लागले. मला पारपत्र मिळण्याची मुळीच घाई नाही याची कुणकुण पारपत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कशी लागली देव जाणे आणि त्यामुळे या कामासाठी विलंब लावण्याचा त्यांचा उत्साहच नष्ट झाला असावा ! पण तरीही काही अडथळे शिल्लक होतेच, काऱण मी महाविद्यालयातून एक दिवस घरी आलो तेव्हा घरी पोलिस येऊन गेल्याची सुवार्ता सौ. ने माझ्या कानावर घातली . सुदैवाने त्यावेळपर्यंत दूरदर्शनवर मालिकांचा सुळसुळाट झाला नव्हता त्यामुळे त्या बातमीने माझ्या मनावर कसलीच उलटसुलट प्रतिक्रिया झाली नाही शिवाय मालिकेत अशा वेळी त्या भागाचा शेवट करून प्रेक्षकाना पुढील दिवसापर्यंत टांगून ठेवतात तसे काहीही न करता लगेचच तो पारपत्रासाठी पोलिस तपास करायला आला होता हेही तिने सांगून टाकले. अशा वेळी पोलिस कार्यालयात जाऊन त्यांची गाठ घेऊन योग्य ती दक्षिणा द्यायची असते असे शहाण्या माणसांनी सांगून ठेवले आहे.खर तर मला पारपत्र मिळायला कितीही उशीर झाला तरी हरकत नाही अशी माझ्या मनाची तयारी असल्याने त्या शहाण्या माणसांचा सल्ला पाळण्याचे मला कारण नव्हते. पण " होणारे न चुके जरि तया ब्रह्मा असे आडवा " असे म्हणतात ना ! त्यामुळे आमच्या पोलिस तपासातही काही अडचण राहिली नाही असेही सौ. ने मला सुनावले. त्याचे कारणही तसेच मजेदार होते.त्यावेळी औरंगाबादला असणारे पोलिस कमिशनर तिच्या नात्यात होते आणि ते एकदोनदा आमच्या घरी आल्याचे तपासणी करणाऱ्या पोलिसाने पाहिले होते ते तुमचे कोण एवढ्या प्रश्नाचे उत्तर  आमची तपासणी विशिष्ट प्रकारे न करण्यास पुरेसे झाले. आणि खरोखरच एक दिवस रजिष्टर पोस्टाने आमचे दोघांचेही पासपोर्ट घरबसल्या आमच्या हातात पडले
      पारपत्र जरी १९९९ च्या शेवटीशेवटी मिळाले तरी अमेरिकेला जाण्याचा योग मात्र तब्बल तीन साडेतीन वर्षानी म्हणजे २००२ च्या मे महिन्यात आला.खरे तर आता योग आणणे आमच्याच हातात होते पण मी नोकरी करीत असताना गेल्यास फार दिवस रहाता येणार नाही अशी शक्यता होती. असे घाईघाईने जाऊन येण्यात आता आम्हाला स्वारस्य नव्हते. जायचे तर आरामशीरपणे जाऊन यावयास हवे असे आम्हास वाटत होते. आणि त्याप्रमाणे मी सेवानिवृत्त झाल्यावर आता आम्हाला जाण्यास काही अडचण नाही या कल्पनेने चिरंजीवानी आम्हाला तिकिटे आणि यू.एस. भेटीचे निमंत्रणही पाठवून दिले असे निमंत्रण व्हिसा मिळण्यासाठी आवश्यक असते म्हणे.
