ह्यासोबत
दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्हाला निघावे लागले. अर्थात कुठेही दुसरीकडे काही बघण्याच्या दृष्टीने जावयाचे म्हटले की कमीतकमी वेळ झोपेत घालवणे आवश्यक असते तरच काही बघायला वेळ मिळतो. आमच्या मित्राचे कुटुंबीय म्हणजे ते स्वतः, त्याच्या सौभाग्यवती, त्यांचे चिरंजीव अमर आणि नात आर्या आणि आम्ही दोघे असे आम्ही सर्व लोक असल्यामुळे त्यानी एक मोठी कार भाड्याने घेतली होती.अमरच्या बायकोला सध्या पूर्ण बेडरेस्ट सांगितल्यामुळे ती येणार नव्हती. कार चालन अर्थात अमर करणार होता. अशा प्रवासाला निघताना सुजित बहुधा रस्त्याचा नकाशा अगोदर आंतरजालावरून छापून घ्यायचा आणि तो बरोबर घेऊन सॅमी त्याला मार्गदर्शन करायची. अमरने तसे काही केले नव्हते तो मोठे अमेरिकन मार्गदर्शक नकाशाचे पुस्तक घेऊन गाडीत बसला होता आणि माझा मित्र त्याला त्या पुस्तकावरून मार्गदर्शन करणार होता.अलिकडे जी. पी. एस् . (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) निघाले आहेत. हे उपकरण गाडीत बसवल्यास आपले निघण्याचे आणि गंतव्य स्थान याची माहिती पुरवल्यावर त्या उपकरणात आपल्या मार्गाचा नकाशा दाखवला जातो एवढेच काय त्यातून मार्गदर्शक सूचनाही ऐकवल्या जातात. त्यामुळे चालकाला गाडी चालवणे अतिशय सोपे जाते.आपण मार्गात थोडा बदल केला की लगेच ते उपकरण तसा बदल केल्याचे आपल्याला सुनावून पुन्हा त्याप्रमाणे योग्य मार्गबदल करून आपले सूचना देण्याचे काम चालू ठेवते असे ते फार उपयुक्त उपकरण आहे आणि आता ते आपल्याकडेही दिसू लागले आहे.काही काही भ्रमणध्वनीतही ते बसवलेले असते आणि परक्या शहरात वावरायला ते फार उपयुक्त असते. त्यावेळी हे उपकरण इतके प्रचारात आले नसावे आणि आंतरजालावरून मिळणारा नकाशाही बरोबर घेतला नसल्यामुळे त्या मोठ्या पुस्तकात पाहून आमच्या मित्राच्या मार्गदर्शनावर गाडी चालवणे अमरला भाग होते.
प्रवासाला निघण्यापूर्वी अमरच्या आईने दोन दिवसाच्या प्रवासाची भक्कम तयारी केली होती. तामुळे खाण्यापिण्याची चंगळ निघाल्यापासूनच सुरू झाली होती पण त्यामुळे मित्राचे लक्ष मार्गदर्शक पुस्तकापेक्षा खाण्याकडेच जास्त लागल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या मार्गदर्शनावर होऊ लागला आणि बऱ्याच वेळा अमरची गाडी भलत्याच दिशेने भरकटू लागली . एकादी खूण गेली का हे त्याने विचारल्यावर ती यायची आहे असे आत्मविश्वासाने सांगितल्यावर थोड्या वेळाने ती पूर्वीच गेल्याचे मित्राच्या ध्यानात यायचे अशा वेळी आपली बाजू सावरण्यासाठी अरे मी तर तुला मागेच सांगितले होते असे मित्राने म्हणावे आणि अमरबाबूना गाडी थांबवून पुस्तक आपल्या हातात घेऊन सगळा नकाशा आणि मार्गदर्शक खुणा तपासून पाहाव्या लागावे असे बऱ्याचदा घडत होते.. थोडक्यात मार्गदर्शना ऐवजी मित्राकडून मार्ग चुकवण्याचेच काम मोठ्या प्रमाणात चालू होते. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना बोटक्लबवर नौकानयन हा आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या एक आवडता छंद असे त्या काळात मीही थोडाबहुत या नौकानयनाचा आनंद उपभोगला त्यात टब्फोर या बोटीचा समावेश होता. त्यात चार जण वल्हे मारायचे .आणि एक सुकाणुधारक नावेचा मार्ग योग्य राहील याची दक्षता घ्यायचा. त्या सुकाणुधारकाला कॉक्स म्हणतात. माझ्या नौकाचालन कारकीर्दीत या सुकाणुधारकाचे काम माझ्याकडे असे.त्याचे कारण मार्गदर्शन हे काम म्हणजे केवळ नाव फार वाकडी तिकडी जाऊ न देणे येवढ्याप्य्रतेच मर्यादित असे. कारण त्यातून आम्ही जगप्रवास करणार नव्हतो.वल्हे मात्र जोरात न मारल्यास शर्यतीत हरण्याची शक्यता असे .त्या अनुभवाच्या जोरावर आताही मित्राला बाजूस सारून आपण मार्गदर्शकाचे काम करावे असा मोह क्षणभर मला झाला पण त्यामुळे अमरचे काम मी फार सोपे केले असते की अवघड याविषयी मला जरा शंका होती. माझ्या चुका दाखवून द्यायलाही त्याला जरा संकोच वाटला असता. शिवाय पितापुत्रांच्या प्रेमळ (सं)वादाचा जो आनंद आम्हाला उपभोगायला मिळत होता त्याला आम्ही मुकलो असतो !
