वारी २४

               सकाळी फिरताना वेगवेगळे रस्ते शोधण्याचा मी प्रयत्न करत असे. अर्थात रस्ता न चुकण्याची दक्षता घेऊनच ! इनमन अव्हेन्यू या मुख्य रस्त्याला मिळणारे बरेच रस्ते पुढे ग्रोव्ह अव्हेन्यूला मिळतात असे मला आढळून आले. या रस्त्यावरून फिरताना माझ्यासारखेच फिरणारे क्वचित काही लोक दिसायचे त्यातील काही चिनी असायचे त्याव्यतिरिक्त काही भारतीय आणि तेसुद्धा गुजरातीच असायचे.एका दिवशी माझ्या प्रात:फेरीत एक नवीन रस्त्याचा शोध घेताना अचानक एक कार माझ्याशेजारून गेली ती थोडी पुढे जाऊन थांबली आणि पुन्हा मागे येऊन माझ्या शेजारी थांबली आणि त्यातून एक मध्यमवयीन स्त्री उतरली.तिच्या चेहऱ्या आणि पेहेरावावरून ती भारतीयच आहे हे समजले त्यामुळे कदाचित मी पण भारतीय म्हणून ती उतरली असावी अशी माझी समजूत झाली.नेहमी अमेरिकन करतात तसे अभिवादन "हाय हेल्लो"झाल्यावर तिने प्रथम मी गुजराती आहे का याची चौकशी केली आणि मी नाही म्हटल्यावर इंग्रजी भाषेत बोलायला सुरवात केली,आणि म्हणाली "Sir I have a good news for you !"
       मी एकदम आश्चर्यचकित झालो कारण या परक्या देशातच काय भारतात देखील मला एकादी चांगली बातमी घरातल्या लोकांकडून किंवा फार झाले तर मित्राकडून ई मेलने पत्राने अथवा दूरध्वनीवरून कळण्याची शक्यता होती पण ही परकी बाई अचानक गूड न्यूज देते म्हणजे फारच झाले.कदाचित हा जाहिरातीचा प्रकार असावा असेही वाटले कारण भारतात असतानासुद्धा बऱ्याच वेळा असे फोन येत ," You have been selected by our company " अशा थापा मारून फोन घेणाऱ्याकडून पैसे उकळ्ण्याचे बरेच प्रकार होत असतात असाच हा प्रकार असावा असे वाटले. पण तिने एक पुस्तकाचे पान उघडून मला वाचायला सांगितले तिने अशी माझी वाचनाची चाचणी घ्यायचे कारण मला समजेना पण त्यावेळी मी चष्मा घातला नसल्यामुळे मला वाचता येणार नाही अशी असमर्थता व्यक्त केल्यावर तिनेच वाचायला सुरवात केली आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की ते "येशूचे शुभवर्तमान "होते. तिच्या तावडीतून मी कशीबशी सुटका करून घेतली आणि अशी कार आपल्याकडे परत येताना दिसली तर तिच्यापासून पळ कसा काढायचा याची मनात आखणी करून ठेवली.त्यामुळे मदर तेरेसाच्या आत्म्यास जरा वाईट वाटले असण्याची शक्यता होती.
          यावेळी आम्ही मार्चमध्ये आल्यामुळे आमचा मुक्काम सेप्टेंबरमध्येच संपला.आम्हाला हुबळीकर कुलकर्णी मुक्काम वाढवण्याचा आग्रह करत होते पण शक्यतो गोष्टी यदृच्छया घडतील तशा घडू देणे इष्ट असे मला वाटत असल्यामुळे ज्या तारखेची मोहर इमिग्रेशन अधिकाऱ्याने उमटवली होती त्याच्या आठ दिवस अगोदरच आम्ही निघायचे ठरवले.शिवाय भारतात जाऊन नवरात्र पार पाडण्याची निकड सौभाग्यवतीला होती त्यामुळे त्या अगोदर निदान आठ दिवसतरी पोचले तर घराची साफसफाई करून नवरात्र व्यवस्थित पार पाडता येईल असा तिचा बेत होता.
   त्याप्रमाणे आम्ही १६ सेप्टेंबरला नेवार्क विमानतळावरून संध्याकाळी निघून नेहमीचा एअर इंडियाचा पॅरिसचा थांबा बाहेर न उतरता घेऊन भारतात १७ तारखेच्या रात्री पोचलो तेव्हा १२ वाजून गेले असावेत.कस्टम वाल्यांनी पहिल्यावेळी आम्हाला बॅगा उघडायला लागणारा वेळ पाहिला होता आणि एवढे करून त्यातून काहीच निष्फन्न झाले नव्हते त्यामुळे अशा अनुत्पादक कामात वेळ न घालवण्याचे ठरवून त्यांनी आमची मुळीच दखल घेतली नाही. आम्हाला न्यायला आमच्या साडूंनी गाडी पाठवली होती आणि चालक मारुती हनुमानाने रामाची वाट पहावी तसा प्रवेशद्वारापाशी आमची वाट पहात असल्यामुळे मुळीच त्रास न होता आम्ही त्यांच्या घरी पोचलो.मुंबईहून एकच दिवस थांबून लगेचच घरी पुण्यास जायचे होते कारण नवरात्र घटस्थापना लगेचच होणार होती त्यामुळे सौ.ला घरी जाण्याची घाई होती.तिने मुंबईहूनच आमच्या कामवालीस फोन करून आमच्या येण्याची वेळ कळवून त्यावेळेस हजर रहाण्याचे आदेश दिले होते.
   नेहमीप्रमाणे टूरिस्ट टॅक्सी करून २० तारखेस सकाळी आम्ही निघून अगदी वेळेवर म्हणजे दुपारी १२ वाजताच घराच्या दारापाशी पोचलो.इतका सगळा प्रवास कुठलाही अडथळा न येता पार पडल्यामुळे मी आनंदाने घर उघडताउघडता सौ.ला "चला कुठलेही विघ्न न येता सुखरूप घरी पोचलो " असे म्हणालो.हे वाक्य कलीच्या कानावर पडले असावे कारण दार उघडून आत प्रवेश करतो तो काय एकदम नाक बधिर करणारा दुर्गंध नाकात शिरला.त्याचबरोबर घराच्या हