वारी ---२

       अमेरिकेचा प्रवेशपरवाना अर्थात व्हिसा विनासायास मिळाला आणि तोही दहा वर्षाचा ही आमच्या दृष्टीने फारच मोठी उपलब्धी होती‌. सुजितने म्हणजे -माझ्या मुलाने एअर इंडियाच्या विमानप्रवासाची तिकिटे पाठवलीच होती.तरी त्याच्याकडून तिकिटे मिळण्यापूर्वी विमानप्रवासाची तिकिटे मिळवण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला होताच.कारण आमच्या पूर्वानुभवी मित्रानी निरनिराळ्या विमानकंपन्या एकाच प्रवासासाठी वेगवेगळी भाडी आकारतात येवढेच काय पण निरनिराळ्या प्रवासी कंपन्या पण त्यात आणखी काही सवलती देतात आणि त्यात किफायतशीर भावात तिकिट खरेदी करून बरेच पैसे वाचवता येतात असा मोलाचा सल्ला दिला.आमचा यापूर्वीचा प्रवासाचा अनुभव मराठवाड्यात अधिक काळ कंठल्यामुळे म.रा.मा.प.मं (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ)  पुरताच मर्यादित असल्यामुळे विमानप्रवासास निघणे हे आमच्या दृष्टीने बिगरीतल्या मुलाला एकदम एस. एस. सी च्या परीक्षेला बसविण्याचाच प्रकार होता त्यामुळे निरनिराळ्या प्रवासी कंपन्यांकडून ऐकलेली माहिती फक्त ऐकून घेणेच आमच्या आवाक्यात होते,त्यातही एअर इंडियाने आमच्या प्रवासाची तारीख मे महिन्यातील असल्यामुळे आणि आम्ही चौकशी मार्चमध्ये करत असल्यामुळे एक एप्रिलपासून दर बदलणार आहेत असे सांगून आम्हास लोंबकाळत ठेवले आणि इतर कंपन्यांविषयी आम्ही साशंक होतो. आश्चर्य म्हणजे एअर इंडियाचे दर हे नेहमीच बदलत असतात आणि त्याची पक्की माहिती कोणत्याच प्रवासी कंपनीकडे नसते असे पुढे अनुभवास आले.अलितालियाने ज्येष्ठ नागरिकासाठी काही सवलत देण्याची तयारी दाखवली होती. टाइम्स ऑफ इंडियात मात्र निरनिराळ्या प्रवासी कंपन्या अगदी कमी भाड्यात अमेरिकेला अथवा जगात कुठेही नेण्याची तयारी दाखवणाऱ्या जाहिराती देत होत्या.आमच्या साडूंना मी फोन करून विचारले कारण त्यांचा एक पाय नेहमी विमानातच असतो तर त्यानी एअर फ्रान्स ची तिकिटे ब्लॉकच करून टाकली. एअर फ्रान्सचे भाडे बरेच जास्त म्हणजे इतर काही कंपन्यांपेक्षा माणशी वीस हजार रुपये अधिक होते अर्थात ब्लॉक करताना पैसे द्यावे लागत नसल्यामुळे मला फारसा धक्का बसला नाही.आमच्यासारख्या परत येणाऱ्या व्यक्तींसाठी तिकिट परतीचेच असते आणि एकेरी प्रवासाच्या भाड्याशी तुलना करता ते बरेच कमी पडते.तसेच तुम्ही चार महिने रहाणार की सहा महिने यावरही तिकिटाचे  दर अवलंबून असतात. परतीची तारीख निश्चित नसल्यास घेतलेल्या तिकिटास खुले किंवा ओपन तिकिट म्हणतात,पण काही विमानकंपन्या अशी तिकिटे देत नाहीत आणि दिल्यास जास्त भाडे लावतात सुदैवाने या सर्व माहितीच्या गोंधळातून सुजितने एअर इंडियाचे ओपन तिकिट पाठवून आमची सुटका केली अर्थात त्याने पाठवले नसते तर मी शेवटी एअर इंडियाचेच तिकिट घेतले असते याला दोन कारणे होती.एक म्हणजे एअर इंडियाचे विमान त्यावेळी सहार (मुंबई) विमानतळावरून निघून लंडन मार्गे जे.एफ.के.(न्यूयार्क) विमानतळावर उतरे आणि या प्रवासात लंडनला एक थांबा असला तरी विमान आणि विमानतळ बदलावा लागत नव्हता ( आताही तीच परिस्थिती आहे) आणि दुसरे एअर इंडियातील खानपान सुविधा आमच्यासारख्या शाकाहारी मंडळींना योग्य होती.
