ह्यासोबत
मिनिआपोलिस
आमच्या पाचव्या वारीच्या काही दिवस अगोदरच जयवंतला एडिसनहून हलावे लागले होते.कारण टी.सी.एस.च्या ज्या प्रकल्पासाठी तो तेथे गेला होता तो संपला होता.त्यावेळी तो जी.ई.हेल्थ या कंपनीसाठी काम करत होता.त्यांनी त्यांचे खाते सत्यमकडे सोपवायचे ठरवले (त्यावेळी सत्यमचा घोटाळा बाहेर आला नव्हता)त्यामुळे त्याला दुसऱ्या जागी जावे लागणार हे उघडच होते कारण टी.सी.एस.चा दुसरा ग्राहक एडिसनजवळ नव्हता.त्याला दोन तीन जागा सुचवण्यात आल्या होत्या.हा सगळा प्रकार आम्ही चौथ्यांदा अमेरिकेस गेलो होतो तेव्हांच चालला होता.पण आम्ही परतल्यावर त्याला मिनिआपोलिसचे अलियांझ या कंपनीच्या कामावर रुजू व्हायला सांगण्यात आले आणि तो मार्चमध्ये तेथे सहकुटुंब गेला होता.आम्ही फेब्रुवारीत परतलो होतो त्यामुळे लगेचच परत जाऊ असे वाटत नव्हते पण आमच्या नातवांचा हट्ट आणि त्याना पुन्हा पहाण्याची इच्छा यांनी आम्हाला भारतात बसू दिले नाही आणि त्यामुळे आम्ही परत आलयावर सहा महिन्यातच परत जावे असे वाटू लागले आणि पुन्हा २००८ च्याच ऑगस्ट महिन्याच्या २७ तारखेस आम्ही कॉंटिनेंटलच्या विमानसेवेने परत अमेरिकेत जावयास निघालो.
कॉंटिनेंटलने आम्ही यावेळी प्रथमच प्रवास केला.या उड्डाणाचा मोठा फायदा असा वाटला की हे मुंबईहून रात्री नऊ वाजता निघून कोठेही न थांबता सरळ पहाटे ५-४५ ला नेवार्कला जाणारे उड्डाण आहे,त्यामुळे मुंबईतून आडवेळेला निघावे लागत नव्हते,प्रवास जवळजवळ रात्रीच होत होता आणि नेवार्कला न्यावयास येण्यासाठी मुलाला रजा घ्यायचे कारण नव्हते.एकूण प्रवासही ठीक झाला.
नेवार्कला पोचल्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्यानेही लगेचच सहा महिन्याच्या वास्तव्याची परवानगी दिल्यावर सुटकेचा निश्वास सोडून बाहेर पडल्यावर आम्हाला आमच्या बॅगा आमची जणु वाटच पहात असल्यासारख्या सामानाच्या पट्ट्यावरून फिरत असलेल्या दिसल्या. येऊनजावून त्यासाठी ट्रॉल्या मात्र सहा डॉलर भरून घ्यावयाच्या होत्या त्या बरोबर असणाऱ्या एका सहप्रवाशाने सोडवून दिल्यावर (अर्थात सहा डॉलर आम्ही दिले) लगेचच आम्ही बाहेर पडलो त्यावेळी पहाटेचे साडेसहाच वाजत होते. मात्र नेहमीप्रमाणे आम्हाला न्यावयाला येणाऱ्या सुजितचा वा संयुक्ताचा पत्ता नव्हता या वेळी जयवंत आणि त्यांचे कुटुंबीय तेथे नव्हतेच त्यामुळे. आजपर्यंत प्रत्येक वेळी आम्ही बाहेर पडताच सर्व मुला नातवंडांचे चेहरे पहाण्याची संवय झालेल्या आम्हाला पहाटेच्या थंड वेळी अशा थंड्या स्वागताची अपेक्षा नव्हती. मग एक भारतीय व्यक्ती भ्रमणध्वनी करत्त असताना पाहिल्यावर तिलाच वेठीस धरून त्याच्या मोबाइलवर संयुक्ताचा नंबर लावला आणि तो लागला ती विमानतळावरच होती पण नेहमीप्रमाणे आम्ही एअर इंडियाने न आल्यामुळे तिचा अंदाज जरा चुकला होता.म्हणजे ती कॉंटिनेंटलसाठी राखीव पार्किंग बघूनच तिकडे गेली होती पण तेथील प्रवेशद्वार आंतरराष्ट्रीय विमानाच्या प्रवाशांना बाहेर किंवा आत जाण्यासाठी नव्हते ही सूचना तिला दिसली नव्हती.काहीका असेना आमचा संपर्क साधला होता त्यामुळे ती केव्हातरी येईल आणि आम्हाला घेऊन जाईल याची खात्री होती.
