ह्यासोबत
अमेरिकेतील अनुभव पहिली वारी झाल्यावर जवळ जवळ सहा वर्षांनंतर लिहीत असल्याने आणि त्यावेळी मागास वाटणारा आपला भारत ( मेरा भारत महान! ) अतिशय वेगाने प्रगती करत असल्यामुळे आता अमेरिकाच मागास देश वाटायला लागलाय. आता हेच पहाना मी मारे ऐटीत चतुर्मिती चित्रपटाविषयी लिहिले तर आपल्याकडे आता षण्मिती चित्रपट निघालेही. आता सहा मिती कशाला म्हणायचे याविषयी जरा मनोगतींमध्ये चर्चेला पुरेसा वाव आहे( आणि तसा तो घेतला गेलाही) ही गोष्ट वेगळी! मी मॉलविषयी लिहिले न लिहिले तो त्याच्याहून आकाराने जास्त मोठे नसले तरी त्यापेक्षा कितीतरी अधिक गर्दी असणारे मॉल आता आपल्याकडेही निघालेले पाहतोय आणि तेथे बिल चुकते करायला त्याच्याहूनही जास्त वेळ लागण्याचा अनुभवही घेऊन झाला! येऊन जाऊन गाडी (बैलगाडी नव्हे ) घेऊन न गेल्यामुळे गाडी पार्क कुठे करायची याविषयी काही अडचण मात्र आली नाही(तशी ती आपल्याकडे कोठेही उभी केली तरी चालते म्हणा) पण नंतर घरी येताना अनेक रिक्षावाल्यांची मनधरणी केल्यावर मीटरपेक्षा दहा रुपये जास्त देत असाल तर नेतो या प्रेमळ आग्रहाला मान्यता द्यावी लागली. तरी बर पुण्यातच आहे बंगलोरला नाही नाहीतर मीटरच्या दुपटी तिपटीने पैसे मोजावे लागले असते. ( पाहा रिक्षा की शिक्षा) अर्थात याबाबतीत तर भारत अगोदरच फार पुढारलेला देश आहे. पण आता मला हे सांगा तुम्ही अमेरिकेत टॅक्सीत बसल्यावर उतरताना एक दोन डॉलर गुपचुप टिप म्हणून देताच ना मग तेच या रिक्षाचालकांनी हक्काने आणि प्रेमळपणे मागून घेतले तर कुठे बिघडले. आपली दृष्टीच अशी पूर्वग्रहदूषित.
त्या पूर्वग्रहदूषित दृष्टीमुळेच अमेरिकेत जाईपर्यंत तो विकसित - पुढारलेला आणि आपण मात्र विकसनशील म्हणजे मागास असे वर्गीकरण आपण नव्हे तर इतर जगाने केले आहे तेच आपण खरे मानून चालतो. पण अमेरिकेत गेल्यावर अमेरिकेलाच मागास देश म्हणावे लागेल असे वाटू लागते. ज्या क्षेत्रात आपण पुढारलेले अर्थात विकसित आहोत त्यात त्या देशाला विकसनशील तरी म्हणता येईल की नाही शंकाच आहे कारण त्या क्षेत्रात विकास करण्याची मूळ इच्छा तरी हवी ना! आता हेच पाहा व्यापारी म्हणून एके काळी ब्रिटिश लोक प्रसिद्ध होते आणि त्यातीलच काही अमेरिकेत गेल्यामुळे त्या क्षेत्रात तेच आघाडीवर असायला हवेत की नाही? पण नाही. कोंणत्याही गोष्टीचा ( वस्तूचाच नव्हे) व्यापार करण्यात आपण त्यांना केहांच मागे टाकले आहे. व्यापार करण्यासाठी आपल्याला कोणतीही गोष्ट चालते. मग त्यात शिक्षण असो, पदव्या असोत किंवा परीक्षेच्या प्रश्न पत्रिका असोत.
