वारी १७

           अमेरिकेच्या पहिल्या वारीहून परत आल्यावर आता शांतपणे पुण्यातच रहायचे आणि सुजितकडून दुसऱ्या नातवंडाची वर्दी मिळाल्यावरच परत जायचे असा ठाम निश्चय मी केला पण  आपल्या ठरवण्यावर गोष्टी घडत नसतात. आमच्या पुण्यातील मुलाला-जयवंतला  तो काम करीत असलेल्या टी. सी. एस्. या कंपनीने अमेरिकेत पाठवायचे ठरवले आणि त्याला कमीतकमी तीन वर्षे तरी जावे लागेल असे समजल्यावर सून भाग्यश्री आणि नातू प्रथमेश यांना घेऊनच  जाणे त्याला आणि आम्हालाही योग्य वाटले. अर्थात आमचे त्याच्याबरोबर जाणे आवश्यक होते अशातला भाग नव्हता पण त्याच वेळी त्यानेच दुसरे नातवंड येण्याची वर्दी दिली. त्याचा जन्म अमेरिकेत व्हावा असा निर्णय तो आणि त्याच्या पत्नीने सर्वानुमते घेतला आणि मग त्याच्या आगमनाचे वेळी आम्ही अमेरिकेत असावे असे ठरले. त्यामुळे आम्हाला परत वारीवर निघणे भाग पडले.
          जयवंतला कंपनीतर्फे जायचे असल्यामुळे कंपनीच्या सोयीने जाणे भाग होते. त्याच्या कुटुंबाची तिकिटे कंपनी काढून देणार होती आणि त्यांचा प्रकल्प अमेरिकेत सुरू करण्याची त्याना घाई असल्याने त्याला व्हिसा मिळाला की लगेचच निघायचे असल्यामुळे बेळ फारच कमी होता, म्हणजे व्हिसा मिळण्यापूर्वीच तयारी करून ठेवायची आणि व्हिसा मिळाला नाही तर सगळी तयारी वायाच जाणार होती. त्यामुळे नवीन बॅगा न घेता आमच्यासाठी घेतलेल्या बॅगा घेऊनच जायचा निर्णय घेण्यात आला. म्हणजेच तेवढ्यात सगळी तयारी करून सर्वांचे एकदम जाणे शक्यच नव्हते त्यामुळे त्यांनी अगोदर जायचे आणि मागून सगळी नीट आवरा आवर करून आम्ही जायचे असा विचार झाला,
       तिघांचा व्हिसा ज्या दिवशी मिळाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी निघायचे होते. निघायच्या वेळेस प्रथमेशला एकदम तापाने पछाडले आणि त्याला त्यांया बरोबर निघणे जमते की नाही अशी परिस्थिती उत्पन्न झाली पण सुदैवाने कसाबसा सहार विमानतळ त्याने गाठला. मुलीला आणि जावयाला निरोप द्यायला आम्चे व्याही पण आले होतेच‌अग्ळ्यांचा निरोप घेऊन त्याप्रमाणे जूनमध्ये ते तिघे  मुंबईहून नेवार्कला गेले. सुजित तेथे असल्याने गेल्यावर लगेच कुठल्याच गोष्टीबद्दल काळजी करायचे कारण जयवंतला पडले नाही, सुदैवाने त्याच्या प्रकल्पाचे ठिकाण सुजितच्या राहत्या जागेपासून फारच जवळ होते इतके की सुजितलाच त्याच्या कामाचे ठिकाण म्हणजे न्यूयॊर्क त्याच्यापेक्षा अधिक लांब होते. म्हणजे ती जागा जणू काय सुजितने जयवंतसाठीच घेतली होती.
       आम्ही पहिल्या वेळी ज्या जागेत राहिलो होतो त्या हिडन व्हॅलीमध्येच ही त्याची नवी जागा होती फक्त मधल्या काळात सुजितने इमारत बदलली होती. पहिल्या वेळी तो एका बेडरूमच्या जागेत राहत होता तर इथे दोन बेडरूम्स होत्या आणि मुख्य म्हणजे ही तळमजल्यावर होती त्यामुळे प्रथमेशने कितीही पाय आपटले तरी शेजारी तक्रार करणार नव्हते. उलट पुढे त्याने आरडाओरडा सुरू करताच आम्हालाच पोलिसाना बोलावतो अशी धमकी त्याला द्यावी लागू लागली.
          या वेळी आम्हाला जायची तयारी मागील वेळेप्रमाणे शेंडीपासून म्हणजे पासपोर्ट व्हिसा या गोष्टीपासून करायची नव्हती पण मागील वेळी घर जयवंत भाग्यश्रीवर सोडून गेलो होतो तसे आता करायचे नव्हते. जयवंतला घाईने जावे लागल्यामुळे आणि आम्ही आणलेल्या बॅगा त्यानी नेल्यामुळे पुन्हा एकदा बॅगांची जमवाजमव करणे आले. यावेळी दोन नवीन बॅगा घेऊन दोन मात्र पूर्वी अमेरिकेला जाऊन आलेल्या आमच्या मित्रांकडून आणल्या. ते आता अमेरिकेत जाण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे घरातील जागा अडवणारे हे सामान आनंदाने त्यांनी आम्हाला दिले.
       मागील वेळी फोन वीजबिल या गोष्टींची आम्हाला काळजी करण्याचे कारण नव्हते पण यावेळी जाण्यापूर्वी टेलिफोन आणि महावितरण यांच्याबरोबर झुंज घेणे आवश्यक होते. आपल्याकडे काही गोष्टी मिळण्यासाठी झगडावे लागले हे समजू शकते पण त्या काही काळ नको असल्या तर केवळ त्या त्या खात्याना कळवून चालत नाही. टेलिफोन खात्याने जाताना तुमचा फोन आमच्या कस्टडीत ठेवा आणि त्याबद्दल २५०/- दरमहा भरा असा किंवा सरळ सरेंडर करा असे दोन पर्याय दिले. आल्यावर लगेच फोन परत मिळेल याची खात्री त्यावेळी नसल्याने पहिला पर्याय स्वीकारावा की काय असे मला वाटू लागले पण टेलिफोन खात्याला सहा महिने फोन न वापरल्याबद्दल ३०००/- रु. दान करण्यापेक्षा सरेंडरच करू आल्यावर बघू असे ठरवले. 
         महावितरणने वीजबिल कोणालातरी दुसऱ्याला भरायला सांगा कारण त्या काळात कमीतकमी येणारा ३०/- रु. दरमहा विजेचा आकार भरावाच लागेल असे सांगितले. मी आगाऊ पैसे भरतो असे म्हटल्यावर आमच्याकडे तशी पद्धत नाही असे सांगण्यात आले. थोडक्यात ग्राहकाची कसलीही सोय शक्य असेल तरी करायची नाही ही वृत्ती, शेवटी आगाऊ पैसे घेण्यात महावितरणचे काही नुकसान नाही उलट थोडे पैसे आगाऊच मिळणे फायद्याचे आहे हे त्याना पटवून द्यावे लागले. त्यानंतर पुढच्या वेळेस जयवंतला सांगून ऑनलाइन वीजबिल भरण्याची सोयच मी करून घेतली.
          याशिवाय सामानखरेदी बॅगा भरणे आणि त्यांचे वजन करून बघणे या गोष्टी चालू होत्याच. यावेळी जाताना एकावेळचा अनुभव जमेस असला तरी प्रवासाचा ताण घेण्याचा नेहमीचा स्वभाव उचल खात होताच. आमच्याच संकुलातील एका सदनिका धारकाने गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केल्याचे सौ. ने पाहून ठेवले होते त्याच्यावरच मुंबईस आम्हाला सोडण्याचे काम सोपवून मग मी निर्धास्त झालो.
       सुजितने तिकीट पाठवले असे कळवल्यावर आणि आम्ही दोघेच घरात असल्याने आम्ही घरात नसतानाच तिकीट घेऊन पोस्टमन आला तर काय घ्या म्हणून बरेच दिवस आम्ही कोणीतरी एकजण घरात सदैव राहील याची दक्षता घेत होतो, बरेच दिवस झाले तरी तिकिटाचा पत्ता नाही. पण अमेरिकेतून रजिस्टर पोस्ट केले असले तरी त्याची पावती अमेरिकेत परत पाठवायची नसल्यामुळे की काय पोस्टमनने आमच्या सदनिकेच्या टपालपेटीतच एक दिवस तिकिटे  टाकलेली आढळली. आमच्या सुदैवाने आम्ही पाहीपर्यंत ती सुरक्षित राहिली हे आमचे भाग्य !
           काही विशेष घोटाळा न होता   पॅरीसला दोन तास विमानातच थांबून एअर इंडियाच्या विमानाने आम्ही नेवार्कला पोचलो आणि या वेळी आमच्या स्वागताला दोन्ही मुलगे सहकुटुंब हजर होते विशेषत: ज्याला पहायला मी अगदी उत्सुक होतो तो नातू प्रथमेशही आला होता. गेल्यावर या मुक्कामात त्याच्याइतका किंवा त्याच्यापेक्षाही अधिक निरुद्योगी मीच राहणार असल्यामुळे त्याने मला ताब्यातच घेतले.
         मागील वेळेसारखी ही केवळ आनंदयात्रा म्हणून आमची अमेरिका भेट नव्हती बराच काळ थंडीचे दिवस घरातच बसून काढावे लागणार अशी कल्पना असल्यामुळे मी यावेळी इतर काही मराठी पुस्तकांबरोबर मामासाहेब दांडेकर संपादित ज्ञानेश्वरीची प्रत घेऊन गेलो होतो. एकादी तरी ओवी अनुभवावी या उक्तीनुसार तिचे वाचन करून अध्यात्मज्ञानात काही भर पडते का हे बघण्याचा विचार होता. अर्थात अध्यात्म ही उक्तीपेक्षा कृतीची चीज आहे आणि कितीही ग्रंथ वाचले आणि त्याला कृतीची जोड देता आली नाही तर ते व्यर्थ असे माझे मत आहे. बरेच लोक सकाळी पूजापाठ करून आणि ज्ञानेश्वरी वा तत्सम ग्रंथ वाचून परमार्थाचा बराच मोठा डोस घेऊन  मग ऑफीसमध्ये स्वार्थ साधायला मोकळे होतात तसे करण्यात मला रस नव्हता पण ज्ञानेश्वरी वाचायला सुरवात तर करून बघूया आपल्या वृत्तीत काही फरक पडतो का म्हणून वाचू लागलो. वाचताना एक गोष्ट जाणवली की वाचायचा कंटाळा येत नाही पण त्याच बरोबर थोडे वाचन झाल्यावर आपण काय वाचले याचा विचार केल्यास फारच थोडे लक्षात राहिल्याचे जाणवले.सगळी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण होऊनही या परिस्थितीत अजूनही फारसा फरक पडलेला नाही . कदाचित अजून काहीवेळा वाचल्यावर फरक पडेल. 
      मध्यंतरी डॉ. रवीन (रविंद्र)थत्ते यांची दूरदर्शनवर मुलाखत पाहिली होती. त्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न केल्यावर त्यानाही हाच अनुभव आल्यामुळे त्यानी दररोज ती लिहूनच काढली असा उल्लेख केला होता. डॉ. थत्ते सायन हॉस्पिटलमधील नावाजलेले प्लास्टिक सर्जन असून त्यांनी ज्ञानेश्वरीच्या वाचनानंतर लिहिलेली तीन पुस्तके १)जाणीव, २)मी हिंदू झालो आणि ३)माणूस नावाचे जगणे मी वाचली होती आणि मला ती भावली होती. आयुष्यात कधीही देवपूजा न केलेल्या आणि पूर्णपणे अश्रद्ध वातावरणात वाढलेल्या व्यक्तीच्या जीवनावरही ज्ञानेश्वरीचा किती प्रभाव पडू शकतो आणि त्याना पडलेल्या अनेक प्रश्नांची उकल   करण्याची प्रेरणा  त्याना  ज्ञानेश्वरीतून कशी प्राप्त झाली यावर अतिशय सहज शैलीत भाष्य केलेले असे निबंध त्या पुस्तकांत आहेत. त्यानंतर त्यानी ज्ञानेश्वरीचे इंग्रजीत भाषांतर केले आहे असे मला कळले. मी ते वाचलेले नाही.
        माझ्याबाबतीत मुद्दाम आठवणीने ठेवलेली वस्तू (विशेषत:चष्मा)कोठे ठेवली हे न आठवणे आणि त्यासाठी सौ. ला बोलावून तिला शोधायला सांगणे ही आता नित्याची बाब झाली असल्याने वाचलेले पुन्हा न आठवणे ही गोष्ट केवळ ज्ञानेश्वरीच्याच नव्हे तर आता सगळ्याच बाबतीत अनुभवाला यायला लागली होती. त्यामुळे डॉ. थत्ते यांच्याप्रमाणेच आपण ज्ञानेश्वरी नुसतीच न वाचता लिहून काढावी असे माझ्या मनाने घेतले आणि अमेरिकेत दुसऱ्यांदा गेल्यावर जरा स्थिरस्थावर होताच तो प्रयोग मी सुरू केला. अर्थासह लिहीत असताना बरेच लिखाण करावे लागते असे पाहिल्यावर माझ्या आळशी स्वभावाने उचल खाल्ली आणि ओवीचा अर्थ  गद्यात न लिहिता आजच्या भाषेत ओवीरूप लिहिता आला तर लिहायला आणि नंतर पुन्हा वाचायला सोयीचे जाईल असे वाटल्यामुळे पहिल्या २०-२५ ओव्यानंतर  ओवीबद्ध स्वरूपात जसा जमेल तसा अर्थ आजच्या रूढ मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करू लागलो आणि तो प्रयत्न जमू लागला.
       या काळात मी मनोगती झालो नव्हतो किंवा मनोगत त्यावेळी अस्तित्वात नसेलही.त्यामुळे माझा हा प्रयत्न मनोगतवर प्रसिद्ध करणे शक्य झाले नाही मात्र त्यानंतरच्या माझ्या अमेरिकावारीत श्री. विनायक हे मनोगती ज्ञानेश्वरीचे अध्याय मनोगतवर प्रसारित करत असताना १५ व्या अध्यायानंतर माझे ओवीबद्ध रूपांतर मी मनोगतवर काही काळ प्रसारित करू शकलो. या उपक्रमाचा मला एक फायदा निश्चितच झाला आणि तो म्हणजे मला वेळ घालवणे हा प्रश्न कधीच पडला नाही. जेव्हां वेळ मिळेल तेव्हां मी ज्ञानेश्वरी घेऊन बसू लागलो. आणि तो काळ तरी खूप आनंदात जाई.
     त्याच वेळी सुजितला कामावरून परत येताना संकुलातील रस्त्यावर चालत असलेले  एक जोडपे जवळजवळ आमच्याच वयाचे मराठीत बोलत असलेले दिसले आणि त्यामुळे कुतूहल निर्माण होऊन  त्यांच्याजवळ जाऊन त्याने चौकशी केल्यावर तेही कुलकर्णीच निघाले आणि आमच्याचसारखे ते त्यांच्या मुलीकडे आले होते आणि त्याच संकुलात राहत होते. मुख्य म्हणजे तेही सेवानिवृत्त प्राध्यापकच आणि दररोज ज्ञानेश्वरीपठण करणारे निघाले. मग त्यांची आणि आमची चांगलीच दोस्ती झाली. त्यांचे आणि माझे काही समान मित्रही निघाले आणि समानशीलेषू व्यसनेषू सख्यं या उक्तीचा पुरेपूर अनुभव त्यावेळी आम्हाला आला. 
     या दुसऱ्या वारीतला महत्वाचा अनुभव म्हणजे आमच्या कुटुंबातील आम्ही सर्व सभासद प्रथमच एकत्र राहिलो. कारण मुलांची शिक्षणे होऊन ते नोकरीला लागल्यावर म्हणजे गेली दहा वर्षे आम्ही दोन्ही मुलांबरोबर कधीच राहिलो नव्हतो. कधी लग्नाकार्यानिमित्त एकत्र जमलो असू तेवढेच. बाकी सुजित अमेरिकेत, जयवंत पुण्यात आणि आम्ही औरंगाबादला असे आमचे  तिघांचे तीन संसार होते आम्ही आता  पहिल्यांदाच अगदी सास बहू मालिकासारखे   दोन मुले सुना आणि नातवासह एकत्र राहू लागलो. आजकाल लग्न झाले की मुलाला वेगळा फ्लॅट घेऊन देण्याच्या जमान्यात आमचा बरोबर उलटा प्रवास झाला म्हटले तरी चालेल. आणि तो खूप आनंददायक पण होता.
        एकत्र कुटुंबपद्धती फायदेशीर असते असा निष्कर्ष एका ( की दोघा) चिनी समाजशास्त्रज्ञानी काढल्याचे वाचनात आहे. त्यात त्यानी ऊर्जा बचत होते असा एक मुद्दाही मांडला आहे. आंतरजालावर शोध घेतला असता एकत्र कुटुंब,   लग्नानंतर मुलाने वेगळे राहणे, वेगळे राहून आपल्या आईवडिलाशी चांगले संबंध ठेवणे या तीन पर्यायांपैकी पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायाला अधिक पसंती देण्यात आलेली असली तरी अजूनतरी प्रत्यक्षात पहिला पर्याय कमी प्रमाणात अस्तित्वात आहे असे आढळते. माझ्या अगदी जवळच्या मित्रांची मुले लांब राहून चांगले संबंध ठेवणेच पसंत करतात असे निदर्शनास आले आहे.
         बरेचदा मुलांना वेगळे राहणे अपरिहार्य होते कारण बहुतेक मध्यम वर्गीयात जागा मोठ्या कुटुंबास एकत्र राहता येण्याइतक्या मोठ्या नसतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणानंतर मुले मूळ गावीच राहतील याची निश्चिती नसते. अगदी माझेच उदाहरण घेतले तर औरंगाबादला घर बांधताना मी अगदी मुलांच्या लग्नानंतरही सर्वांना एकत्र राहता यावे म्हणून तीन शयनगृहे असलेले घर बांधून घेतले इतका विचार करून की पुढे घराची वाटणी करण्याची पाळी आली तरी ती व्यवस्थित करता यावी. पण कसचे काय इंजिनियर होताच दोघे दोन दिशांना पळाले आणि आम्हाला दोघानाच घरात एकमेकाला शोधण्याची वेळ आली.