ह्यासोबत
वारीच्या बाराव्या भागानंतर बरेच दिवस पुढचा भाग मनोगतवर न दिसल्यामुळे मनोगतीना चुकल्याचुकल्यासारखे वाटत असेल.
वारीचे १० भाग झाल्यावरच बंद करायचे असे मी ठरवले होते, कारण आपल्याकडे दशमान पद्धत आहे ना, पण अमेरिकेत बारा या संख्येला एक डझन म्हणून महत्त्व आहे. या अमेरिकनांच सगळ विचित्रच! जगात इतरत्र जी पद्धत असेल त्याहून काहीतरी वेगळच करायच. बघाना जगात बहुतेक देशात वाहने डाव्या बाजूने चालवतात ( आपल्या देशात ती कोणत्याही बाजूने चालवतात ही गोष्ट वेगळी) तर हे उजवीकडून चालवणार. सगळीकडे मेट्रिक पद्धत सोयिस्कर म्हणून वापरात आली पण यांच मात्र अजून गॅलन, पौंड, ओंसच चालू आहे. सुदैवाने यांच्या डॉलरचे १०० सेंटच होतात त्याला यांचा नाइलाज आहे तरीही गॅस(पक्षी पेट्रोल)ची किंमत लिहिताना एका गॅलनला २ डॉलर ९५ ९/१० सेंटस असे लिहिण्यात यांना काय शहाणपण वाटते कुणास ठाउक. त्यामुळे डझनालाही इथ अजून महत्त्व आहेच अगदी शाळेतल्या मुलांचे पाढेदेखील १२ पर्यंत म्हणजे बे दाही (२x १०) वर न थांबता बे बारे (२ x १२)पर्यंत लिहिण्याची पद्धत मी पाहिली. अर्थात ते पाठ करण्याची पद्धत असेल असे वाटत नाही.
त्यावेळी अमेरिकेत राहत असल्याने लेखांचा एक डझन झाल्यावर थांबायचे असे ठरवले. दहा भागानंतर थांबलोही असतो. पुढचे दोन भाग कसेबसे ओढून काढले त्यामुळे काही मनोगतींनाही फोडणी कंमी पडली असे वाटू लागले. पण तरीही मनोगतवर लिहायची चटक लागली की ती सुटता सुटत नाही. त्यातही आमची अवस्था पुण्यप्रभावातल्या धुंडिराजासारखी झालेली कुणी ऐकून घेवो न घेवो आपण आपले सांगत सुटायचे.
प्रस्तावना बरीच लांबली. पण प्रस्तावना लांबवण्याच्या दोषातून प्रत्यक्ष ज्ञानेश्वर सुटले नाहीत तिथ आमच्यासारख्यांची काय कथा. (बघा मधेमध्ये ज्ञानेश्वरांना घेतले की कसा लेख भारदस्त झाल्यासारखा वाटतो. ) ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात ज्ञानेश्वर प्रास्ताविकात आपण कसे गुरुंच्या हातचे बाहुले आहोत याविषयी सांगत असताना गुरुच त्यांना
तंव श्रीगुरू म्हणती राही । हे तुज बोलावे न लगे काही ।
आता ग्रंथा चित्त देइ । झडकरी वेगे ॥१. ८३॥
असे दटावतात तर कधीकधी ज्ञानेश्वरांनाच आपण पाल्हाळ लावतोय याची जाणीव होऊन ते स्वतः च स्वतः स बजावतात
हा असो अतिप्रसंगू । न संडी बा कथालागू ।
होईल श्लोकसंगती भंगू । म्हणोनिया ॥५. ६६॥
किंवा
तू संतस्तवनी रतसी । तरी कथेची से न करिसी ।
की निराळी बोल देखसी । सनागर ॥५. १४१॥
थोडक्यात पाल्हाळिकपणाचा दोष ज्ञानेश्वरांनाही लागू होतो तेथे कुशाग्राची काय कथा? यावर कोणी म्हणेल अहो ते ज्ञानेश्वर आहेत त्यांची तुमची काय तुलना यावर ज्ञानेश्वरांनीच सांगून ठेवले आहे,
राजहंसाचे चालणें । भूतळीं जालिया शाहाणे ।
आणिकें काय कोणें । चालावेंचिना ॥१८. १७१२॥
याच थाटात
ज्ञानदेवांचे पाल्हाळ लावणे । वाटते गोड अमृताप्रमाणे ।
म्हणून काय कुशाग्राने । पाल्हाळ लावूच नये?
असे का म्हणू नये, असो! एवढ्या प्रस्तावनेनंतर वारीचा पुढचा भाग.
