वारी--५

     सुजितचे घर म्हणजे एक सदनिका होती.आपल्याकडे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ घरे बांधून भाड्याने देत होते आणि त्यांचा देखभाल खर्च त्या भाड्यातून निघत नाही असे दिसल्यावर काहीतरी एकमुष्टी रक्कम घेऊन त्या भाडेकरूंच्या  नावावर करण्याचा आंतबट्ट्याचा व्यवहार करत होते त्याचप्रमाणे येथे काही खाजगी संस्था अशा प्रकारच्या सदनिका बांधून भाड्याने देतात,मात्र भाडे आकारताना त्या उत्पन्नातून देखभाल व्यवस्थित होईल याची काळजी करतात आणि खरोखरच देखभालही करतात. न्यू जर्सीत मिडलसेक्स मॅनेजमेंटने अशा अनेक सदनिकांची  संकुले निर्माण केली आहेत.त्यापैकी हिडनव्हॅली ड्राइव्ह या संकुलामध्ये सुजितची सदनिका  होती.स्वयंपाकखोली,दिवाणखाना  आणि एकच शयनखोली (थोडक्यात वन बी एच के )अशी रचना होती पण क्षेत्रफळ त्यामानाने बरेच मोठे म्हणजे जवळजवळ ११०० चौरस फूट  होते‍. शिवाय  घरात गृहमंडळाकडूनच ए‌ सी. फ़्रीज. वॉशिंग मशीन‌ स्वयंपाकाचा गॅस,या सर्व सोयी दिलेल्या होत्या.त्या संकुलामध्ये चारच इमारती होत्या आणि सर्व तीन मजली म्हणजे तळमजला आणि वर दोन मजले अशा होत्या̱. त्याची सदनिका पहिल्या मजल्यावर होती. आपल्यासारखे जिन्याचे ९-९ पायऱ्यांचे अथवा ४-६-८ असे भाग पाडलेले नव्हते. जिना सरळ खालून सुरू होऊन अठरा पायऱ्यांवरच संपे आणि तो संपला की सुजितचा गाळा. असे जिने आता आपल्याकडील खेड्यापाड्यात किंवा पुण्यातील जुन्या वाड्यातच ( आता किती उरलेत पुणे म.न.पा.च जाणे) पहायला मिळतात सर्व इमारतीच्या बांधकामात लाकडाचा सढळ वापर.म्हणजे छत,जमीन आणि भिंती सगळे लाकडी म्हणजे जिना लाकडीच हे ओघानेच आले.त्यामुळे आजूबाजूला शांतता असल्याने कोणीही बाहेरून येत किंवा बाहेर जात असल्याची वर्दी सगळ्या भाडेकरूंना मिळत असे. जमीन लाकडी असल्याने आपल्या चालण्याचा आवाज नारायण धारपांच्या गूढ कथांतील सत्रार किंवा अशाच पात्राच्या पावलांचा आवाज असल्याचा भास होई.इतके दिवस बरेच वेळा बायको जवळ येऊन उभी राहिली तरी मला पत्ता लागत नसे पण आता मात्र ती घरात कोठेही चालू लागली की भूकंप होऊ लागल्याचा भास होऊ लागला अर्थात ही केवळ तिचीच मक्तेदारी होती अशातला भाग नव्हता.तळमजल्याच्या सदनिकांच्या जमिनी कारपेटने आच्छादित होत्या मात्र वरच्या दोन्ही मजल्यावर जमिनी गुळगुळीत लाकडी पट्ट्यांच्या बनवलेल्या असल्यामुळे आणि त्यावर कारपेट नसल्यामुळे आमच्या चालण्याचे पडसाद आमच्यापेक्षा खालच्या मजल्यावरील भाडेकरूना अधिक जाणवायचे आणि त्याची कल्पना आम्हाला येऊ शकत नसे त्यामुळे आमच्या नादात आणि आमच्या दृष्टीने अगदी हलक्या पावलांनी चाललो तरी आमची चाल त्यांची झोप उडवण्यास पुरेशी होत असे.त्याचा पुढे आम्हास अनुभव येणारच होता.
