ह्यासोबत
या दुसऱ्या वारीत आम्हा सर्व कुटुंबियांना अनेक वर्षानंतर एकत्र राहण्याची संधी मिळाली पण या संधीचा जास्तीतजास्त फायदा प्रथमेशनेच लाटला. आता तो चार वर्षाचा होता.त्याने या काळात आपले भरपूर लाड पुरवून घेतले. तो आता दादा होणार असल्याने त्याने सगळ्यांवरच दादागिरी गाजवायला सुरवात केली. मी तर त्याच्या लेखी त्याच्या बरोबरीचा (किंवा कदाचित लहानच)होतो त्यामुळे फिरायला जाताना मला त्याला बरोबर घेऊन जावे लागे किंवा तोच मला फिरायला घेऊन जात असे. बहुतेक आमच्या फिरण्याचा मार्ग आमच्या सदनिकेच्या आसपास असणाऱ्या शॉपराइट, ड्रगफेअर, या मॉलमधून जात असे. तेथील खेळ आणि निरनिराळ्या वस्तू पाहण्यात त्याला खूप मजा यायची. आमच्या घरात पैसे आणण्याचे काम माझे आणि ते खर्च करण्याचे त्याच्या आजीचे ही विभागणी पहिल्यापासूनच आहे आणि तिला मी अमेरिकेत असतानाही धक्का लावला नाही त्यामुळे आजोबांच्याकडे पैसे नसतात अशी त्याची ठाम समजूत असण्याचा मला फायदा असा झाला की कोणतीही वस्तू वा खेळ मी घेउन देऊ शकणार नसल्याने फक्त ते पाहण्यात किंवा ते आजीकडून घेऊन देण्याच्या आश्वासनावर मी त्याची बोळवण करू शकत होतो.
बऱ्याचदा या खेळण्यांचा कारखानाच काढण्याचे स्वप्न तोच रंगवत असे आणि ती सर्व खेळणी त्यातच बनवण्याचे मनोराज्य करीत असे. असा उद्योगी नातू असण्याचा मला होणारा फायदा म्हणजे त्याला खेळणे घेऊन देण्याचे माझ्यावरील संकट टळत असे. शॉपराइटमध्ये त्याला आणखी एक आकर्षण म्हणजे तेथली पिकअप व्हॅन! ती खरेतर एक प्रकारची ट्रॉलीच होती. तिच्या केबिनमध्ये मुलाना बसवून खरेदी करून घेतलेल्या वस्तू मागील ट्रॉलीत टाकता यायच्या. बाकी इतर ट्रॉलीजनाही मूल ठेवण्याची सोय असायची पण यात त्या मुलाला गाडीत बसण्याचा आनंद मिळायचा त्यामुळे ती प्रथमेशला फार प्रिय होती. शॉपराइटमध्ये गेल्यावर त्यामध्ये त्याला बसवणे हा एक माझा महत्वाचा कार्यक्रम असे. बऱ्याच वेळा इतर कोणीतरी ती नेली असेल तर ती बाहेर आणून ठेवेपर्यंत आम्हास तेथे थांबावे लागे. पूर्वी ज्या माणसाने ती नेली असेल त्याने जर मूळ जागी आणून ठेवली नसेल तर हा पठ्ठ्या पार्किंगमध्ये जाऊन बरोबर ती शोधून मला दाखवायचा की मग त्याला तिच्यात बसवून काही खरेदी करायची असो वा नसो मला फिरवावे लागेच.