अमेरिकेत पर्यटक यावेत म्हणून प्रत्येक स्थळ सुशोभित करून प्रेक्षणीय करण्यात उगीचच पैशाचा अपव्यय करताना दिसतात. त्याऐवजी त्या स्थळातील वस्तूंचाच व्यापार केला तर? म्हणजे सुंदर सुंदर दुर्मिळ पेंटिंग्स किंवा शिल्पे उगीच संग्रहालयात सडत पडण्यापेक्षा त्यांचाच व्यापार करण्याची कल्पना नाही त्यांना सुचत! आपल्याकडे सगळ्याच वस्तू एवढेच काय माणसेही विकाऊ असतात. अमेरिकेत रिपब्लिकन सेनेटर डेमोक्रेट झालाय किंवा उलटे झालेय असे कधी ऐकू आले नाही. कदाचित या बाबतीत फारच कमी पर्याय असण्याचा हा फायदा( की तोटा?) !आपल्याकडे कसे दररोज राजकीय व्यक्ती वेगळ्याच पक्षात असतात. एवढेच काय पण नवीन पक्षही काढतात. या व्यापारात किती फायदा असतो याची यांना कल्पनाच नसावी.
सफारीसारखी अनेक अभयारण्ये ठेऊन जंगली प्राण्यांच्या संरक्षणात पैशाचा अपव्यय करण्यापेक्षा त्यांची शिकार आपणच करून त्यांच्या कातडीचा किंवा शिंगांचा वा सुळ्यांचा व्यापार करण्याची शक्कल त्यांना सुचवण्यासाठी आपल्या वनमंत्र्यांनाच तिकडे पाठवायला हव.
राम गणेश गडकऱ्यानी बाळकराम या नावाने लिहिलेल्या विनोदी लेखात ( परिशिष्ट पाहा) स्वयंपाकघरातील काही नव्या कृतींचा परिचय करून दिला आहे. (बघा गडकऱ्यांनाही या विषयाचे महत्व किती पूर्वी कळले होते. अगदी कमलाताई ओगले यांच्या पुस्तकापूर्वी आणि आपल्या दूरदर्शन वाहिन्यावर संजीव कपूरचा खानाखजाना सुरू होण्यापूर्वी. ) तर ते असो. बाळकरामांच्या या लेखात त्यानी खाद्यपदार्थांच्या नावांने प्रचलित वाक्प्रचारांचा गमतीशीर वापर करून तो लेख लिहिला आहे. त्यात गुळाचा गणपती, चापटपोळ्या, धम्मकलाडू इ. पदार्थाबरोबरच बर्फीची चटणी हा पदार्थ दिला आहे. त्या खाद्यपदार्थ कृतीच्या शेवटी त्यांनी "माझ्या मते आपल्या आवडत्या कोणत्याही पदार्थाची चटणी सहज करता येते, " असा विनोदी शेरा मारला आहे. गडकरी आज हयात असते तर त्यांनी त्यात भूखंडाचे श्रीखंड, शि़क्षणाचे शिक्रण, पदव्यांची खिरापत अशा नावाच्या पदार्थांची भर घालून " आमच्या मते भारतात कोणत्याही गोष्टीचे खाद्यपदार्थात रूपांतर करून त्याची सहज चटणी करता येते. "असा शेरा मारला असता. खाते वाटपाबाबत मंत्रिमंडळातील घटकपक्षांत उगीच नाहीत वाद होत. खाद्यसंस्कृतीत नाहीतरी आपण पहिल्यापासूनच आघाडीवर आहोत अशी आघाडी घेणे अमेरिकनांना थोडेच जमणार आहे? तरी आपण मात्र मागासपणाचेच तुणतुणे वाजवत बसणार का? बुश, राइल्स भारतीयांच्या खाण्यावर टीका करतात त्यातील गर्भितार्थ खरा तर हाच आहे नाचता येईना अंगण वाकडे म्हणतात ते यांच्याबाबतीत अगदी खरे ठरते.