आमचे मित्र आमच्याकडे येऊन नायगारा आणि न्यूयॉर्क पाहून परत जाताना आम्हाला पुन्हा एकदा त्यांच्याकडे येण्याची आठवण करून गेले आणि आम्ही पण येण्याचे आश्वासन त्यांना दिले. पण आपण जाऊच अशी मला खात्री नव्हती, कारण माझा नेहमीचाच बाहेर जायचा निरुत्साह. शिवाय तेही पुणेरी असल्यामुळे त्यांचा आग्रहही एकदा आमच्याकडे या की राव अशा पुणेरी थाटाचाच असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती पण पुणे सोडून बरेच दिवस राहिल्यामुळे की काय त्यानी पुणेरीपणाही सोडून दिला असावा. कारण एक दिवस खरोखरच त्यांचा दूरध्वनी आला आणि त्यानी आम्हाला त्यांची हॉलिवूड, युनिव्हर्सल स्टुडिओला भेट देण्याची तारीख ठरत आहे आणि ती आम्हाला जमण्यासारखी आहे किंवा नाही असे विचारले. असे त्यानी विचारल्यावर मात्र आम्ही नेहमीप्रमाणे या विषयावर चर्चासत्र सुरू केले. आमच्या घरात कोणतीही गोष्ट चर्चा केल्याशिवाय ठरत(वा ठरवून मग बहुतेक वेळा रद्दही होत) नाही. बरीच साधक बाधक चर्चा झाली. सुजितचे मत अर्थातच आम्ही जावे असेच होते. आम्हाला अमेरिकेत एकट्याने विमानाचाच काय पण कसलाच प्रवास जमेल की नाही याची शंका होती आणि खरोखरच आम्ही अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवल्यापासून पायी फिरण्यापलीकडे स्वतंत्रपणे कोठेही जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यात त्यांच्याकडे सानहोजेला जाण्यासाठी एकदा विमान बदलावे लागत होते हीसुद्धा महत्त्वाची अडचण होती. तरीही आता इतक्या लांब आलोच आहोत तर एकदा हाही अनुभव घ्यावा असा शेवटी निश्चय करून आम्ही येत असल्याचे त्यांना कळवले आणि सुजितने आमची सानहोजेची तिकिटे खरेदी केली. अमेरिकन एअरलाइन्सचे हे विमान पिटसबर्गला बदलावे लागत होते.
नेवार्कहून ते विमान संध्याकाळी साडेसहाला सुटून पिटसबर्गला साडेसातला पोचणार होते आणि तेथून आठ वाजता सुटणारे विमान आम्हाला पकडायचे होते. आमचा संपर्क सतत राहावा म्हणून सुजितने एक भ्रमणध्वनी आम्हाला दिला होता आणि त्यावरून संपर्क कसा साधायचा याविषयी सूचना पुन्हापुन्हा दिल्या होत्या कारण उघडच होते. यापूर्वी आम्ही भारतातही भ्रमणध्वनी वापरला नव्हता. शिवाय प्रत्येक यंत्राचे वापरण्याचे तंत्र वेगवेगळे असते. अमेरिकेत तर काही बोलायलाच नको. साधा बाथरूममधला नळसुद्धा कधीकधी उघडायला जमत नाही. एकदा खरोखरच एका हॉटेलमध्ये आम्ही उतरलो असताना अंघोळ करण्यासाठी कपडे काढून शॉवरखाली उभा राहिलो आणि पाणी सोडण्याचा प्रयत्न केला पण कितीही वेगवेगळ्या प्रकारे नळाची आराधना केली तरी तो मुळीच दाद द्यायला तयार नाही. अखेर त्याचा नाद सोडून कपडे पुन्हा चढवून बाथरूमबाहेर येवून मुलाला तो नळ कसा उघडतात हे विचारावे लागले(त्यालाही त्यासाठी बरीच कसरत करावी लागली होती ) तेव्हाच अंघोळ करणे शक्य झाले. असो! विमानतळावर जितक्या आत आम्हाला सोडणे शक्य होते तेथपर्यंत सुजित आमच्याबरोबर होताच. पुढे अंग आणि बॅगझडती होऊन आम्ही आत गेल्यावर ज्या गेटमधून विमानात प्रवेश करायचा तेथे जाऊन बसल्यावर त्याला भ्रमणध्वनीवरून संदेश पाठवल्यावर तो आणि आम्हीही निर्धास्त झालो. या प्रवासात भ्रमणध्वनीचा फारच उपयोग करावा लागणार आहे याची तेव्हा कल्पना नव्हती.