          घराची एकूण रचना केवळ लाकडाच्या वापरामुळे इतकी भूकंपप्रवण होती की जवळच्या स्टेशनवरून गाडी जाऊ लागली की भिंती हादरत. घराच्या खिडक्या पाहून तर मी चकितच झालो कारण जवळ जवळ भिंतीचा अर्धा भाग व्यापणाऱ्या खिडक्यांना फक्त काचेचे तावदान आणि कीटक येऊ नयेत म्हणून बाहेरून बारीक जाळी. आमच्या सुरक्षेच्या कल्पनेला पार सुरुंग लावणारी योजना. मी घर बांधताना काटकसर म्हणून प्रत्येक भिंत एक वीट जाडीची घेतल्याबद्दल मला सर्वानी वेड्यात काढले होते त्यांच्या मते बाहेरील भिंत भक्कम दीड विटेची हवी(त्यावेळी घरे लोडबेअरिंग पद्धतीचीच असत).भक्कम लोखंडी जाळी असणाऱ्या खिडक्या बसवल्या होत्या तरी त्या उचकटून चोरी करण्याचा चोरानी प्रयत्न केला होताच आणि नंतर ते मी ज्या डॉक्टरना  विकले त्यानी त्या घराचा इतिहास जाणून घेतल्यावर त्या जाळ्यांवर आणखी एक त्याहून अधिक जाडीच्या जाळीचे आवरण बसवले एवढेच नव्हे तर आतल्या प्रत्येक दाराला त्यानी आणखी एक लोखंडी सरकद्वार (रोलिंग शटर) बसवून घेतले आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हां सगळी शटर्स खालीवर करून दाखवून अभिमानाने मला म्हणाले," तुमच्या घरात ( अजून ते त्या घराला याच नावाने संबोधतात)चोर अगदी आलेच तरी सगळी दारे उघडेपर्यंत सकाळ निश्चित होणार." त्यावेळी मला त्या चोरांची दया आली होती.पण आता मात्र मला माझी काळजी वाटू लागली. अमेरिकेत अगोदरच लहानलहान मुलेही हातात पिस्तूल घेऊन धडाधड दिसेल त्याच्यावर गोळी चालवतात असे ऐकलेले आणि आता या अशा घरात रहायचे ! अमेरिकेतल्या लोकांच्या धाडसाचे मला कौतुक वाटू लागले. मी भीत भीत माझी शंका मुलाकडे व्यक्त केल्यावर तो म्हणाला "काही काळजी करू नका येथे पोलिस लगेच येतात.आणि घरात कोणी रोख रक्कम दागिने अगर सोनेनाणे ठेवत नाही हे चोरानाही माहीत असते." मी मनात म्हटले की त्यामुळेच चोर सरळ बँकाच लुटत असावेत. आपल्याकडे चोर फारसा भेदभाव न ठेवता सगळ्यांचीच सारख्याच ममत्वाने विचारपूस करत असतात अगदी आमदार,खासदार आणि मंत्र्यांचीसुद्धा ! उलट त्यांच्या घरात चोरी म्हणजे तर आपलाच माल आपण परत घेण्यासारखे आहे असे चोराना वाटत असावे.अशाप्रकारे चोरांना मुक्तद्वार असले तरी येथील नागरिक मात्र येथील पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पूर्णपणे विसंबून आरामात राहत होते  तरी मला मात्र त्या रात्री झोप लागली नाही. खरे तर आमचे सगळे सामान चोरानी पळवले असते तरी त्याची किंमत फार फार तर पाचशे डॉलर झाली असती आणि एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी चोर खिडक्या तोडण्याचे आणि १२८ किलो वजनाच्या आमच्या बॅगा पळवण्याचे श्रम करेल अशी मुळीच शक्यता नव्हती. शिवाय  येथील पोलिस आपल्याकडल्यासारखे चोरी होईपर्यंत तेथे गैरहजर राहून चोरांना हातभार लावणारे आणि नंतर आपल्यालाच दटावणारे नसून  खरोखरच नागरिकांचे संरक्षण करणे आणि त्याना कायदे पाळायला लावणे  हे आपले कर्तव्य आहे असे मानतात याचा अनुभव पुढे आलाच. घरात असताना देखील बाहेरून पोलिसांच्या गाड्या धावत आहेत हे मधूनमधून ऐकू येणाऱ्या सायरनवरून जाणवत असे.
