ह्यासोबत
मिनिओपोलिसच्या आमच्या मुक्कामात दिवस थंडीचे असल्यामुळे आम्हाला बाहेर पडून कितपत फिरता येईल याविषयी शंकाच होती पण थंडीने आमच्यावर मेहेरबानी केल्यामुळे सुरवातीला आम्ही मॉल ऑफ अमेरिका या अमेरिकेतील सर्वात मोठ्या मॉलला भेट देऊ शकलो. या तीन मजली अतिभव्य मॉलमध्ये वस्तू खरेदीप्रमाणेच लोकांना निरनिराळ्या राइडसचाही अनुभव घेता येतो. अर्थात आम्ही डिस्ने लॅंडमध्ये बऱ्याच राइडसचा अनुभव घेतला असल्यामुळे आणि आमच्या वयोमानानुसार चढण्यापेक्षा घसरण्याचाच आमचा व्यासंग दांडगा असल्यामुळे आम्ही त्या फक्त पाहणेच पसंत केले मात्र आमच्या मुलांनी व नातवंडांनी काही राइडसमध्ये बसून त्यांचा आनंद उपभोगला.
मॉलमध्ये प्रवेश करताच एक मोठे लेगो सेंटर लागते त्यात प्लॅस्टिकच्या एकमेकात फसवता येणाऱ्या लहानलहान तुकड्यांपासून (यांनाच लेगो म्हणतात)पृथ्वीचा गोल, ताजमहाल, स्पेस क्राफ्ट अशा मोठ्या वस्तू बनवून त्यांचे प्रदर्शन केले होते त्यासाठी कोट्यावधी लेगो तुकड्यांचा वापर करावा लागला होता. शिवाय एका टेबलावर लेगोचे अगणित तुकडे ठेवून लहान मुलांनी हवी ती वस्तू बनवावी असे मुलांसाठी आकर्षण करून ठेवले होते आणि त्याभोवती पाचपंचवीस बाळे आणि त्यांची माता पितरे बागडत होती. आमचा वस्तू खरेदीचा विचार नसल्यामुळे सर्व मॉल हिंडून पाहणे आणि जमल्यास मुलांना राइडसचा आस्वाद घेऊ देणे एवढाच कार्यक्रम होता तरीही मध्ये खानपानासाठी विश्रांती घेऊन आम्ही पाच सहा तास त्या मॉलमध्ये काढून सायंकाळी घरी परतलो. त्या मॉलमध्येही एक महाराष्ट्रीय कुटुंब आम्हास भेटलेच आणि थोड्याफार ओळखी पण निघाल्या. आणि मग त्यांच्याबरोबर एक छायाचित्र घेऊन पुढे गेलो.
दोन वेळा प्रथमेशबरोबर फिरायला बाहेर पडून त्याची शाळा पहायला जाण्याचा योग आला तो फार आनंददायक वाटला. नेहमी तो बसने शाळेस जातो पण तशी शाळा बरीच जवळ आहे त्यामुळे दोनदा रविवारी शाळेला सुट्टी असूनही माझ्या फिरायला जायच्या वेळी तोही जागा झालेला होता नाहीतर एरवी तो सुट्टी असल्यामुळे नऊपर्यंत झोपण्याचा आनंद लुटायचा. तो उठून माझ्याबरोबर येतो म्हणाला आणि खरेच तो मला शाळेपर्यंत घेऊन गेला. हॉपकिन्स डाउनटाउन कडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याची शाळा होती आणि त्याने मला व्यवस्थित चालवत शाळेपर्यंत नेले. वाटेतच हॉपकिन्सचे ग्रंथालयही लागते. तेथेही आम्ही एकदा गेलो. यावेळी येथील मुक्कामात या ग्रंथालयात बऱ्याच वेळा आलो. आमच्या घरात प्रथमेशनेच या ग्रंथालयाचा जास्तीतजास्त वापर केला असावा. ग्रंथालयात पुस्तके घेण्यासाठी आपल्याला एक प्लस्टिकचे ओळखपत्र मिळते ते प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या यंत्राच्या फटीत सारल्यावर पुस्तके ठेवा असा आदेश येतो मग एक एक पुस्तक टेबलावरील खूण केलेल्या जागेवर ठेवताच त्याची नोंद होते. अशी सर्व पुस्तके थेवून झाल्यावर ते ओळखपत्र काढून घेतल्यावर संपूर्ण यादी बाहेर येते त्यावर सर्व पुस्तकांची नावे घेतल्याचा दिनांक व परतीचा दिनांक याची नोंद झालेली असते.. पुस्तक वेळेवर परत न केल्यास काही रक्कम दंड म्हणून वसूल करतात आणि ती देईपर्यंत नवीन पुस्तके मिळत नाहीत. या सगळ्या सेवेसाठी आणि पुस्तके मिळण्यासाठी मात्र काहीही शुल्क लागत नाही. एका वेळी तुम्ही कितीही पुस्तके घेऊ शकता. एकटा प्रथमेशच एकावेळी वीस वीस पुस्तके घेत असे आणि ती महिन्याभरातच वाचून त्यांचा फडशा पाडत असे. ग्रंथालयात त्याच्याच बरोबरीची बरीच मुले येऊन वाचन करत असलेली पाहून आनंद वाटला. वयाच्या आठव्या वर्षी अगदी सहज संगणकावर आपल्याला हव्या असलेल्या पुस्तकाचे नाव लिहून ते उपलब्ध आहे का हे पाहून तेथील कर्मचाऱ्यास ते केव्हा उपलब्ध होईल याविषयी तो चौकशी करत असलेला पाहून मला मोठे कौतुक वाटले.आपल्याकडे ग्रंथालयाचा लाभ घेणारी या वयाची मुले फारच कमी आढळतात. त्याचे मुख्य कारण चांगले ग्रंथालय घराजवळ नसतेच म्हटले तरी चालेल आणि जितक्या सुलभतेने मुलांना पुस्तके उपलब्ध होत होती त्या सुलभतेचा अभाव. आपल्याकडील ग्रंथालयात आपल्याला हवे ते पुस्तक मिळणे म्हणजे अगदी कपिलाशष्ठीचा योग. चुकून ते पुस्तक असलेच तर ते कोणीतरी नेलेले असते आणि ते आपल्याला केव्हा मिळेल हे सांगणे ग्रंथालय चालकाला शक्य नसते. येथे मात्र प्रथमेशने मागितलेले पुस्तक त्याला किती महिन्यानी उपलब्ध होईल हे बरोबर सांगण्यात आले. तुम्ही मागितलेले पुस्तक उपलब्ध होताच तुम्हाला विरोपाने कळवले जाते मात्र ते तुम्ही न नेल्यास तुम्हाला थोडा दंड भरावा लागतो.
मिनिआपोलिसमध्ये आणखी एक संस्मरणीय सहल म्हणजे बसने डाउनटाउनला प्रवास. या बसेस आगदी आमच्या संकुलाच्या दारातच थांबत होत्या त्यामुळे एक दिवस कारने गावात न जाता बसने जायचे ठरवले. सकाळी अकरा वाजता निघणाऱ्या बसने आम्ही निघालो. कोठेही गेले तरी तिकिट तेवढेच म्हणजे पावणेदोन डॉलर प्रत्येकी होते. बसचा पासही असतो. बसला दोन दरवाजे असतात त्यातील पुढचा चालकाशेजारचा मोठा असतो. त्यातून आत शिरल्यावर तिकिटाएवढी रक्कम चालकाशेजारील पेटीत टाकल्यावर तोच तिकिटे देतो. पास असल्यास तो दाखवल्यावर आत प्रवेश मिळतो. एकादा अपंग माणूस बसस्टॉपवर चाकाच्या खुर्चीवर असेल तर समोरील दाराची रचना बदलून एक उतरती फळी पुढील दारातून रस्त्यापर्यंत जाते मग चालक खाली उतरून त्यावरून त्या अपंग माणसास खुर्चीसह आत ढकलतो. चालकाच्याच मागील भागात खुर्चीसाठी जागा असते आणि बस चालू झाल्यावर खुर्ची हालू नये म्हणून तिच्या पायात अडकवण्यासाठी साखळी असते. हे सर्व काम अपंग व्यक्तीबरोबर दुसरे कोणी नसेल तर चालकच करतो. आणि त्या व्यक्तीस योग्य त्या थांब्यावर उतरवूनही तोच देतो. या अपंगांना तिकिटातही सवलत असते, तशीच सवलत ज्येष्ठ नागरिकांनाही असते आमच्याकडे तसे प्रमाणपत्र नसल्यामुळे आम्ही त्याचा वापर करू शकलो नाही. सर्व लोक व्यवस्थित चढल्यावर बसची दारे लागतात आणि मगच बस सुरू होते.