यापूर्वी आमचा सगळा प्रवास पूर्व किनाऱ्यावरील रस्त्यावर झाला होता आणि त्या रस्त्यांवर अतिशय दाट झाडी दुतर्फा होती आता मात्र अमेरिकेच्या पश्चिम भागात आम्ही आलो होतो आणि जुलै महिना असूनही रस्तांवर झाडी जवळजवळ नव्हतीच म्हटले तरी चालेल. हा प्रदेश एकदम रुक्ष वाटला. रस्त्याच्या कडेला असलीच तर बारीक बारीक झुडुपे असायची. डोंगर सगळे उघडे बोडके असा एकूण या प्रदेशाचा रागरंग होता. प्रवासात गाडीतून बाहेर पाहण्यासारखे काही नव्हते त्यामुळे गाडीतील प्रवासी गप्पा मारण्यातच काळ घालवीत होते त्यामुळेही मित्राला रस्ता चुकवण्याला अधिक वाव होता. असे चुकतमाकत आम्ही दुपारी बाराच्या सुमारास आमच्या वास्तव्याच्या ठिकाणाजवळ पोचलो पण मार्गदर्शक कोळून पिऊनही अमरला त्याने आरक्षित केलेले हॉटेल सापडायला तयार नव्हते. बहुधा हॉटेल न सापडल्यामुळे आपल्याला असेच परत जावे लागते की काय अशी शंका माझ्या मनात नेहमीप्रमाणे लगेच आलीच. अमर आणि माझा मित्र दोघांच्या वितंडवादातून अखेर कधीतरी योग्य रस्ता मिळाल्यामुळे अचानक होटेल फेअरफ़िल्ड दिसले आणि युरेका म्हणत आम्ही सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
अमेरिकेतील होटेल्स आम्ही पाहिलेली तरी चांगलीच वाटली.इतरत्र होटेल्स कशी असतात हे कळायला माझा पर्यटनक्षेत्रातील अनुभव फारच बेताचा आहे. आत प्रवेश केल्यावर लगेचच एका मोठ्या प्रशस्त हॊलमध्ये सर्व प्रकारच्या चहाच्या पुरचुंड्या(टीबॅग्ज), कॊफीपूड, मध,लिंबूरस अशा गोष्टी एका मोठ्या टेबलावर ठेवल्या होत्या. आपल्याला हवे तेव्हा हवे तेवढे घ्यावे.सकाळी न्याहारीच्या वेळी इतर खाद्यपदार्थ असत.आम्ही जेवणाचे पदार्थ बरोबर घेऊन गेलो होतो. आमच्या खोल्या चांगल्या प्रशस्त असून त्यात दोन मोठे पलंग जाडजूड गाद्या त्यावर थंडीचा पुरेसा बंदोबस्त होण्याइतकी पांघरुणे , ए. सी. फ्रीज, मायक्रोवेव्ह ओव्हन, दोन टेबले चार पाच खुर्च्या असत. सोबत प्रशस्त बाथरूम, त्यात स्वच्छ चार चार टर्किश टॉवेल्स. तेवढेच नॅपकिन्स , गरम गार पाण्याचे नळ तसेच वॉश बेसिन्स त्यातही गरम थंड पाण्याचे नळ, तीच गोष्ट शॉवरची खाली मोठा टुब अशी सर्व व्यवस्था होती. आम्ही सोबत आणलेले पदार्थ शीतकपाटात ठेऊन नंतर मायक्रोवेव्हमध्ये ते गरम करून खाऊ शकत होतो.आम्ही ज्या ज्या होटेलम्स्ध्ये राहिको ती बहुतांश अशीच होती.
