वारी--३

          आता अगदी हातातून दोर सुटलेल्या पतंगासारखीच आमची अवस्था झाल्यासारखे वाटले. आम्ही जणू काय एअरपोर्ट झाडायलाच पोचल्यामुळे एक्सरे स्क्रीनिंग सुरू झाल्यावर त्यावर बॅगा चढवणारे पहिले आम्हीच होतो. आमच्या चार मोठ्या आणि दोन लहान बॅगा बेल्टवरून एक्सरे मशीनखालून खडखड करत निर्विघ्नपणे पलीकडे जाऊन पडल्या आणि पलीकडील कर्मचाऱ्याने त्या प्लॅस्टिक बेल्टने सील करून टाकल्यावर विमानतळावर वाचायला म्हणून नेलेले पुस्तक आतच राहिल्याचे ध्यानात आले.पण केबिन बॅगांचे सील महत्त्वाचे नसते हे त्यावेळी तरी माहीत नसल्यामुळे गप्प बसलो. बोर्डिंग पास मिळण्यासाठी आता योग्य कौंटरवर जायचे होते अर्थात तेथेही रांग लावून उभे राहणारे आमच्याशिवाय कोणीच म्हणजे प्रवासी आणि कर्मचारी पण-- नव्हते. बसलो वाट पाहत त्यांच्या येण्याची !  कारण आता सामान त्यांच्या ताब्यात देऊन मोकळे झाल्याशिवाय हालचाल करणे अवघड होते.थोड्या वेळाने त्या कौंटरवरचे कर्मचारी आले आणि आमचे तिकीट पासपोर्ट पाहून आमच्या बॅगांना काउंटरशेजारून जाणाऱ्या पट्ट्यावर आश्रय मिळाला. आम्ही अगदी काटेकोर वजन करून आणल्यामुळे वजन जादा होण्याची शक्यता नव्हतीच त्यामुळे आमच्या चार बॅगा सुरळीतपणे आत गेल्या.आम्हाला ऐल सीट्स (कडेच्या) घ्या असे मुलाने कळवले होतो आणि आम्ही तसे म्हटल्यावर  आम्हाला पाहिजे तशा जागांचे बोर्डिंग पासेस मिळाले. यापुढे तिकिटाऐवजी तेच दाखवावयाचे.आता हातात फक्त केबिन बॅग्ज च राहिल्या आणि हलके हलके वाटू लागले.आता इमिग्रेशनमध्ये जाण्यापूर्वी बरोबर आलेल्या सगळ्यांना जाऊन सगळे ठीक जमले असे सांगितले.म्हणजे आता त्यांना सटकायला हरकत नव्हती  इमिग्रेशनच्या वाटेने आत गेले की परत बाहेर येता येत नाही,निदान आमच्यासारख्या सामान्य माणसांना तरी ! त्या टेबलापाशी बसणाऱ्या माणसाने आमचा व्हिसा आणि पासपोर्ट पाहून आम्हाला दहा वर्षाचा व्हिसा कसा मिळाला याविषयी उत्सुकता ( आश्चर्य ?)व्यक्त केली.कदाचित नुकताच त्याच्या मुलाला अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला असावा नाहीतर अमेरिकन कॉन्सुलेटने आमच्यावर मेहेरबानी केल्याचे त्याला दु : ख व्हायचे तसे काही कारण नव्हते. त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देताच आम्ही पुढे सटकलो कारण त्याची तशी अपेक्षा नसावी आणि आम्हाला उत्तर माहीत नव्हते.यापुढील भागात एका चौकटीतून प्रवेश करावा लागत होता.त्या चौकटीच्या बाहेर ठेवलेल्या टोपलीत आपले बूट,घड्याळ, पर्स , पँटचा बेल्ट, काढून ठेवावे लागते.(घाईघाईत जॉर्जसाहेबानी त्यावेळी बेल्टबरोबर इतर कपडेही उतरवले असावेत) त्या टोपल्या केबिनबॅगांसह चाळणीखालून जातात आणि पलीकडे जाऊन पडतात, आपण मात्र त्या चौकटीतून प्रवेश करायचा त्यावेळी मेटल डिटेक्टर सर्वांगावरून फिरवून आपण विमान उडवण्याच्या तयारीत आलो नसल्याची खात्री करून घेण्यात येते.पलीकडे जाताना सौ.च्या अंगावरून मेटल डिटेक्टर फिरवल्यावर आवाज आल्यामुळे मी घाबरलो पण नंतर ते चुकीचे निदान झाल्याचे कळले आणि मग आम्ही केबिनबॅगांसह विमानात चढण्याच्या लायकीचे ठरवल्यावर आम्हाला पलीकडे प्रवेश मिळाला. बोर्डिंग पासवरच कोणत्या क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून विमानात प्रवेश करावा लागेल याची नोंद असते त्या भागात जाऊन ते द्वार उघडण्याची आम्ही तेथे असलेल्या अनेक आरामशीर खुर्च्यांपैकी आम्हाला सोयिस्कर वाटणाऱ्या खुर्च्यांत बसून वाट पाहू लागलो.
