वारी ---४

             लंडनला पोचायला जरी जवळजवळ दहा तास लागले होते तरी घड्याळात मात्र सकाळचे अकराच वाजले होते.आम्ही पश्चिमेला चाललो होतो ना ! हवा चांगली असल्याची घोषणा झाली त्यामुळे लंडन राहिले पण हीथ्रो विमानतळ तरी पाहायला मिळेल अशी आशा होती पण तेथेही आमची पार निराशा झाली. आम्हाला विमानतळावर जाऊ दिलेच नाही त्या ऐवजी बाहेर नेऊन एका अतिशय छोट्या हॉलमध्ये आमची रवानगी झाली.तेथे सगळ्यांना बसायपुरतीही जागा नव्हती आणि टॉयलेटही नव्हते.ज्या पूर्वानुभवी मंडळींनी विमानातील अतिआकुंचित टॉयलेटऐवजी विमानतळावरील  प्रशस्त सुविधेचा लाभ घ्यायचे ठरवले होते त्यांची परिस्थिती मात्र फारच बिकट झाली. बाहेर सोडायचेच नव्हते तर व्हिसा तपासण्याची काय आवश्यकता होती कळले नाही.भाग्यच आमचे की सामान ताब्यात घेऊन पुन्हा ते चाळणीखालून न्यावयास लावले नाही कारण ९/११ नंतर प्रवास करणाऱ्या काही मित्रांवर असा प्रसंग आला होता.अर्धा पाऊण तास त्या हॉलमध्ये काढल्यावर पुन्हा आम्हांस विमानात सोडण्यात आले आणि आम्ही पूर्वीच्याच जागी स्थानापन्न झालो.त्यानंतरचा प्रवासही बराचसा झोपेतच झाला.माझ्या मागील आसनावरील प्रवासी बरोबर खाद्यपेयांच्या गाड्या आल्या की जागा होत असे आणि मद्याचा भरपूर मोठा डोस पचवून पुन्हा झोपेच्या अधीन होत असे.नऊ तासांनी न्यूयॉर्कचा जे. एफ्. के. विमानतळ आल्याची घोषणा झाली तेव्हा तेथील घड्याळात दुपारचे चार वाजले होते. आम्हाला आय- ९४ फॉर्म्स प्रत्येकी एक आणि दोघात मिळून एक डिक्लेरेशन फॉर्म भरायला देण्यात आले.मला आमचे दोघांचे फॉर्म्स भरायचे असल्याने आणि अजून डोळ्यांवर झोप असल्याने प्रत्येक वेळी फॉर्म भरताना काहीतरी चूक व्हायची.कधी माझ्या फॉर्ममध्ये बायकोचा पासपोर्ट नंबर तर कधी तिच्या फॉर्ममध्ये माझी जन्मतारीख असे घोटाळे करत मी बरेच फॉर्म्स खराब केले.फॉर्म्स मागण्यासाठी मी बायकोला पाठवत होतो,फॉर्म भरण्याचे काम मी करत असल्याने तिलाही ती जबाबदारी आपली आहे असे वाटत होते पण शेवटी विमान कर्मचाऱ्यांनी आता हे शेवटचेच फॉर्म असे निक्षून बजावून सांगितल्यावर तिनेही मला तसे निक्षून सांगितल्यावर मात्र माझ्या हातून चूक न होता फॉर्म्स भरले गेले.फॉर्म्स अगदी प्रवासाच्या शेवटी दिल्यामुळे भरायला पुरेसा वेळ नव्हता अशी तक्रार बरेचजण करत होते त्याअर्थी त्यांच्याही हातून अशाच चुका झाल्या असण्याची शक्यता वाटली.मी फॉर्म्स भरताना केलेल्या चुका पाहून माझ्या मागे बसलेल्या प्रवाशाने प्राशन केलेल्या पेयाचा परिणाम त्याच्या ऐवजी माझ्यावरच झाला की काय की चुकून हवाई सुंदरीने मला ज्यूसऐवजी आणखी काही दिले अशी शंका सौ.ला आल्याचे तिने   बोलून दाखवले.तो प्रवासी मात्र एका झटक्यात फॉर्म भरून मोकळा झाला होता.त्याचे कारण त्याची बायको बरोबर नसल्यामुळे त्याच्यावर कसलेच दडपण नव्हते असे मी तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा परिणाम उलटाच झाला. असो! बाहेर पडताना विमान कर्मचाऱ्यांनी (अगदी सुटलो यांच्या तावडीतून असा चेहरा न करता)हसून आम्हाला निरोप दिला आणि पुन्हा लांबलचक बोगदा मार्गाने बाहेर पडलो. 
           लगेच इमिग्रेशनसाठी निरनिराळ्या रांगा लागल्या होत्या त्यातील एका रांगेत आम्हाला उभे केले गेले.तेथील कर्मचारी आमचे पासपोर्ट, व्हिसा यांची पाहणी करून आम्ही किती महिने राहायचे याचा विचार करून तसा शिक्का आमच्या प्रवासपरवान्यावर मारत होते.आम्हा दोघांची पाहणी करून आम्ही कोणाकडे आणि कशासाठी चाललो आहोत असे विचारल्यावर आम्ही मुलाला भेटायला आलो आहोत असे सांगितल्यावर त्याचा पत्ता विचारून खात्री करून घेण्यात आली.आणि किती दिवस राहणार असे विचारल्यावर मी इमानेइतबारे चार महिने म्हणून सांगितले त्यावर स्मितहास्य करून मारलेला शिक्का बघून आश्चर्य वाटले कारण त्याने सहा महिन्याचा शिक्का मारला होता.कदाचित आमच्या पूर्वीच्या प्रवाशास त्याने तो शिक्का वापरला असावा  तर तोच शिक्का मारावा उगीच कशाला बदलायचा  नाहीतरी  हा चार महिनेच राहायचे म्हणतोय असा विचार त्याने केला असावा,किंवा चार महिन्या ऐवजी सहा महिनेच काय कितीही काळ राहिला तरी ही मंडळी काही विशेष त्रासदायक होणार नाहीत असाही केला असावा.काहीका असेना इतरांना येणाऱ्या अनुभवाच्या उलट अनुभव आम्हाला आला. कारण काही लोकांना सहा महिने सांगूनही तीनच महिन्याचा किंवा महिन्याचाच परवाना देण्यात आल्याचे अनुभव काही जणांनी निवेदन करून आम्हाला घाबरविले होतेच.आमच्या एका मित्राचा अनुभव मात्र नमुनेदार होता.त्याच्या पूर्वीच्या प्रवाशाने माझ्याचसारखा चार महिने राहण्याचा विचार व्यक्त केला होता त्याला वापरलेला शिक्काच त्या मित्रवर्यांच्यासाठी इमिग्रेशनवाल्याने मारण्यासाठी हात उचलताच या आमच्या मित्रमहाशयानी आपला हात मध्ये घातला कारण त्यांना सहा महिने राहायचे होते.त्या मित्राच्या सावधानतेचे मला तरी कौतुक वाटते कारण आमच्याच भवितव्यतेच्या चिंतेत मी इतका मग्न असतो की आपल्यापुढची व्यक्ती काय बोलते आणि त्यावर काय प्रतिक्रिया होते या गोष्टीकडे लक्ष देणे मला तरी काही जमले नसते. सुदैवाने त्या इमिग्रेशनवाल्यावर त्यांच्या हात मध्ये घालण्याचा  काही  विपरीत परिणाम झाला नाही आणि त्यांनाही सहा महिन्याचा शिक्का मारून मिळाला.
        आता सामान ताब्यात घेण्याची वेळ आली.बॅगेज क्लेम अशी खूण असलेल्या भागात आम्ही प्रवेश केला.तेथे निरनिराळे पट्टे वर्तुळाकार मार्गात फिरत होते आमच्या उड्डाणाचा क्रमांक असलेल्या पट्ट्याजवळ जाऊन आम्ही सामान येण्याची वाट पाहू लागलो.त्यापूर्वी एक डॉलरमध्ये एक ट्रॉली विमानतळावर उपलब्ध होईल अशी सूचना मुलाने देऊन ठेवल्यामुळे एक एक डॉलरची नाणी मुठीत पकडून आम्ही जात होतो पण आम्हाला तेवढाही त्रास होऊ नये अशी अमेरिकनांची इच्छा असावी त्यामुळे त्या पट्ट्यापाशीच सोडलेल्या दोन ट्रॉल्या आम्हाला मिळाल्या आणि फिरत्या  पट्ट्यावरून  सामान येण्याची वाट पाहू लागलो.आमच्या बॅगांसारख्याच सगळ्या बॅगा दिसत असल्याने आपल्याच बॅगा आपल्याला कशा मिळणार अशी भीती मला पडली होती पण सौ. ने मात्र कशी काय आपली बॅग बरोबर हेरली आणि पट्ट्यावरून खाली खेचलीसुद्धा मग तिच्यापाठोपाठ इतर बॅगांनीही शरणागती पत्करली. विजयी वीरांप्रमाणे आपले सामान दोन ढकलगाड्यांवर चढवून आम्ही आता शेवटचा अडथळा म्हणजे सामानासह अमेरिकन  कस्टम अधिकाऱ्यांच्या चाळणीतून बाहेर पडण्याचा पार करायला निघालो.बाहेर पडताना आपल्या बॅगा उघडायला लावतात आणि त्यातील त्यांच्या दृष्टीने आक्षेपार्ह म्हणजे काही खाद्यपदार्थ वगैरे ( कारण आमच्याकडे बाँब असणे शक्यच नव्हते)काढून बाहेर फेकून देतात का हे पाहणे आणि काही प्रश्न विचारतात का हे पाहणे येवढेच उरले होते.पण तेथेही आम्ही आणि आमचे सामान अगदीच लक्ष न देण्याच्या लायकीचे ठरलो आणि आपल्याला मुळीच भाव न मिळाल्याचे कणभरही दुः ख न होता (उलट थोडासा आनंदच ) आम्ही बाहेर पडलो.आम्ही बाहेर पडत असतानाच सुजितचा आमच्या मुलाचा चेहरा दिसला आणि जीव भांड्यात पडला. पण अनपेक्षितपणे त्याच्याबरोबर एक व्यक्ती दिसली ती होती एक गोरी चष्मा लावलेली मुलगी ! आम्हाला भारतात करावयाच्या तयारीचा मेल करताना त्याने त्याच्या एका मैत्रिणीचे आई वडील नुकतेच येऊन गेल्यामुळे तिने केलेल्या तयारीचा उल्लेख त्यात होता.त्याउपर आणखी काही अधिक आहे की काय अशी शंका मला आली होती आणि आता आम्ही बाहेर पडताच " ही संयुक्ता राव " अशी तिची ओळख करून देताना तिने आम्हाला  वाकून  नमस्कार केल्यामुळे ती खरी असावी असे वाटले.