दुपारी लॉसएंजेलिसला पोचल्यावर लगेचच डिस्नेलॆंडला जावयासाठी आम्ही निघालो आणि दुपारी तीन वाजताच तेथे पोचलो.वॉल्टर एलिअस ऊर्फ वॊल्ट डिस्ने १९०१ मध्ये शिकागोला जन्माला आला आणि व्यंगपटाच्या क्षेत्रात काहीतरी धडपड करीत असताना अनेक अपयशानंतर मिकी माउस या पात्रात त्याला यशाची वाट सापडली आणि मग त्याने मागे वळून पाहिलेच नाही.अनेक व्यंगचित्रपट आणि बोलप त्याने काढले.१९५५ मध्ये त्याने पहिली डिस्नेनगरी कॆलिफोर्नियामध्ये निर्माण केली २००१ मध्ये त्याच्या शेजारी दुसरी अशीच निर्मिती त्याने केली.याव्यतिरिक्त फ्रान्समध्ये पॅरिस,जपानमध्ये टोकियो आणि हॊंगकॊंग येथेही डिस्नेनगरी निर्माण केल्या.
डिनेनगरीत आम्ही पोचलो तेव्हा लगेचच मिकी माउस,डोनाल्ड डक,निरनिराळ्या पऱ्या अशा डिस्नेच्या कार्टून्समधील सर्व पात्रांची जी मोठी मिरवणूक निघते ती बघायला रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी शिस्तीत उभी राहून वाट पहात होती.अशा गर्दीत दिसणारा आनंद,उत्साह तेथे शिगोशीग भरून वहात होता पण आरडाओरडा,धक्काबुक्की,खाद्यपदार्थ खाऊन त्यावरील आवरणे किंवा उरलेले खाद्यपदार्थ फेकणे अशा गोष्टींचा मात्र अभाव होता.जो तो कटाक्षाने त्या गोष्टी कचराकुंडीत टाकायचा,आणि त्यासाठी कचराकुंड्या पण अगदी सोयिस्कर ठिकाणी ठेवलेल्या.आम्ही कॆमेरे सज्ज करून कार्टून पात्रफेरीची वाट पहात होतो.प्रथम सुमधूर संगीताचे सूर ऐकू यायला लागले आणि पाठोपाठ हळूहळू एकामागून एक चित्ररथ दिसू लागले.त्याच्यावर एक अथवा दोन पात्रे आरूढ झालेली असत.निरनिराळ्या प्रकारच्या वाहनातून,रथातून अथवा चालत निरनिराळी पात्रे मिरवणुकीने येत होती. डोळ्याचे पारणे फेडणारी सुखद आनंदयात्राच होती ती जणु.आम्ही निरनिराळ्या जागांवरून जास्तीतजास्त छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न करून त्या यात्रेचे काही क्षण परत जाताना सोबत नेण्यासाठी गोळा करण्याचा प्रयत्न करू लागलो.
मिरवणूक संपल्यानंतर निरनिराळ्या सवाऱ्यां(राइड्स)चा आस्वाद घेण्यासाठी आम्ही निघालो.डिस्ने लॆंडमध्ये प्रवेश करतानाच आम्ही प्रवेशपत्र खरेदी केलेले असल्यामुळे नंतर आतील सर्व ठिकाणी आम्हाला मुक्तप्रवेश होता.अडचण होती पुरेसा वेळ मिळण्याची आणि त्या सवाऱ्या आमच्या प्रकृतीस सहन होण्याची.कारण प्रत्येक ठिकाणी लांबचलांब रांग असायची या सवाऱ्या लहान मुले आणि तरुण स्त्रीपुरुषांच्यासाठी तयार केल्या होत्या आणि या दोन्ही वर्गात आमच्यापैकी फक्त अमर आणि आर्याच बसू शकत होते.लहान मुलेही काही वेळा अशा गोष्टींचा उपभोग घेण्यास घाबरण्याची शक्यता होती. अलिस इन वंडरलँड, सिंड्रेला , हिमगौरी आणि सात बुटके अशा निरनिराळ्या परी किंवा भूतकथांच्या पार्श्वभूमीवर या सवाऱ्या बेतलेल्या होत्या.त्यातून जाताना लहान मुलांना काही भीतिदायक आभास होत आणि मग ते किंकाळ्या फोडत.एकदम अंधार, आग, भुते, वेताळ असे भास होणे किंवा मधूनच पाण्यातून तर कधी आगीच्या ज्वाळातून आपण जात आहोत असे आभास होते.कधी एकदम उंचावर जाऊन एकदम खोल गुहेत प्रवेश होई.काही सवाऱ्याच्या प्रवेशाजवळ हृदयरोग,स्पॊंडिलायटिस अशी दुखणी असणाऱ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर सवारी घ्यावी असा इशाराही लिहिला असे.तरीही धाडस करून मी आणि माझे मित्र ( आमच्या बायकांनी केव्हाच माघार घेतली होती)दोघानी एक धाडसी सवारी पार पाडली आणि त्यातून कोणतेही हाड अथवा अवयव न मोडता सुखरूप बाहेर पडल्यावर सुटकेचा निःश्वास टाकला. आर्यासाठी भुताखेताच्या काही सवाऱ्या आम्ही सहजपणे पार पाडल्या त्यात सर्वांनाच भाग घेता आला.