       यापूर्वी विमानप्रवासाचा अनुभव नसल्यामुळे चित्रपटात नायक नायिका विमानाला लावलेल्या शिडीवरून उतरताना आपल्या आईवडिलांकडे पाहून हात हालवताना पाहिल्यामुळे आपणही तसेच प्रवेशद्वार उघडल्यावर विमानात शिडीने चढणार अशा कल्पनेने," पायऱ्या जरा जपून चढ " अशी सूचना सौ. ला देण्याचा विचार करत होतो. तेवढ्यात सहा वाजल्यामुळे आम्हाला " एअर इंडियाच्या न्यूयॉर्कला जाणाऱ्या उड्डाणातील प्रवाशांनी तयार राहावे" अशी सूचना मिळाली व आम्ही लगबगीने तयार झालो.प्रथम व्हीलचेअरवर बसणारे आणि बालके बरोबर असणारे प्रवासी आणि एक्झिक्युटिव्ह क्लास च्या प्रवाशांना आत सोडण्यात आले त्यानंतर आमच्या आसनक्रमांकानुसार आम्हाला आत सोडण्यात आले.आत गेल्यावर बऱ्याच लांबलचक बोगद्यासारख्या मार्गाने आम्ही चालू लागलो.तो मार्ग इतका लांबलचक होता की हे आता आम्हाला जे. एफ् . के. पर्यंत चालतच नेतात की काय असे वाटू लागले तोच समोर एक प्रवेशद्वार आणि त्यात हसतमुखाने उभे राहून आमचे स्वागत करणारे हवाई सुंदरी आणि इतर कर्मचारी दिसल्यावर आपण विमानानेच जाणार याची खात्री वाटून जिवात जीव आला.हवाई सुंदऱ्या बहुतेक सेवानिवृत्तीपूर्वीचा शेवटचाच प्रवास करायला निघाल्या असाव्यात. अर्थात आमच्यासारख्या सेवानिवृत्त होऊनच प्रवासाला निघणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना योग्य असली तरी इतर प्रवाशांची मला दया आली.त्यांनी आम्हाला आमच्या हातातील बोर्डिंग पासेस पाहून आम्ही कोठे जायचे याविषयी दिग्दर्शन केले आणि त्यांच्या सूचनेनुसार आमच्या आसनक्रमांकाकडे जाऊन हाशहुश करत बसलो.