       आता आम्ही निश्चिंत झालो कारण मुलगा बरोबर होता.न्यूयॉर्क विमानतळाबाहेर पडताना आमच्या सामानाचा ताबा त्या दोघांनी घेतला होता आणि आम्ही त्यांच्याबरोबर चालू लागलो,रस्ता ओलांडण्यापूर्वी संयुक्ताने समोरच्या खांबावरचे बटण दाबले आणि समोरचा दिवा हिरवा होताच आम्हाला चला असे म्हटले.आपण बटण दाबून रहदारी थांबवू शकतो ही गोष्ट आमच्या तर्कशक्तीच्या बाहेरची होती कारण सिग्नल तांबडा असला तरी वाहने थांबत नाहीत हा आमचा सिंहगड रोड अथवा पुण्यातील कोठल्याही रस्त्यावरचा अनुभव ! पुढे तर केवळ आम्ही बटण दाबले म्हणूनच नाही तर आम्ही रस्ता ओलांडतो असे पाहूनही मंत्र्यांच्या गाड्या येताना थांबावी तशी रहदारी थांबते हे पाहून आम्ही अगदी अचंबित झालो.सुजितने आम्ही येणार आमचे सामान बरेच असणार म्हणून एक मोठी गाडी भाड्याने आणली होती.बाहेर भला मोठा वाहनतळ होता आणि त्यात आपली गाडी शोधून त्याने सामान चढवले आणि आमचा अमेरिकेतील रस्त्यावरचा पहिला प्रवास सुरू झाला.
         जे. एफ्.के. विमानतळापासून सुजितच्या घराकडे यावयास जवळजवळ दोन अडीच तास लागले̱. गाडीत आमच्या गप्पा चालू असल्याने माझे लक्ष बाहेर जरा कमीच होते,शिवाय सौ̮. ला संयुक्ताशी बोलण्यात अधिक रस होता कारण मला ज्या गोष्टीची शंका होती त्याविषयी तिला खात्रीच होती ज्यावेळी माझे लक्ष बाहेर गेले त्यावेळी आम्ही सुजितच्या घराच्या बरेच जवळ आलो होतो असे तो म्हणत होता आणि रस्त्यावरील दुतर्फा दुकाने आणि हॉटेले यावरील पटेल अश अंड कॅरी, सब्जीमंडी वगैरे वाचल्यावर चिमणराव स्कौटमास्तरांच्या गाडीचे बैल रात्री उलटे फिरून परत पुण्यातच आले तसे आम्ही पण चुकून पुन्हा भारतातच आलो नाही ना असे क्षणभर वाटले पण बरोबर अमेरिकेतील मंडळी असल्याने तसे काही नाही याची खात्री होती.शिवाय दुकाने भारतीय असली तरी रस्त्यावर वाहने शिस्तीत चालत होती त्या अर्थी आपण भारतात असणे शक्य नाही असे वाटले. नंतर मात्र न्यू जर्सी तील हा भाग अगदी मिनिइंडियाच आहे हे समजले.काही दिवसांनी येथील अमेरिकनांनाच गुजराती शिकावी लागेल अशी शक्यता वाटते.कारण येथे भेटणारा कोणताही गुजराती आपल्याशी प्रथम गुजरातीमधूनच बोलू लागते. आपल्या मराठी लोकांचे तसे नाही बरका .ते प्रथम आणि शक्यतो नंतरही इंग्रजीतच बोलण्याचा प्रयत्न करणार. असो तो पुढचा भाग झाला.दोन अडीच तासांच्या छोट्या प्रवासानंतर आम्ही सुजितच्या घरात शेवटी प्रवेश केला त्याचा पत्ता होता ३०९ हिडन वॅली ड्राइव्ह,एन् जे.