       आता यापुढील तयारी म्हणजे सामान काय आणि किती न्यायचे याची! पण ही तयारी सौ.ने आणि त्याशिवाय आम्ही जाणार याची वर्दी लागलेल्या आणि ज्यांचे पाल्य अमेरिकेत आहेत अशा आमच्या मित्र आणि मित्र नसलेल्याही लोकानी अगोदरच सुरू केलेली दिसली.कारण आम्हाला बऱ्याच लोकांचे प्रेमळ आवाजात फोन येऊ लागले की आमच्या बॅगेत थोडी जागा असेल तर त्याना काहीतरी पाठवायचे आहे.एक दिवशी सकाळीच आमचा फोन खणाणला आणि मी कानाला लावताच पलिकडून 'मी देशपांडे बोलतोय" असे शब्द ऐकू आले.देशपांडे हे नाव आमच्या कुलकर्णी नावाइतकेच सर्वसमावेशक असल्याने ' आपण कोणते देशपांडे" अशी पृच्छा मी केली त्याव्र त्यानी सांगितलेले नाव माझ्या परिचयाचे नव्हते पण त्यानी त्यांचा मुलगा आमच्या मुलाचा मित्र असल्याची माहिती देऊन अगदी थोडेसे सामान आमच्याबरोबर पाठवायचे आहे असे सांगितले.त्यांचे सामान नेणे ही आमची जणु जबाबदारीच आहे असा त्यांचा सूर वाटल्याने मी 'माझ्या मुलाने काही तसा उल्लेख केला नाही" असे त्यांच्या कानावर घातले तेव्हां"असे कसे म्हणता असे एकमेकाला साह्य करावे लागते "असा उपदेश करायला सुरवात केल्यावर मात्र मला फार आनंद झाल्याचे मी न दर्शवल्यामुळे देशपांडे साहेबानी माझा नाद सोडला.  
      सामान काय न्यावयाचे यावर बरीच चर्चासत्रे झाली‌  सुजितला आवश्यक वस्तूंची यादी त्याने दिलीच होती. आम्हाला त्यावेळी प्रत्येकी ३६ किलो वजनाच्या प्रत्येकी दोन बॅगा आणि केबिनमध्ये प्रत्येकी सात ते दहा किलो वजनाची एक बॅग नेण्याची मुभा होती, बॅगाचे आकारमानही निश्चित केलेले होते. अशा प्रकारच्या बॅगा आमच्याकडे असणे शक्यच नव्हते त्यामुळे संन्याशाच्या लग्नाप्रमाणे आम्हाला बॅगेपासून तयारीला लागणे आवश्यक होते, त्या बॅगा आणल्यावर त्या आपल्याला खेळण्यासाठी आणल्या आहेत अशी आमच्या नातवाने समजूत करून त्यावर उड्या मारून बॅगा पुरेश्या दणकट आहेत याची शहानिशा करून दिली.त्यानंतर त्या बॅगात सामान भरण्याचे आणि काढण्याचे काम जायच्या आधल्या दिवसापर्यंत चालू होये कारण सामानाचे वजन जरा जास्त झाले तर ते काढायला लावतात असे ऐकले होते.त्याशिवाय अमुक वस्तु घेऊन जाता येत नाही तमुक वस्तु अमेरिकेच्या विमानतळावर काढून फेकून देतात असे पूर्वानुभवी लोकानी आम्हाला घाबरवण्याचे बरेच प्रयत्न केले. अर्थात त्यांच्या मते असा मोलाचा सल्ला देऊन ते आमच्यावर उपकारच करत होते.