बसची लांबी बरीच असते आणि मागील भाग जरा वरच्या पातळीवर असतो. काही जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी (खरोखरच) राखलेल्या असतात. मागील दार बसच्या लांबीच्या मध्यावर असते आणि मागील भागातील प्रवासी त्याचा वापर करतात पण ते दार जोपर्यंत तुमचा हात विशिष्ट खूण केलेल्या भागात असतो तोपर्यंतच उघडा राहतो त्यामुळे तुम्ही खाली उतरला की ते आपोआप बंद होते त्यामुळे ते बंद करण्याकडे चालकास लक्ष द्यावे लागत नाही. पुढचे दार उघडणे आणि बंद करणे ही मात्र त्याची जबाबदारी असते. बस वातानुकूलित असल्यामुळे दारे घट्ट बंद असणे आवश्यक असते. मात्र या सर्व गोष्टींमुळे बसला एकूण प्रवासास बराच वेळ लागतो. म्हणजे ती रॅम्सगेट संकुलासमोरूनच निघाल्यावर डाउनटाउनच्या शेवटच्या थांब्यावर पोचायला सहज एक तास घेत असे. त्यामुळे मला आम्ही काही काळ सोलापुरात राहत होतो त्याकाळात सोमपा (सोलापूर महानगरपालिका)च्या बसने केलेला प्रवास आठवला. म्हणजे आम्ही राहत होतो त्या कुमठा नाकापासून सुटणारी बस शेवटी गावात जात असे तिचा मार्ग विकासनगर, सात रस्ता करून सोलापूर स्टेशन वरून महापालिका ते हुतात्माचौक असा होता. आमची मुले त्या बसने शाळेत जायची आणि ती त्यावेळी वयाने लहान असल्याने विकासनगरमधील शाळेपर्यंत त्यांना सोडायला माझी पत्नीच जायची. दोनतीन वेळा तिला पाहिल्यावर एके दिवशी वाहकास दया येऊन त्याने तिला सांगितले, "बाई तुम्ही कशाला त्रास घेताय त्या मुलांना आम्ही बरोबर शाळेसमोर उतरवू आणि ती शाळेच्या फाटकात शिरल्यावरच बस हलवू मग तर झाले? "अशा प्रेमळ वाहक चालकामुळे कुमठानाक्यापासून हुतात्मा चौकात जायला ती बस बरोबर एक तास घ्यायची शिवाय स्टेशनच्या थांब्यावर वाहक चालक बदलत असत त्यामुळे आणखी पाच दहा मिनिटे सहजच जायची. त्यावेळी सोलापुरच्या लोकांच्या सहनशक्तीचे मला कौतुक वाटत होते पण आता मिनिआपोलिसमधील डाउनटाउन बस हा तिचाच अवतार आहे हे पाहून आता मिनिआपोलिसकरांचेही कौतुक करावे वाटायला लागले. या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा घेतलेले तिकिट तीन तास चालत असे त्यामुळे तुम्ही मध्ये उतरून काही काम आटोपून पुढे जायचे असेल आणि ते काम तीन तासाच्या आत आटोपले तर पुढे किंवा परत त्याच तिकिटावर जाऊ शकता, त्यामुळे त्यादिवशी आम्ही गावातील चक्कर आटोपून त्याच तिकिटावर परत निवासस्थानी गेलो.
याच बसने आणखी एकदा आम्ही डाउनटाउनला गेलो ते थॅंक्स गिविंगची परेड बघायला. ती संध्याकाळी सहा वाजता निघत असे. त्यामुळे आम्ही चार साडेचार वाजताच्या बसने गेलो. त्या परेडमुळे बसचे मार्गही जरा बदलले होते त्यामुळे बस नेहमीच्या ठिकाणी थांबणार नव्हती पण बसमधील एका प्रवासी महिलेने अगदी उत्साहाने ती कोठे थांबते आणि परेड कशी जाते याचे वर्णन केले आणि त्यामुळे आम्ही योग्य ठिकाणी उतरलो. आश्चर्य म्हणजे ज्या रस्त्यावरून परेड जाणार होती त्याच्या दुतर्फा लोकानी अगदी जत्रेत करावी तशी गर्दी केली होती, रस्त्यात उघड्यावर थंडी बरीच वाजत असल्याने आणि मॅसीज या मोठ्या मॉलच्या वरच्या मजल्यावरूनही ती परेड चांगली बघता येते असे कळल्यामुळे आम्ही मॅसीजमध्ये शिरून तिसऱ्या मजल्यावरील दोन भागांना जोडणारा जो मोठा बंद मार्ग होता त्याच्यावर गेलो. तो वरून बंदिस्त केलेला असल्यामुळे व बाजूला काच बसवलेली असल्यामुळे तेथून परेड चांगली दिसण्याची शक्यता होती, पण मजा म्हणजे तेथेही लोक अगदी खुर्च्या, शाली सतरंज्या घेऊन पाच वाजल्यापासूनच ठाण मांडून बसलेले होते. दोन बाजूला तात्पुरते कठडे करून बघणाऱ्या लोकांनी त्याच्या आतच राहून मधला मार्ग येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी खुला राहील याची दक्षता पोलिस घेत होते.
बरोबर सहा वाजता परेड सुरू झाली आणि डिस्नेची निरनिराळी पात्रे (मिकी माउस सिंड्रेला वगैरे)मिरवणुकीने येऊ लागली. सहा वाजले तरी सूर्यास्त संध्याकाळी चार वाजताच होत असल्याने अंधार बऱ्यापैकी होता अर्थात परेडमधील पात्रांवर बऱ्यापैकी प्रकाशदीप होते तरीही त्यांच्यावर फारसा उजेड पडत नव्हता आणि त्यामुळे इतक्या उंचावरून त्याना नीट पाहता येत नव्हते. अशा प्रकारची परेड आम्ही भर दिवसा कॅलिफोर्नियाच्या डिस्नेलॅंडमध्येच पाहिली असल्याने आम्हाला त्याची फार अपूर्वाई वाटली नाही. अशाच प्रकारची न्यूयॉर्कमधील परेड फारच प्रेक्षणीय असते म्हणे.
त्या परेडनंतर खालच्या मजल्यावर जे प्रदर्शन होते त्यात नाताळाची सर्व तयारी दाखवली होती. त्यात मुलांनी सांताला पाठवलेल्या पत्रांचे गट्ठे घेऊन जाणारा पोस्टमन त्या ओझ्याने पडलेला, कॅंडीज बनवणाऱ्या स्त्रिया, त्याची तयारी इत्यादी गोष्टी छोटे छोटे पुतळे करून दाखवले होते. तसे हे छोटेच प्रदर्शन होते. सर्वात शेवटी एका हॉलसमोर बरीच मोठी रांग दिसली आणि आम्ही थोडावेळ तेथे उभे राहिल्यावर ती सांताबरोबर फोटो काढून घेण्यासाठी होती हे कळल्यावर आम्ही तेथून ताबडतोब काढता पाय घेतला कारण आमच्याबरोबरच्या कोणत्याच बालकाला सांताबरोबर फोटो काढायचा नव्हता.
आपण सर्वसाधारणपणे बर्फ हा एकच शब्द वापरतो आणि हिम हा दुसरा माहीत असलेला शब्द आपण बहुधा काव्याबिव्यातच वापरतो. मात्र इकडे स्नो. आइस, फ्लरी असे वेगवेगळे शब्द बर्फाच्याच निरनिराळ्या प्रकारास वापरणे आवश्यक ठरते, कारण स्नो बराच हलका व भुसभुशीत असतो तोच घट्ट झाल्यावर त्याचा आइस होतो आणि भुरभुर पडत असेल तर त्याला फ्लरीज म्हणतात. येथील बर्फ लवकर घट्ट होत नसल्याने त्यावर चालायला त्रास होत नाही पाय त्यात बुडतात पण चांगले बूट असतील तर बाहेर काढले की पाय स्वच्छच राहतात. बर्फ घट्ट झाल्यावर मात्र त्याव्र घसरण्याचा धोका असतो. येथे या दिवसात तपमान बऱ्याच वेळा शून्याखालीच असल्यामुळे आणि हिमवर्षाव जोरदार होत असल्यामुळे साफ केलेले रस्ते आणि घराची छपरे उतरती असल्यामुळे तेवढीच काय आपले मूळ स्वरूप दाखवतात एरवी सगळीकडे फक्त शुभ्र पांढरा रंग दिसतो. त्या काळात तेथील एक तलाव पहायला गेलो तो पूर्णपणे थिजून गेला होता आणि त्याच्यावर आइस हॉकीसारखे खेळ खेळले जात होते. गोठलेले तलाव बघायलाही येणारी आमच्यासारखी हौशी मंडळी खूप होती.