           पोलिसांच्या दक्षतेचा आम्हासही अनुभव आलाच.एक दिवस संयुक्ता बाहेरून घरात शिरताना तिला शेजारच्या घरात किंचाळण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा दक्ष नागरिकाप्रमाणे तिने ९११ या क्रमांकावर(पोलिसांना बोलावण्यासाठी) फोन केला तर दोनच मिनिटात पोलिस आले आणि त्यानी तिला कशासाठी फोन केला हे विचारले तेव्हा तिने त्यांना हा प्रकार सांगितला आणि ते शेजारच्या इमारतीत गेले.थोड्या वेळाने परत आमच्या दाराची घंटी वाजली आणि पोलिस "आम्ही चौकशी केली त्या घरातली लहान मुलेच गम्मत म्हणून किंचाळली होती" असे सांगूब तिने फोन केल्याबद्दल तिचे आभार मानून निघून गेले.मला खात्री आहे आपल्याकडे शेजारच्या इमारतीतच काय शेजारच्या घरातून असा आवाज आला असता तरी प्रथम पोलिसाना फोन करण्याच्या भानगडीत सुबुद्ध नागरिक पडलाच नसता पण चुकून अमेरिकेतून नुक्ताच आल्याने त्याने केलाच असता तर प्रथम फोन उचललाच गेला नसता आणि समजा दैवयोगाने उचलला गेलाच असता तर होणाऱे संभाषण  असे झाले असते
सु. ना.पोलिसांचा फोन नंबर लावतो.त्यावर
पोलिस स्टेशनमधून
"पर्वती पोलिस ठाणे कोण बोलतय ?काय काम आहे?
सु. ना . - मी अमुक अमुक बोलतोय
"ते समजल हो पण काय काम आहे?"(च्यायला काय कटकट आहे साली! अलिकडे पब्लिक काही स्वस्थ बसू देत नाही )
सु,ना. अहो शेजारच्या इमारतीतून किंचाळण्याचे आवाज येत आहेत.
"मग आम्ही काय कराव अस वाटतय तुम्हाला? थोडा वेळ वाट पाहा होईल शांत आपोआप. नाहीतर आम्हाला इतक्या लांब चक्कर मारायला लावण्यापेक्षा तुम्हीच का जाऊन बघत नाही काय झाले ते? अगदी खून वगैरे झालाच तर बोलवा आन्हाला"
सु.ना . कपाळावर हात मारून घेतो.
         अमेरिकेतून भारतात फोन करताना ९१ क्रमांक प्रथम लावावा लागतो त्यात थोडे चूक होऊन जर ९११ लागला तर थेट तो इथल्या पोलिसानाच लागतो आणि मग त्यांच्या तपासणीस तोंड द्यावे लागते. एकदा आमच्या मित्रांच्या मातवंडाने चुकून असाच नंबर लावला आणि दोन मिनिटात पोलिस हजर ! लहान मुलाने चुकून लावला सांगून त्यांचा विश्वास बसला नाही. कारण इथली पोरे पण शहाणी असतात, आईनाप मारू लागले तर लगेच पोलिसाना फोन करतात.म्हण्जे पूर्वी मूल रडू लागले तर आईबाप त्याला पोलिसाला बोलावण्याचा धाक दाखवत तर येथे उलट पोरेच आईबापाना तसा धाक दाखवू लागली आहेत. पोलिसानी घरात येऊन सगळीकडे पाहणी केली आणि खरोखरच काही नाही आईबाप पोराला मारत वगैरे नाहीत याची खात्री झाल्यावरही थोडा वेळ घराबाहेर बसून परत जाताना घरातील व्यक्तींना सांगून निघून गेले. 