शेवटी आम्ही एकदाचे पाचव्यांदा अमेरिकेत पोचलो होतो. एडिसनला आम्ही पोचल्यावर लगेचच गणपती आणि गौरी यांची आगमन होत होते.खरे तर त्यांच्या स्वागतासाठीच इतके तडातापडीने आम्ही गेलो होतो.त्यामुळे आम्ही फारशी विश्रांती न घेता लगेचच तयारीला लागलो.यावेळी संयुक्ता पण नोकरीवर जाऊ लागली होती पण सुदैवाने त्या काळात तिला सुट्टी म्हणजे रजा मिळाली होती आणि त्यामुळे अगदी पुण्यात व्हावा तशाच उत्साहात गणपतीचे व गौरींचेही आगमन झाले. आजूबाजूच्या भारतीय कुटुंबानी त्यात भाग घेऊन आमच्या उत्साहात भर घातली आणि त्यानंतर आम्हाला नवरात्र साजरे करण्यासाठी मिनिआपोलिसला जाण्याचे वेध लागले.
. नेवार्कहून मिनिआपोलिसला २० सेप्टेंबरला निघणारी आणि तिकडून २५ डिसेंबरला परत येणारे कॉंटिनेंटलचेच उड्डाण आम्हाला मिळाले.हा प्रवास फक्त दोनच तासाचा असल्यामुळे आणि मिनिआपोलिसची प्रमाणवेळ एडिसनपेक्षा एक तासाने मागे असल्यामुळे आम्ही संध्याकाळी ५-४५ लाच मिनिआपोलिसला पोचलो.
डोमेस्टिक उड्डाणाच्या बाबतीत एक गोष्ट चांगली असते त्यात पोचवायला अगर न्यायला येणारी मंडळी अगदी बॅगेज ज्या विभागातून उतरवून घेतो तेथपर्यंत आत येऊ शकतात त्यामुळे आमच्यासारख्या नवागतांची पंचाईत होत नाही.आमचे विमान मिनिआपोलिसच्या विमानतळात शिरतानाच मी जयवंतला मोबाईलवरून संपर्क साधून आमचे उड्डाण तेथे पोचल्याची वर्दी दिली त्यामुळे बॅगेज क्लेमच्या पट्ट्यापाशीच तो आमची वाट पहात उभाच होता त्यामुळे पट्ट्यावरून सामान काढण्यापासूनच आम्हाला त्याची मदत झाली.सौ.भाग्यश्री आणि नातवंडे येण्याची अपेक्षा आणि आवश्यकता नव्हती.
मिनिआपोलिसमध्ये प्रवेश करतानाच हे जरा लहान शहर आहे हे जाणवले. येथे थंडी फारच आहे अशी भीती आम्हाला घालण्यात आली होती,आणि त्यात तथ्यही होतेच कारण आम्ही येण्यापूर्वीच एकदा तेथे हिमवर्षाव होऊन गेलाच होता. त्यामुळे आम्ही विमानात बसतानाच स्वेटर ,जॅकेट असे कपड्यांचे एकावर एक थर चढवले होते त्याची काही आवश्यकता नव्हती असे खाली आल्यावर जाणवले. कारण आम्ही येणार असे कळल्यावर बहुधा थंडीने आपला मुक्काम हलवला होता इतका की त्या दिवशी एडिसनपेक्षाही हॉपकिन्स या जयवंत रहात असलेल्या उपनगराचे तपमान जास्त होते.
हॉपकिन्स या विभागात जयवंतची सदनिका होती.त्या रस्त्याचे नाव व्हॅन ब्यूरेन अवेन्यू नॉर्थ असे आहे आणि त्याच्या इमारतीचा क्रमांक ४२१ होता.या संकुलाचे नाव रॅम्सगेट असे असून त्यात तीन इमारती आहेत त्यातील बाकीच्या दोन ५०० आणि ७२५ क्रमांकाच्या होत्या. हे क्रमांक कसे देण्यात आले हे कोणालाच माहीत नाही पण बहुधा हे प्लॉट क्रमांक असावेत असे मला वाटते.