        विमानात शिरल्यावर परत बरोबर घेतलेल्या पुस्तकाची आठवण झाली.ते पुस्तक केबिन बॅगमध्ये होते आणि केबिनबॅग आत शिरताच नेहमीच्या तत्परतेने डोक्यावरील सामान ठेवण्याच्या जागेत ठेवल्याचेही स्मरण झाले.ते काढून घ्यायचा विचार करतो तोच विमानातील कर्मचारी आणि हवाई सुंदऱ्या सगळ्या वरच्या कप्प्यांची झाकणे जोरात आवाज करत लावून जाताना बेल्ट बांधायला आणि मोबाईल बंद करायला सांगून गेल्या.तेव्हा मला बेल्टची आठवण झाली . त्याची टोके माझ्याच अंगाखाली गेलेली काढून लावायला गेलो तेव्हा एक टोक शेजारील सौ, च्या सीटचेच हातात आले आणि ते ओढून बेल्ट बांधायच्या प्रयत्नात तिच्या स्वातंत्र्यावर आक्रमण होऊन सगळ्या प्रवाशांना ऐकू येईलशा आवाजात " अहो माझा बेल्ट कशाला ओढताय ?" अशी माझी कानउघाडणी झाल्यावर आणि तिनेच माझ्या बेल्टचे तिच्याच अंगाखाली गेलेले टोक माझ्या हातात दिल्यावर मला बेल्ट लावणे शक्य होऊन कर्तव्यपूर्तीचा आनंद झाला. आता विमान चालू होण्याची आम्ही वाट पाहू लागलो  सुरवातीला बराच काळ फक्त घरघराटच ऐकू येत होता आणि वैमानिकाच्या सूचनेवरून आम्ही उड्डाण करत आहोत येवढे समजले पण विमान जागा सोडायला तयार नव्हते. अर्थात आमच्या नेहमीच्या एस् .टी. च्या प्रवासाप्रमाणे सर्व प्रवासी स्थानापन्न झाल्यावर या बसचा टायर पंक्चर झाल्यामुळे सर्व प्रवाशांनी खाली उतरून दुसऱ्या बसमध्ये बसावे अशी सूचना विमानप्रवासात होत नसावी अशी आशा मला होती. सुदैवाने वैमानिकाने काही तांत्रिक कारणामुळे विमान सुटायला उशीर होत असल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली आणि माझा जीव थोडासा भांड्यात पडला कारण तांत्रिक अडचणीमुळे किती विलंब होईल याचा अंदाज नव्हता पण लगेचच पुन्हा घरघर सुरू होऊन विमान गजगतीने चालू झाले.ते बराच वेळ चालले आणि पुन्हा थांबले मग परत ते उलट्या दिशेने धावू लागले पुन्हा ते थांबले आणि आता कसे काय होणार अशा चिंतेत मी असतानाच ते एकदम वेगाने योग्य दिशेने धावू लागले ते आता मात्र उड्डाण करायचेच या करारानेच ! आणखी वीसपंचवीस सेकंदातच जमिनीशी संपर्कामुळे चाकांचा होणारा खडखडाट एकदम बंद होऊन आपण हवेत तरंगत आहोत याची जाणीव झाली. आमची आसने खिडकीजवळ नसली तरी शेजारच्या खिडकीतून आपण मुंबईच्या आकाशात विहार करू लागल्याचे आणि खालील रस्ते,इमारती.माणसे लहान होत जात आहेत हे समजत होते. समोरच्या पडद्यावर विमानाचा वेग, जमिनीपासून उंची निघण्याची वेळ गंतव्य स्थान आणि अंतर तेथे पोचण्याची वेळ या गोष्टी दिसू लागल्या.विमान योग्य त्या उंचीवर स्थिर झाल्यावर  विमान वर जाताना कानाला दडे बसण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्वानुभवी माणसांच्या सल्ल्यानुसार कानात घालण्यासाठी कापसाचे बोळे बरोबर घेतले होते  त्यांची आठवण आता झाली आणि आता कानात बोळे घालायचे काही कारण नाही हे समजले..पुस्तक काढावे काय असा विचार करत होतो पण तेवढ्यात समोरील पडद्यावर संकटकाळी तुमच्या डोक्यावरील ऑक्सिजन मास्क कसा वापरायचा किंवा विमान पाण्यात पडल्यास लावावयाचे लाईफ जॅकेट कसे वापरायचे याचे दिग्दर्शन झाले.त्यानंतर आता बेल्ट सोडायला आणि हालचाली करायला हरकत नाही अशी सूचना मिळाल्यावर मी वरून पुस्तक काढावे काय याचा विचार करू लागलो,तेवढ्यात मनोरंजनासाठी विमानात खुर्चीच्या मागील पिशवीत हेडफोन होते.