मिनिटोंका येथील तलावाला भेट देण्यासाठी गेलो पण तो गोठण्याच्या अवस्थेत होता त्यामुळे तेथील बीच बंद होता. तेथे गेलो तेव्हा चक्क ऊन पडले होते त्यामुळे जवळ लहान मुलांना खेळण्यासाठी केलेल्या हिरवळीवर आम्ही भरपूर बागडलो आणि मुलांनी घसरगुंड्या वगैरे साधनांचा आनंद लुटला. आणखी मिनिहाहा येथे एका बागेत लहान धबधबा आहे असे कळल्यावरून तो पाहण्यासाठी गेलो. तेथे जॉर्ज बुश येऊन गेले असा उल्लेख होता पण तेथे गेल्यावर मात्र तेथे पाण्याचा एक थेंबही नव्हता असे दिसले एवढेच काय बुशसाहेब येथे आले त्यावेळी बाहेरून पाणी पंप करून हा धबधबा वाहता केला होता असा फलकच तेथे लावला होता. एकूण मिनिहाहाने आमचा अगदी मक्सिहाहा केल्याचे जाणवले
आमचा मिनिआपोलिसचा मुक्काम थंडी असूनही जयवंतच्या घरात मात्र हीटरची उष्णता भरपूर असल्यामुळे आम्हाला कुठलाच त्रास न होता पार पडला इतका की त्या काळातही पातळ चादरीशिवाय काही पांघरण्याची आम्हाला गरज पडली नाही. आम्ही एडिसनला २५ डिसेंबरला जाणार होतो आमचे परतीचे तिकिट निघायच्या वेळीच काढले होते कारण त्या एकाच दिवशी परतीच्या उड्डाणात जागा उपलब्ध होत्या त्याचे एक कारण ख्रिसमसच्या दिवशी कोणी प्रवास करायला शक्यतो निघत नसावे. आमची कॉंटिनेंटलची परतीची तिकिटे होती आणि उड्डाणाची वेळ संध्याकाळी सहाची होती. त्यादिवशी जयवंतला सुट्टीच होती त्यामुळे निघायला काही अडचण नव्हती. विशेष म्हणजे अगोदर दोन तीन दिवस हिमवर्षाव चालू असूम आमच्या निघण्याच्या दिवशी मात्र थांबला होता त्यामुळे आम्हाला विमानतळापर्यंत पोचायला काहीच त्रास झाला नाही.
कोंटिनेंटलच्या कौंटरसमोर काही गर्दी नव्हतीच त्यामुळे सामान देऊन बोर्डिंग पासेस घेउन ठेवावे असा विचार केला. आम्ही एक एक केबीन बॅग व एक एक बॅग एवढेच सामान घेऊन चाललो होतो. जाताना एक बॅग जास्त होती यावेळी सामान कमी असल्यामुळे मोठ्या बॅगेत छोटी बॅग ठेवून एकूण बॅगांची संख्या आम्ही कमी केली होती. स्थानीय (डोमेस्टिक) प्रवासात एकच मोठी २३ किलो वजनाची आणि विशिष्ट आकाराची (हा आकार आणि वजन आंतर्देशीय प्रवासासाठीही तेवढाच लागू आहे)बॅग प्रत्येकी नेता येते, मात्र आंतर्देशीय प्रवासात प्रत्येकी दोन बॅगांचे लगेज नेण्याची परवानगी असते. त्यामुळे मिनिआपोलिसला जाताना एका जादा बॅगेसाठी $२५ भरावे लागले होते ते वाचावे हा उद्देश! कदाचित त्यामुळे किंवा काही प्रवाशांचे सामान तपासून पहायचे या उद्देशाने आमच्या त्या बॅगेची तपासणी करण्याचे त्यांनी ठरवले. अगोदरच बॅगेला कुलूप आहे का हे त्यानी विचारल्यावर आम्ही किल्ली त्याच्या तपासणी अधिकाऱ्याकडे दिली. मोठ्या बॅगेत छोटी बॅग बसवून सौ. ने अतिशय कौशल्याने बसवलेले सामान त्या अधिकाऱ्यानेच बॅग उघडून बाहेर काढले त्यात त्याला आक्षेपार्ह काही सापडले नाहीच पण मग त्यानेच तशाच पद्धतीने ते सामान भरण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो त्याला तितकासा जमला नाही पण तरीही त्याने ती जबाबदारी स्वत:च पार पाडली आणि कुलूप लावून किल्ली आमच्याकडे दिली.
मुंबई विमानतळावर पहिल्यांदा परतताना मात्र कस्टम अधिकाऱ्याने आमची बॅग आम्हालाच उघडायला आणि बंद करायला लावली होती याची त्यावेळी आठवण झाली.
आम्ही घरातून निघतानाच संगणकावर बैठकांचे क्रमांकही ठरवून ठेवले होते त्यामुळे त्याच क्रमांकाचे बोर्डिंग पासेस मिळाले. आमचे सामान आत पाठवले जाऊन फक्त केबिनबॅगा घेऊन आम्ही पुढे निघालो. जयवंतने तेथील अधिकाऱ्याशी बोलून आम्हाला आतपर्यंत सोडण्यासाठी पासही मिळवला त्यामुळे तो आम्हाला गेटपर्यंत सोबत करू शकत होता आणि ते फारच बरे झाले कारण आम्ही घरातून दुपारी चारलाच निघून एडिसनला रात्री पोचणार असल्याने आत जाण्यापूर्वी काही खाद्यपदार्थ बरोबर आणलेले खाऊन मगच सुरर्क्षातपासणी करून आत शिरावे कारण ते खाद्यपदार्थ आत नेऊ देणार नाहीत या उद्देशाने बाहेरील बाकावर बसून खाण्याचा विचार करत असतानाच जयवंतचा भ्रमणध्वनी वाजला आणि तो ऐकून त्याने आम्हाला सूचना केली, "अगदी सावकाश जेवण करून घ्या विमान तीन तास उशीरा म्हणजे नऊ वाजता सुटणार आहे. आमच्या उड्डाणाची माहिती असल्याने सुजितने एडिसनहून चौकशी केली तेव्हां त्याला हा संदेश मिळाला होता आणि तो त्याने आम्हाला कळवला होता. त्यामुळे जयवंतने आम्हाला आत सोडून मगच घरी जाण्याचा निर्णय घेतला. कारण उड्डाणात एकदा विलंब होण्याची सुरवात झाली की मग ते निश्चित केव्हां सुटेल हे सांगता येत नाही. त्यामुळे शांतपणे खाद्यपेयांचा समाचार घेतला व सुरक्षायंत्रणा पार करून आमच्या उड्डाणासाठी नियत द्वाराच्यासमोरील सोफ्यावर जाऊन बसलो आणि तेथे आमच्याशिवाय आणखी कोणीही प्रवासी नव्हते.
आज नाताळामुळे फारच थोडे लोक प्रवासासाठी बाहेर पडलेले दिसले. प्रवेशद्वारापाशी उभ्या असणाऱ्या कर्मचारी युवतीकडे चौकशी केल्यावर तिने ते विमान जेथून निघते तेथेच त्यात दोष आढळल्यामुळे मूळ विमान बदलून त्या जागी दुसरे विमान पाठवत असल्याने विलंब होत असल्याचे सांगितले. आश्चर्य म्हणजे त्या बाजूस जेवढी प्रवेशद्वारे होती त्यापैकी फक्त आमच्याच प्रवेशद्वारासमोर काही तुटपुंजे प्रवासी दिसत होते बाकी इतरत्र अगदी शुकशुकाट होता. मध्ये आम्ही आतील रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेतली तेथील कर्मचारीदेखील ते बंद करून घरी जाण्याच्या घाईत दिसले म्हणजे आमची कॉफी पिऊन होईपर्यंत त्यानी खरोखरच शटर ओढून घेतले म्हणजे मला अगदी एकाद्या खेडॅगावातील एस. टी. स्टॅंडवर असावे तसे वाटू लागले अर्थात असा दिव्यांचा झगझगाट तेथे असणार नाही हे उघडच आहे. बराच वेळ असल्याने आम्ही दुसऱ्या विभागाची जरा चक्कर मारली त्या बाजूला मात्र बरेच प्रवासी व हालचालही दिसली. तिकडील दुकाने व खाद्यपेयांचे स्टॉल्सही बऱ्यापैकी चालू होते.