हे त्याच्या दृष्टीने खरे तर दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार होता. कारण त्याच्या वाढदिवसाला त्याला दुचाकी घेऊन देण्याचा आमचा विचार होता आणि त्यानेही घरात होतो तो पर्यंत या गोष्टीला मान्यता दिली होती. पुण्यात त्याला तीनचाकी सायकल घेतलेली होतीच. आता तो दुचाकी चालवेल आणि शर्यतीत भाग घेऊन पहिला नंबर मिळवेल असे स्वप्न त्याच्यापुढे आम्ही रंगवले होते. पण आम्ही फिरत असताना काही मुलांच्या खेळातील मोटारगाड्या बाहेर ठेवलेल्या त्याने पाहिल्या होत्या आणि त्याच्या मनात तशी गाडी घेण्याचे स्वप्न साकार होत होते. बऱ्याच वेळा तो त्या बाहेर ठेवलेल्या गाडीत बसण्याचा हट्ट करायचा. संकुलात अशी खेळणी उघड्यावर पडली तरी ती चोरीला जाण्याची भीती नसे त्यामुळे घरात अडचण नको म्हणून लोक अशी अवजड खेळणी बाहेरच ठेवत. विशेषत: वरच्या मजल्यावरील लोकांना ती खाली राहू देणेच परवडायचे आणि प्रथमेशच्या मते ती त्यानी त्याच्यासाठीच तेथे ठेवलेली होती.
त्यामुळे वाढदिवसाला आपल्याला तशी मोटरगाडी मिळावी अशीच त्याची इच्छा होती. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सायकल घ्यायला खेळण्यांच्या दुकानात गेलो त्यावेळी आणखीच अवघड प्रकार झाला. येथील खेळण्याची दुकाने म्हणजे तेथे येणाऱ्या पालकाला कोठून येथे येण्याचा मूर्खपणा केला असे वाटायला लावणारी, कारण त्या दुकानात खेळण्यांचा येवढा मोठा साठा मुलांच्यासमोर दिसत असे की त्यांना आणि त्यांच्या हट्टाला तोंड देता देता त्याच्या पालकांना वेडच लागावे. शिवाय कुठलेही खेळणे हाताळण्याचा मुक्त परवाना असल्यामुळे सगळी पोरे हवे ते खेळणे खेळून पहायची. आम्ही प्रथमेशसाठी सायकल खरेदी करण्याच्या उद्योगात गुंग होतो त्या काळात हा पठ्ठ्या हमर गाडीत चढून बसला होता आणि तेथील विक्रेत्याने ती कशी चालवायची याचे तेवढ्यातल्या तेव्ढ्यात प्रशिक्षणही देऊन त्याला त्याच्या बापा, काका पेक्षाही गाडी चालवण्यात तज्ञ करून टाकले आणि आम्हाला मोठ्या संकटात टाकले कारण आता त्याला वाढदिवसाची भेट म्हणून ती हमर गाडीच हवी होती. ती अजून तरी त्याच्या बापाच्या अंदाजपत्रकात बसत नसल्यामुळे शेवटी त्याला सायकलवरच आनंद मानावा लागला होता. ते त्याचे दु:ख वेळीअवेळी फणा काढत असे.
रस्त्यावर ज्या शेकडो गाड्या लावून ठेवलेल्या असत त्यांच्या मेकची नावे जाता जाता सांगणे हा एक त्याच आवडता उद्योग होता. मग आमची फेरी सुरू झाली की प्रत्येक गाडीकडे बोट दाखवीत ही होंडा सिविक ही फोर्ड ही टोयाटो ही करोला अशी त्याची उजळणी सुरू होत असे. लहानपणी सगळीच नातवंडे आपल्या आजीआजोबांची अशीच करमणूक करून स्वत: ही आनंद मिळवीत असतात. आणि प्रत्येक आजी आजोबाला आपले नातवडच काय ते जगात सगळ्यात शहाणे आहे असे वाटत असते. याचा अनुभव मला नेहमीच येत असे कारण माझ्या मित्रासमोर किंवा त्याच्या पत्नीसमोर मी प्रथमेशचे गुणवर्णन सुरू केले की लगेचच त्यांचे आपल्या नातवंडाचे गुणवर्णन सुरू व्हायचे आणि मग मला गप्प बसून ते ऐकून घ्यावे लागायचे. याला अपवाद फक्त अजून जे आजी आजोबा झालेले नाहीत असे मित्र.हे वाचणारे कोणी आजी आजोबा असतील तर त्यांनाही लगेच आपल्या नातवंडाचे गुणवर्णन करण्याची स्फूर्ती आलीच असणार.
त्याची स्मरणशक्ती चांगलीच तीव्र होती असे म्हणावे लागेल. मुलांना आवडणाऱ्या गोष्टी बरोबर ध्यानात राहतात हे खरेच.