बोर्डिंग पासवर उल्लेखलेल्या गेटमधून आत प्रवेश करण्याची सूचना लगेचच मिळाली आणि सहा वाजता आम्ही विमानात स्थानापन्नही झालो आणि तसा संदेश भ्रमणध्वनीवरून पाठवून विमानकर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार तो बंद करून सौ. वतीच्या पर्समध्ये आम्ही त्याची प्रतिष्ठापना केली. आता पिटसबर्गला पोचल्यावरच त्याला कळवायचे तोपर्यंत त्याची आवश्यकता नाही असे वाटले होते. पण तसे घडायचे नव्हते. साडेसहा वाजले तरी विमान उडण्याचे चिन्ह दिसेना उलट पायलटने सूचना दिली की "खराब हवामानामुळे विमान निघायला उशीर होत आहे पण आम्ही वेळेत विमान पिटसबर्गला न्यायचा प्रयत्न करू. " असे ऐकल्यावर आता आपण पिटसबर्गला काही आपण वेळेत पोचत नाही आणि पुढची फ्लाइट काही आपल्याला मिळत नाही अशी भीती मला वाटू लागलीच. म्हणून मी लगेचच पर्समध्ये स्थानपन्न केलेला भ्रमणध्वनी बाहेर काढून सुजितला परिस्थितीची कल्पना दिली. माझ्या शेजारी एक अमेरिकन प्रवासी होता त्याला पुढची फ्लाइट चुकली तर काय असे विचारल्यावर बहुतेक ते दुसऱ्या फ्लाइटमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात असे गुळमुळीत उत्तर त्याने दिले. म्हणजे तो अमेरिकन असला तरी या अडचणीला नवखाच असावा. मला एकदम नेहमीच्या एस. टी. च्या प्रवासाची आठवण झाली. बऱ्याच वेळा आम्ही बसलेल्या एशियाड गाडीचा टायर नेमका पंक्चर होतो आणि गाडीत ज्यादा टायर नेहमीप्रमाणेच नसतो. कंडक्टरला असे का विचारल्यावर तो त्रासिकपणे काहीतरी उत्तर देतो कारण सगळेच प्रवासी तोच प्रश्न विचारत असल्यामुळे तोही वैतागलेलाच असतो आणि मागून येणाऱ्या लाल डब्याच्या गाडीत कसेबसे आम्हाला कोंबून पुढे रवाना करून आपली जबाबदारी पार पाडतो. [float=font:nayanB;breadth:200;background:F3F2F0;color:CC6714;place:top;size:18; ]विमानात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यामुळे अतिओझ्याने विमान कोसळले अशी बातमी कधी वाचलेली नसल्यामुळे विमानप्रवासात तसे काही असणार नाही याची खात्री नसली तरी अंदाज होता.[/float] सात वाजले तरी हवामान सुधारत नव्हते आणि पुढची फ्लाइट चुकण्याची दाट शक्यता मला दिसू लागली. सुजितचा परत फोन आला की त्याने पिटसबर्गला असलेल्या त्याच्या मित्राला फोन करून आम्हाला रात्र तेथेच काढावी लागली तर आमची राहण्याची सोय करावयास सांगितले होते. फ्लाइट चुकण्यापेक्षा पुढे आमच्या मित्राने दुसऱ्या दिवशी पहाटेच त्याच्या घरून निघून डिस्नेलँड आणि युनिव्हर्सल स्टुडिओजवळील आमच्यासाठी आरक्षित केलेल्या हॉटेलची व्यवस्था वाया जाणार की काय याची मला जास्त काळजी पडली होती. साडेसात वाजले आणि पुन्हा हवा खराब असल्याचीच सूचना देण्यात आली. शेवटी आठला पाच मिनिटे कमी असताना हवा सुधारल्याची खात्री पायलटला झाल्यामुळे त्यानी उड्डाण करायला सुरवात केली.