त्यामुळे तिकिट मिळाल्यामुळे आता व्हिसा मिळवण्याच्या मागे लागणे आवश्यक होते.या बाबतीत आपण भारतीय जितके उदारहृदयी तितकेच हे अमेरिकन लोक संकुचित वृत्तीचे ! त्यामुळे अमेरिकन कॉन्सुलेटसमोर व्हिसा मिळवण्यासाठी उत्सुक भारतीयांच्या रांगा लागलेल्या असतात असा पूर्वी जाऊन आलेल्यांचा अनुभव होता.त्यांनी सांगितलेल्या हकीकतींवरून त्यासाठी अर्ज भरून दिल्यावर महिन्यादोनमहिन्यानी मुलाखतीला बोलावतात ,तेथे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या प्रश्नाच्या फैरीला तोंड द्यावे लागते.ते काय विचारतील याचा नेम नाही, अमेरिकेला कशाला जाताय , कुणाकडे जाताय,तिथे जाऊन काय करणार,तेथे तुमचा खर्च कोण करणार एक ना दोन अरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात.आमच्याकडे पहा बरे कसे आवजाव घर तुम्हारा.कोण आल कोण गेल याकडे लक्ष देण्याचा आगाऊपणा आम्ही करतो तरी का? मुळीच नाही.काही दिवस त्यांना घुसखोर म्हटले तरी नंतर तेच आमच्यावर दादागिरी करू लागतात. बरेचदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकही आमच्याकडे येऊन गेल्यावर मग आम्हास जाग येते आणि त्यानंतर त्यांचा पाहुणचार करायचा राहिला ही रुखरुख दूर करण्यासाठी त्यांना आपल्याकडे पाठवावे म्हणून पोर्तुगाल,पाकिस्तान अशा मित्रांची विनवणी करावी लागते. आपली ही सहिष्णुतेची ऐतिहासिक परंपरा कोठे आणि हे अमेरिकन लोक म्हणजे असहिष्णुतेचा कळस. बोटाचे ठसे काय , समोरून बाजूनी फोटो काय काही विचारू नका?जॉर्ज फर्नंडिससारखे लढाऊ व्यक्तिमत्वसुद्धा यांच्या तडाक्यातून सुटले नाही तेथे आमच्यासारख्यांची काय कथा !त्यातून ९/११ नंतर मामला अधिकच कडक झालेला.
          मुलाखतीला गेलेल्या एका मित्राने मुलीच्या बाळंतपणासाठी जातो असे सांगण्याचा त्याच्यामते चतुरपणा केला तर त्यासाठी तुम्हाला जायच कारण नाही आमच्या देशात हॉस्पिटलात सगळ व्यवस्थित करतात असे सांगून त्याला माघारी पाठवण्यात आले तर दुसऱ्या एका असाच चतुरपणा करणाऱ्या मित्राच्या बायकोला तुम्ही एकट्या मॅनेज करू शकाल का असे विचारून तिला एकटीलाच व्हिसा देऊन मुलीच्या बापाला हात चोळत गप्प बसवले.आमच्या एका स्नेह्याच्या भावी जावयाच्या अडचणीमुळे त्यानी मुलीला वेगळ्या पद्धतीने व्हिसा मिळवून देऊन अमेरिकेत पाठवले आणि लग्न अमेरिकेत करण्याचा घाट घातला तर आता तिच्या आईबापानाच व्हिसा मिळून लग्नास हजर रहाता येईल की नाही अशी पंचाईत निर्माण झाली आहे अशा व्हिसाविषयक कहाण्या ऐकून आपल्याला व्हिसा न मिळाल्यामुळे आपले पोराने पाठवलेले तिकिट रद्द करावे लागते की काय अशी भीती मला पडली. पण या सर्व संकटांना तोंड देऊन जाण्याचा प्रयत्नही मी कदाचित करणार नाही या शंकेने बुशमहाराजांनी प्रसन्न होऊन त्याच सुमारास एक नवी योजना अमलात आणण्याचा सुविचार केला होता.