आमचे स्वागत जरी कमी थंडीने झाले तरी एकूण येथे थंडी खूपच असते.कधीकधी तपमान शून्याखाली २०-२५ अंश फॅ. इतके जात असल्यामुळे रस्ते हिमवर्षावामुळे खराब होतात त्यामुळे त्यांची देखभाल चांगली असते आणि थंडी सुरू होण्यापूर्वीच रस्ते व्यवस्थित करण्याची दक्षता घेतात हे मला फिरायला जाताना पहावयास मिळाले.आणि पावसाळा सुरू आल्यावर गटारे सा करणा्ऱ्या आपल्या महापालिकांची आठवण झाली.
रॅम्सगेट संकुलाविषयी सांगणे आवश्यक आहे असे मला वाटते कारण अशा प्रकारचे संकुल असू शकते यावर निदान भारतातील तरी कुणाचाच विश्वास बसणार नाही इतकेच काय आम्ही आमच्या अमेरिकेतील परिचितांना फोन करून वर्णन केल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले.
ज्या दिवशी आम्ही रॅम्सगेटमध्ये पाऊल ठेवले त्याच दिवशी संध्याकाळी संकुलातर्फे संध्याकाळीचे गेट टुगेदर होते.त्यात सर्व संकुलातील कुटुंबे ४२१ म्हणजे आमच्याच इमारतीच्या आतील पार्टी हॉलमध्ये जमली होती.अशाच पद्धतीने महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी नाश्त्यासाठी सर्व कुटुंबांना संकुलातर्फे बोलावण्यात येते.त्यामुळे गेलो त्याच दिवशी आमच्या संकुलातील चार पाच मराठी कुटुंबांचा परिचय झाला.त्यातील एकातील आजी आजोबा पण आले होते आणि ते आमच्यासारखेच पुण्याहून आले होते एवढेच नव्हे तर आमचे काही समान मित्रही आहेत याचा शोध लागला.भारतीय कुटुंबे तर इतकी होती की आम्ही अमेरिकेत आलो नसून काही अमेरिकनच भारतात पाहुणे म्हणून आलेत असे वाटू लागले.या सर्व मराठी माणसांचे स्नेहसम्मेलन दिवाळीत आमच्या सुनेने आणि तिच्या मैत्रिणीने पुढाकार घेऊन आयोजित केले त्याला ३०-३५ जण आले होते.
रॅम्सगेट संकुलात तीन अगदी सारख्या इमारती एकमेकाकडे पाठी करून उभारण्यात आल्या आहेत आणि त्या तिन्ही इतक्या सारख्या आहेत की चुकून आपण दुसऱ्या इमारतीत शिरलो तरी पत्ता लागणे शक्य नाही.बाहेरूनही त्या अगदी सारख्या आहेत तेव्हा आत शिरताना नंबर पाहिला तरच आपण आपल्याच इमारतीत शिरतो याचा बोध होतो. एकमेकाशी काटकोन करून उभ्या असल्याने समोरील रस्ते मात्र वेगवेगळे आहेत.आमच्या ४२१ समोरील रस्ता व्हॅन ब्यूरेन अव्हेन्यू नॉर्थ तर बाकीच्या दोन इमारतीसमोरील रस्त्यांची नावे केंब्रिज रोड व लेक रोड अशी आहेत.माझा फिरण्याचा मार्ग लेक रोडवरून टायलर रोड त्याला काटकोणातील सेकंड स्ट्रीट,नंतर ब्लेक रोड व शेवटी केंब्रिज रोडवरून रॅम्सगेट असा होता. प्रत्येक इमारतीच्या समोर मोठे पार्किंग क्षेत्र तर आहेच पण समोर छान झाडी पण लावलेली आणि व्यवस्थित राखलेली आहे.समोर फुलांचे ताटवे पण आहेत.अर्थात आम्ही तेथे गेल्यावर पहिले काही दिवसच त्या सौंदर्याचा आस्वाद घेणे शक्य झाले कारण नंतर हिमवर्षावामुळे त्या सर्वांची वाट लागली एवढेच काय झाडांपैकी फक्त सूचिपर्णी झाडेच काय ती टिकून राहिली बाकी सर्व झाडांवर एकही पान पहायला मिळत नव्हते आम्ही गेल्यावर काही दिवस आम्हाला फॉल कलर पहायला मिळाले. प्रवेशद्वारासमोर रॅम्सगेटचा छाप म्हणजे मेंढ्याच्या मुखवट्याचे चित्र आहे,आणि छोटासा पाण्याचा हौद आणि त्यात काही प्रदर्शनीय दगड धोंडे छोटासा शोभेचा धबधबा पण होता.थॅंक्स गिव्हिंगपासून त्यात हरीण ,रेनडियर व स्नोमॅन यांच्या प्रतिकृतींचे लोखंडी सांगाडे विद्युतमाळांनी प्रकाशित केलेले ठेवले होते ते बहुधा नाताळपर्यंत ठेवत असावेत.