थोड्या वेळाने चौकशी केल्यावर विमान दहा वाजता येईल अशी माहिती मिळाली. एकून त्या भागात आम्ही दोघे प्रवासी आणि कोंटिनेंटलचे तीन कर्मचारी असे पाच जण आणि आम्हाला सोडायला आलेला जयवंत सहावा असे लोक होतो त्यामुळे प्रवासी नाहीत म्हणून उड्डाण रद्द तर होणार नाही ना अशी शंका मला येऊ लागली पण बाहेर गप्पा मारत बसलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने तसे होणार नाही असा दिलासा आम्हाला दिला. साडेनऊ वाजता एक प्रवासी स्त्री धावत धावत आली आणि प्रवेशद्वाराजवळील कर्मचारीललनेला फ्लाइट उशीरा झाली आता माझी जेवणाची वेळ झाली असे सांगितल्यावर तिला त्या ललनेने एक कुपन देऊन तेथील खाद्यवस्तू विकत घेण्याची विनंती केली, मग जयवंतलाही ते कळल्यावर त्यानेही दोन कुपन्स मिळवली व आम्हाला जेवायचे नसल्यामुळे तो बाहेर जाऊन खाऊन आला. त्याचबरोबर त्याने कार तात्पुरत्या पार्किंगमध्ये लावली होती आता तेथे जाडा आकार पडेल अशी तक्रार केल्यावर त्यासाठी मात्र आता आकार भरून एअरलाइन त्याची भरपाई करेल असे त्याला आश्वासन देण्यात आले.
शेवटी दहा वाजता एकदाचे विमान आले. त्यातून मोजून सात आठ प्रवासी उतरले त्यातील काही उशीराबद्दल कर्मचाऱ्यांकडे तक्रार करत होते पुढील उड्डाण ज्याना गाठायचे होते त्यांना ताबडतोब विमानतळावरील छोट्या गाड्यांमधून योग्य त्या प्रवेशद्वारापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. शेवटी आम्ही दोघे आणि आणखी दोन तीन प्रवासी असे पाच सहाजण आम्ही विमानात बसलो. विमानसुंदरींनी कोठेही बसा सगळे विमान तुमचेच आहे असे लक्ष्मण देशपांड्यांच्या यांच्या "होल वावर इज युवर्स" या थाटात सांगितले आणि आम्ही दोघे प्रथमच अगदी दोन वेगवेगळ्या रांगेतील खिडकीजवळील बैठकांवर बसलो. आत बसल्यावर भ्रमणध्वनीवरून आत स्थानापन्न झाल्याचे जयवंतला सांगून भ्रमणध्वनी बंद केला. थोड्यावेळाने "एकटीला फारच कंटाळवाणे होते" म्हणत सौ. आपली बैठक सोडून माझ्याचजवळ येऊन बसली. विमान उडाल्यावर एक विमानसुंदरी आमच्याजवळ येऊन गप्पा मारत बसली. प्रवासी इतके कमी असल्याने तिलाही काही उद्योग नव्हता एकूण पाच सहा प्रवासी आणि दहा बारा कर्मचारी अशी त्या उड्डाणाची अवस्था होती. मध्ये एकदा पेयपान झाले आणि थोडा वॅळ जातो न जातो तोच एडिसन आल्याची वैमानिकाने सूचना केलीच तसे त्याने सूचना देण्यापूर्वीच सौ. ने IKEA व Toys 'R'Us ही नेवार्क विमानतळाशेजारील मोठी दुकाने विमानातूनच पाहून मला सांगितले होते पण इतक्या लवकर पोचू असे मला वाटत नसल्याने मी तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता पण मग अशी उद्घोषणा झाल्यावर विजयी मुद्रेने तिने माझ्याकडे पाहिले.
आम्ही बाहेर पडण्यापूर्वीच सुजितला भ्रमणध्वनी करून कळवल्यामुळे त्यामुळे बॅगेज क्लेम पाशी तो उभाच होता आणि आमच्याच दोन बॅगा त्या पट्ट्यावरून दोन तीन चकरा मारून आमच्या येण्याची प्रतीक्षाच जणू करत होत्या आम्ही बाहेर पडताच सुजितने त्या ताब्यात घेतल्या आणि त्यांच्यासह त्याच्या कारमधून आम्ही एडिसन १० हेदर ड्राइव्ह ला पोचलो तेव्हां एक वाजला होता.