आम्ही दुसऱ्या वेळी गेलो तेव्हां अध्यक्षीय निवडणुकांचे दिवस होते पण आमच्यासारख्या बाहेरच्या लोकांनाच काय पण अमेरिकेतील लोकांना तरी ते समजत होते की नाही कुणास ठाउक. कुठे काही आवाज नाही, पताका नाही माळा नाहीत तोरणे नाहीत, कमानी नाहीत रस्त्यावर पोस्टर्स नाहीत. ढोल नाहीत ताशे नाहीत कशी या देशाची प्रगती होणार? येथील छापखान्यांना, चित्रकारांना, घोषणा रचणाऱ्याना आणि देणाऱ्यांना कसे काम मिळणार? आमच्याकडे साधा गल्लीतील पुढाऱ्याचा वाढदिवस असला की त्या भागातील सगळ्या रस्तांवर कटऔटस, पोस्टर्स यांचा खच पडतो आणि इकडे एक साधी पोस्टर्स नाहीत की जाहिरात नाही. फक्त येऊन जाऊन दूरदर्शनवरील निरनिराळ्या वाहिन्यांवर त्यांच त्या मिळमिळीत चर्चा. त्यामुळे नंतर त्या वाहिन्यांच्या ऑफीसवर हल्ले नाहीत. त्यात ना कसला आवेश ना दंगा धोपा ना रस्ते बंद असे सगळे शांत आणि म्हणे हे जगाचे नैतृत्व करणार. अरेरे यांना प्रशिक्षणासाठी आपल्याकडेच बोलवायला हवे असे वाटून गेले. थोडक्यात काय आमची वृत्ती म्हणजे अगदी " घरकी मुर्गी दाल बराबर".
अमेरिकेत गेल्यावर कित्येक दिवस आपली वस्तूच्या डॉलरमधील किमतीची रुपयात रूपांतर करण्याची संवय काही केल्या सुटत नाही. त्यामुळे कटिंग करायला पंधरा डॉलर म्हटल्यावर लगेच त्याचे रूपांतर त्या वेळी जवळ जवळ साडेसातशे रुपये होत असल्याने येवढ्या रुपयात भारतात दोनतीन तरी वर्षाचे कटिंग होईल हा विचार करून मी तो विचारच टाळला, शिवाय त्याच वेळी डॉ.ए. पी. जे. अब्दुलकलाम राष्ट्रपती झाल्यामुळे मी त्यांचा आदर्श समोर ठेवल्याचा टेंभाही मिरवला.
माझ्या मित्राचा मुलगा जो सुजितचा मित्रही आहे तो कनेक्टिकटला राहत होता त्याच्याकडे गेलो होतो त्याच्या मुलीचा फ्ल्यूटचा कॉन्सर्ट त्यादिवशी त्याच्याकडेच होता. येथील त्याच्या मुलीच्या शाळेत विद्यार्थ्याना कुठले तरी एक वाद्य शिकावे लागते. रश्मी ( त्याची मुलगी)ज्या शाळेत शिकत होती तिथे ज्या वाद्यांचा शिक्षणक्रमात समावेश होता त्यातील फ्ल्यूट हे वाद्य तिच्या बापाने निवडले. आणखी ड्रम ,कीबोर्ड अशी पण वाद्ये शिकवली जात होती म्हणे ! त्या शाळेच्या संचालकानी ते वाद्य म्हणजे फ्ल्यूट तो विकत घेणार की भाड्याने घेणार असा प्रश्न विचारल्यावर भाड्याने घेण्याच्या कल्पनेचा विचारही त्याच्या मनात आला नाही कारण भारतात त्यावेळी पंचवीस तीस किंवा जास्तीत जास्त पन्नास- शंभर रुपयापर्यंत मिळणारा फ्ल्यूट अमेरिकेत फारफार तर दहा पंध्रा डोलरला मिळेल या कल्पनेने त्याने विकत घेणार असे ठामपणे सांगितले आणि तो विकत घ्यायला गेल्यावर मात्र त्या फ्ल्यूटची किंमत ७९९ डॉलर्स आहे हे ऐकल्यावर त्याचे डोळे पांढरे झाले. अर्थात त्याने मग तो विकत घेण्याचा विचार रद्द केला. हा फ्ल्यूट आपल्या बासरीसारखा अगदी साधा नसतो, तर क्लॅरोनेट या वाद्यासारखा तो धातूचा असून त्याला बरीच छिद्रे असतात आणि त्यातील काही वाजवताना बंद करावी लागतात तर काही उघडावी लागतात हे तो पाहिल्यावर कळले. फ्ल्यूट भाड्याने ( महिन्याला १० डोलर्स) घेऊनच तिने मग सराव सुरू केला. तो सराव कसा चालला आहे हे सर्वांसमोर दाखवण्याच्या या कार्यक्रमाला कॉन्सर्ट म्हणजे आपण ज्याला बैठक म्हणतो तसा हा प्रकार. मुला/लीला छंद जोपासण्यासाठी एक प्रकारचे उत्तेजन म्हणाना! त्यासाठी शेजारी मित्रमडळींना त्याने प्रेक्षक म्हणून बोलावले होते.