प्रत्येक इमारतीत शिरण्यासाठी एक काचेचे मोठे प्रवेशद्वार आहे त्यातून आत शिरल्यावर एक छोटा मोकळा भाग असून त्यात उजव्या बाजूस छोटे बाक ठेवलेले आहे..डाव्या बाजूस इमारतीतील भाडेकरूंची नावे लिहिलेली यादी एका काचेच्या चौकटीत लावलेली दिसते.जर तुमच्याकडे किल्ली असेल तर आतील काचेचा दुसरा दरवाजा तुम्ही उघडू शकता पण तुम्ही पाहुणे असाल तर ज्यांच्याकडे तुम्ही आला असाल त्यांच्या नावासमोरील क्रमांक समोरील फोनसारख्या तबकडीवर दाबला की त्या घरातील व्यक्ती येऊन तो दरवाजा उघडते व तुम्हाला इमारतीत प्रत्यक्ष प्रवेश मिळतो.आतील भाग वातानुकूलित असतो.आम्ही गेलो तो थंडीचा काळ असल्याने हीटर्स चालू होते.आमच्या इमारतीत संकुलाची कचेरी आहे ती या काचेच्या दारातून प्रवेश केल्यावर जो मोठा हॉल आहे त्याच्या दोन बाजूच्या मोठ्या दालनात असून आठवड्यातील सातही दिवस तेथे एक वा दोन कर्मचारी असतातच त्यामुळे काही तक्रार नोंदवायची असेल तर कोणीतरी उपलब्ध असतेच.ऑफिसातच सुटी नाणी मिळण्याची सोय आहे कारण वॉशिंग मशीनसाठी ती लागतात.समोरच्या हॉलमध्ये आपल्याला पाठवावयाच्या पत्रांसाठी पोस्टाची पेटी आहे आणि भाडेकरूंना आलेली पत्रे टाकण्यासाठी त्याच भागात प्रत्येक सदनिकेसाठी वेगळ्या छोट्या छोट्या पेट्या बसवलेल्या आहेत. त्याची किल्ली सदनिकाधारकाकडे असते.या हॉलच्या आत गेल्यावर वर जाण्यासाठी जिना आणि त्याचशेजारी एलेव्हेटरही आहे पण तो फार हळू चालतो इतका की त्याच्या शेजारी "In case of immergency use the staircase"सूचना आहे हे वाचून हसू येईल पण हा एलेव्हेटर खरे तर जड सामान घेऊन आलेल्या वरच्या भाडेकरूंसाठी आहे.येथे आठवड्यातून एकदा अगर दोनदाच खरेदीसाठी बाहेर पडता येत असल्याने एकदम बरेच सामान आणावे लागते आणि इतके सामान घेऊन जिन्यावरून चढणे अवघड जाते.सामान वाहून नेण्यासाठी ट्रॉलीजही ठेवल्या आहेत त्या जिन्यावरून चढवणे शक्यच नसते म्हणूनच एलेव्हेटर लागतो नाहीतर दोनच मजले असल्यावर त्याची आवश्यकताच नाही.त्यामुळे जिन्यावरून वर चढणे आणि एलेव्हेटरमधून खाली येणे हा आमच्या धाकट्या नातवाचा आवडता खेळ होता.जिन्याच्याजवळच डावीकडे व उजवीकडे जाणारे पायरस्ते असून ते खालच्या सदनिकांकडे जातात.त्यांच्या प्रवेशद्वारांवर कोणत्या क्रमांकाच्या सदनिकांकडे ते जातात ते क्रमांक लिहिलेले आहेत.