पण या त्याच्या स्मरणशक्तीमुळे त्याने एकदा एका मोठ्या अडचणीतून मला वाचवले. आमच्या दररोजच्या प्रभातफेरीत आम्ही मॉलयात्रा करतो हे माहीत असल्याने येताना दोनतीन वस्तू घेऊन यायला त्याच्या आजीने मला सांगितले. मी नेहमीच्याच पद्धतीने ते ऐकल्यासारखे करून पिशवी आणि पैसे घेऊन प्रथमेशसह बाहेर पडलो. नेहमीचा फेरा संपल्यावर मी वस्तू खरेदी करण्याचा विचार करू लागलो तर एकाही वस्तूचे नाव काही केल्या आठवेना. मोबाइल बरोबर नेत नसल्यामुळे तीही सोय नव्हती. नाहीतर सुजित वा जयवंत एकेकटे खरेदीला गेले तर त्यांची संपूर्ण खरेदी मोबाइल कानाला लावूनच होत असते. आता घरी जाऊन पुन्हा विचारून यावे असा विचार मी करू लागलो पण एक गोष्ट त्याचवेळी आठवली की त्या वस्तूंची नावे तिने प्रथमेश च्या समोरच सांगितली होती( कदाचित मी विसरलो तरी प्रथमेश बरोबर लक्षात ठेवील अशी तिला खात्री असेल) म्हणून एक चान्स घ्यायचा म्हणून त्याला विचारले, "अरे आजीने कायकाय वस्तू आणायला सांगितले आठवते का? " त्याने ताबडतोब होकार देऊन सगळी यादी मला म्हणून दाखवली आणि मी त्या वस्तू घेऊन घरी आलो आणि आजीच्या शाब्दिक माऱ्यातून वाचलो..
घरातील कॅसिओ, व्ही. सी. आर. टी. व्ही. या सगळ्या वस्तूवर पहिला हक्क त्याचा असा त्याचा दावा होता, त्यामुळे तो सकाळी उठण्याच्या वेळी मी जर हरिप्रसाद चौरसिया वा रविशंकर यांची सी. डी. लावलेली असेल तर तो जागा होताच "हे कुणी लावलेय? " असे एकाद्या मोठ्या माणसाच्या आविर्भावात म्हणून ते खटकन बंद करून तो टी, व्ही. वर कार्टून लावायचा. मी कॅसिओ वाजवू लागलो की या पठ्ठ्यालाही तोच वाजवण्याचा उत्साह येत असे. येऊनजाऊन अजून संगणकावर त्याने हक्क दाखवायला सुरवात केली नसल्यामुळे मी त्यावर काही काम करत असलो तर त्याचा इलाज चालत नसे. वादविवाद करण्यात तर त्या वयातही त्याने आजीचा कित्ता गिरवला होता आणि तिच्याकडील मोठे अस्त्र तर त्याच्याजवलचा हुकुमी एक्का होतेच. त्यामुळे त्याला एकादी गोष्ट नाकारताना तो लहान आहे असे म्हटल्यावर तो आपण मोठा असल्याचा दावा करायचा आणि त्याचा आधार घेऊन आता तू मोठा झालास ना मग ही गोष्ट करू नको म्हटल्यावर त्याने एक युक्तिवाद शोधून काढला होता तो म्हणे, "मी लहान झालेला मोठा आहे" आता यावर काय बोलणार?
एकदा तर त्याने फारच कमाल केली. तेथे असतानाही मी मधून मधून काहीतरी लिहीत असे. त्याच काळात त्याच्या आजीचा वाढदिवस होता म्हणून मी एक विनोदी भाष्य आमच्या संसारावर करून रात्री घरातील सर्वांना वाचून दाखवले त्यातील विनोदाला सर्व जण हसून दाद देत होते. ते पाहून यालाही अचानक स्फूर्ती आली आणि माझे वाचून झाल्यावर एक कागद घेऊन माझ्यासारखाच खुर्चीवर बसून वाचण्याचे नाटक करून सगळ्याच्याकडे पाहून"जोक" म्हणून स्वत:च हसू लागला. म्हणजे मी काहीतरी जोक केला असावा असा त्याने अंदाज केला होता.