पायलटने अजूनही आम्हाला पुढील फ्लाइट मिळवून देण्याचा आशावाद दाखवला होता आणि खरेच आम्ही नेवार्क विमानतळ सोडतो न सोडतो तोच पिटसबर्ग विमानतळावर आपण उतरण्याची तयारी करत आहोत अशी सूचनाही झाली. म्हणजे हा प्रवास जेमतेम वीस पंचवीस मिनिटांचाह होता एस. टी. च्या प्रवासाचे गणित माझ्या डोक्यात इतके घट्ट बसले होते की आतापर्यंत दोन वेळा विमानात प्रवेश करण्याचा अनुभव असूनही आता पिटसबर्गला जर पुढची फ्लाइट निघायच्या तयारीत असली तर आपण धावत जाऊन सुटणाऱ्या एस. टीच्या मागील वा पुढील दरवाज्यावर थाप मारावी तसा विमानाचा दरवाजा खडखडावयाचा आणि तो उघडायला लावून आत प्रवेश करायचा असे मी ठरवूनही टाकले. पिटसबर्गला उतरतानाच ज्या प्रवाशांना पुढची फ्लाइट पकडायची असेल त्यांना अगोदर उतरू द्यावे अशी सूचना होऊन आम्हाला बाहेर पडून लगेच कोणत्या गेटकडे जायचे याची सूचनाही मिळाली. आम्ही दोघे जमेल तितक्या वेगाने सामानासह बाहेर पडलो. विमानतळावर एका गेटमधून प्रवेश करून पिटसबर्गहून सानहोजेला जाणाऱ्या फ्लाइटच्या गेटकडे जाऊन त्या विमानात प्रवेश करायचा होता. प्रवेशद्वारावरील विमानकंपनीच्या कर्मचाऱ्याने आम्हाला हवे असलेल्या गेटकडे कसे जायचे याचे मार्गदर्शन केल्यावर आम्ही एवढ्या वेगाने त्या गेटकडे गेलो की आम्ही त्या गेटकडे जाऊन खरोखरच गेटचा बंद दरवाजा खडखडवीत आहोत की काय अशी शंका बाहेर बसलेल्या कर्मचारी स्त्रीला येऊन तिने मला बोलावले आणि"Hay man what are you doing? " असे विचारल्यावर मी तिला आमची फ्लाइट कशी उशीरा आली आणि त्यामुळे आम्ही किती घाईघाईने आलो याविषयी खुलासा करण्याचा प्रयत्न केल्यावर "Do you think you can enter the plane like this? " असे विचारून माझ्या अडाणीपणाची जणू कीवच केली आणि अजून तुमच्या फ्लाइटची अनौन्समेंटही झाली नाही असे बजावून सांगितल्यावरही तिच्या बोलण्याचा राग न येता किंवा आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन झाल्याची लाज न वाटता आता पुढील प्रवास पदरात पडला या कल्पनेने आमचा जीव भांड्यात पडला आणि मग भ्रमणध्वनी बाहेर काढून आम्ही सुजितला संदेश पाठवून त्याचीही काळजी दूर केली. मग नेहमीच्या पद्धतीने आम्ही सॅन होजेला जाणाऱ्या विमानात स्थानापन्न झालो.
पिटसबर्गपर्यंतचा प्रवास अगदीच छोटा असल्याने आणि आम्ही वेगळ्याच काळजीत असल्याने प्रवासात पेयपान अथवा इतर काही गोष्टींकडे आमचे मुळीच लक्ष नव्हते पण आता प्रवास तीन-चार तासांचा असल्यामुळे त्या गोष्टी व्यवस्थित सुरू झाल्या मात्र या प्रवासात येता जाता दोन्ही वेळा फूटबॉलवर आधारित एकाच इंग्लिश पिक्चरने आमची पाठ पुरवली. दुसरी गोष्ट म्हणजे यावेळी एअर इंडियासारखे श्रवणयंत्र ( हेडफोन) फुकटात नसून त्यासाठी चक्क पाच डॉलर मोजावे लागणार होते, आणि ते लावूनही आम्हाला ऐकू येणाऱ्या शब्दांपैकी कितीसे कळणार होते हाही प्रश्नच होता त्यामुळे आम्ही तिकडे लक्ष न देता एकादी डुलकी काढता येतेय का याकडेच लक्ष देणे पसंत केले. अमेरिकेच्या अतिपूर्वेकडून अतिपश्चिमेकदे आम्ही जात असल्यामुळे वेळेत तीन तासांचा फरक होता त्यामुळे नेवार्कहून आठ वाजता निघूनही आम्ही सॅन होजेला रात्री साडेदहालाच पोचलो. आम्हाला न्यायला विमानतळावर आमचे मित्र आपल्या चिरंजीवांना घेऊन आले होतेच
डिस्नेलँड आणि युनिव्हर्सल स्टुडिओसाठी लॉस एंजेलिसजवळ एका होटेलमध्ये आमच्या सर्वांच्या वास्तव्याचे आरक्षण मित्राच्या मुलाने केले होते. तो प्रवास बराच मोठा होता आणि गाडी चालवण्याचे काम त्याला एकट्यालाच करावे लागणार असल्यामुळे पहाटे लवकरच निघण्याचा त्याचा विचार होता. त्यामुळे मित्राच्या घरी पोचून थोडेबहुत स्थिरस्थावर होऊन कशीबशी दोन तीन तास झोप काढली की लगेच आमची बाहेर पडायची वेळ झाली.