रात्री लेसर शो व फायर वर्क्स अतिशय प्रेक्षणीय होते.लेसर शोमध्ये लेसर किरण,पाण्याची कारंजी,प्रत्यक्ष नृत्य यांचा वापर केलेला होता.त्यातही डिस्नेच्या काही पात्रांचा समावेश होता.निरनिराळ्या पार्श्वभूमीवर डिस्नेच्या काही कथांतील प्रसंगही दाखवण्यात आले होते.फायर वर्क्समध्ये शोभेचे दारूकाम होते त्यातूनही मिकी माउस वगैरे निरनिराळे आकार तयार करण्याचा प्रयत्न केला होता.रात्री बराच उशीरापर्यंत हे नेत्रदीपक शोभानृत्य चालू होते.
रात्री होटेलवर उशीरा पोचल्यामुळे दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम उशीरा सुरू झाला.त्यात आम्ही नेहमीप्रमाणे रस्ता चुकवल्यामुळे पुढच्या गोष्टी पहायला आम्ही दुपारी दोनच्यानंतरच सुरवात केली.त्यादिवशीचा कार्यक्रमही खूप धावपळीचा होता कारण ऍडवेंचर पार्क,सी वर्ल्ड,आर्क्टिक राइड,डॊल्फिन शो,सी लायन शो,पिरेट चतुर्मिती(four D show) शो,आणि शामुज शो एवढ्या गोष्टी पहायच्या होत्या.
शामुज शो,डॉल्फिन शो आणि सी लायन शो या तिन्हीमध्ये सागरी प्राण्यांकडून निरनिराळ्या कसरती करून घेतलेल्या पहिल्या.शामुज शोमध्ये किलर व्हेल्सचा बराच मोठा ताफा होता तर सीलॉयन म्हणजे सील हा एकच प्राणी सगळ्या कसरती करत होता.हा प्राणी इकडील समुद्रात मोठ्या प्रमाणात आढळतो आणि अतिशय बुद्धिमान असतो नाकावर चेंडू तोलणे अथवा झेलणे , शिड्या चढणे शिंग फुंकणे अशा कसरती ते लीलया करतात. त्यांचा उपयोग यू. एस्. नेव्हीमध्येपण करतात म्हणे ! सी डायव्हर्सना वाटाडे म्हणून अथवा शत्रूच्या डायव्हर्सना जाळ्यात अडकवणे अशी कामे त्यांच्याकडून करून घेतात.
डॊल्फिन शोमध्ये अर्थातच अनेक डॊल्फिन माशांच्या कसरती पहावयास मिळाल्या.अशा प्राण्यानी ज्या कसरती करून दाखवल्या त्या पाहून त्यांच्या प्रशिक्षकाचे कौतुक करावे वाटले.असे शोज अतिशय प्रभावीपणे सादर करण्यात या मंडळींचा हातखंडा आहे.वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर,म्हणजे एकादा शो ५-३० ला सुरू होणार असे जाहीर झाले की एक मिनिटही मागेपुढे नाही.तयारीला थोडा वेळ लागणार असेल तरी वेळेवर एकादे गिटारीसारखे वाद्य वाजवण्यास सुरवात करणार आणि प्रेक्षकापैकी काही जणांना बोलावून त्यांच्या फिरक्या घेणार,त्यामुळे प्रेक्षकांनाही सहभागी झाल्यासारखे वाटते.मध्ये मोठा तलाव त्याच्या एका बाजूस प्रेक्षक आणि दुसऱ्या बाजूस शो सादर करणारी/रा प्रशिक्षक,कधी एक अथवा कधी दोघे.तलावाच्या अगदी जव्ळच्या बैठकांवर बसणाऱ्या प्रेक्षकांना काही अवखळ डॊल्फिम्सनी वा व्हेल्सनी उडवलेल्या पाण्यात भिजण्याची संधी असते आणि काही प्रेक्षकही त्यासाठी मुद्दाम पुढे बसतात आम्ही मात्र ते चुकवण्याच्या उद्देशाने पूर्वीच्या शोमध्ये पाणी कोठवर उडाले आहे हे पाहून आमच्या बैठका पकडत असू.
