वारी ---६

   
 
      त्यानंतर अधिक अधिक मोठे मॉल्स पाहिले,बरेचसे मॉल पूर्ण पाहण्यापूर्वीच पाय दुखू लागले,पुढेपुढेतर मी मुलांना खरेदी करा म्हणून सांगून कुठल्यातरी आरामशीर खुर्चीवर बसून आराम करीत असे.वॉलमार्ट, शॉपराइट, पाथमार्क,मार्शल्स  ही काही प्रसिद्ध साखळीमॉल्सची नावे. मॉल्समध्ये खाद्यपेये,स्टेशनरी,मिळत असे त्याशिवाय ठराविक प्रकाराचेच साहित्य विकणारी तर असंख्य दुकाने.तीही इतकी विस्तीर्ण की पूर्ण पाहणे अशक्यच.बेड बाथ अंड बियॉंड (झोपण्या व अंघोळीचे सामान), होम डेपो (घर बांधण्यासाठी किंवा सजवण्यासाठीचे सामान)  ,टॉयझरस,बेबी-ज-रस (खेळणी आणि लाहान मुलांसाठी) अशी विशिष्ट प्रकारचे सामान विकणारीही असंख्य दुकाने . आमच्या सुदैवाने शॉपराइट.मार्शल्स,ड्रगफेअर ही दुकाने आमच्या घरातून चालत जाण्याच्या अंतरावर होती.दुकाने चालत जाण्याच्या अंतरावर असली तरी कामात असणाऱ्या व्यक्तीला आठवड्यातून एकच दिवस मिळत असल्याने आणि अगदीच किरकोळ म्हणजे अर्धा लिटर दूध,अर्धा किलो भाजी अशा वस्तू आणायला गेले तर वस्तू घेण्यापेक्षा ज्या कौंटरवर पैसे द्यायचे तेथे एवढी गर्दी असे की तेवढ्या वस्तूच्या पेमेंटसाठी सहज अर्धा तास मोडायचा.एकदा अर्धा डझन केळी शॉपराइटमधून  आणायला मला चालत जाऊन केळी घेऊन परत चालतच येण्यास अर्धा तास आणि दीड डॉलर किंमत चुकवण्यात एक तास असावेळ गेला.भारतात आम्हाला घराबाहेर पडल्यापडल्या दिसणाऱ्या दुकानात हवी ती वस्तू मिळते,जास्त वस्तू असल्या तर वाणी घरी पाठवून द्यायलाही एका पायावर तयार असतो.त्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ आणि संवयीने आळशी बनलेल्या, गाडी चालवता न येणाऱ्या नागरिकांमुळे तरी मॉल संस्कृती आली तरी अमेरिकेसारखी ती पूर्णतया रुजू शकणार नाही. मॉल्समुळे  वस्तू स्वस्त मिळतील आणि चांगल्या मिळतील असेही खात्रीने सांगता येत माही कारण भेसळ करण्याची संवय लागलेले भारतीय व्यापारी अमेरिकेत माल पाठवतानाही ( देशाचे नाव बदनाम होईल याची अजिबात पर्वा न करता) जेथे भेसळ करायला मागेपुढे बघत नाहीर् तेथे मॉलची काय कथा?आपल्याकडे इतक्या मोठ्या जागा मॉल बांधायला आणि गाड्या पार्क करायला उपलब्ध होण्याचीही अडचण आहे अर्थात सध्याच्या मॉलकडे नजर टाकली तर लोकांना गाड्या लावायला जागा मिळते की नाही याची ना मॉलचालकांना काळजी ना त्यांना त्यासाठी परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना काळजी.रस्तावर वाहतुक कोंडी होऊन चारदोन अपघात झाले आणि लोकांनी दगडफेक केली की मग सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या होणार.