        आणखी एका वेळी मी माझ्या मुलाबरोबर गाडीत बसून स्वाध्याय ला चाललो होतो,दर रविवारी स्वाध्यायसाठी तो मला घेऊन जात असे,पण त्यादिवशी जरा जास्त वेळ लागल्यासारखे वाटले म्हणून मी म्हटले ,"आज फारच वेळ लागतोय!"यावर मुलगा म्हणाला "मामाची गाडी मागून येतेय" मला समजेना आमच्या पोराचा मामा इथे कुठून आला.पाहतो तर पोलिस व्हॅन मागून येत होती. म्हणजे लोकही पोलिसाना एवढे घाबरतात कारण आपण वेगमर्यादा ओलांडली किंवा आणखी काही वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केले की ते ताबडतोब आपल्याला पकडणार आणि आपल्याला जबरदस्त दंड तर होणारच शिवाय आपल्या वाहन चालन परवान्यावर एक लाल खूण होणार आणि अशा तीन खुणा पडल्या तर परवानाच जप्त होणार याविषयी सगळ्या नागरिकांना खात्री असतें. तेच आपल्याकडे पाहा बरे खुशाल एकदोघाना गाडीखाली लोळवा कोणी विचारणार नाही आणि तुम्ही चित्रपटतारा वा तारका  असाल तर मग काही विचारायलाच नको,तुमच्या गाडीखाली येण्याचे भाग्य ज्यांच्या नशिबी आले असेल आणि चुकून माकून ते जिवंत राहिले असतील तर त्यांनाच जाब विचारला जातो की असे ताऱ्याच्या गाडीखाली येण्याचे धाडसच कसे झाले त्यांचे. जरी कायदा गाढव असतो असे म्हटले जाते तरी आपल्या देशात मात्र कायदा पाळणारा गाढव असतो  असे म्हटले जाते किंवा अनुभवास येते .
       सगळ्या सुविधा असून या सदनिकेत आमच्या दृष्टीने एक फार मोठी त्रुटी आम्हाला सकाळी उठल्याउठल्या जाणवली ती म्हणजे उठल्यावर बाथरूम आत कोणी गेल्यामुळे बंद असली तर बाकीच्यानी तो/ती बाहेर येईपर्यंत हातावर हात धरून गप्प बसायचे (किंवा तोपर्यंत झोपायचेच)कारण बाथरूम (ज्याला ते रेस्ट रूम म्हणतात) मध्येच वॉशबेसिन, शॉवर आणि कमोड सगळे एकत्र ! याबाबतीत आपली घरे लहान असली तरी  किती सोयिस्कर असतात सगळ्या गोष्टी एकत्र नसल्यामुळे एकाच वेळी दात घासणारा,शौचाला जाणारा आणि अंघोळ करणारा अशा तिघांची सोय होते अगदी तशीच वेळ आली तर आणखी एक जण तांब्या घेऊन बाहेरही जाऊन शुद्धी करून घेऊ शकतो अशा बऱ्याच बाबतीत आपण अमेरिकनांपेक्षा कितीतरी पुढारलेले आहोत याचा प्रत्यय आला आणि अभिमान वाटला.
