वारी--८

          आम्ही गेलो तो मे महिना असल्यामुळे हवा बरीच उष्ण होती‌. सकाळी तर कडक ऊनही असे.एक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश पडला असताही सुजित छत्री घेऊन कामावर निघाला हे पाहून मी आश्चर्याने त्याला छत्री घेण्याचे कारण विचारले तर त्याने संध्याकाळी पाऊस येणार म्हणून ही खबरदारी असे सांगितले.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळी तो कामावरून आला त्यावेळी खरेच धोधो पाऊस कोसळत होता. यावरून पुण्यातील सिमला ऑफीस ऊर्फ ऑब्झर्वेटरीविषयी मला एकाने सांगितलेला किस्सा आठवला.पुण्यातील वेधशाळाचे कार्यालय इंग्रजांच्या काळी सिमल्यास होते म्हणे.त्यावेळी जो व्हाइसरॉय होता त्याला एकदा त्याच्या खास दोस्ताना पार्टी द्यायची होती आणि ती त्याच्या बंगल्याच्या पटांगणात ! त्यामुळे वेधशाळाप्रमुखाला फोन करून त्याने पार्टीच्या  दिवशी संध्याकाळी हवा कशी असेल याविषयी विचारणा केली त्यावर त्याने साहेबांचे काम म्हणून जरा पहाणी करून सांगतो असे सांगितले.थोड्या वेळाने त्याने साहेबांना फोन करून "काही काळजीचे कारण नाही हवा एकदम स्वच्छ राहणार आहे पाऊस पडणार नाही "असे सांगितले‌‌. साहेबानी मग पार्टीचे निश्चित करून मित्रांना आमंत्रणे दिली.पार्टीच्यादिवशी सकाळी साहेब फिरायला बाहेर पडले असता  त्यांना एक लमाण आपली गाढवे हाकीत रस्त्यावरून जाताना दिसला.त्याने साहेबाच्या बंगल्यासमोरील गडबड पाहिली होती.आणि उत्सुकतेने दरवानाला त्यामागचे कारणही विचारले होते.त्यामुळे साहेबाला पाहून आदबीने नमस्कार करून तो लमाण म्हणाला,"साहेब आज संध्याकाळी पाऊस येणार आहे.""तुला कसे कळले?" साहेबाने विचारले." माझ्या गाढवांना कळते पाऊस येणार असेल तर."त्याचे उत्तर ऐकून साहेबाला हंसू आवरेना तरीही घरी परत आल्यावर त्याने वेधशाळाप्रमुखास फोन करून खरच पाऊस येणार नाहीना याची चौकशी केली.आणी त्याला पाऊस निश्चित येणार नाही अशी ग्वाही मिळाली.त्यामुळे साहेब निश्चिंत झाले.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळी पार्टी रंगात आल्यावर अगदी धोधो पाऊस आला आणि पार्टीच्या रंगाचा नेरंग झाला‌. साहेब एकदम संतापले आणि त्यानी वेधशाळेचे ते ओफिसच तेथून उचलून पार पुण्यात नेऊन टाका असा हुकुम दिला.तेव्हापासून म्हणे वेधशाळा पुण्यात आली सिमला ऑफिस या नावामागचा इतिहास असा आहे म्हणे ! आंतरजालावर पाहता खरोखरच १९२८ मध्ये शिमला ऑफिस पुण्यात स्थलांतरित झाल्याचा उल्लेख वाचून कदाचित गोष्ट खरीही असेल असे वाटले आणि अजूनही त्यांनी आपली चुकीचे भाकित करण्याची परंपरा मात्र सोडली नाही हे लक्षात आले..त्यामुळे वेधशाळेने पाऊस पडणार नाही असा हवाला दिला की लोक छत्र्या घेऊन बाहेर पडतात.येथे अमेरिकेत मात्र हवामानाचा अंदाज क्वचितच चुकल्याचा अनुभव मला आला. अगदी दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी किती तपमान असणार याविषयीचा अंदाजही आठवडा आठवडा अगोदर वर्तवला जातो आणि तो क्वचितच चूक ठरतो.आणि न्यू जर्सीतील हवा तर इतकी बेभरवशाची आहे की योग्य भाकीत आवश्यकच आहे.माझ्या मुलाने सांगितले की इथल्या हवेविष्यी असे म्हणतात If you donot like NJ weather wait for five minutes you will get good weather.यामागची अतिशयोक्ती सोडली तरी हवा फारच सारखी बदलत असते हे मात्र खरे.