पिरेट्स फोर डी शो एका छोट्या चित्रपटगृहातच दाखवतात,त्या शो मध्ये काही चाच्यांची कथा गुंफली होती कथा साधारणच होती महत्वाचा भाग म्हणजे नेहमीच्या दोनच लांबी रुंदी या मितीबरोबर खोलीचा आभासही होतो.यात रानात गुणगुणणारी माशी आपल्या कानाजवळून गेल्याचा भास होतो तर काही अशाच गोष्टी अगदी आपल्या पुढ्यात घडत असल्याचा आभासही होतात.पाऊस पडत असेल तर थेंबही अंगावर पडतात किंवा काही सुगंधी फुले पाहिल्यास त्यांचा गंध येतो यालाच त्यानी चतुर्थ मिती असे नाव दिले आहे.यापूर्वी याहून भव्य त्रिमिती शोज बघितले असल्याने यात विशेष काही वाटले नाही.
तिसऱ्या दिवशी आम्ही बरेच लवकर म्हणजे नऊ वाजता निघून युनिव्हर्सल स्टुडिओला भेट दिली.तेथील वातावरण एकदम रंगीबेरंगी,चमकदार असे होते.जिकडे पहावे तिकडे रंगांची उधळण होती.प्रवेशापाशी अतिशय मोठा पृथ्वीचा गोल हे युनिव्हर्सल स्टुडिओचे चिन्ह(लोगो) होते त्याचेसभोवती मोठे कारंजे होते.त्यातून उडणाऱ्या पाण्याशी खेळणाऱ्या लहान मुलांमध्ये एक थेट आमच्या नातवासारखा दिसतो असे माझ्या मित्राने माझ्या निदर्शनास आणल्यावर त्याला उचलून घेण्याचा मोह झाला पण अमेरिकन लोकांना ते आवडेल की नाही असे वाटून तो टाळला.मात्र पुढच्या वारीत अमेरिकन लोक आमच्या नातवालाही गोंजारून त्याला जवळ घ्यायचे हे पाहिल्यावर लहान मुलाचे कौतुक कोणत्याही देशातील सहृदय माणसाला असतेच हे ध्यानात आले.विस्ताराचे दृष्टीने हा स्टुडिओ अतिभव्य आहे.कदाचित इकडचे इतर स्टुडिओही असेच भव्य असतील अनेक मजली सरकते जिने आहेत आणि त्यावरून निरनिराळे भाग पहाताना अगदी दमछाक होते.संपूर्ण स्टुडिओ दाखवणारी बस असून त्यात बसवून सर्व स्टुडिओचे महत्वाचे भाग दाखवतात.हैद्राबादचा रामोजी फिल्मसिटी याच धर्तीवर उभारण्यात आला आहे असे नंतर तो पाहिला तेव्हा वाटले.( जसे ताजमहाल पाहून बिबीका मकबरा पाहिल्यावर वाटते.)या स्टुडिओत बऱ्याच इंग्लिश चित्रपटांमध्ये वापरलेले सेट्स ठेवण्यात आले होये.त्यात हिचकॉकच्या काही चित्रपटाचे मला ओळखू आले.नुकतेच २जून १९९८ ला या स्टुडिओला लागलेल्या आगीच्या भक्षस्थानी काही सेट्स पडले अशी बातमी वाचली पण त्याच बरोबर सर्वांची एक प्रत ठेवण्यात आली आहे असे व्यवस्थापकांचे निवेदन पण वाचले म्हणजे मवीन भेट देणाऱ्यांना काही कमी झाल्याचे जाणवणार नाही.