पुढे तेथील शाळेत माझाच नातू जायला लागल्यावर त्या शाळा पाहण्याचा योग आला इथे आपल्याप्रमाणेच प्रीस्कूल, ज्यूनियर के. जी., सिनियर के. जी. अशी तीन वर्षे झाल्यावर मूल प्राथमिक शाळेत जायला लागते. या तीन वर्षाच्या शिक्षणाची जबाबदारी पालकाची असते आणि त्या काळात हवी ती शाळा ते निवडू शकतात. या तीन वर्षाचे शिक्षण बरेच महागडे असते पण वेगवेगळ्या शाळांतं शिक्षणशुल्कात फारसा फरक नसतो. शाळेत जाण्यासाठीची व्यवस्थाही पालकानाच करावी लागते. तरीही शाळेत पालक सोडू शकत नसेल तर शाळेची मान्यताप्राप्त व्यक्तीच ते काम करू शकते.
पहिल्या इयत्तेपासून पुढील शिक्षणाची जबाबदारी मात्र शासनाची असते. पण त्यातही पब्लिक स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल असे दोन प्रकार असतात आणि प्रायव्हेट स्कूल्सना बरीच फी असते उलट पब्लिक स्कूलमध्ये मात्र शिक्षण पूर्णपणे मोफत असते. शिवाय तरीही तेथे शाळेत शिकवले पण जाते त्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यास वेगळ्या क्लासला जावे लागत नाही. अशाने क्लासचा उद्योग कसा चालणार?म्हणजे याही बाबतीत आपणच अधिक पुढारलेले आहोत. आपल्याकडे शाळेत शिक्षक नेमतांना त्यांना पगार देण्या ऐवजी त्यांच्याकडूनच घसघशीत देणगी शाळेसाठी घेण्यात येते आणि मग ती रक्कम कशी वसूल करायची हे त्या शिक्षकावरच सोपवले जाते. इथे मात्र शिक्षकाने शाळेत शिकवायला पाहिजे असा नियम आहे आणि ते तो कसोशीने पाळतात. तुम्ही ज्या भागात राहता त्याच प्रभागातील शाळेत तुमच्या पाल्याला प्रवेश घ्यावा लागतो आणि कोणत्याही धावपळीशिवाय तो मिळतो. आपल्याकडे रिझर्वेशनशिवाय बस, रेल्वेसारखेच शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवणे कठीण असल्यामुळे प्रवेश मिळाला की एव्हरेस्टच्या शिखरावर पोचल्याचा भास आणि आनंद जो होतो त्याला येथील पालक मुकतात.