या सल्ल्यांमुळे आमचे बॅगा भरण्याचे काम दुपटीने वाढले होते कारण बॅगेत गेलेली प्रत्येक वस्तू एकदोनदा तरी बॅगेबाहेर काढली जाऊनच शेवटी बॅगेत स्थानापन्न होत असे.त्यानंतर वजन बरोबर ३६ किलो करण्यासाठी बऱ्याच वस्तूना आपली जागा बदलावी लागली.वजनाविषयी मी एवढा काटेकोर  कॉलेजात केमिकल बॅलन्स वापरतानाच झालो होतो आणि त्यानंतर कधीतरी बायकोसाठी दागिना ( अशी वेळ क्वचितच आली) घ्यायला सोनाराकडे गेलो तेव्हां ! मात्र त्यानिमित्ताने वजनमापक काटा घरी आला आणि त्याचा उपयोग घरातील व्यक्तीची वजने करण्यातही झाल्यामुळे सौचे केवळ मानसिक बलच नव्हे तर शारीरिक बलही माझ्यापेक्षा जास्त आहे हे सप्रमाण सिद्ध झाले .
       अमेरिकेत जाताना स्वत: साठी मात्र फारसे काही न्यावे लागत नाही म्हणजे अमेरिकन लोक कपड्यांविषयी (आणि कपडे घालण्याविषयीही) फारसे आग्रही नसल्यामुळे केवळ लज्जारक्षणापुरते कपडे नेले तरी चालते,मग हौस म्हणूनच ज्यादा कपडे न्यायचे असल्यास न्यायचे , शिवाय उन्हाळ्यातच आम्ही जात असल्याने थंडीसाठी खास काही नेणे आवश्यक नव्हते.
त्यामुळे माझे काम फारच सोपे झाले. अर्थात बायकांना हे लागू पडत नसल्याने सौची बॅग नेहमीप्रमाणेच हाउसफुल्ल होती.
या वयात परदेशी(येवढेच काय पण परगावीदेखील) जाताना न विसरता नेणे आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे आमची नेहमीची औषधे आणि अमेरिकेत जाताना त्याचबरोबर आवश्यक म्हणजे आरोग्यविमा.कारण अमेरिकेत तुमचा विमा नसेल तर डॉक्टर तुमच्या अंगाला हातही लावायला घाबरतात म्हणे!आणि तोही थोडाथोडका नाही तर पाच लाख डॉलर्स ची भरपाई करण्याइतका हवा असा मुलाचा आग्रह ! बरे खर्चाची सबब सांगितली तर तो पैसे पाठवायला तयार असल्याने नकार देता आला नाही त्यामुळे वाया जाणार याची खात्री असली तरी जनरल इन्शुअरन्स कं ला सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयांचा नैवेद्य दाखवून आलो.येवढे करूनही आमच्या एका मित्राला एक दात काढण्यासाठी अमेरिकेत आलेला  खर्च भारतात येऊन पाच सहा महिने झाले तरी त्याची भरपाई झाली नव्हती असा त्यांचा अनुभव पण गाठीशी बांधला. दुसऱ्या एका मित्राचा अनुभव वेगळाच होता.तो चार महिनेच अमेरिकेत रहाणार असल्याने त्याने विमा तेवढ्याच मुदतीचा घेतला होता पण त्याना मुक्काम वाढवावा लागला म्हणून विम्याची मुदत संपल्यादिवशी ते विमा कंपनीकडे निघाले आणि जातानाच  जिन्यात पडून पायाला फ्रॅक्चर झाले प त्यांचे नशीब येवढे खराब की त्याच दिवशी मुदत संपल्यामुळे त्याना एकही पैसा खर्चाची भरपाई मिळाली नाही.  