         अमेरिकेत गेल्यावर वेळ घालवणे हा एक अवघड प्रश्न असतो असे पूर्वानुभवींचे मत होते. वेळ घालवणे याबाबतीत माझ्याच पेशातील एका सेवानिवृत्त मित्राची भूमिका मला पटत नसली तरी मजेशीर वाटते.त्याना "वेळ कसा घालवता बुवा तुम्ही ?" असे विचारल्यावर त्यांचे नमुनेदार उत्तर असते " वेळ घालवण्यासाठी आपल्याला काय करावे लागते बुवा? आपण काहीही केले नाही तरी वेळ जातच असतो,त्याला थोडेच हाताला धरून चालवावे लागते ?" याच मित्राने कामाच्याही बाबतीत आपली भूमिका अशीच परखडपणे माझ्यापुढे मांडली होती. तो सेवानिवृत्त झाल्यावर एकदा फिरताफिरता त्याची गाठ पडली असता मी " काय गुरुजी आता काय आराम ना?" असे विचारल्यावर लगेच त्याने "मग इतके दिवस काय करत होतो?"  असे हसत हसत मलाच विचारले होते.
       तरीही अमेरिकेत  मुलांकडे येणाऱ्या आमच्यासारख्या सुट्टीवर आलेल्या ज्येष्ठ मंडळीना वेळेचा सदुपयोग कसा व्हावा याची काळजी असतेच.ड्यूटीवर म्हणजे मुलीच्या अथवा सुनेच्या प्रसूतीसाठी आलेल्याना अथवा लहान नातवंडे असणाऱ्यांना वेळ पुरतच नाही.जवळपास फिरण्याव्यतिरिक्त  स्वतंत्रपणे बाहेर पडण्याची शक्यता नसते  कारण आम्ही गाडी चालवू शकत नाही. माझ्या एका मित्राने भारतात गाडी चालवता येत असल्यामुळे इथे गाडीचालनाचा परवाना घेतला होता पण गाडी वापरण्याचे धाडस काही केले नाही. वाहतुकीची उलटी पद्धत आपल्या चटकन अंगवळणी पडत नाही.[float=font:sagar;size:20;breadth:200;place:top;]इतक्यावेळा अमेरिकेत आलो तरी रस्ता ओलांडताना माझी मान प्रथम डावीकडेच वळते.त्यामुळे समजा चुकून मी गाडी चालवली तर सारखे माझे लक्ष आपल्याला डावीकडून कोणी ओलांडतो का याकडेच राहील‌.[/float] शिवाय येथे रस्ता चुकला तर उलट वळण्याची सोय नाही.एकादा बाह्यमार्ग (एक्झिट) चुकला तरी मोठा फेरा पडायचा. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था येथे जवळजवळ नसल्यासारखीच असते. पुण्यातही आम्ही पी. एम् . टी. बसने प्रवास करण्याचे धाडस करत नाही पण रिक्षावाले आमच्या मदतीस सदैव तयार असतात.
      मी येताना वाचण्यासाठी काही मराठी पुस्तके घेऊन आलो होतो आणखी एक चांगले साधन म्हणजे त्यावेळी आपल्याकडे नुकतेच मूळ धरू लागलेले ब्रॉडबँड इंटरनेटचे ! मी येथे येईपर्यंत त्याचा वापर विशेष केला नव्हता पण येथे आल्यावर मुलाने लगेचच माझे याहूमेलवर  खाते उघडून दिले आणि मला जणू अलिबाबाची गुहाच उघडून मिळाली.मला माहीत असलेल्या सर्वांना मेल करण्याचा मी सपाटा लावला.माझ्या सपाट्यात माझे विद्यार्थी,माझ्या मित्रांची मुले असे बरेच जण सापडले.एका याहू खात्याची आद्याक्षरे ओळखीची वाटली.तो माझ्या मोठ्या मुलाचा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मित्र आणि माझा विद्यार्थी असावा असा अंदाज करून मी त्याला मेल केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तातडीने त्याचे उत्तरही आले. मी माझ्या मुलास सांगितल्यावर त्याला आश्चर्य वाटले.पण नंतर तो समजुतीचा घोटाळा आहे असे कळले कारण त्याचे नाव जसे मला परिचित होते तसेच माझे नावही त्याच्या परिचितांपैकीच होते.प्रत्यक्षात आम्ही दोघेही परिचित नव्हतो. परिचितांपैकी अमेरिकेत वास्तव्य करणारानी लगेचच प्रतिसाद दिले. मात्र त्या मानाने भारतातील मित्रा, नातेवाईकांचा प्रतिसाद हवा तेवढा मिळाला नाही.भारतातील आमच्या वयाच्या नागरिकांत अजूनही या साधनाविषयी हवी तेवढी जागृती नाही हेच खरे अगदी अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना संगणक विभागातच काम करणारे माझे मित्रदेखील आता सेवानिवृत्तीनंतर संगणकाचा उपयोग शेअर्सच्या उलाढालीव्यतिरिक्त फारच कमी करतात. टेलिफोन किंवा विद्युतबिले भरावयास सुद्धा ते त्या बिलभरणाकेंद्रातच जाणे ते पसंत करतात.( काही लोकांच्या मते तेवढाच वेळ चांगला जातो) मुख्य म्हणजे असलेले मेलचे खाते उघडून पहाण्याची तसदीसुद्धा ते घेत नाहीत त्यामुळे मला त्यांच्या अमेरिकेतील नातेवाइकाना फोन करून मी त्याना मेल केले आहेत हे कळवावे लागले.असे का घडते कळत नाही.मीही अमेरिकेत आलो नसतो तर माझेही वर्तन असेच झाले असते का माहीत नाही.पण अमेरिकेत येऊन गेलेल्या मित्रांचाही या साधनाचा फार वापर करण्याकडे कल दिसला नाही. माझ्या एका मित्राने ब्रॉडबँड कनेक्शन मिळाल्यावर मला मेल पाठवून सळो की पळो करण्याची धमकी दिली पण प्रत्यक्षात मीच त्याच्यावर त्या अस्त्राचा वापर करून त्यालाच सळो की पळो केले.आणि आपले अस्त्र बूमरंग झाल्याची जाणीव करून दिली. या बाबतीत भारतातील सततचे विद्युतभारनियमन आणि बी.एस.एन. एल. चा लहरीपणा हेही कारण असू शकेल. येथे मराठी पेपर वाचण्यासाठीपण आम्हाला इंटरनेटचा उपयोग होत होता, आणि भारतातील बातम्या   तेथील लोकांना कळण्यापूर्वी आम्हाला कळत होत्या कारण पेपरची आवृत्ती रात्री बाराला बाहेर पडल्यावर लगेच भारतात वाचायला कोणी जात नाही पण त्यावेळी आमच्याकडे दुपारचे तीन अथवा चार वाजले असल्याने ती आम्हाला ताबडतोब वाचायला मिळायची.
            वेळ घालवण्यासाठी आणखीही काही पर्याय आम्हाला उपलब्ध होते.त्यातील एक म्हणजे अनेक उत्तमोत्तम ऑडिओ आणि विडिओ सीडीज चा मुबलक साठा चि‌. सुजितने करून ठेवला होता. शिवाय खास मातोश्रींसाठी झी टी व्ही चा एक चॅनल घेतला होता. अर्थात हळूहळू मलाही त्यातील सासबहू मालिका बघण्यात डुकराचा जन्मसुद्धा आवडणाऱ्या साधूप्रमाणे रस वाटू लागला होता हे मान्य केले पाहिजे. याशिवाय आणखी एक करमणुकीचे साधन थोड्याच दिवसात उपलब्ध झाले ते म्हणजे एक उत्तम की बोर्ड पण सुजित घेऊन आला.या सर्व गोष्टींमुळे मला वेळ घालवण्या ऐवजी वेळ या सगळ्या गोष्टींना द्यावा कसा हाच अवघड प्रश्न झाला. याशिवाय आम्ही अमेरिकेत प्रथमच आल्यामुळे मधूनमधून निरनिराळ्या स्थळांना भेटी देणे हाही महत्त्वाचा कार्यक्रम तर होताच !