येथील शाळां पाहून त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटायला लागला. या शाळांच्या इमारती आपल्याकडील कोठल्याही महाविद्यालयापेक्षा भव्य असतात. तरी या शाळा त्या त्या शहरांच्या महापालिकांसारख्या स्थानिक संस्थानीच चालवलेल्या होत्या. शाळेत जाण्यासाठी जी बस असे तिच्यासाठी मात्र काही रक्कम द्यावी लागते. बाकी सर्व शैक्षणिक साहित्य शाळेतच मिळते. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे घोकंपट्टीचा पूर्ण अभाव. दुसरीपर्यंत तर स्पेलिंगसुद्धा बरोबर लिहिण्याचा कटाक्ष नसतो.अर्थात आपण याही बाबतीत आघाडीवर आहोत आणि दहावीपर्यंतही स्पेलिंग शुद्धलेखन यांचा मुळीच आग्रह आपण धरत नाही. इतकेच काय दहावीपर्यंत आपल्याकडे मुलांना कॉपी करण्यासाठी आवश्यक तेवढेच वाचता आणि लिहिता आले तरी भागते. इथे मात्र तिसरीपासून स्पेलिंगच्या चुका दाखवल्या जातात. त्याचा आग्रह पहिल्यापासूनच धरावा असे पालकांचे मत ! मुलांनी स्वतःच या गोष्टीकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा करण्यात येते. इतर वाचन विद्यार्थ्यांनी करावे यासाठी त्यांना उत्तेजन देण्यात येते. माझ्या नातवाने त्यामुळे वाचनात इतके प्रावीण्य संपादन केले की एडिसन शहरातील वाचनालयातील जास्त पुस्तके वाचल्याबद्दलची पारितोषिके त्याने दोनतीनदा पटकावली
दुसरी तिसरी पर्यंत तर पुस्तकेही नसतात. किंवा असली तर ती फक्त शिक्षकच वापरतात. आणि विद्यार्थ्यांना शाळेत वापरायला देतात, त्यामुळे पुस्तके पहायला न मिळाल्यामुळे त्यात चुका असतात की नाही हे कळू शकले नाही. दररोजचा पाठ वर्गातच शिकवला जातो आणि त्यावरील गृहपाठ मुद्रित स्चरूपात प्रत्येक विद्यार्थ्याला घरी मिळतो आणि त्याच कागदावर राखून ठेवलेल्या मोकळ्या जागा भरून तो पाठ पूर्ण करून दुसऱ्या दिवशी दाखवायचा असतो. तो पुढे शिक्षकांकडून पाहिला जातो आणि त्याचे गुण वर्षाच्या सरासरीत धरले जातात. त्यामुळे दप्तराचे ओझे असे फारसे नसते. डबा घरून नेला तर तो खाण्यासाठी स्वतंत्र जागा असून त्या जागेच्या स्वच्छतेची फार काळजी घेण्यात येते, ज्या शाळेत माझा नातू जात होता त्याच्या वर्गात २०-२२ मुले आणि त्यांना दोन शिक्षिका होत्या. त्यामुळे व्यक्तिगत लक्ष फारच राहते.
प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीचा वाढदिवस शाळेत साजरा होतो त्यावेळी शिक्षिका त्यांना शुभेच्छापत्रे तयार करून देतात. आणि बाकीचे त्याचे मित्रमैत्रिणीही! शाळेतील वातावरण अतिशय खेळीमेळीचे असते. हॅलोवीन या सणाच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांची हॅलोवीन परेड या नावाने शाळेच्या आवारात शोभायात्रा निघते त्याला जाण्याचा योग आला होता. प्रत्येक विद्यार्थ्याने मजेदार मुखवटे आणि पोषाक परिधान केले होते. आमच्या नातवाने स्पायडरमॆनचा वेष डोक्यापासून पायापर्यंत परिधान केल्यामुळे आमच्या शेजारून जाताना त्याने हात उंचावून दाखवला म्हणूनच आम्हाला तो जात आहे हे कळले. तरी त्याच्या पायातील बुटाकडे पाहून आमच्या सौभाग्यवतीने त्याला अगोदरच ओळखले होते म्हणे हे ऐकून मला सीतेच्या पायातील पैंजणावरून तिला ओळखणाऱ्या लक्ष्मणाचीच आठवण झाली.