येथेही वेगवेगळ्या सवाऱ्या(राइड्स)होत्या त्यात काही चित्रपटावर आधारित दुनियेची सफर अंतर्भूत करण्यात आली होती पण त्याचबरोबर प्रवाशांना मधूनमधून आश्चर्याचे आणि शारीरिक धक्के पण होते.ज्युरासिक पार्कच्या सवारीत बोटीतून प्रवास होता आणि ती वेगवेगळ्या डोंगर गुहा अरण्यातून नेताना ज्युरासिक पार्कमधील प्राणी मधून मधून डोकावत होते.या सवारीत शेवटचा हादरा अमपेक्षित असल्यामुळे माझा चष्मा उडून गेला आणि आता या दुसऱ्या चष्म्यासही मुकावे लागून ( पहिला नायगाऱ्याला अर्पण केला होता)एक तर आता वाचन बंद करावे लागेल किंवा अमेरिकेतील महागडा चष्मा घ्यावा लागेल अशी भीती वाटली.पण सुदैवाने तो उडून आमच्या पायालगत नावेतच पडला होता हे मित्रवर्यांनी निदर्शनास आणून दिले.आणि माझा जीव भांड्यात पडला.चष्मा म्हटल्यावर आठव्ले की त्यानंतर एकदा मॉलमध्ये काही चष्मे विकायला ठेवलेले दिसल्यावर सहज म्हटले की काय किंमती आहेत बघाव्या आणि त्याखाली लिहिलेले आकडे वाचून मी बुचकळ्यात पदलो कारण ते आकडे अगदी दोन(२)पासून होते आणि मनात म्हटले एवढी का किंमतीची भीती बाळगतात हे . पण नंतर मुलाशी बोलताना कळले ते आकडे किंमतीचे नसून चष्म्याच्या नंबरचे होते.या शेवटच्या हादऱ्यात पाणीपण जोरात उडून नावेत त्याचा फवारा उडून आम्ही सर्व ओलेचिम्ब झालो आणि आमचे ऍडवेंचर पार्कमध्ये टाळलेले भिजणे अनपेक्षितपणे होऊन गेले.आता परत होटेलला जायचे नव्हते.ते आम्ही सकाळीच निघताना सोडले होते त्यामुळे युनिवर्सल स्टुडिओपासून निघून थेट मित्राच्या घरीच पोचलो त्यावेळी रात्रीचे बारा वाजले होते.
शेवटच्या म्हणजे चौथ्या दिवशी आम्ही आमचा मित्र आणि अमर एवढेच सानफ्रान्सिस्कोला गेलो कारण आमच्या मित्राचे वास्तव्यच तेथे असल्यामुळे वहिनीनी बऱ्याच वेळा तो भाग पाहिला होता.शिवाय घरात नात आणि सुनेची काळजी त्यांना घ्यायची होती.सान फ्रान्सिस्कोला गोल्डन गेट ब्रिजवर गेलो.हवा छान होती.स्वच्छ ऊन पडले तरी हवेत सुखद गारवा होता.
गोल्डन गेट ब्रिज सान फ्रान्सिस्को आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणाऱ्या भागावर १९३७ मध्ये उभारण्यात आला आणि त्यावेळपर्यंत जगातील सर्वात मोठा झुलता पूल होता. आता मात्र त्याच्याहून अधिक मोठे झुलते पूल झाले आहेत पण तरीही अधिक लांबी आधाराशिवाय असणारा हाच सर्वात मोठा पूल आहे.आपल्या भारतात या प्रकारचे लक्ष्मण झूला राम झूला असे पाच पूल असून त्यातील गोकाक नदीवरील पुलाला मी लहानपणी भेट दिली होती.त्यावेळी मी सातवी आठवीत होतो आणि आमच्या शाळेची सहल गोकाकला गेली होती.त्यावेळची आठवण्यासारखी गोष्ट म्हणजे गोकाकला गेल्यावर नेमकी माझी दाढ दुखू लागली आणि अशा वेळी ताबडतोब इलाज करणे त्याठिकाणी शक्य नव्हते,पण आमचे मित्रमंडळ याबाबतीत भलतेच तयार त्यापैकी एकाने मला एक औषध देतो म्हणून त्याच्या पुरचुंडीतील तंबाकूची गोळी करून मला दाढेत धरावयास सांगितले आणि त्याच बरोबर धोक्याचा इशाराही दिला होता की तोंडात तयार झालेला रस लगेच थुंकून टाकायचा एक थेंब ही पोटात जाऊ द्यायचा नाही.या बाबतीत मी अगदीच नवशिका असल्यामुळे त्याच्या सूचनेची कडक अंमलबजावणी करणे शक्य न झाल्यामुळे थोड्याच वेळात झुलत्या पुलापेक्षा अधिक वेगाने मी झुलू लागलो.
