वारी १९

                  प्रणवच्या जन्माच्या  आनंदात   दुसरा दिवस आम्ही मोठ्या उत्साहात सुरू केला. नेहमीप्रमाणे सकाळचे कार्यक्रम पार पाडून मी प्रथमेशबरोबर फिरून आलो. हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी डबा बनवणे वगैरे कामात महिलावर्ग गुंतला. संध्याकाळी आपल्या आईबरोबर प्रणव घरी येणार म्हणून त्यांची खोली तयार करून ठेवायचा विचार काका काकू करू लागले. आज हितेशभाई पण अगदी वेळेत आला आणि प्रथमेश अगदी खुषीत त्याच्याबरोबर शाळेत गेला. घरी आल्यावर तो बेबाजीशी खेळणार होता. काका डबा आणि इतर काही आवश्यक वस्तू घेऊन हॉस्पिटलला गेला.
          सव्वातीन वाजता प्रथमेश घरी आला ते नाचतच आला. अजून इंग्रजीचा गंधही नसताना त्याने कसे काय कुणास ठाऊक पण आपल्याला बेबी ब्रदर झाल्याची बातमी शाळेत सगळ्या मित्रांना आणि टीचरनाही सांगितली होती आणि त्या सर्वांनी त्याला त्याबद्दल ग्रीटिंग कार्डस करून दिली होती. टीचरनीही दादा झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे छान कार्ड बनवून त्याला दिले होते. संध्याकाळपर्यंत वेळ काढण्यासाठी त्याला घेऊन नुकतेच मित्र झालेल्या कुलकर्णींच्याकडे गेलो. त्यांनाही एक नातू प्रथमेशपेक्षा थोडा लहान होता. नातू झाल्याचे वृत्त ऐकून त्यानाही आनंद झाला. गप्पा मारण्यात बराच वेळ गेला आणि त्यांचा फोन वाजला म्हणून त्यानी घेतला तर तो माझ्यासाठीच होता, फोनवर आमची सौ. होती तिच्या सुरात जरा काळजीचा भास झाला. सुजित हॉस्पिटलला गेल्यावर त्याचा फोन आला होता की प्रणवच्या तब्येतीत थोडा बिघाड झाल्यामुळे त्याला C.H.O.P. (चिल्ड्रेन्स होस्पिटल ऑफ फिलाडेल्फिया) मध्ये न्यावयाचे ठरले आहे. थोडक्यात आज बेबाजी घरी येणार नव्हता.
       कुलकर्णींचा निरोप घेऊन घरी आलो. घरी आल्यावर प्रथमेशची समजूत घालून त्याला त्याच्या आजीने जरा गुंतवले आणी जयवंतचा फोन काय आला ते सांगितले. प्रणव हसला की एकदम काळानिळा पडत आहे असे एका नर्सच्या लक्षात आल्यामुळे ही बाब तिने तेथील डॉक्टरांच्या निदर्शनास आणली. त्यामुळे आज दिवसभर त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते आणि खरोखरच हसल्यावर  तो काळा निळा पडत होता आणि त्याचे कारण त्याच्या हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या जोडणीतच दोष होता. त्यामुळे हृदयास शुद्ध रक्ताचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नव्हता आणि हसण्यासारख्या क्रियेत ऑक्सिजनचा जास्त वापर होताच अशुद्ध रक्ताचे प्रमाण वाढून तो काळा निळा पडत होता.
      प्रणवच्या हृदयातील हा दोष शस्त्रक्रियेनेच दूर करणे शक्य होते. हे १३ आणि १४सेप्टेंबरला त्याला निरीक्षणाखाली ठेवल्यावर समजले आणि त्या शस्त्रक्रियेसाठी त्याला C.H.O.P.(Children's Hospital of Philadelphia) मध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.चॉप हे अमेरिकेतील केवळ लहान मुलांवर उपचार करण्यासाठी १८५५ पासून सुरू करण्यात आलेले रुग्णालय आहे. आणि अशा प्रकारचे ते अमेरिकेतील सर्वोत्तम हॉस्पिटल आहे.
         प्रणवला  तपासण्या करण्यासाठी ठेवले होते त्यावेळी त्याला कृत्रिम ऑक्सिजन, सलाइन लावावे लागले आणि रक्तातून ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होऊ शकत नसल्याने आता शस्त्रक्रिया होईपर्यंत त्याची आवश्यकता पडणार होती, त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर, सलाइन बाटली आणि डॉक्टर्स आणि नर्सेस यांचा ताफा यासह सेंट पीटर्स हॉस्पिटलच्या ऍंब्युलन्समधून सेप्टेबरच्या १४ तारखेस त्याला चॉपमध्ये पाठवण्यात आले. मात्र त्याच्या आई बाबाना  त्याचेबरोबर  जाता आले नाही. डॉक्टरांनीच त्यांना स्वतंत्रपणे यावयास सांगितले. तो दोन दिवसाचा एकटा जीव चॉपला गेला. जन्मल्यापासून त्याने फक्त काही औषधे आणि सलाइन व्यतिरिक्त काहीच पोटात घेतले नव्हते. आणि आता आई वडिलांना सोडून एकटाच शेकडो मैलावर चालला होता. बाबा आईला घेऊन घरी आले. प्रथमेश घरी आल्यावर आईला पाहिल्यावर बेबाजी घरी का आला नाही याची चौकशी सुरू झाली आणि त्याला तोंड देणे आम्हाला अवघड झाले.
     दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ तारखेस जयवंत पहाटेच उठून फिली( फिलाडेल्फियाचे संक्षिप्त रूप)ला गेला. रेल्वे स्टेशनपासून चॉपला बस होती. ती घेऊन तो होस्पिटलला गेला. तेथून त्याचा फोन आला. ऑपरेशन सकाळी साडेअकरा वाजता ठरले होते. दोन अडीच तासात आटपेल असा अंदाज होता पण दोन तीन तास झाले तरी फोन न आल्यामुळे काळजी वाटू लागली. मधल्या काळात प्रथमेश शाळेत जाऊन घरी आला आणि बाबाही नाही आणि बेबाजीही नाही बघून त्याने थयथयाट सुरू केला. शेवटी नेहमीचा उपाय म्हणजे त्याला शॉपराइटमध्ये घेऊन जाण्याचा मला अवलंबावा लागला. सुदैवाने तेथे पिकअप व्हॅन होती,
    . शेवटी संध्याकाळी साडेसहा वाजता त्याच्या बाबाचा फोन आला. ऑपरेशन पूर्ण झाले असा. म्हणजे जवळ जवळ आठ तास ते चालले. ओपन हार्ट सर्जरी असल्यामुळे कृत्रिम हृदयावर ठेवले होते. १२ तास काळजीचे होते त्या काळात प्रणवच्या जिवास धोका होता. सुजितने जयवंतला तेथे येऊ का असे विचारले तेव्हां त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास त्याने सांगितले.
           जयवंतने आमच्या सगळ्या नातेवाइकांना आणि मित्रांना आपण दुसऱ्यांदा आणखी एका मुलाचा बाप झाल्याचे कळवले होते. त्या बिचाऱ्याला त्यावेळी काय कल्पना की अशी काही गुंतागुंत होणार आहे. त्यामुळे त्या सर्वांचेही अभिनंदनपर मेल आले होते. ते पाहताना ते पाहून जयवंतला काय वाटेल याचीच मला काळजी वाटत होती. अर्थात सध्या त्याला मेल पहायला वेळ मिळण्याची शक्यता नव्हतीच. सुदैवाने त्याच्या कंपनीतले त्याचे सहकारी त्याची इतकी काळजी घेणारे निघाले की तुझ्या कामाचे आम्ही बघून घेऊ तू फक्त प्रणवची काळजी घे असे त्यांनी त्याला सांगितले.
     सुजित दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गुरुवारी फिलीला गेला. त्याने रविवारअखेरपर्यंत तेथेच राहून जयवंतला धीर देण्याचा निश्चय केला. लहानपणी या दोघांची भांडणे सोडवणे हा आम्हाला मोठा उद्योग असे. अर्थात हा अनुभव सर्वच आईबापांना मुले लहान असताना आलेला असतोच. पण आता मात्र अमेरिकेतही एकमेकाला धीर द्यायला दोघे जवळजवळ आहेत याबद्दल मी मनातल्यामनात देवाचे आभार मानले. सुजितने गेल्यावर लगेच फोन करून प्रणवच्या प्रकृतीची माहिती दिली. दिवसभरात त्यांचे मधून मधून फोन येतच होते. प्रणवची शस्त्रक्रिया चांगली झाली होती पण इतक्या लहान बाळावर इतकी मोठी शस्त्रक्रिया झाल्यावर त्याच्या सर्व शरीरसंस्थांवर परिणाम झाला होता. बराच काळ त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावरच ठेवावे लागले. १५ तारखेस शस्त्रक्रिया झाली आणि १९ तारखेस कृत्रिम श्वसन पूर्णपणे बंद ठेवता आले आणि तो स्वत:च्या हृदयाच्या सहाय्याने श्वसन करू लागला हे कळल्यावर आम्हाला आनंद झाला. या सर्व काळात प्रणवची जन्मदात्री फारच बेचैन असणे स्वाभाविकच होते, कारण जन्मल्यापासून आपल्या बाळाला ती फक्त काही तास जवळ घेऊ शकली होती.
             शस्त्रक्रियेनंतर प्रणवच्या तब्येतीविषयी मेल जयवंतने काही लोकांना पाठवले आणि त्याच बरोबर Care page  या नावाची वेबसाइट उघडून त्याच्या प्रकृतीतील चढ उताराची दररोज नोंद त्यावर तो करू लागला. त्यावर ती साइट पाहणाऱ्यांना आपले संदेश नोंदवण्याची पण सोय होती त्याकाळात अनेक लोकानी आपले संदेश पाठवून जयवंतला धीर देण्याचा प्रयत्न केला.
           सोमवारी म्हणजे २० तारखेस प्रणवची जखम शिवून टाकण्यात आली. पण त्यानंतर रक्तदाब कमी झाल्यामुळे, रेस्पिरेटर आणि पेस मेकर लावून  ते नियंत्रणात आणण्यात आले. तरी त्याच्या प्रकृतीत चढ उतार चालूच होता. तो  care page  वरून आणि मधूनमधून येणाऱ्या जयवंतच्या फोनवरून कळत होता, आणि ज्ञानेश्वरी वाचत असलो तरी डोक्यात प्रणबचेच विचार चालत.
         २२ तारखेला भाग्यश्रीला फिलीला घेऊन जाण्याचे ठरवले कारण तिला प्रणवला पाहावे असे वाटणे स्वाभाविक होते. आईच्या दुधातून काही औषधे प्रणवला द्यायचे डॉकटरांनी ठरवले त्यादृष्टीनेही तिला जाणे आवश्यक होते. हॉस्पिटलमध्ये रोग्याच्या नातेवाइकाना राहण्यासाठी स्वतंत्र गेस्ट हाउसच होते. हॉस्पिटलपासून ते बऱ्याच अंतरावर असले तरी तेथे जाण्यासाठी काही मेटॅडोर होत्या. आता आई आणि बाबा दोघेही जाणार म्हटल्यावर प्रथमेश गोंधळ घालणार हे उघडच होते. म्हणून तो शाळेतून येण्यापूर्वीच त्या दोघांनी जावे असे ठरत होते, पण ते शक्य झाले नाही. आणि तसेही त्यानी त्याला असे नकळत जाण्यापेक्षा सांगून आणि त्याचा निरोप घेऊनच जावे असे मला वाटत होते.
                 दुसऱ्या दिवशी हितेशभाईनेही प्रथमेशला शाळेत नेण्यास  आणि  घरी परत आणण्यासही वेळ लावून आम्हाला आम्ही या कामासाठी काहीतरी दुसरी व्यवस्था करावी असा इशाराच दिला. सुदैवाने आजूबाजूच्या बऱ्याच लोकांच्या आमच्या ( म्हणजे सौ. च्या) ओळखी झाल्या होत्या त्यापैकी एका महाराष्ट्रीय महिलेकडून आमच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या दुसऱ्या महाराष्ट्रीय कुटुंबातील एक छोटी मुलगी त्या शाळेत जात होती तिला शाळेत सोडणाऱ्या एका अमेरिकन  महिलेचा पत्ता मिळू शकेल असे कळले. त्या मुलीच्या आईला फोन केल्यावर तिने आम्हाला फोन नंबर दिला आणि नंतर आमचा फोन लागण्यापूर्वीच तिचाच फोन आला आणि आता ती त्या शाळेत जात नाही अशी माहिती तिने दिली या माहितीमुळे आमची निराशा होण्यापूर्वीच तिने "तुमच्या प्रथमेशला मीच सोडले तर चालेल का असे विचारून आमची परिस्थिती "आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन " अशी करून टाकली. एवढी माहितीची आणि जवळ राहणारी काकू प्रथमेशला शाळेत न्यायला मिळाली त्यामुळे प्रथमेश आणि त्याहून आम्ही खूष झालो. नंतर ही काकू आमच्या सौ, च्या खूपच ओळखीतली निघाली.
        असे काही प्रश्न उपस्थित होऊन सुटत होते पण मुख्य प्रश्न मात्र आमची परीक्षा घेतच होता. भाग्यश्री हॉस्पिटलला गेल्यामुळे जयवंतला अधिकच गुंतून राहावे लागले कारण तिला अजूनही तब्येतीची काळजी घेणे आवश्यक असल्याने फार हालचाली करणे शक्य नव्हते आणि खाण्यापिण्यावरही बंधने होती, या गोष्टी घरातल्यासारख्या  शक्य नव्हत्या शिवाय प्रणव ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेत त्याची पूर्ण काळजी नर्सेसच घेत असल्यामुळे त्याला मधूनमधून पाहण्यापलिकडे ती काहीच करू शकत नव्हती. त्याला दूधही पचत नव्हते. मूत्रपिंडात दोष उत्पन्न होऊन शरिरातील द्रव बाहेर पडू शकत नसल्यामुळे शरीरावर सूज येऊ लागली मग औषधे बदलून डॉक्टर प्रयत्न करू लागले. आज त्याला स्वच्छ केल्यामुळे तो चांगला दिसत आहे. हातपाय हलवू लागला आहे फक्त किडनीचीच जरा तक्रार आहे असा जयवंतचा फोन आला. त्यावर बराच वेळ द्यावा लागतो असे तेथील आमच्या डॉक्टर मित्रांनी आणि माझ्या औरंगाबादच्या डॉक्टर भावाने (याने नेफ्रॉलॉजी मध्ये डॉक्टरेट केलेली आहे) दिलासा दिला.
         प्रणवला पहायची इच्छा होती पण मी एकटा जाऊ शकत नव्हतो पण दोन ऑक्टोबरला सुजित जाणार म्हटल्यावर लगेच मी त्याच्याबरोबर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तो गाडी घेऊन जाणार होता त्यामुळे त्याने आंतरजालावरून मार्गाचा नकाशा तयार करून घेतला आणि आम्ही दुपारी चार वाजता जायला निघालो. जयवंतला फिलीत प्रवेश केल्यापासून भ्रमणध्वनीच्या संपर्कात ठेवले होतेच त्यामुळे तो पार्किंगपाशीच वाट पाहत होता.. हॉस्पिटल अतिभव्य होते आणि त्यामुळेच ते लहान मुलांसाठीचे प्रथम क्रमांकाचे होते हे समजतच होते. चौथ्या मजल्यावर हृदयरोग अतिदक्षता विभागात प्रणवला ठेवलेले होते. तेथे आत शिरतानाच प्रवेशपत्र तयार करून घेऊन शर्टावर चिकटविले. एकावेळेस जास्तीत जास्त तिघांना जाता येते. कक्षात वेगवेगळ्या खोल्या असून प्रत्येक खोलीत एकच रुग्ण ठेवलेला होता. सर्व खोल्यातील सर्व रुग्णांच्या प्रकृतीचे आलेख प्रवेशाजवळच ठेवलेल्या मुख्य संगणकावर पाहता येत होते. त्याच भागात सर्व प्रमुख डॉक्टर येऊन त्या संगणकावरील नोंदी पाहून आवश्यक असलेल्या रुग्णाच्या खोलीत जाऊन तपासणी करत असत किंवा संगणकावर बसलेली व्यक्ती आवश्यक असल्यास योग्य त्या डॉक्टरांना संदेश देण्याचे काम करीत असे. सगळीकडे पूर्ण शांतता होती.
             प्रणवच्या खोलीत प्रवेश करतानाच हात निर्जंतुक करण्यासाठी असलेल्या बेसिनवर धुवून  मगच आत प्रवेश असे. सर्व खोल्या अशाच होत्या. ती खोली बरीच मोठी होती. खोलीच्या मध्यभागी प्रणवला एका छोट्या बिछान्यात ठेवलेले होते आणि त्याच्या शरीराच्या पाच ते सहा ठिकाणापासून निरनिराळ्या नळ्या किंवा केबल्स निघून त्यांची टोके संगणक. सलाइन बॉटल, काही औषधी द्रव बाटल्या, ई‌ . सी. जी. दर्शक, रक्तदाब मापक, मूत्रमापक, यांना जोडलेली होती. बिछान्यावरच त्याचे वजन करण्याची सोय होती. त्याच्या शरीराला पुरवठा करावयाच्या औषधी द्रव्याची आणि अन्नद्रवाची मात्रा  एक सहस्रांश मिमि. इतक्या सूक्ष्म प्रमाणात कमी जास्त करता येईल असे छोटे पंप त्यात बसवलेले होते. आणि या सर्वांची देखरेख करण्यासाठी अगदी पारंगत परिचारिका तेथे बसलेली होती. आम्ही आत गेलो तेव्हां असलेल्या नर्सचे नाव रॉबीन होते आणि आता तिची पाळी संपणार असल्यामुळे रात्रीच्या वेळीची नर्स किम पण तेथे येऊन बसली होती. त्या दोघीनीही प्रणव किती स्वीट बेबी आहे आणि तो कसा छान उपचार करून घेतो असे त्याचे कौतुक केले शिवाय सुरवातीपासून त्याची कशी प्रगती होत आहे याची माहिती दिली.
         आपल्याकडे रोग्याचे नातेवाइक म्हणजे ही एक बला कशाला आली असे भाव बहुधा डॉक्टर आणि परिचारिका दोघांच्याही चेहऱ्यावर दिसतात, अर्थात त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे रोग्यांची अफाट संख्या आणि त्यांच्या नातेवाइकांची वागण्याची तऱ्हा.असे भाव येथे मात्र त्यांच्या चेहऱ्यावर मुळीच नव्हते उलट आम्हाला अधिक बरे कसे वाटेल आम्हाला जास्तीतजास्त माहिती कशी देता येईल याचीच त्या काळजी घेत होत्या. मध्येच डॉ. सारा या पण येऊन गेल्या त्याही आमच्याशी बोलून आम्हाला धीर देऊन गेल्या. प्रणवच्या उशापाशीच एक सुंदर फलक तयार करून त्याच्यावर "प्रणव लवकर बरा हो" अशी शुभेच्छा लिहून ठेवलेली होती. इतक्या सुंदर कक्षात शांतपणे पहुडलेल्या प्रणवला मात्र या सगळ्याचे मुळीच भान नव्हते. तो बिचारा नळ्यांनी वेढलेला होता. जन्मानंतर आज मी त्याला प्रथमच पाहत होतो. जन्माच्यावेळचे ते हास्य त्याच्या चेहऱ्यावर शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न मी करत होतो आणि मनातल्यामनात हुंदके देत होतो. एकादे लहान मूल अथांग महासागरात पडून शांतपणे तरंगत असले तरी हे किनाऱ्याला कसे लागेल अशी काळजीची भावना माझ्या मनात ठाण देऊन बसली होती ती काही झाले तरी या लोकांच्या सांत्वनपर शब्दांनी कमी होऊ शकली नाही.
       खरे पाहता आमचे रुग्णालयातील  असणे केवळ आमच्या समाधानासाठी होते. ना आम्ही प्रणवसाठी काही करू शकत होते ना त्याला आमच्यामुळे काही दिलासा मिळत होता. कारण आमचेच काय पण सर्वांचेच  अस्तित्व त्याच्या लेखी शून्यच होते. त्याला कुणाचीच जरुरी होती असे वाटत नव्हते. गीता अथवा ज्ञानेश्वरीत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली होती ती त्याच्या ठायी पहायला मिळत होती. तो रडत नव्हता, हसत नव्हता, बोलता तर त्याला येतच नव्हते आणि विचार तरी काय करणार. त्याचे सर्व व्यापार त्याच्या उशापायथ्याशी ठेवलेल्या संगगणकावर दिसत होते आणि निरनिराळ्या बाटल्यातील द्रव त्यानुसार कमीजास्त प्रमाणात त्याच्या शरीराची निगा राखत होते. त्यावर किम अथवा रॉबीन नजर ठेवून डॉ. साराच्या आदेशानुसार आवश्यक असल्यास त्यात योग्य ते बदल करीत होत्या.
       थोड्या वेळाने आम्ही सर्वचजण गेस्टहाउसकडे गेलो. गेस्ट हाउसही हॉस्पिटलसारखेच प्रचंड होते. पूर्वी तो मॅक्डोनल्ड पॅलेस होता. त्यात मोठमोठ्या २०/२० खोल्या दोन विभागात होत्या. खालच्या भागात अगदी प्रचंड म्हणता येईल असे स्वयंपाकगृह, जेवणघर, सायबर कॅफे  होते.. स्वयंपाकघरात तीन मोठे कुकिंग रेंज, सात आठ मायक्रो ओव्हन्स, अनेक चहा कॉफी करायची मशीन्स मोठीमोठी बारा डायनिंग टेबल्स,, साठ सत्तर खुर्च्या, असा सरंजाम होता. आतील भागात मोठमोठी शीतकपाटे असून त्यात रोग्याच्या नातेवाइकानी स्वत:बरोबर खाद्यपदार्थ आणले असतील तर ते ठेवता येत. त्याला कुलूप लावून किल्ली आपल्या बरोबर ठेवायची. या कपाटात जयवंतने काही खाद्यपदार्थ घरून आणलेले ठेवले होते, काही आम्ही आता बरोबर घेऊन आलो होतो त्यातील काही आम्ही गरम करून खाल्ले. खरे पाहता रात्रीचे जेवण काही सेवाभावी संस्था हॉस्पिटलला देणगी म्हणून देतात, तसेच रविवारी दुपारी जेवण आणि नाश्ता पण काही संस्था देतात. पण आम्हास बराच उशीर झाल्यामुळे ते जेवण संपले होते. पण त्यातील काही केक उरले होते. आमचे खाद्यपदार्थ खाल्ल्यावर ते आम्ही घेतले. त्यानंतर ज्यूस चहा कॉफी आमच्या आवडीनुसार घ्यायला होतेच.
       जयवंतला जी खोली मिळाली होती तीही अशीच प्रचंड होती. त्यात दोन डबल बेड आणि एक सिंगल बेड, टी. व्ही., मोठी रेस्ट रूम. या खोलीचे क्षेत्रफळ आमच्या पुण्याच्या सदनिकेयेवढे तरी असेल. वातानुकूलन होते हे ओघाने आलेच. इमारतीचे छत उत्तम टीकवुडचे होते. त्य सर्वाला पॉलिश करण्याचा खर्चच काही लाख डॉलर्स येत असेल. प्रणवच्या आतापर्यंतच्या उपचाराच्या खर्चाचा आकडा ऐकूनच मला घेरी आली कारण तो होता, ३, ८३, ००० डॉलर्स म्हणजे त्यावेळच्या विनिमयदराने जवळजवळ १. ९ कोटी रुपये. जयवंतला हा कसा काय परवडणार आहे याचीच मला काळजी पडली. कारण तो लहान असताना त्याच्या एका शस्त्रक्रियेसाठी मला ५००० रु. खर्च आला तर माझे डोळे पांढरे झाले होते. प्रणवच्या शरीराला जी निरनिराळी उपकरणे बसवलेली होती त्याचीच किंमत काही कोटी रुपये असावी. चॉप हे लहान मुलांचे हॉस्पिटल आहे तर त्याच्या शेजारीच युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वानियाचे हॉस्पिटल मोठ्या माणसांचे आहे.
     रविवारी सकाळचा नाश्ता कुठल्यातरी अकादमीतर्फे होता. त्यातील दहाबारा लोकांचा ताफा सकाळी सहा वाजताच येऊन तयारीला लागला होता. त्यात एकाच कुटुंबातील सात आठ जण होते. आम्ही दहा वाजता नाश्त्यासाठी गेलो तर प्रत्येक टेबलावर त्यांनी छापून आणलेले मेन्यू कार्ड होते. त्यांच्यापैकी एक चुणचुणीत दहाबारा वर्षाचा मुलगा हातात छोटी वही पेन्सिल घेऊन आमची ऑर्डर टिपून घेत होता. आम्ही प्रत्येकी एक एग कॅसरॉल घेतले. ती सर्व माणसे अगदी चटपटीतपणे आणि अगदी नेहमी एकाद्या हॉटेलमध्ये काम करत असावीत अशा सराईतपणे काम करत होती. एग कॅसरॉल भलताच मोठा निघाला मला संपता संपेना. अमेरिकन माणसाच्या आहाराला साजेसा केलेला असावा तो.
    आमचे खाणे संपत असतानाच एक युवती जयवंतला भेटली. तिच्या मुलीचीही अशाच प्रकारची शस्त्रक्रिया झाल्याचे वर्णन करत होती. हॉस्पिटलमधील व्यवस्थेचे तिलाही आमच्याप्रमाणेच मोठे  कौतुक वाटत होते. तिची मुलगी सात आठवड्यांची असताना तिची शस्त्रक्रिया झाली. तिला एवढ्या नळ्या लावलेल्या पाहून तिला कसे रडू आले याचेही तिने वर्णन केले आणि प्रणवला पाहून   माझा  कंठ  दाटून आल्याची मला आठवण झाली. तिच्या मते याविषयी पूर्वकल्पना तेथील डॉक्टरनी आम्हाला (म्ह. तिला) द्यायला हवी.
      अकरा वाजता पुन्हा हॉस्पिटलमध्ये प्रणवच्या खोलीत गेलो तो अजून झोपूनच होता पण त्याच्यात सुधारणा आहे असे त्यावेळी असलेल्या नर्सने सांगितले. मूत्रविसर्जनाचे प्रमाण वाढत होते हे चांगले लक्षण होते. मध्ये त्याने डोळे उघडले आणि हातही हालवला ते पाहून आम्हाला कोण आनंद झाला. जणू त्याने एव्हरेस्टवरच पाउल ठेवले होते.