(आठवा हीच राघवा हीच पैंजणे) असे वेष अर्थातच विद्यार्थ्याच्या पालकानीच खरेदी करून आपल्या पाल्याला द्यायचे असतात, त्यात भुताखेताचे जास्त प्रस्थ असते. विशेष म्हणजे शिक्षिकांनीही या यात्रेत भाग घेतला होता. फक्त अशा विशेष दिनासाठी शिक्षिकांना भेट म्हणून काही देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा करण्यात येते
माझ्या मुलास त्याच्या कंपनीने दुसऱ्या प्रकल्पावर पाठवल्यामुळे जेव्हा त्याला वर्ष संपण्यापूर्वीच नव्या ठिकाणी जावे लागले त्यावेळी आपल्याकडील पद्धतीप्रमाणे बदली झाल्यावर कुटुंबास त्याच गावी ठेऊन कर्ता पुरुषच फक्त कामावर रुजू होतो त्याऐवजी तेथील प्रथेनुसार त्याने कुटुंबकबिल्यासह प्रस्थान केले त्यामुळे नातवाला शाळा बदलावी लागली पण आश्चर्य म्हणजे त्यासाठी कुठल्याही कटकटी कराव्या न लागता पहिल्या शाळेने दुसऱ्या ठिकाणच्या शाळेला नुसते कळवले की त्याचा प्रवेश पक्का. पहिली शाळा सोडताना नातवाला जो निरोप देण्यात आला तो अगदी आपल्या ‘ऑफीसमधील एकादी व्यक्ती दुसरीकडे बदलून जाताना द्यावा अशा थाटाचा होता. म्हणजे त्याच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने आणि शिक्षिकांनी तर त्याला शुभेच्छापत्रे तर दिलीच पण तो किती चांगला विद्यार्थी होता आणि त्याच्या जाण्यामुळे आम्हाला किती वाईट वाटते हे प्रत्येक शिक्षिकेने बोलून दाखवले. आणि हे अगदी वरवरचे आहे असे निदान भासू तरी दिले नाही.
परिशिष्ट:
राम गणेश गडकरी यानी बाळकराम या नावाने लिहिलेल्या विनोदी लेखाचा संदर्भ मी दिला आहे अलिकडील बऱ्याच वाचकाना तो माहीत नसेल आणि तो इतक्या सहजासहजी उपलब्धही होणार नाही म्हणून त्यातील काही भाग येथे उद्धृत करीत आहे.
स्वयंपाकघरातील गोष्टी ले. बाळकराम ऊर्फ राम गणेश गडकरी
राष्ट्राचे खरे जीवन स्वयंपाकघरावरच अवलंबून आहे ---- स्वामी विवेकानंद
अन्नाद्भवंती भूतानी ( असतील शिते तर जमतील भुते) श्रीमद्भगवद्गीता
चापटपोळ्या
स्वतःखेरीज दुसरी चांगलीशी पाठ घ्यावी. आपल्या हाताची बोटे नीट पसरून हात खूप जोराने त्या उघड्या पाठीवर आपटावा. असेच पाच सहावेळा करावे. चांगल्या चापटपोळ्या होतात.
बर्फीची चटणी
चांगली शेर दीड शेर सुरती बर्फी घ्यावी व सहज हाताला येईल अशी उघडी ठेवावी. स्वयंपाक करतांना अगर येताजाता तिचा एकएक बकाणा भरत जावे. घटकेच्या आत सगळ्या बर्फीची चटणी होते. माझ्या एका भगिनीने कुरकूर केली आहे की " दररोज नवीन चटणी करण्यास फार अडचण होते". माझ्या मते कोणत्याही आवडत्या पदार्थाची तेव्हांच चटणी करून टाकता येते.
गुळाचा गणपती
आपलेच तीन चार वर्षाचे पोर घ्यावे. त्याला नेहमी स्वयंपाकघरामध्ये बसवून ठेवावे. नेहमी त्याच्या हातावर गोडाधोडाचे काहीतरी ठेवीत जावे. त्याला इकडची काडी तिकडे करू देऊ नये. शाळेत सुद्धा जाऊ देऊ नये. खायला हवे तेव्हा घालावे. पण जागचा हलू देऊ नये. लौकरच मुलगा अगदी गुळाचा गणपती होतो. हा पुष्कळ वर्षे टिकतो.