या हॉलमध्ये दोन मोठी गोल टेबले व त्यांच्यासभोवती चार चार खुर्च्या,त्याव्यतिरिक्त दोन बाक.एक छोटे टेबल व त्यावर एक शोभेची कपबशी ठेवलेली वर काच लावलेली छोटी लाकडी पेटी,तिच्या शेजारी दोन खुर्च्या,मध्ये एक मोठे आडवे टेबल याशिवाय भिंतीवर काही चांगल्या लाकडी चित्रांच्या चौकटी याशिवाय भिंतींवर आणखीही काही शोभेच्या चिनी मातीच्या वस्तु यांनी हॉल सजवलेला आहे,हॉलमध्ये हवा वातानुकूलित असूनही दोन पंखे चोवीस तास चालूच असतात व शोभेचे व प्रकाश देणारे हंड्यांमध्ये चोवीस तास जळणारे दिवे आहेत.इमारतीच्या रचनेत लाकडाचा सढळपणे वापर ही येथील थंड हवेमुळे आवश्यक बाब बनली आहे.त्याच बरोबर आगीचाही धोका बराच असतो त्यामुळे आगीची सूचना देणारे गजर सदनिकांकडे जाणाऱ्या आतील पायवाटावर जागोजागी आहेत त्यांच्या साखळ्या इतक्या खाली लोंबतात की एकादे लहान मूलही मजा म्हणून सहज ओढू शकेल.एकदा एक भारतीय गृहिणी त्या पायवाटेवर उभी राहून तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारत उभी होती,तिच्या खांद्यावर लहान मूल होते त्याने सहज ती साखळी ओढली आणि अतिशय जोराचा आवाज करणार भोंगा सुरू झाला.आम्ही व सगळेच लोक घाबरून आपापल्या महत्वाच्या सामनाच्या बॅगा भरून बाहेरकर्च्या मोकळ्या जागेत जमा झाले.दोनच दिवस अगोदर सगळ्या सुरक्षा यंत्रणेची पहाणी करायला सदनिकेचे अधीक्षकवर्ग येऊन गेले होते आणि त्यानी अशा वेळी काय दक्षता घ्यायची त्याच्या सूचना दिल्या होत्या,त्यानुसार आमच्यासारखे पाहुणे आपले पासपोर्ट व व्हिसा एका बॅगेत भरून मध्ये जमा झाले.जरी त्या छोट्या मुलाच्या आईने आपल्या मुलाची करामत कबूल केली तरी पहाणी करायला अग्निशामक दलाची गाडी येऊन त्यांनी परवानगी दिल्यावरच आम्हाला आपापल्या सदनिकेत जाता आले.
प्रत्येक इमारतीस तीन बाजूस सदनिका असून मागील एक बाजू मोकळी ठेवून त्यात काही झाडे लावलेली होती.शिवाय कृत्रिम रीतीने टेकडीसारखा उंचवटाही मुद्दाम करून सर्वत्र भरपूर हिरवळ लावलेली आहे या मागील बाजूनेही बाहेर पडण्यासाठी इमारतीला काचेचे दरवाजे असून ते उघडण्यासाठी भाडेकरूला आपल्याकडील किल्लीचा वापर करावा लागतो.त्याच भागात दोन बार्बेक्यू भट्ट्या असून त्याच जवळ काही बाके व खुर्च्या ठेवलेल्या असतात.हवा चांगली असताना काही कुटुंबे त्या भट्टीचा वापर करून पार्टीची मजा लुटू शकतात.लहान मुलांसाठी बिंगोसारखे काही खेळ वगैरे या भागातही हवा चांगली असताना संकुलातर्फे घेण्यात येतात.या भागात आणि सर्वत्रच सीमेंटचे पायरस्ते असून हिमवर्षावानंतर बहुधा लगेचच ते साफ करण्यात येतात असे दिसले.त्यासाठी नेमलेले सेवक संकुलातच रहातात.
बहुतेक दोन शयनखोल्यांच्या सदनिका असून आत डिशवॉशर, रेफ्रिजरेटर,गॅसच्या शेगड्या व गॅसचे कनेक्शन, एक पूर्ण व एक अर्धी बाथरूम.त्यात एक टब व गरम व थंड पाण्याचे नळ तसेच वॉश बेसीनवरही,आणि स्वयंपाकघरातील बेसीनलाही, वातानुकूलन आणि उष्ण हवेसाठी वेगळी व्यवस्था या सगळ्या व्यवस्था बहुतेक सर्वच सदनिका संकुलाप्रमाणे.पण येथील वैशिष्ट्य म्हणजे माझा मुलगा रहायला आला तेव्हा बाथरूम व स्वयंपाकघरात कागदी हातरुमाल व टॉयलेट पेपर,छोटी सेंटची बाटली व वेलकमची छोटी पाटी त्याच्या स्वागतासाठी संकुलातर्फे ठेवण्यात आलेले पाहून त्याला आणि हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले.नंतर त्याच्याच विभागासाठी भारतातून आलेल्या त्याच्या सहकाऱ्याला हाच अनुभव आला.त्याच्यासाठी सदनिका राखून ठेवल्याबद्दल जयवंतला २०० डॉलरची भेटही मिळाली.येथे सदनिकांची संख्या बरीच असल्यामुळे असेल पण भाड्याने देणे च्या पाट्या जागोजागी दिसल्या आणि सध्या जागांचे भावही पडल्याने विकाऊ घरांच्या पण ! अशी स्थिती आपल्याकडे कधीच येणे शक्य नाही.
संकुलातर्फे महिन्याच्या एक तारखेस ऑफीससमोरील टेबलवर कुकीज व थंड वा गरमही पेय सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठेवलेले असते.प्रत्येक व्यक्तीने दोन कुकीज व एक ग्लास वा कप पेय घ्यावे अशी अपेक्षा असते. महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी वा शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता अपार्टमेंटच्या पार्टी रूममध्ये डेसर्ट या नावाखाली केक्स,पाय व आणखी काही वस्तू ठेवलेल्या असतात आणि सात ते आठ आपल्या सोयीप्रमाणे जाऊन तेथील टेबलांवर बसून तुम्ही खाऊ शकता अथवा वेळ नसेल तर डिशमध्ये घेऊन घरी जाऊ शकता.एका गुरुवारी डिनर असते. ते संध्याकाळी ६-३० ते ८ या काळात असते.एका संध्याकाळी ४ ते ५-३० या काळात चित्रपट दाखवण्यात येतो. महिन्याच्या चौथ्या रविवारी सकाळी कॉंटिनेंटल ब्रेकफास्ट ९-३० ते ११ या काळात असतो यात कुकीज,केक्स,फळे व गरम वा थंड पेय यांचा समावेश असतो.या प्रत्येक कार्यक्रमास संकुलाचे कर्मचारी हसतमुखाने प्रत्येकाचे स्वागत करून देखरेख करीत असतात.आश्चर्य म्हणजे ११ वाजल्यानंतर त्यातील काही वस्तू उरल्या तर त्या कर्मचाऱ्यांच्या घरी न जाता ऑफीस समोरील टेबलवर त्या ठेवल्या जातात आणि जे सकाळी येऊ शकले नसतील असे भाडेकरू त्यांचा आस्वाद घेऊ शकतात याशिवाय अडल्ट बिंगो किड्स बिंगो,चिल्ड्रेन्स क्राफ्ट असे कार्यक्रमही असतात.
याशिवाय होमवर्क हेल्पर असा एक उपक्रमही राबवला जातो त्याला थोडी फी असते व त्यासाठी वेगळी खोली असून तेथे लहान मुलांची बरीच पुस्तके काही खेळणी व शैक्षणिक साहित्य ठेवलेले आढळले.काही ठराविक दिवशी शाळेत जाणाऱ्या मुलाना गृहपाठ करण्यास मदत केली जाते.प्रत्येक आठवड्याच्या सुरवातीला त्या आठवड्यातील कार्यक्रमाची छापील माहितीपत्रिका प्रत्येक इमारतीत प्रवेश करण्याच्या प्रत्येक दारात प्रवेश केल्यावर दिसेल अशी काचेच्या फ्रेममध्ये लावून ठेवलेली असते.
या संकुलाचे आणखी एक मजेशीर वैशिष्ट्य असे आहे की तुम्हाला जर कराराच्या मुदतीपूर्वी जागा सोडून जावे लागले तर तुम्ही संकुल व्यवस्थेतर्फेच त्या काळात पोटभाडेकरू ठेऊ शकता आणि त्या काळात पुढील काळाचे भाडे तुम्हाला भरावे न लागता तो पोटभाडेकरू भरतो,मात्र तुम्ही तसे न करता जागा सोडली तर कराराची मुदत भरेपर्यंत भाडे तुम्हाला भरावे लागते,अर्थात हा नियम सर्वच संकुलात असतो पण इतरत्र ही पोटभाडेकरू ठेवण्याची सोय नसते. प्रत्यक्षात तुमची कराराची मुदत संपल्यावर जर तुम्हाला पुढे रहायचे असेल तर भाडे काही प्रमाणात वाढते पण तेच तुम्ही दुसऱ्या कोणी जागा सोडल्याने पोटभाडेकरू म्हणून गेलात तर मात्र पूर्वीचेच भाडे चालू रहाते त्यामुळे बरेच लोक भाडे वाचावे म्हणून कराराची मुदत संपल्यावर कोणी त्याचा करार संपण्यापूर्वी सोडून जात असला तर त्याच्या सदनिकेत स्थलांतरित होतात.अगदी पोटभाडेकरू म्हणून न जाता कराराची मुदत संपल्यावर याच संकुलातील दुसऱ्या सदनिकेत नव्याने जाता येते आणि भाडेवाढ वाचवता येते अर्थात स्थलांतराची कटकट बरीच असते पण तरी पैसे वाचवण्यासाठी बरेच लोक अनेक वेळा स्थलांतर करताना आढळले.
तिन्ही इमारतींच्या बरोबर मध्यावर एक मोठी इमारत रेक सेंटर म्हणजे recreation club सारखी असून तेथे दोन टेबलटेनिसची टेबले,एक बिलिअर्ड टेबल एका मोठ्या हॉलमध्ये आणि त्यास लागून असणाऱ्या दुसऱ्या हॉलमध्ये तीन ट्रेड मिल्स,एक सायकलिंग मशीन, दोन वेगळी व्यायामाची मशीन्स,शिवाय डंबेल्स,व्यायाम करण्यासाठी योग्य छोटी टेबले अशी साधने ठेवलेली.त्या खोलीत टी.व्ही.,पंखे,वातानुकूलन अर्थातच असते.व्यायाम करायला येणाऱ्या स्त्रियांना सोयीचे जावे म्हणून एका छोट्या खोलीत लहान मुलांच्या खेळण्याची काही साधने.मुख्य हॉलच्या उजव्या बाजूस एका मोठ्या हॉलमध्ये टी.व्ही.पाच सहा आरामशीर खुर्च्या.दोन मोठी टेबले असून त्यावर बुद्धिबळ वगैरे बैठे खेळ खेळण्याची सोय असते.त्यास जोडूनच पुरुष आणि स्त्रियांची वेगळी प्रसाधन गृहे.या मुख्य हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक चाव्या सर्व सदनिकाधारकांना दिलेल्या असतात.तसेच काचेचे दार मागील बाजूसही असून त्यातून बाहेर पडल्यावर एक मोठा व एक छोटा असे पोहण्याचे तलाव आहेत अर्थात आम्ही गेलो तेव्हां थंडीमुळे ते बंद होते.त्याच्या पलीकडेही थोडा उंच भाग करून त्यावर टेबल खुर्च्या ठेवलेल्या असून उन्हाळ्यात त्यावर बसून सूर्यस्नानाचा किंवा काही पेयपान करायचे असेल तर त्याचा आनंद लुटता येतो.त्या आनंदासही थंडीचे दिवस असल्यामुळे आम्हाला मुकावे लागले.या भागातून आत प्रवेश करायला पुन्हा चावी वापरावी लागते नाहीतर आतून कोणालातरी दार उघडावे लागते.
या दारामुळे आम्ही एकदा मोठ्याच अडचणीत सापडलो होतो. डिसेंबरमध्ये तपमान अगदी कमी म्हणजे शून्याखाली गेल्यावर हिमवर्षाव होऊ लागल्यावर सकाळच्या फिरण्याच्या कार्यक्रमास आम्हाला रजा द्यावी लागली त्यामुळे त्याऐवजी रेकसेंटरमध्येच ट्रेडमिलवर आपला चालण्याचा हप्ता पूर्ण करावा असा विचार आम्ही केला आणि त्याप्रमाणे आम्ही सकाळीच तेथे जाऊ लागलो.एक दिवस हिमवर्षाव बराच झाल्याने त्या पार्श्वभूमीवर काही छायाचित्रे घ्यावीत असा विचार करून आम्ही खेळ साहित्याबरोबरच कॅमेरा पण घेऊन गेलो.हिमवर्षाव झाला असूनही चक्क छान ऊन पडले होते त्यामुळे मागील भागात गोठलेल्या तलावाच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्याचा मोह सौ.ला झाला.अर्थात त्यात आमच्या छबीपेक्षा पार्श्वभूमीच महत्वाची होती हे उघडच होते.आम्ही जाताना गरम जाकिटे,हातमोजे,गरम कपडे असा सगळा जामानिमा करून जात होतो इतका की आत शिरल्यावर आम्हाला घामच यावा त्यामुळे आत शिरल्यावर ते सगळे ओझे आम्ही उतरवून ठेवले आणि त्यानंतर फोटो घेण्याची स्फूर्ती सौ.ला झाली.त्यामुळे नेहमीच्या कपड्यावरच मागील काचेच्या दारातून आम्ही बाहेर पडलो.बाहेर पडताना चावी घेतली आहेस का हा प्रश्न मी तिला विचारला आणि तिनेही अगदी आत्मविश्वासपूर्ण होकारार्थी उत्तर दिल्यावर त्यावर शंका घ्यायचे मला काहीच कारण नव्हते.एकुलता एक फोटो काढल्यावर आम्ही आत जाण्यासाठी सौ.ने किल्ली बाहेर काढली आणि ती पाहून बेशुद्ध पडण्याची पाळी माझ्यावर आली कारण ती चावी रेकसेंटरची नसून घराची होती आणि रेक सेंटरची आम्ही काढून ठेवलेल्या जाकिटामध्ये राहिली होती.रेक सेंटरमध्ये काहीजण व्यायाम करत होते पण त्यानी आतील टी.व्ही.जोरात चालू ठेवला होता त्यामुळे आम्ही दारावर कितीही ठोठावले तरी त्यांचे लक्ष जाऊ शकत नव्हते.मागील बाजूस अगदी भक्कम कुंपण असल्याने आम्हाला पुढील भागात येता येणे शक्य नव्हते कारण पुढील दारावर ठोठावले तर आतील व्यक्तींना ऐकू येण्याची जास्त शक्यता होती.शिवाय पुढील दाराने बऱ्याच वेळा किल्ली घरी विसरून येणाऱ्या व्यक्ती ठोठावून आत प्रवेश मिळवत.मात्र पुढील दाराने प्रवेश करूनच मागेजाता येत असल्यामुळे कोणी दीडशहाणे किल्ली आत ठेवून मागील बाजूस जातील अशी शंका आतील व्यक्तींना येणे शक्य नव्हते,शिवाय मागील दार व्यायामाच्या जागेपासून पुढील दारापेक्षा जास्त अंतरावर होते.त्यामुळेही त्यावरील ठोठावणे आतल्या व्यक्तीना ऐकू जाणे अवघड होते.या सर्व कारणामुळे मी आता गोठून जाण्याची मानसिक तयारी केली.मागील कुंपणावरून चढून बाहेर पडून पुढे जाण्याचा प्रयत्नही मी करून पाहिला आणि तो माझ्या वयाला साजेसा नव्हता हे कळल्यावर तो लगेच सोडूनही दिला कारण कुंपणावरून पडून हातपाय मोडून घेण्यापेक्षा काही काळ गोठून जाणे परवडण्यासारखे होते. कारण केव्हातरी कोणाचेतरी लक्ष जाईल व आमची तेथून सुटका होईल हे निश्चित होते.सुदैवाने ऊन बऱ्यापैकी कडक असल्याने पारा जरी शून्याखाली असला तरी अगदी असह्य होत नव्हते.मी वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर कसे पडता येईल याचा विचार करत होतो.अशा थंडीत कोणी घराबाहेरही पडायला तयार नव्हते नाहीतर कोणी दिसले असते तर त्याला सांगून पुढील बाजूने ठोठावण्यास सांगता आले असते.अशी पंधरा मिनिटे गेली तीसुद्धा आम्हाला अगदी अनंत काळासारखी वाटली.सुदैवाने त्याच वेळी एका संकुलातून एक गृहिणी बाहेर पडून रेक सेंटरजवळून बाहेर जाण्याच्या विचारात होती.आश्चर्य म्हणजे नुकताच जयवंतच्या ऒफीसमध्येच रुजू झालेल्या त्याच्या सहकाऱ्याचीच ती पत्नी होती.आम्ही रेक सेंटरच्या मागील बाजूस हिमविहार करण्याचा आनंद लुटत आहोत असा तिचा समज झाला व आमच्याकडे पाहून हात हालवून ती पुढे जाऊ लागल्यावर सौ.ने आम्ही तेथे मजा लुटत नसून ती आमच्या मूर्खपणाची सजा भोगत आहोत हे सांगून पुढे जाऊन पुढचा दरवाजा ठोठावण्यास सांगितले, त्यानंतर आतील कसरतपटूंना जाग येऊन त्यानी मागील दार उघडून आम्हाला आत घेतले आणि मग जिवात जीव आला.