गोल्डन गेट पुलावर गौरी गोविल ही दोन वर्षाची छोटी मुलगी २१ डिसेंबर १९९७ या दिवशी घसरून पुलाच्या रेलिंगला असलेल्या दहा इंचाच्या फटीतून सरळ १७० फूट खाली कोसळून जागच्या जागीच मरण पावली,त्या जागेवर तिच्या नावाने एक खांब उभा केलेला आहे आणि त्यावर या अपघाताचे वर्णन लिहिले आहे.पूल उभारल्यानंतर साठ वर्षात असा अपघात झालेला नाही असे म्हणून अधिकारी वर्ग अपघाताचे खापर त्या छोट्या मुलीवर किंवा एकमेकावर फोडत बसले नाहीत तर ताबडतोब कार्यवाही करून अशा प्रकारचा अपघात पुन्हा होणार नाही अशी दक्षता घेण्यात आली.पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या पुलाच्या अतिअरुंद पदपथावरून चालताना त्याच्या कठड्याचा भाग एका ठिकाणी पूर्ण नाहीसाच झाला आहे त्यातून पडून लहान मूलच काय मोठा माणूससुद्धा दगावू शकतो असे मला वाटते पण आपल्या नगरपालिका अधिकाऱ्यांना धन्यवाद अशासाठी द्यायला हवेत की सर्वच रस्ते वा पूल अशी ठिकाणे धोकादायक करून सर्वच नागरिकांना त्यांनी इतके तयार केले आहे की कोणत्याही सर्कशीत झूल्यावरील कसरती ते सहज करू शकतील त्यामुळे अशा किरकोळ दुरुस्त्या करून आपला अमूल्य वेळ वाया घालवण्यात त्यांना स्वारस्य नाही.
गोल्डन गेट पूल प्रेक्षणीय तर निश्चितच आहे.त्याच्या शेवटच्या भागात छोटी बाग आणि बसण्याची जागा आहे आणि अमेरिकेतील पद्धतीप्रमाणे बागेत काही प्रेक्षणीय पुतळे बसण्यास छान बाके वगैरे आहेत.त्यावर बसून आम्ही विश्रांती घेतली आणि बागेत काही फोटो काढणे हे ओघाने आलेच.हा पूल दोन मजली आह.जाताना वरून जावे लागते तर परतताना खालून
सान फ्रन्सिस्कोत आणखी एक पहाण्यासारखी गोष्ट ( खरे म्हणजे पाहण्यासारख्या अजून पुष्कळ आहेत पण आम्ही पाहिलेली ) म्हणजे लोंबार्ड स्ट्रीट.अतिशय उतरता आणि वळणावळणाचा हा रस्ता क्रूकेड स्ट्रीट या नावानेच प्रसिद्ध आहे.काही लोकांच्या मते सान फ्रन्सिस्कोमधीलच व्हेर्मौंट स्ट्रीट याहून अधिक क्रुकेड आहे पण त्याला आम्ही भेट दिली नाही.याचा उतार जवळ्जवळ क्षितिजाशी ५० अंशाचा कोन करणारा आहे आणि त्यात ४०० मीटर अंतरात आठ वळणे आहेत ,हा रस्ता फक्त एका दिशेने म्हणजे पूर्वेकडे खाली जाण्यासाठी वापरतात आणि त्यावर वेगमर्यादा ताशी ५ मैल अथवा ८ किलोमीटर इतकी कमी आहे.अशा रस्ताच्या दोन्ही बाजूस घरे आहेत हे विशेष.
त्या दिवशी संध्याकाळी आमच्या दुसऱ्या एका मित्राच्या मुलीकडे जायचे असल्यामुळे दुपारी घरी आलो आणि संध्याकाळी ती आम्हास घेऊन गेली. अमरच्या कुटुंबाचा त्याच वेळी आम्ही निरोप घेतला कारण आम्ही तिच्या घरी रात्र काढून परतीच्या वाटेला लागणार होतो.तिच्या घरी जाणे हा पूर्णपणे घरगुती कार्यक्रम होता त्यामुळे गप्पा आणि खाणेपिणे यात पुढचा वेळ निघून गेला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजताच उठून पहाटे पाच वाजता परतीच्या प्रवासासाठी सान फ्रान्सिस्को विमानतळावर जायला निघालो.