             आमच्याचबरोबर आमचे आणखी एक मित्रही त्यांच्या मुलाच्या अडचणीवर मात करण्यासाठी अमेरिकेला प्रथमच निघाले होते. म्हणजे आमच्या वयाचे पालक अमेरिकेतील मुलांकडे जातात ते आपल्या सुनेच्या अथवा मुलीच्या प्रसूतीसाठी म्हणजे ड्यूटीवर आणि आमच्यासारखे जाणारे म्हणजे सुट्टीवर जाणारे अशी वर्गवारी करण्यात येते त्यामध्ये ते ड्यूटीवर जाणार होते अर्थात त्यांचे जाणे अधिक महत्त्वाचे होते त्यामुळे जोडीदार म्हणून त्यांना बरोबर घेऊन जावे असा विचार मी केला आणि एका सुप्रभाती आम्ही दोघे पुण्यातील व्हिसाऑफिसला गेलो. अर्थात तोपर्यंत बुशमहाराजांचे हृदयपरिवर्तन झाल्याची बातमी आमच्यापर्यंत पोचली नसल्याने आम्ही आपले आपल्याला मुलाखतीला बोलावल्यास मराठीत बोलायचे की इंग्लिशमध्ये बोलायचे याविषयीच चर्चा करत होतो कारण अमेरिकन  इंग्लिश उच्चार आम्हाला कळणार नाहीत तेवढेच आमचे फर्डा इंग्रजी त्यांना समजणार नाही (कारण दोघेही प्राध्यापक)अशी दुहेरी खात्री आम्हाला होती त्यामुळे हा प्रश्न दुभाषाची मदत घेऊन सोडवायचा निर्णय आम्ही करत होतो.व्हिसा ऑफिसच्या पायऱ्या चढण्यापूर्वी एक सुटाबुटातील व्यक्ती हातात बॅग घेऊन उभी होती. त्यामुळे तिला पहाताच आम्ही आपले त्या इमारतीत व्हिसासाठी आवेदनपत्र कोठे मिळेल याची चौकशी केली आणि अहो आश्चर्यम् जणु आमचीच वाट पहात असल्यासारखी त्या व्यक्तीने आपल्या बॅगेतून सरळ व्हिसासाठी लागणारे आवेदनपत्रांचे नमुनेच काढून दिले आणि त्यानंतर जी बातमी सांगितली त्यामुळे आम्हाला आनंदाने वेडच लागायचे राहिले कारण त्याच वर्षी बुशसाहेबानी कृपावंत होऊन पेटी परवाना पद्धत (ड्रॉप बॉक्स )ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली होती.त्यानुसार पुण्यातील नागरिकांना पुण्यातील कॉन्सुलेटच्या ऑफिसमध्ये अर्ज सर्व प्रमाणपत्रांसह आणि आवश्यक शुल्काच्या धनादेशासह दाखल केल्यावर तसे प्रमाणपत्र मिळेल, आणि चार पाच दिवसात तुमच्या घरच्या पत्त्यावर कोरियरने व्हिसाच येईल,ते प्रमाणपत्र दाखवल्याव्वर ते तुमच्या हाती पडतील असे सांगण्यात आले आणि अत्यानंदाने ते आवेदनपत्राचे नमुने घेऊन आम्ही घरी परतलो. ते भरून त्यासोबत योग्य रकमेचा धनादेश मिळवण्यासाठी मी जवळची आणि आपली म्हणून महाबँकेत गेलो तर त्यानी तुम्ही बँकेचे खातेदार आहात का अशी सुरवात केल्यावर कदाचित व्हिसा ऑफिसपेक्षाही इथले लोक अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे असे वाटून मी दुसऱ्या पण जवळच्याच बँकेतून ड्राफ्ट काढला आणि दुसऱ्याच दिवशी सर्व कागदपत्रांसह सौभाग्यवतीलाही घेऊन व्हिसा ऑफिसला गेलो तिला मुलाखतीसाठी नाही तरी निदान ऑफिस कसले आहे हे कळावे आणि मला जरा नैतिक धैर्य प्राप्त व्हावे म्हणून ! आम्हाला कसलेच प्रश्न न विचारता आमचे कागदपत्र खिडकीतील गोऱ्या महिलेने घेतले आणि तपासून आम्हाला तशा अर्थाची पावती दिली.आणि चार दिवसानी घरच्या पत्त्यावर व्हिसा  येईल ही पावती देऊन ते ताब्यात घ्या असे तिने सांगितल्यावर मोठ्या धाडसाने मी मग आम्हाला दहा वर्षाचा व्हिसा मिळेल का असा प्रश्न विचारल्यावर तिने हे मुंबईच्या ऑफिसमधील लोक ठरवतील असे सांगून आमची बोळवण केली चार दिवस जीव टांगणीला लागल्यावर अखेर पाचव्या दिवशी खरोखरच कूरियरने  दोघांचे व्हिसा (की व्हिसे ?) आले आणि अहो आश्चर्यम् ! आम्हाला चक्क दहा वर्षाचा अनेकप्रवेशी ( मल्टिपल एंट्री ) व्हिसा मंजूर होऊन आला होता.