       अमेरिकेत पोचण्याच्या दुसऱ्या दिवसापासून फिरायला जायला योग्य जागा मी शोधू लागलो.पुण्यात सिंहगड रस्त्यावर सकाळी सातपूर्वीच इतकी रहदारी चालू होते की मी सुरवातीला पुण्यातील आमच्या गृह संकुलाच्या मागील बाजूस असणाऱ्या आंबराईत फिरायला जाण्याचा पर्याय शोधला होता आणि माझ्यासारख्या बऱ्याच जणाना तो पसंत पडला होता.पण आंबराईच्या मालकाला इतके ज्येष्ठ नागरिक या एकुलत्या एक शुद्ध हवेच्या ठिकाणाचा लाभ घेऊ लागले तर ते अधिकच दीर्घायु होऊन शासनास सेवानिवृत्तीवेतनचा फारच भूर्दंड पडेल आणि देशाचे मोठे नुकसान होईल असे वाटून लगेच त्याने तेथे तारेचे कुंपण घालून टाकले.तोपर्यंत पी. चिदंबरम् अर्थमंत्री झाल्यामुळे शासनातर्फे त्याला बहुतेक काही बहुमान मिळण्याची शक्यता वाटते सध्या त्या विभागाचा नगरसेवक म्हणून त्याला संधी देण्यात आली आहे. अशा वातावरणातून अमेरिकेत गेल्यावर कोठेही फिरायला मला रान मोकळे मिळाल्यासारखे झाले तरीही मुलाने उगीच इकडेतिकडे जाऊ नका रस्ता चुकला तर पंचाईत व्हायची असा धाक घालून ठेवला होता.त्याने मोबाइल घेऊन जा असा आग्रह पण केला.पण मी रस्ता चुकण्यापेक्षा मोबाइलच हरवून टाकेन अशी मला भीती वाटत असल्याने मी टप्प्याटप्प्याने आपली फिरण्याची कक्षा वाडवायची असे ठरवले‌. सुरवातीस तर आम्ही एकएकटे फिरायला बाहेर पडायचे ठरवल्यामुळे पहिला टप्पा फक्त मुलाच्या घराशेजारच्या रोलरस्केटिंगच्या मैदानावरच तासभर फेऱ्या मारायच्या असा मी बेत केला कारण तेही तसे बऱ्यापैकी मोठे होते. 
       त्यानंतर हळूहळू रस्त्यावर जायचे असे ठरवले म्हणून बाहेर पडलो पण रस्ता इतका मोकळा पाहून पुढे जाण्याचा मोह आवरेना.रस्ता पाहून अमेरिकन लोकाना आमच्यापासून शिकण्यासारखे कितीतरी आहे याची जाणीव झाली कारण रस्ता अगदी जेवढी रुंदी उपलब्ध होती तितक्या रुंदीचा करून बाजूला पदपथ ज्याला इथे साइडवॉक  म्हणतात ते पूर्ण करून आता करण्याला शिल्लक काही ठेवलेच नव्हते आपल्या गरजेपुरतेच वापरा आणि गरजा कमीतकमी ठेवा हा म. गांधींचा दृष्टीकोण या लोकाना कुठला पटायला.येथे रस्ते अगोदर तयार असतात आणि लोक त्या भागात नंतर रहायला सुरवात करतात.आपल्याकडे लोक नव्या भागात रहायला गेल्यावर बरेच दिवस ठेचकाळत जात रस्ता झाला तर बरे होईल असे म्हणत आणि ते न करत असल्याबद्दल नगर्सेवकांबा शिव्या देत देत प्रवास करतात‌  शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण होण्याची वाट पाहणाऱ्या श्रीकृष्णाप्रमाणे नगरसेवक शिव्यांची लाखोली पूर्ण होण्याची वाट पाहतात,तोपर्यंत लोकांच्या चालण्यामुळे बऱ्यापैकी पायवाट तयार होते आणि रस्ता कमीतकमी किती रुंदीचा केला तरी भागेल याची त्यांना कल्पना येते.त्यानुसार एकदिवस नगरविकास रचनेत शंभर फुटी म्हणून दाखवलेल्या रस्त्याची  सुरवातीस वीस फुटाच्या रुंदीचीच आखणी होते आणि तरीही नागरिकांच्या आशेला पालवी फुटते.त्यानंतर काही दिवसानी त्या आखलेल्या रुंदीच्या  दोन्ही  बाजूने खडीचे ढीग दिसू लागतात आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा चालणे किंवा वाहन चालवणे अवघड झाले तरी रम्य भावीकाळासाठी ही अडचण नागरिक सोसायला तयार होतात.मग कित्येक दिवस काहीच घडत नाही आणि त्या ढिगातील खडी हळूहळू जाणाऱ्यायेणाऱ्या पादचाऱ्यांना आजूबाजूने जाणाऱ्या वाहनापासून बचावण्यासाठी त्या खडीच्या ढिगावरूनच चालावे लागून रस्त्यावर पसरू लागते.आणी एक दिवस भल्या पहाटे बऱ्याच कामगारांचा ताफा ती खडी पुन्हा ढिगात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करून मग तीच नियोजित रुंदीची रस्त्याची पट्टी झाडण्याचा प्रयत्न करून जाणाऱ्या येणाऱ्याना त्यावरून चालणे किंवा वाहनातून जाणे मुश्किल करतात. त्यादिवसाच्या अखेरीस ती खडी रस्त्यावर पसरली जाते आणि दुसऱ्या दिवसापासून तेथील नागरिकांचे खरे हाल सुरू होतात,कारण खडी पसरण्याचे काम पूर्ण करून ठेकेदार आपली कामगारसेना दुसऱ्या तशाच कामासाठी हाकारतो पण तोपर्यंत डांबरीकरण करणारा ठेकेदार ठरायचे बाकी असते कारण कोणत्या ठेकेदाराकडून अधिक प्राप्ती होणार याची चाचपणी नगरसेवकांकडून चालू असते आणि त्यामुळे पहिला रस्ताच बरा होता असे म्हणत पूर्वीपेक्षाही अधिक शिव्यांचा संग्रह नागरिकांपाशी तयार होतो आणि नाइलाजाने त्या खडीवरूनच चालण्याची संवय नागरिकांना आणि वाहनचालकांना पण लागते,त्यांच्या जाण्याने खडी बऱ्यापैकी दबली जाते आणि असाच रस्ता तयार होईल की काय असा विचार दृढ होताहोता एक दिवस रस्त्याच्या बाजूला रोडरोलर दिसू लागतो आणि पुन्हा नागरिकांच्या आशेला पालवी फुटू लागते पण त्याला फळे येण्यापूर्वीच तो रोलर पुन्हा तेथून गुप्त होतो आणि पुन्हा शिव्यासप्तशतीचा पाठ नागरिक म्हणू लागतात. पण अचानक एक दिवस त्या भागाला कोणीतरी बडी असामी भेट देणार अशी आवई उठते.आणी एकदम कामगारांची मोठी फौज,रोडरोलर,डांबराची पिपे त्या भागात येऊन त्या दिवशी तो रस्ता वाहतुकीला बंद होऊन संध्याकाळपर्यंत एकदम चकचकीत डांबरी पट्टी त्या जागेवर दिसू लागते आणि त्या भागातील नागरिकांना स्वर्ग हाती आल्याचा भास होतो.इतक्या प्रतीक्षेनंतर तयार होणारा रस्ता कसाही झाला तरी तो पूर्वीपेक्षा बराच होता याविषयी नागरिकांत एकमत होते. तो रस्ता ती बडी असामी येईपर्यंत कसाबसा तग धरतो आणि हळूहळू रस्त्याच्या बाजूची धूळ त्यात पाऊस पडल्याने चिखलाच्या रूपाने तयार रस्त्यावर येऊन रस्ता डांबराचा नसून चिखलाचा आहे असे वाटू लागते. असे झाले तरी " ठेविले अनंते तैसेची राहावे" अशा शिकवणीत वाढलेले आपले नागरिक तशाही अवस्थेत हसतमुख राहण्याचा प्रयत्न करतात.रस्ता करणे ही इतकी सोपी गोष्ट आहे हे या बेट्या अमेरिकनांना माहीतच नाही आणि एकदा केलेला रस्ता जणू काही जन्मोजन्म टिकावा आणि तो पुन्हा कधीच करायचा नाही अशा थाटात करण्याचा त्यांचा अट्टाहास न समजण्यासारखा वाटतो.खरे तर रस्ता ही गोष्ट बायकांच्या साड्यासारखी अथवा इतर वस्त्रप्रावरणाप्रमाणेच पुन्हापुन्हा करावी लागून त्यातून नगरसेवकांच्या कित्येक पिढ्यांना पुरेल अशी तरतूद करावयाची असते ही साधी गोष्ट यांना कळत नाही. काहीका असेना अशा पद्धतीने रस्ता तयार होताच महापालिकेच्या इतर विभागानाही किंवा टेलिफोनवाल्याना जाग येते, रस्ता तयार झाला आहे असा टेलिफोनच जणू त्याना जातो की लगेच केबल टाकण्यासाठी रस्ता खणण्याच्या तयारीत ते तस्त्यावर हल्ला करतात.
          रस्त्याच्या बाबतीत मला येथे आणखी जाणवणारी गोष्ट म्हणजे रस्ता केवळ वाहतुकीसाठीच वापरायचा असतो ही यांची गैरसमजूत.आपल्याकडे कसे रस्ता हा शक्य झाले तर वाहतुकीसाठी वापरायची चीज आहे.त्याव्यतिरिक्त भाजीविक्रेते, भेळपुरीवाले, किल्ल्या तयार करणारे,या सर्वांना रस्त्याचाच आधार असतो.दुकानदाराना आपला माल गिऱ्हाइकांना दिसेल असा बाहेर ठेवायला रस्त्याचाच वापर करावा लागतो.वाहने पार्क करायला नागरिकांनाही रस्ताच आवडतो,या रस्ताच्याच डाव्या उजव्या बाजूस नागरिकांनी कचरा टाकावा म्हणून मोठ्या कुंड्या ठेवलेल्या असतात पण या कुंड्यांचा नागरिक खोखो खेळण्याच्या खुंटासारखा वापर करून कचऱ्याचा सडा मात्र रस्त्यावरच पडेल याची दक्षता घेतात.आणी इथे मात्र पार्कात फिरायला गेलो तर बरोबर आणलेल्या पाळीव कुत्र्याच्या मालकांना त्या कुत्र्यामागे पिशवी घेऊन धावून त्याची विष्ठा बागेत पडू नये याची काळजी घ्यावी लागते नाहीतर त्यांना जबरदस्त दंड बसतो आपल्याकडे तर काही मानवप्राणीही रस्त्याच्या कडेची शोभा वाढवण्यात धन्यता मानतात.
         रस्त्यावर वाहने अतिशय वेगाने जात असतात आणि आणि ती फारच मोठ्या प्रमाणात चारचाकीच असतात. आपल्याकडे दिसणारी वाहनांची विविधता येथे दिसत नाही.आणखी एक जाणवणारी गोष्ट म्हणजे रस्त्यावर कोठेच पाळीव अथवा कसलेच प्राणी दिसत नाहीत.याउलट आपल्याकडे पाळीव प्राणी मालकाकडे कामापुरते राहून बाकीचा काळ रस्त्यावरच व्यतीत करतात त्यामुळे आपला  रस्ता हे शिक्षणाचे मोठे केंद्रच असतो.अमेरिकेतील मुलांना साधे कोंबडे,गायी,घोडे.इ.प्राणी प्राणिसंग्रहालयातच जाऊनच पाहावे लागतात याउलट आपल्या बालकांना मात्र हती,घोडा,गाय बैल,म्हशी,कधीकधी उंट ,कोंबड्या इ. चे सांगोपांग ज्ञान रस्त्यावरच मिळते त्यासाठी त्यांना प्राणिसंग्रहालयात जावे लागत नाही.फक्त आता वाघ सिंह आणि माशांसारखे जलचर प्राणीच काय ते रस्त्यावर दिसत नाहीत.बोरिवली वगैरे अभयारण्यांच्या शेजारील रस्त्यावर तेही दिसतात अधूनमधून.रस्त्यावरील प्राण्यांची आठवण येताच एका म्हशीने केलेली माझी फजिती आठवल्याशिवाय कशी राहील.नुकतेच लग्न झाल्यावर ऐटीत बायकोला घेऊन एरंडवण्यातून मेव्हण्यांच्या घरातून बाहेर पडून लोकमान्यनगरात जाण्यासाठी निघालो होतो अंगात त्यावेळी चांगलेच म्हणता येतील असे कपडे म्हणजे शुभ्र शर्ट आणि सटिन ब्ल्यू पँट होती̮. लोकमान्यनगरला जाण्यासाठी कर्वे रस्ता ओलांडून कॉजवेवरून( आता तेथे पूल झाला आहे.) चालतच जाता येणे शक्य होते.