     बॅगा भरल्यानंतर आम्ही निघायला सिद्ध झालो म्हणायला हरकत नव्हती
    आमच्याशी फोनवर बोलून आणि एक मोठा विरोप (ईमेल) पाठवून सुजितने सहार विमानतळावर प्रवेश केल्यापासून ते केनेडी ( जे. एफ .के.) विमानतळातून बाहेर पडेपर्यंत कायकाय करावे लागते,कोठे काय खबरदारी घ्यायला हवी याविषयी बऱ्याच सूचना दिल्या होत्या.परीक्षेला बसणाऱ्या मुलासारखा मी त्या डोक्यात घोळवत होतो‌ शिवाय जे पूर्वी जाऊन आले होते त्यानी त्यांच्या मुलांना द्यायचे गाठोडे आमच्या बॅगमध्ये बसू शकले नाही तरी निराश न होता आपल्या अनुभवाचे भले मोठे गाठोडे आम्हाला बरोबर देण्यात कुचराई केली नव्हती‌ शिवाय बरोबर आमचे भारतातील चिरंजीव आणि अनुभवी मंडळी होती कारण आम्ही पुण्याहून प्रथम आमच्या साडूंकडे उतरून मग सहार विमानतळावर गेल्याने आमच्या विरोधास न जुमानता त्यानी विमानतळावर आमच्या सोबत येण्याचा आपला हट्ट सोडला नाही आणि त्यामुळे मी आता अगदीच हलक्या मनाने निघत होतो कारण काही अडचण आलीच तर त्यांचा मदतीचा हात सदैव पुढे होताच̱.एअर इंडियाच्या विमानाची सहार विमानतळावरून सुटण्याची वेळ सकाळी ६-३० अशी दिसायला सोयिस्कर असली तरी त्याअगोदर तब्बल चार तास विमानतळावर हजर रहावे असा शिरस्ता असल्याने घरातून पहाटे दोन अडीच अशा अगदी अडनेड्या वेळेला निघावे लागते.त्यात लवकर उठण्यासाठी लावलेला गजर एकचा न लागता चुकुन १२ चाच लागल्यामुळे भलत्याच वेळी आम्ही उठून बसलो आणि त्यानंतर झोप येणे शक्य नव्हते,अर्थात अगोदरही फार झोप लागली होती अशातला भाग नव्हता.त्यामुळे विमानतळावर आम्ही पहाटे एक दीडलाच डोळे चोळत पोहोचलो.
         यापूर्वी दोनदा या विमानतळावर सुजितला सोडण्यासाठी आलो होतो पण त्याचे लुफ्तान्साचे तिकिट असल्याने त्यावेळी वेगळ्या टर्मिनलवर गेलो होतो.त्यावेळी २ए आणि २बी अशी टर्मिनल्स होती. आता २सी हे नवे स्थानक झाले होते आणि त्यावरून केवळ एअर इंडियाच्याच विमानांचे उड्डाण होणार असल्याने अगोदरच आडवेळ असल्याने तेथे इतका शुकशुकाट होता,की त्या विमानतळावरूनच आपले विमानोड्डाण होणार आहे यावर विश्वास ठेवणे कठीण होते. पण केवळ अनुभवी मंडळी बरोबर होती म्हणूनच मी तग धरला.बाहेरच बऱ्याच ढकलगाड्या पडल्या होत्या त्यातीलच दोन आमच्याबरोबर आलेल्यानी आमच्या हातात सोपवून आमचे सामान त्यावर चढवून आता निघा अशी खूण केल्यावर कळले की आता खऱ्या अर्थाने आम्ही परदेशपर्यटनासाठी निघालो कारण यापुढे आम्हाला साथ देणारी मंडळी आत येऊ शकणार नव्हती.ती बाहेरूनच आम्हाला धीर देण्याचे काम करू लागली.येऊनजाऊन बाहेर ती उभी असल्याने जर तशीच काही अडचण आलीच तर किंवा बॅगेतील सामान काढावेच लागले तर परत घेऊन जाण्यासाठी ती तेथे असल्याने आमची पंचाईत होणार नव्हती.