पुण्यात असताना तो ज्यू. के. जी. त जात होता त्यामुळे आता त्याला सीनिअर के. जी. त घालणे आवश्यक होते. जवळच्याच शाळेत घालणे बंधनकारक नसले तरी आवश्यक होते कारण या शाळांच्या बसेस नसतात, पालकांनाच पाल्याच्या शाळेत नेण्या आणण्याची सोय करावी लागते. जवळच्या म्हटले तरी कारमधून पंधरा मिनिटात जाता येइल अशा अंतरावरील शाळेत त्याला घालण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा छान होती आणि त्याच्या वर्गात फक्त अकरा विद्यार्थी होते. त्यात दोन तीन भारतीय होते पण मराठी नव्हते. त्याला शाळेत नेण्या आणण्यासाठी हितेशभाई या गुजराती गृहस्थाला सांगण्यात आले. त्याचा हाच व्यवसाय होता. फक्त तो खाजगी पद्धतीने चालवत होता. हितेशभाई त्याच्या गाडीतून जास्तीतजास्त फायदा मिळवण्याच्या उद्देशाने धंदा करत असल्यामुळे प्रथमेश हे त्याच्या दृष्टीने अगदी किरकोळ गिऱ्हाईक होते. त्यामुळे त्याच्या नेण्या आणण्याविषयी जरा बेफिकीरच होता. त्यामुळे काही वेळा शाळेत त्याला न्यायला उशीर होई आणि शाळेचे व्यवस्थापन वेळेविषयी काटेकोर असल्याने शाळेची दारे बंद करत आणि मग त्याची पंचाइत होई.
नेण्या आणण्यासाठी त्याला बारा डॉलर्स दररोजचे ठरले होते आणि ते प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजे पाच दिवसाचे साठ डॉलर्स द्यायचे ठरले होते. पण त्यातही तो नाखूषच होता. शिवाय शाळेची वेळ संभाळावी लागायची असल्यामुळे त्या काळात मोठे भाडे मिळण्याचा योग आला तरी तो त्याला सोडावा लागे. त्यामुळे तो पहिल्यापासून जरा कुरकुरतच होता. तरी दुसऱ्या दिवशी त्याच्या सोयीनुसार शाळेची वेळ आम्ही बदलून घेतली होती. एक दिवस प्रथमेशला त्याने शाळेत सोडले पण परत आणायच्या वेळेस त्याचा फोन आला की तो ट्रॅफिक जॅममध्ये अडकला तेव्हां अर्थातच त्याला घरी आणायला आम्हालाच टॅक्सी करून जावे लागले. आणि त्यासाठी पंचवीस डॉलर्स मोजावे लागले. येथे टॅक्सीसुद्धा आपल्याकडे रिक्षा जशी रस्त्यावर मिळते तशी मिळत नाही. त्यांच्या एजन्सीला फोन करावा लागतो. त्याचा असा आम्हाला अनुभव आला.
या सगळ्या गडबडीत एक गोष्ट तेवढी बरी झाली होती ती म्हणजे प्रथमेश शाळेवर खूष होता आणि त्याने इंग्रजी बोलता आले नाही तरी तेथे बऱ्यापैकी जम बसवला होता. पहिल्या दिवशी शाळा लवकरच सुटणार होती आणि अजून त्याच्या आईची तब्येत तशी बरी असल्याने ती शाळेत पूर्ण वेळ थांबली होती पण दुसऱ्या दिवसापासून त्याने स्वतंत्रपणे जाणे अंगवळणी पाडून घेतले होते इतके की तो जाता येता हितेशभाईशी बऱ्याच गप्पा मारायचा असे त्याने आम्हास सांगितले. लगेचच त्याचा वाढदिवसही झाला आणि त्याच्या मित्रांनी त्याला शुभेच्छापत्रे दिली. त्या दिवशी भाग्यश्री शाळेत चॉकोलेटस घेऊन गेली होती. शनिवारी घरी पण आम्ही त्याचा वाढदिवस आजूबाजूच्या लहान मुलांना बोलावून साजरा केला. प्रथमेशमुळे आमच्या आजूबाजूच्या बऱ्याच लोकांच्या ओळखी झाल्यामुळे त्याच संकुलात पाच सहा महाराष्ट्रिय कुटुंबे राहतात हा शोध आम्हाला लागला. खरे तर ही मंडळी मागील वेळीही तेथेच होती पण त्यांचा पत्ता आम्हास नव्हता.
जे. एफ. के. हॉस्पिटलमध्ये भाग्यश्रीचे नाव नोंदवले होते. तेथील प्रसूतीतज्ञ भारतीय डॉक्टरच होत्या. मधल्या काळात त्यांच्याकडे दोनतीनदा प्रसूतीपूर्व तपासण्यांसाठी गेल्यामुळे सोनोग्राफीमध्ये मुलगा होणार हे अगोदरपासून माहीत झाले होतेच भारतात बहुधा मूल झाल्यावरच आपण नाव काय ठेवायचे याविषयी विचार करू लागतो. फारच दक्ष जोडपे असेल तर मुलगा झाल्यावर कोणते आणि मुलगी झाली तर कोणते याची जोडी ठरवून ठेवतात. पण येथे मूल जन्मताच त्याचे नाव नोंदावे लागते त्यामुळे अगोदर नाव निश्चित करणे आवश्यक असते नाहीतर घाईत जॉर्ज ज्यू. जॉर्ज १, २, ३ अशी मालिका लावावी लागते. तसे आपण मूल होण्याविषयी जितके दक्ष नसू तितके नाव ठेवण्याच्या बाबतीत असल्यामुळे निरनिराळ्या नावांच्या याद्या, इंटरनेट असे सगळीकडे शोध घेऊन त्याचे नाव प्रणव ठेवायचे ठरवले होते. प्रथमेशला मात्र बहीणच हवी होती. आणि त्याने तिचे नावही तन्वी असे ठरवून ठेवले होते. पण म्हणून आताच त्याला भाऊच होणार आहे असे सागून त्याचा मूड घालवायला नको असा विचार आम्ही केला.
जयवंत आणि भाग्यश्री जे एफ के हॉस्पिटलमध्ये पालक प्रशिक्षण वर्गास जाऊन आले. त्याना पालक प्रशिक्षण देण्यात आले त्यात प्रसूती पूर्वी आणि नंतर काय काळजी घ्यावी याची माहिती देण्यात आली. तसे जयवंत भाग्यश्री अनुभवी पालक असल्यामुळे त्याना या प्रशिक्षणाची फारशी जरुरी नव्हती शिवाय त्यांच्या पाठीशी अनुभवी आजी आजोबा पण होते. अमेरिकेतील जोडप्यांना ही सुविधा उपलब्ध असतेच असे नाही त्यामुळे असे प्रशिक्षण फायदेशीर ठरत असेल.
अमेरिकेत जयवंतला येऊन फक्त दोनच महिने झाले असल्यामुळे अजून त्याच्या वैद्यकीय विमा आणि हॉस्पिटल यांची सांगड जुळली नव्हती. त्यामुळे त्याना त्यांच्या विम्याचे जास्त संरक्षण सेंट पीटर्स युनिव्हर्सिटी हॉस्पिटलला मिळेल असे सांगण्यात आले आणि मग प्रसूतीसाठी त्या हॉस्पिटलात जावे लागेल असे ठरले. जे एफ के मधील प्रसूतितज्ञ डॉक्टरच सेंट पीटर्समध्येही जात असल्यामुळे तेथेही प्रसूती त्याच करणार होत्या. प्रथमेशच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११ सेप्टेंबरला रविवारी सकाळीच भाग्यश्रीला हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आली. त्यावेळी संयुक्ताच्या परिचितांना जेवायला बोलावले होते. तो कार्यक्रम रद्द करावा की काय असे आम्हाला वाटू लागले पण हॉस्पिटलमध्ये सगळ्यांनी जाऊन गर्दी करण्याचे कारण नाही असा विचार करून जयवंत भाग्यश्री दोघेच हॉस्पिटलमध्ये गेले.
पाहुणे जेवण करून गेल्यावर जयवंतचा सर्व काही ठीक असल्याचा सेंट पीटर्स मधून फोन आला त्यामुळे थोडी विश्रांती घेऊन आम्ही संध्याकाळी सहा वाजता निघावे असे ठरवले. आम्ही रस्त्यात असतानाच आम्हाला मोबाइलवर निरोप मिळाला की प्रसूती सुखरूप होऊन ठरल्याप्रमाणे मुलगा झाला आहे, बजन सात पौंड आहे. आमचा जीव भांड्यात पडला. नाव प्रणव ठेवायचे ठरलेच होते त्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये त्याचे नामकरण झालेलेच होते. हॉस्पिटल एवढे मोठे होते की जयवंतशी मोबाइलवरूंच संपर्क साधावा लागला. त्याने दिलेल्या सूचनांच्या आधारे शेवटी प्रसूतिकक्षात पोचलो. तिघेही मजेत होते. बाळ प्रणव आईच्या मांडीवर मजेत पहुडला होता. त्याला पाहून लहानपणीच्या प्रथमेशचीच आठवण झाली.
आम्ही सर्वांनी प्रणवला मांडीवर घेण्याचे सौख्य उपभोगले. नवीन जगात आलेला तो जीव त्याच्या सग्यासोयऱ्यांना प्रथमच पाहत होता. त्याला काय वाटत होते आम्हाला कसे कळणार? प्रथमेशनेही त्याला मांडीवर घेऊन दादाचा हक्क बजावला. आपण बहीण होणार म्हणून तिचे नाव ठरवले होते हे तो पार विसरून गेला. त्याने त्याचे नामकरण मात्र बेबाजी असे केले. प्रसूती सुलभ झाल्यामुळे बहुतेक प्रणवसह भाग्यश्रीला दुसऱ्याच दिवशी घरी पाठवतील असे वाटत होते. एवढ्या लहान मुलाला घरी पाठवतानाही कारमध्ये त्याची बैठक असणे आवश्यक असते, सुदैवाने माझ्या मित्राच्या मुलाकडे तशी बैठक होती आणि आता त्याचा मुलगा मोठा झाल्यामुळे ती त्याच्या उपयोगाची नव्हती त्यामुळे आम्ही ती घरी आणूनच ठेवली होती. अंघोळ घालण्यासाठी छोटा टब दुसऱ्या एका मित्राने आणून दिला होता. लहान मुलाचे कपडे मॉलमधून थोडे आणून ठेवलेच होते. थोडक्यात आता तो घरी येण्याचाच काय तो अवकाश होता. ती सप्टेंबरची १२ तारीख होती. त्याच्या बापाचाही जन्म सेप्टेंबरच्या दोन तारखेचा आणि त्याच्या दादाचाही सप्टेंबरच्याच दहा तारखेचा. त्या दोघांच्या तारखांची बेरीज करीत प्रणव हुंकारला होता.
जयवंत रात्री तेथेच राहणार होता. आणि प्रथमेशसह आम्ही सगळे काकाच्या गाडीतून घरी आलो. बेबाजीलाही घरी आणावे अशी प्रथमेशची इच्छा होती पण तो तर घरी आलाच नाही आणखी आईबाबाही नाही आले. काय हे? पण प्रथमेश आता दादा झाल्यामुले बहुतेक त्याने शहाण्यासारखे वागायचे ठरवले होते, म्हणून आजोबा, आजी. काका, काकू यांच्यावरच आजचा दिवस भागवायचे त्याने मनोमन मान्य केले. बेबाजीला नकोत का आई बाबा असा प्रथमेशदादाने विचार केला. आणि आई तर दुसऱ्या दिवशी बेबाजीला घेऊन घरी येणारच होती. एक दिवस आजी आजोबांच्या जवळ झोपायला काय हरकत आहे. नाहीतरी आईबाबा घरात असतानाही कधीकधी हट्टाने प्रथमेश आजोबांच्या कंफर्टरमध्ये झोपायचाच की आणि त्यादिवशी तो माझ्याच कुशीत झोपला.