कॉजवेवर थोडे अंतर आम्ही गेलो तो समोरून म्हशींचा एक घोळका लडिवाळपणे एकमेकांच्या शिंगात शिंगे अडकवत आला त्यातील एका म्हशीला आमचे जोडीने चालणे आवडले नसावे आणि आम्ही जवळून जात असताना तिने शेपटीची एक डौलदार तान घेत समेचा एक फटकारा माझ्या छातीवर असा लगावून दिला की त्यापुढे येसाजी कंकाने ज्या तलवारीच्या एका वारात हत्तीची साँड उतरवली तो वारही फिका पडावा आणि त्या फटकाऱ्याने माझ्या शर्टाची पुढची बाजू खांद्यापासून कमरेपर्यंत जानव्यासमांतर शेणाच्या पट्ट्याने सजून निघाली अर्थातच लगेचच परत घरी प्रवेश करून कपडे बदलूनच मला बाहेर पडावे लागले.
        याशिवाय श्वानमित्र संस्थांमुळे कुत्र्यांच्या तर झुंडीच रस्त्यावर फिरत असतात.त्यामुळे आपल्याकडे ज्याविषयी उगीचच शिक्षणतज्ञ आणि राज्यकर्ते यांच्यातच जो चर्चेचा कल्लोळ चालू आहे त्या लैंगिक शिक्षणाचे केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर  प्रात्यक्षिकही बालकांना रस्त्यावरच पहायला मिळत असल्याने उगीचच त्या विषयावर चर्चासत्रे कशासाठी चालू आहेत, समजत नाही.थोडक्यात रस्ता हे आपल्याकडील विद्यापीठच आहे म्हणाना कुटुंबनियोजनाचा प्रसार व्हावा तसा होत नसल्याने आपल्याकडे रस्त्यांचा लोकसंख्या नियंत्रणासाठीही उपयोग केला जातो त्यासाठी सलमानखानसारख्या ताऱ्यांची मदत होते. त्यामुळे आपल्याकडे डोळे उघडे ठेऊन अगदी काळजी पूर्वक रस्त्यावर चालावे लागते आणि तरीही तुमचे दैवच बलवत्तर असेल तर तुम्ही रस्त्यावर सुखरूपपणे चालू शकता.अशी सवय असल्याने रस्ता ओलांडताना एक वाहन येत आहे म्हणून मी थांबलो तर तो वाहनचालकच थांबून मला रस्ता ओलांडण्याचा आग्रह करू लागला आणि माझे अंतः करण अगदी भरून आले आणि बिचाऱ्याचा हिरमोड करायला नको म्हणून मी त्याच्या विनंतीस मान दिला.
        रस्त्याचा असा अगदी मर्यादित वापरच माहीत असल्याने येथील वाहनचालकाना वाहने अगदी जपून चालवावी लागतात.आणि जिकडेतिकडे पाट्या दिसतात " कायद्यानुसार पायी चालणारास अग्रक्रम देणे आवश्यक आहे."  आपल्याकडे असे केले तर मला वाटते गाडी चालवणाऱ्याना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालतच जावेसे वाटेल.आणी अशा प्रकारे इंधनाची बरीच बचत होईल.
        .