आमच्या मित्रकन्यकेने आणि तिच्या नवऱ्याने व्यवस्थित बोर्डिंग पास मिळेपर्यंत आम्हाला सोबत करून अगदी प्रवेशद्वारापाशी सोडले आणि आमचा निरोप घेतला.यावेळी पिट्सबर्गला जाणारे विमान अगदी वेळेत म्हणजे सात वाजून दहा मिनिटांनी सुटले आणि तसा भ्रमणध्वनी आम्ही सुजितला केला.पिट्सबर्गला आम्ही दुपारी ३ वाजता पोचणार होतो आणि तेथून पुढची फ्लाइट दुपारी ४-३० वाजता होती.त्याप्रमाणे आम्ही पिट्सबर्गला अगदी योग्य वेळी पोचलो आणि पुढच्या उड्डाणाची वाट पाहू लागलो.पण आमच्या उड्डाणदारापाशी अगदी शुकशुकाट दिसत असल्यामुळे मला जरा शंका यायला लागली आणि म्हणून फ्लाइट शेड्युल्डचा तक्ता मी पाहू लागलो आणि माझ्या पोटात गोळा आला कारण आमची फ्लाइट रद्द झाल्याचे त्यावर नमूद केले होते.अशा वेळी काय करावे लागते याविषयी आम्ही अनभिज्ञ होतो तेव्हा सोपा उपाय म्हणजे तेथील कोणालातरी विचारणे.आमच्या फ्लाइटच्या गेट्पाशी असणाऱ्या आसनापैकी एकावर एक महिला कर्मचारी बहुधा त्या विमानकर्मचाऱ्यांपैकीच एक असेल म्हणून तिला विचारू लागल्यावर ती कर्मचारी नसून एक प्रवासी स्त्रीच होती असे समजले पण तिने माझे विचारणे मनावर न घेता मला US Airways special service counterवर जाण्यास सांगितले.तेथे थोडी रांग होती पण माझा नंबर लवकरच लागला आणि तेथील खिडकीतील महिलेने माझा बोर्डिंग पास पाहून दुसरा एक तिकिटवजा कागद मला दिला पण त्यावर फ्लाइट क्रमांक वगैरे काही लिहिले नव्हते त्यामुळे आम्ही कोणत्या विमानातून पुढचा प्रवास करणार याविषयी काही उलगडा होत नव्हता म्हणून सरळ सुजितला भ्रमणध्वनी केला आणि आमची परिस्थिती त्याच्या कानावर घातली.त्याने पुन्हा त्याच खिडकीजवळ जाऊन सर्व गोष्टींची खात्री करून घेण्यास सांगितले आणि मग मी पुन्हा त्याच खिडकीधारिणीला जाऊन टोकले आणि यावर सीट नंबर नाहीत असे सांगितल्यावर तिने नवीन बोर्डिंग पासच तयार करून दिले तेव्हां आमचा जीव भांड्यात पडला.मात्र ते पासेस चक्क रात्री ११-३० च्या फ्लाइटचे होते म्हणजे आम्हाला तेथे अजून सात तास मुक्काम करायचा होता.पण त्यादिवशी इतक्या फ्लाइट्स रद्द होत होत्या की ही तरी जाणार की नाही याविषयी शंकाच होती.येऊन जाऊन आम्ही आमच्या गंतव्य ठिकाणापासून बरेच जवळ असल्याने अगदी तशीच वेळ आली तर सुजित आम्हाला गाडीनेही घेऊन जाईल अशी खात्री होती. पिट्सबर्ग विमानतळाची मात्र अगदी खडान खडा माहिती झाली.अर्थात त्या माहितीचा उपयोग पुन्हा कधी पिट्सबर्गवरून जावयाचे असेल तरच होणार अणि तोपर्यंत ती माहिती लक्षात रहाण्याची शक्यता नाही.पिट्सबर्ग विमानतळ बराच मोठा पसरलेला आहे आणि त्यात सर्व गोष्टी एकाच मजल्यावर आहेत हा एक मोठा फायदा मला वाटला.बरेच मोठे अंतर जाण्यासाठी सरकते रस्ते आणि छोट्या मोटारगाड्या पण आहेत.मी बोर्डिंग पास काढून आल्यावर एका गुर्जर भगिनीची गाठ पडली ती तर इंडियानापोलिसहून साडेबारालाच तेथे येऊन बसली होती.पुढे मधली सर्व उड्डाणे रद्द झाल्यावर तिलाही आमच्याच उड्डाणातून यायचे होते आणि तरी तिने बोर्डिंग पास काढलाच नव्हता.रात्री फ्लाइटची घोषणा झाली तेव्हाही बऱ्याच रद्द उड्डाणांचे प्रवासी येणार असल्यामुळे जे प्रवासी स्वतः आपले गमन रद्द करतील त्यांना रात्री उत्तम होटेलमधील वास्तव्य आणि दुसऱ्यादिवशीच्या उड्डाणाने फुकट प्रवासाचे आमिष दाखवण्यात आले होते त्याचा लाभ घेण्यास ती गुज्जु महिला तयार होती,याबद्दल तिचे कौतुक करावे वाटले.शेवटी रात्री साडेअकराच्या उड्डाणात स्थानापन्न होऊन सुजितला भ्रमणध्वनी केल्यावर हायसे वाटले.पिट्सबर्गला विमानात बसून विमान चालू होणे हे नेवार्कला पोचण्यासारखेच होते.आणि तसेच झाले.विमानतळावर सुजित आलाच होता.घरी पोचून जेवण करून झोपलो तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते.