ह्यासोबत
सुजितने अमेरिकेत बोलावले की आपल्याला जावे लागेल अशी अपेक्षा होतीच. शिवाय सेवानिवृत्तीनंतर न जाण्यासाठी काही सबब पण दाखवता येणार नव्हती. आणि तसे काही कारण पण नव्हते. पण मधल्या काळात आम्हाला एक नातू झाला आणि सगळे चित्रच बदलले. माझ्या आजोबा झालेल्या मित्रांच्या ज्या नातूप्रेमाला मी हसत होतो त्याचा आता मला उलगडा झाला म्हटले तरी चालेल. यापूर्वी माझ्या त्या मित्राचा मुलगा अमेरिकेत गेला पण जाताना तो एकटाच गेला त्याचा छोकरा आणि बायको भारतातच राहिले. पण नंतर एक वर्षाने त्यांना न्यायचा विचार त्याने जाहीर केल्यावर माझ्या मित्राने त्याला विरोध करण्याचा बराच प्रयत्न केला शेवटी त्याच्या धाकट्या भावाला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर त्यांना त्याने घेऊन जावे असे मत त्याने व्यक्त केले अर्थात शेवटी त्याला मुलाचे म्हणणे मान्य करावेच लागले.
त्यावेळी मी त्या मित्राची बरीच खिल्ली उडवली पण आता माझ्यावर जवळ जवळ तसाच प्रसंग आल्यावर मात्र त्याला काय वाटले याची कल्पना आली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी सौ. ला " अग हा ( म्हणजे आमचा नातू) थोडा मोठा झाल्यावर आपण गेलो तर नाही का चालणार? " असे म्हणत होतो पण "रघुकुलरीती सदा चली आयी प्राण जाइ पर बचन न जाई" अशा तिच्या वृत्तीमुळे एकदा ठरवलेल्या कार्यक्रमात बदल घडणे शक्य नव्हते हे मला माहीत होते. यापूर्वीही आमच्या लग्नानंतर सुरवातीच्या काळात जर एकाद्या पिक्चरला जायचे ठरवून काही कारणाने मी तो कार्यक्रम पार पाडू शकलो नाही तर येणाऱ्या गंभीर प्रसंगाला तोंड देण्याचा अनुभव पदरी असल्याने यात बदल घडणे शक्य नाही याची कल्पना मला नव्हती असे नाही आणि झालेही तसेच.मात्र माझ्या मनाविरुद्ध का होईना पण तिच्या मनासारखे केल्यावर झाले ते बरेच असे म्हणण्याची पाळी मजवर येतेच आणि यावेळीही तसेच झाले कारण आमच्या जाण्यातच सुजितचे लग्न ठरण्याची बीजे लपलेली होती.
बहुधा अमेरिकेत गेलेल्या मुलांच्या लग्नाची चाकोरीबद्ध रीत म्हणजे आईवडिलांनी बऱ्याच मुलींची पाहणी करून त्यांच्या पसंतीस उतरतील अशा काही मुलींची यादी मुलगा भारतात येण्याच्या सुमारास करून ठेवायची, मग मुलाने भारतात आल्यावर धावता दौरा करून पाहणी करून एकादी मुलगी पसंत करायची आणि लग्न करून तिला घेऊनच किंवा एकही मुलगी पसंत पडली नाही तर हात हलवत परत जायचे अशी आहे.अशा हातघाईने झालेल्या लग्नात बऱ्याच वेळा फोनवरूनच निमंत्रणे देण्याची वेळ येते. .
अलीकडे मुलीही फार चोखंदळ झाल्यामुळे बऱ्याच मुलांना असे अनेक वेळा हात हलवत परत जावे लागले आहे. बेकायदेशीर गर्भजलचिकित्सा करण्याच्या वृत्तीमुळे मुलींचे प्रमाण घटते राहिल्यामुळे हा प्रश्न आणखीच गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे भारतातच असणाऱ्या राजस्थानातील मुलासाठी वधू आणण्यासाठी केरळात जावे लागू लागले आहे. काही दिवसानी मुलींना स्वयंवर मांडायला लागून अनेक होतकरू मुलांमधून नवरा निवडण्याची संधी मिळू लागेल अशी शक्यता दिसते. तसे पाहता महाभारतकाली वा रामायणकालीही स्वयंवराची पद्धत होती तिचेच हे पुनरुज्जीवन समजायचे का? पण त्यावेळी मुलींचे प्रमाण कमी नसतानाही ही पद्धत का होती समजत नाही शिवाय द्विभार्याप्रतिबंधक कायदा नसल्यामुळे लग्न झालेल्या पुरुषांनाही स्वयंवरात भाग घेण्यास मज्जाव नव्हता हे वेगळेच. मात्र बऱ्याच दूरदर्शन मालिकांमध्ये अविवाहित मुली विवाहित पुरुषांच्यावरच का कोणास ठाऊक जीव टाकत असतात. म्हणजे स्वयंवराची पद्धत परत सुरू झालीच तर विवाहित पुरुषांनाही संधी दिली तर वाव आहे.
सुजित कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्याची मुंबईच्या एका कंपनीत निवड झालेली होती आणि त्याच्या अंतीम वर्षाचा निकाल लागल्यावर तो लगेच मुंबईस रवाना झाला आणि त्याच्या पुढील हालचालींची आम्हाला विशेष कल्पना नव्हती. तो यंत्र अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर असला तरी संगणक क्षेत्राकडे त्याचा ओढा होता त्यामुळे संधी मिळताच त्याची पहिली ग्राइंडवेल नॉर्टन कंपनी सोडून त्याने टी. सी. एस(टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस )मध्ये उडी मारली होती. लगेचच कंपनीतर्फेच त्याला परदेशी जाण्याची संधी प्रदान केली गेली पण त्यासाठी काही काळ कंपनी न सोडण्याचे बंधन होते म्हणून त्याने ती संधी नाकारली होती. मधल्या काळात परदेशी नोकरी मिळवून देणाऱ्या एका मध्यस्थ संस्थेतर्फे त्याची झालेली मुलाखत सफल झाल्यामुळे त्याला परदेशी जाण्याची संधी प्राप्त झाली त्यावेळी तो लुफ्तान्सा विमानाने वॊशिग्टनमार्गे बोस्टनला गेला होता आणि तेथील कंपनीने त्याला पिटसबर्गला पाठवले. तेथे तो जवळजवळ पाच वर्षे राहिला.
आम्ही अमेरिकेत जाण्याच्या काही दिवस अगोदर तेही ठिकाण सोडून तो न्यू जर्सीमध्ये नुकताच आला होता आणि कामाला तो क्वांट ट्रेडिंग नावाच्या न्यूयॉर्कमधील कंपनीत जाऊ लागला होता. तो २००१ च्या सप्टेंबरमध्ये तेथे रुजू झाला आणि लगेचच ९/११ चा ट्वीन टॉवरवरील हल्ला झाला, ते दृश्य आम्ही दूरदर्शनवर पाहत होतो, त्यावेळी भारतातले सायंकाळचे सात वाजत होते. ते दृष्य पाहून आमच्या पोटात भीतीने गोळा उठला आणि आम्ही लगेच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण सर्व संपर्कयंत्रणा बंद होत्या शेवटी एका सायबरकॅफेमध्ये जाऊन मी आणि माझा थोरला मुलगा त्याला ई मेल करून घरी येतो न येतो तोच त्याचा फोन आला की तो सुखरूप आहे आणि आमचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर त्याचा सविस्तर फोन बराच उशीरा आला. त्याच्या ऑफिसपासून पाचच मिनिटाच्या अंतरावर ही घटना घडली असे त्याने सांगितले. तो न्यूयॉर्क स्टेशनपासून ऑफिसला चालत जात असे तेव्हा त्याला दोन विमाने ट्वीन टॉवर्सच्या रोखाने जात आहेत असे दिसले आणि विमाने इतक्या खालून कशी जात आहेत याविषयी आश्चर्य करत तो ऑफिसमध्ये शिरतो तो ऑफिसच्या खिडकीतूनच त्याला ती विमाने ट्वीन टॉवर्सवर आदळत असल्याचे प्रत्यक्षच दिसले, त्यानंतर त्याच्या ऑफिसात काम होणे शक्यच नव्हते. सगळीकडेशांतता झाल्यावर ऑफिसकडूनच त्यांया न्यूयॉर्क स्टेशनपर्यंत पोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आणि केव्हातरी रात्री ते घरी पोचले हे सर्व त्याने फोनवर सांगितले.
क्वांट ट्रेडिंग मधील त्याची नोकरी स्थिर स्वरुपाची होती. पूर्वी ज्या कंपनीत तो नोकरी करत असे ती कंपनी त्याला वेगवेगळ्या कामावर वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत असे या प्रकारास कन्सल्टंट असे म्हणतात त्यामुळे त्याचे आसन स्थिर नसे आता मात्र जोपर्यंत कंपनी बदलली नाही तोवर न्यूयॉर्क सोडण्याची आवश्यकता नसल्याने त्याने न्यू जर्सी येथे स्थायिक व्हायचे ठरवले न्यूयॉर्कमध्ये जागा घेणे आपल्याकडे मुंबईत जागा घेण्याइतकेच किंवा त्याहूनही अवघड होते. आणि आहे. एडिसन(न्यू जर्सी) मधून न्यूयॉर्कला कामावर जाण्यासाठी मेट्रोपार्क स्टेशनवरून ट्रेनने जाणे सोयिस्कर होते, शिवाय भारतीय वस्ती जास्त असल्यामुळे एडिसन हे ठिकाण भारतीय व्यक्तींना राहण्यास अधिक योग्य वाटते. त्याने ज्या गृहसंकुलात सदनिका घेतली त्यापासून मेट्रोपार्क अगदी चालत जाण्यासारख्या अंतरावर होते. त्याने यापूर्वीच एक लाल रंगाची स्पोर्टस कार घेतली होतीच पण कारमधून दररोज न्यूयॉर्कला जाणे सोयीचे नव्हते म्हणून तो मेट्रोपार्क स्टेशनपर्यंत चालत अथवा कारने जाऊन तेथून ट्रेनने न्यूयोकला जाई.. न्यू जर्सीतील वातावरण आम्हाला मानवेल असे त्याला वाटल्यामुळे आणि त्याच वेळी मी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्याने आम्हाला त्याच्याकडे येण्याचा आग्रह केला.
आमचे जाण्याचे ठरल्यावर त्याला बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देणे भाग पडले, कारण तो एकटा असल्यामुळे त्याची सदनिका म्हणजे चार भिंती आणि त्यात त्यांच्याकडूनच मिळालेल्या सोयी म्हणजे फ्रीज, वोशिंग मशीन, गॅस, आणि डिशवॉशर याव्यतिरिक्त काहीच नव्हते. अगदी झोपण्यासाठी पलंग, गादी अशा वस्तूंचाही अभाव त्याच्या मठीत होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या दृष्टीने म्हणजे त्याच्या स्पोर्टस कारला पुढील दोनच दरवाजे होते त्यामुळे मागील सीटवर बसण्यासाठी बराच द्राविडी प्राणायाम करावा लागत होता आणि तो आता या वयात आम्हास जमेल का याविषयी त्याला शंका होती म्हणून एक मोठी कारच घ्यावी असा त्याचा विचार होता. नवीन कार घेण्यापेक्षा बऱ्याच वेळा भारतात परत जाणारे लोक आपली कार विकून परत जातात त्यामुळे ती कार स्वस्तात मिळण्याची शक्यता असते म्हणून अशी एकादी कार कोणाची असेल तर सांगण्यासाठी त्याने आपल्या मित्राला सांगून ठेवले होते. एकदा त्या मित्राकडे कसल्याश्या पार्टीसाठी गेला असता त्या मित्राने त्याला अशी एक कार विकाऊ आहे असे सांगितले आणि कारच्या मालकिणीशी त्याची गाठ घालून दिली.
कारची मालकीण संयुक्ता राव या नावाची तरुणी होती. तीपण तीन वर्षापूर्वी अमेरिकेत आली होती आणि ज्या कंपनीत कामास होती तेथे कराराची तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे भारतात परत जाण्याचा विचार करत होती, त्यामुळे अमेरिकेत आल्यावर खरेदी केलेली तिची कार विकून जायचा तिचा विचार होता, तिची आणि सुजितची गाठ पडल्यावर कार विकायचा तिचा मनोदय असला तरी तीन वर्षे पुरी होण्यास अजून काही दिवस आहेत हे सांगितले. तिचेही आईवडिल नुकतेच तिच्याकडे येऊन गेले होते त्यामुळे त्यांच्या मुक्कामासाठी तिने ज्या वस्तू खरेदी केल्या त्याची माहिती शिवाय आमच्या प्रवासासाठी लागणाऱ्या गोष्टी यांची माहिती तिला असल्याने त्यासाठी तिच्या पूर्वानुभवाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने सुजितच्या आणि तिच्या गाठी पडत गेल्या आणि त्याचे पर्यवसान त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेण्यात झाले.
त्यांचा विचार केव्हां ठरला हा भाग शेवटी आमच्या दृष्टीने गौणच असल्यामुळे मियाबिबी राजी या तत्त्वानुसार आम्ही त्यांना आमची सम्मती लगेच देऊन टाकली. उलट आमचे काम हलके केल्याबद्दल मनातून त्या दोघांना धन्यवादच दिले. आमच्या सम्मतीनंतर संयुक्ताच्या आईवडिलांची सम्मती फोनवरूनच घ्यावी लागली आणि तीतर त्यानी दिलीच एवढेच नव्हे तर आम्हीच त्यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेतच साखरपुडाही करून टाकावा असा प्रस्ताव मांडला. संयुक्ताचे काही नातेवाईक न्यू जर्सीपासून जवळच राहत होते. याशिवाय माझा एक विद्यार्थी आणि त्याचे बायकोही जवळच राहत होते आणि सुजितला भावासारखेच मानत होते. संयुक्ताची एक खास मैत्रीण आणि तिचा नवरा हेही येणार होते आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या सौभाग्यवतीची बहीण, माझे साडू आणि त्यांची मुलगी हेही बरोबर त्या काळातच त्यांच्या व्यवसायाच्या कारणाने अमेरिकेत आल्यामुळे आमच्या लग्नाच्या साखरपुड्याला भारतात असतानाही जेवढी मंडळी नव्हती त्यापेक्षा जास्त मंडळींनी एकत्र येऊन हा आनंदाचा सोहळा पार पडला. उणीव होती ती फक्त संयुक्ताच्या आईवडिलांची! अर्थात लग्नसोहळा भारतात बण्गळुरूला तिच्या घरी पार पडला त्यावेळी ही उणीव पूर्णपणे भरून काढण्यात आली हे उघडच आहे.
आम्हाला जरी अमेरिकेत सहा महिने राहण्याचा शिक्का आमच्या पासपोर्टवर मारून मिळाला तरी आम्ही निघताना ठरवल्याप्रमाणे चारच महिन्यात परत जायचे ठरवले कारण आता सुजितच्या लग्नाची तयारी करायची होती. थोडक्यात आमचे अमेरिकेत जाणे त्याच्या लग्नाच्या निश्चितीला कारणीभूत ठरले तसेच परतणेही त्यामुळेच आवश्यक ठरले. अर्थात मधल्या काळात आमचे अमेरिका दर्शन, काही मित्रांच्या गाठी भेटी हे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले आणि मे महिन्यात तेथे गेलेले आम्ही सप्टेंबरम्ध्ये परतण्याची तयारी करू लागलो. यावेळी आमचे परतीच्या उड्डाणाचे वेळापत्रकही ठरलेलेच होते त्यामुळे फक्त एअर इंडियाकडून त्या दिवशी उड्डाण निघण्याची आणि आमच्या आसनव्यवस्थेची निश्चिती करणे तेवढे आवश्यक होत आणि ते केल्यावर आम्ही न्यूयॉर्क विमानतळावरून उड्डाण केले.
यावेळी मात्र लंडनला विमान थांबल्यावर आम्हाला विमानतळावर उतरू देण्यात आले. आमचे एक मित्र त्याचवेळी भारतात परत चालले होते पण ते वॊशिंग्टनवरून निघाल्यामुळे त्यांची आणि आमची गाठ लंडनला आम्ही विमानतळावर उतरल्यावर पडली. त्यांना आमच्या नंतरच्या एअर इंडियाच्या उड्डाणातून यायचे होते पण आमच्या विमानातच बरीच जागा रिकामी असल्याने त्यानाही त्यातच बसवण्यात आले अशा रीतीने त्यांचा आणि आमचा प्रवास लंडनच्यापुढे बरोबरच झाला. मुंबई विमानतळ रात्री १२ वाजता दिसू लागला. यावेळी जातानाच्या बरोबर उलटी परिस्थिती होती, म्हणजे आम्ही जाताना सकाळी सात वाजता निघालो आणि आमचा सगळा प्रवास दिवसाच झाला कारण वेळेतील बदलामुळे आम्ही जेथे पोचू तेथे दिवसच होता त्यामुळे निघाल्या दिवशीच संध्याकाळी चार वाजता आम्ही न्यूयॉर्कला पोचलो होतो आता परत येताना मात्र संध्याकाळी आठला निघाल्यामुळे लंडनला आम्ही उतरलो तेव्हां सकाळचे दहा वाजले होते होती आणि मुंबईला आम्ही चक्क रात्री बाराला पोचलो .
विमानातून उतरून दीर्घमार्गातून बाहेर पडल्यावर उतरताना भरायचे फॉर्म एका खिडकीपाशी परत करण्याचे काम केले आणि नंतर आमचे सामान पट्ट्यावरून फिरत होते ते हस्तगत केले, बाहेर पडताना नेहमीप्रमाणे एक रांग आमच्यासारख्या अमेरिकेतून काही घेऊन न येणाऱ्यांची आणि दुसरी असे काही आणले असल्याची माहिती ज्यांना द्यावयाची असते आणि कस्टम अधिकाऱ्यांच्या परवानगीने ते बाहेर घेऊन येणाऱ्यांची! बहुतेक सगळे लोक पहिल्या प्रकारात मोडणारे म्हणजे हिरव्या दिव्याच्या रांगेत असतात, आणि आम्ही पण त्याच रांगेतून जाणार होतो पण यावेळी कधी नव्हे ते कस्टमने त्याच कामासाठी आणखी एक कस्टम अधिकाऱ्याला लावलेले दिसले. आणि तेथे गर्दी कमी म्हणजे फक्त एकच कुटुंब आहे असे पाहून आम्हाला तिकडे जाण्याचा मोह झाला. त्या कुटुंबाचे सामान बाहेर गेल्यावर आम्ही पुढे झालो तर तो मार्ग फक्त सुप्रसिद्ध गायक श्री. सुरेश वाडकर यांच्या कुटुंबियांसाठीच उघडला होता आणि आता तो बंद करण्यात आला आहे अशी सुवार्ता आनच्या कानावर घालण्यात आली. त्यावेळपर्यंत सौ. ने सुरेश वाडकरांशी गप्पा मारायला म्हणजे, " आपण सुरेश वाडकर ना? " या स्वरुपाच्या सुरू केले होते त्यावरून आम्ही सुरेशजीना ओळखत होतो तरी ते आम्हास ओळखत होते असे काही सिद्ध होत नव्हते नाहीतर आमच्या साठी पण तो मार्ग खुला राहिलाही असता पण तेवढ्यात तेथील अधिकाऱ्यास आमची दया येऊन त्याने तपासणी करणाऱ्या जवानास "ठीक आहे यांचे तेवढे तपासून टाक आणि मग बंद कर" असे सांगितल्यावर आम्हाला तात्पुरते बरे वाटले कारण त्या जवानाने आमचे सामान चाळणीतून पलीकडे गेल्यावर "तुमच्या सामानात कॉस्मेटिक्स आहेत असे दिसते " असे म्हणून आम्हाला बॅगा उघडायला सांगितले. मी त्याला "तसे काही नाही मी एक प्राध्यापक आहे मी असे करीन असे तुला का वाटते? "अशी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ! मला एकदम मागे श्री. लक्ष्मण देशपांडे ( हो तेच वऱ्हाडकार)यांना आलेल्या अनुभवाची आठवण झाली. त्यांना एकदा अमेरिकेत कस्टमच्या तपासणीत अडवले होते पण ते प्राध्यापक आहेत हे कळल्यावर त्याना अडवल्याबद्दल अमेरिकन कस्टम अधिकाऱ्याने त्यांची माफी मागितली होती. त्यानंतर त्यांना भारतात येताना मात्र, "अरे ही मास्तरडी ही काय आणणार आहेत" असे म्हणून त्यांना सोडण्यात आले होते. यापैकी कोणत्याही पर्यायाने का होईना मला सोडून दिले असते तरी माझी काही हरकत नव्हती पण आता कस्टमवाल्याने त्याला केवळ आमच्याच सामानाची तपासणी करायची असल्याने भरपूर वेळ आमच्यावरच खर्च करायला हरकत नाही असा विचार केला असावा. त्यामुळे मी प्राध्यापक आहे हे सांगितल्यावर अमेरिकन कस्टमवाल्याप्रमाणे माझी माफी मागून किंवा भारतीय अधिकाऱ्याप्रमाणे मास्तरडा म्हणून का होईना मला सोडण्यात देइल हा माझा अंदाज खोटा ठरवला. शेवटी मी एक बॅग उघडायला सुरवात केली आणि आमच्या ( म्हणजे सौ. च्या) कडेकोट बंदोबस्तातून योग्य किल्ल्या शोधून ती योग्य त्या बॅगला लावून ती उघडायला लागलो आणि एक बॅग कशीबशी उघडून ती त्याला दाखवल्यावर त्यात आमच्या नातवासाठी आणलेली केळ, पेरू, सफरचंद अशी प्लास्टिकची फळे बाहेर पडली तेव्हा त्याने, "अहो ह्या गोल वस्तू दिसल्यावर मला कॉस्मेटिक्स आहेत असे वाटले " असे म्हणून बाकीच्या बॅगा उघडायला मला लागणाऱ्या वेळेचा अंदाज घेऊन , " अहो साहेब आम्हाला अशी नीट तपासणी करावी लागते" असे सांगून जायला सांगितले, मग मीही त्याला "अशीच कडक त्पासणी करत जा, म्हणजे देश अतिरेक्यांपासून वाचेल" अशी शाबासकी देत उघडलेली बॅग तेवढ्याच वेळात बंद करून बाहेर पडलो.
त्यावेळी आमचे लांबलचक रांगेत उभे राहिलेले मित्र केव्हाच बाहेर पडून आमची वाट पाहत उभे होते, आम्हाला पाहून, " काय इतका वेळ का घेतला, काय कॅमेरा, व्ही. सी. आर. वगैरे आणलेय की काय? " असे चेष्टेच्या सुरात विचारू लागले. पण मी त्यापैकी काहीच आणले नसून इतका वेळ का लागला हे सांगून त्यांची करमणूक केल्यावर ते ज्या एका ट्रॅव्हलच्या बसने पुण्यास जाणार होते त्यात येणार का असे त्यानी विचारल्यावर आमचा मुलगा दुसऱ्या ट्रॅव्हलची गाडी घेऊन आल्याचे त्यांना सांगितल्यावर ते निघून गेले. आमचे चिरंजीव बाहेर वाट पाहतच होते. आमच्या चिरंजिवानी आणलेल्या क्वालिस गाडीतील चौथा प्रवासी लुफ्तान्साने येणार असल्याने आम्हाला त्याच्यासाठी थांबावे लागले. तो आला तेव्हा त्याच्याकडे काहीच सामान नसताना त्याला बाहेर पडताना दहा डॉलर द्यावे लागले असे तो सांगू लागला त्यावरून मी दिलेला सल्ला कस्टम अधिकाऱ्याने काही पाळलेला दिसला नाही किंवा त्याचा अर्थ माझ्या मेहनतीची किंमत दहा डॉलर्स होती. .