         रस्त्यावरही एकदा माझी अशीच पंचाईत झाली होती.मुलाबरोबर गाडीतून जाताना मध्येच मला लघुशंकेची भावना झाली आणि मी मुलाला तसे सांगितल्यावर तो म्हणाला आता रेस्ट एरिया येईपर्यंत थांबावे लागेल आणि ती रेस्ट एरिया बरीच दूर होती तेथपर्यंत मी कसाबसा तग धरू शकलो.आपल्याकडे असे कधीच झाले नसते.कोठेही मनात आले की गाडी रस्त्याच्या कडेला थांबवा  आणि कोठेही जा "होल वावर इज युवर्स"(संदर्भः वऱ्हाड चाललेय लंडनला)अर्थात हे विश्वचि माझे विश्रांतिगृह (रेस्टरूम) या आपल्या वृत्तीमुळे आवश्यक असेल तेथेही अशा सोयी करण्याचा विचार आपण करत नाही ही  मात्र दुर्दैवाची गोष्ट ! 
         लाकडाच्या सढळ वापरामुळे आगीचा धोका खूपच असतो त्यामुळे प्रत्येक सदनिकेच्या प्रत्येक खोलीत आगसूचक गजर बसवलेला असतो आणि त्याच्या आवाजाने लगेच आगीचे बंब धाव घेतात हे विशेष ! याचा नंतरच्या आमच्या वास्तव्यात अनुभव आलाच.आमच्याच वर राहणाऱ्या एका स्वच्छताप्रेमी भारतीय गृहिणीने रेस्टरूमम्धील बेसिन आणि अंघोळीचा टब यामधील जागा स्वच्छ करण्याचा घाट घातला.त्या भागात पाणी निघून जाण्याची सोय नसल्याने ते पाणी जमिनीत जिरून भिंतीमधील विद्युत्जोडणीच्या तारांवरून ओघळून शॉर्ट सर्किट होऊन आग लागून धूर निघू लागला आणि ताबडतोब सगळ्या इमारतीतील गजर वाजू लागून आगीच्या दोनतीन गाड्या तेथे जमा झाल्या.त्यानुळे पुढच्या वेळी नवरात्र अमेरिकेत साजरे करण्याची आवश्यकता भासली तेव्हा घरात नऊ दिवस लावायचा दिवासुद्धा आम्ही भीतभीतच वापरला.
       भिंती खिडक्या याविषयी येवढे बेपर्वाई असणारे लोक दारांच्या कुलुपाविषयी मात्र फारच आग्रही असल्याचे दिसले.त्यामुळे आमच्या सदनिकेच्या दाराचे कुलूप  लावणे आणि उघडणे आम्हाला कित्येक दिवस कठीण्च जात होते.त्यामुळे मुलगा बाहेर कामावर गेल्यावर आम्ही दोघेच घरात असलो तर बरेच दिवस आम्ही फिरायला  दोघे एकदम बाहेर पदत नसू कारण दोघे बाहेर पडलो आणि कुलूप उघडता नाही आले तर काय करता.
       प्रत्येक इमारतीसमोर मोकळी जागा होती आणि तेथे गाड्या पार्क करण्यासाठी व्यवस्थित आखीव जागा असत आणि तेथे वास्तव्य करणारालाच तेथे गाडी लावता येई.आमच्या इमारतीतून बाहेर पडल्याव्र उजवीकादे वळून थोडे अंतर गेल्यावर एक मोकळे मैदान होते तेथे पूर्वी रोलर स्केटिंगची सोय असावी हे अमेरिकन स्केटस अशा तेथल्या पाटीवरून समजत होते.त्याच्या थोडे पुढे गेल्यावर लगेचच एका मोठ्या इमारतीत ड्रग फेअर या नावाचे औषधाचे नाव असलेले तरी बऱ्याच वस्तू मिळणारे मॉल,त्याच्याच शेजारी मार्शल्स या साखळी दुकानातील एक मोठे मॉल थोए पुढे त्याच इमारतीस लागून लाँड्री आणखी लागून असलेल्या बर्याच इमारतीत बरेच मॉल्स,ज्वेलरी शॉप्स असा मोठा दुकानांचाच भरणा असलेल्या इमारती होत्या. आणि गाड्या पार्क करण्यासाठी असलेली जागाच आपल्याकडील डेक्कन जिमखाना बसस्टँडपासून गरवारे पुलापर्यंतचे क्षेत्र व्यापेल इतकी होती.