ते खुर्चीस असलेल्या कनेक्शन पॉंईंटला जोडल्यावर आणि कानाला लावल्यास संगीत अथवा समोर चालू असलेल्या चित्रपटातील संवाद ऐकणे शक्य होते.हे लक्षात आले.पण येथेही बसच्या प्रवासाचाच अनुभव माझ्या वाटणीस आला. अगदी वातानुकूलित लक्झरी बसने प्रवास केला तरी नेमकी माझ्याच खुर्चीची पाठ हटवादीपणे आपला ताठ बाणा सोडायला तयार होत नाही.आणि रात्रभर इतर लोकांचे घोरणे मला ताठ मानेने आणि पाठीने मला ऐकून घ्यावे लागते.येथे मी कानाला हेडफोन लावल्यावर काहीच ऐकू येत नव्हते  मात्र नेहमीप्रमाणे कनेक्शन करण्यात चूक करणारी माझी बायको मात्र संगीत ऐकण्यात ( की समोरील चित्रपट बघण्यात) गुंग झाली.मी तिला तसे सांगताच तिने मी लावलेल्या कनेक्शनची पाहणी केली आणि ते बरोबर असल्याचे प्रमाणपत्र देताच विमानसुंदरीस बोलावून तिला माझी अडचण सांगितल्यावर आता विमान चालू झाल्यावर काही करता येत नसल्याबद्दल तिने दिलगिरी व्यक्त केली.व ती उदार मनाने मी स्वीकारली.(कारण दुसरा पर्यायच नव्हता)आमच्या बायकोने आपल्या कानाला हेडफोन लावून माझ्याशी बोलण्याचे कनेक्शन तोडून टाकले होते. त्यामुळे मी मात्र समोरच्या खुर्चीच्या पाठीवर असलेल्या पुस्तिकेत विमान समुद्रात पडल्यास तरंगण्यासाठी दिलेले जाकीट कसे फुगवावे आणि वापरावे किंवा खुर्चीच्याच वरून येणारा ऑक्सिजनचा मुखवटा तोंडावर कसा चढवावा याविषयी दिलेल्या सूचना वाचत बसलो.आणि इतरेजन संगीत चित्रपटाचा आस्वाद घेत असताना विमान समुद्रात केव्हा पडते याची वाट पाहत बसलो. अर्थात त्या सूचनांचा एवढा अभ्यास केल्यामुळे विमान खरोखरच समुद्रात पडल्यास मी वाचणार होतो अशातला भाग नव्हता फार तर बुडता बुडता ( आपल्या पेश्याला अनुसरून) त्या विषयावर एकांडे लेक्चर देऊ शकलो असतो.पण त्यातही दुः खाची बाब ही की हा लेक्चर देता देता (तानाजी जसा लढता लढता) मेला असे सांगायला तरी कोणी उरेल की नाही याचीही शंकाच होती.पण थोड्या वेळाने सौ. ने उदार मनाने आपल्या खुर्चीचे कनेक्शन मला दिले आणि मलाही संगीत ऐकू येऊ लागले.आणि थोड्याच वेळात तिच्या औदार्याचे कारण कळले.एक म्हणजे चित्रपटाची भाषा तिला कळत नव्हती. अर्थात ती मलाही फार समजत  होती अशातला भाग नव्हता, संगीताच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची एकच कॅसेट  एअर इंडियाच्या साठ्यात उपलब्ध होती आणि प्रत्येक पंधरा मिनिटांनी तीच पुन्हा पुन्हा लावली जात होती,थोडक्यात वीस तासाच्या प्रवासात सर्व गाणी अथवा ख्याल प्रवाशाला मुखोद्गत व्हावेत अशी एअर इंडियाची इच्छा असावी.इतर चॅनेलवरील रॉक आणि पॉप संगीतात आम्हा दोघांनाही मुळीच रस आणि गम्य नव्हते.खाद्यपेयांच्या ट्रॉलीज मधून मधून येत होत्या पण नेमका तो मंगळवार असल्यामुळे आणि तो आमचा उपवासाचा दिवस असल्यामुळे   त्यांच्या खानपानापैकी सुका मेवा काही फळे आणि चहा आणि काही शीतपेयांचाच काय तो आम्ही समाचार घेऊ शकलो. मधल्या काळात मोठ्या धाडसाने मी केबिन बॅग काढून त्यातील पुस्तक काढून वाचायला सुरवात केली आणि रात्री १२ पासून डोळ्याला डोळा न लागल्याने मला हळूहळू झोप लागली आणि जाग आली तेव्हा लंडनचा विमानतळ आला आता पट्टे आवळा अशी सूचना ऐकूनच.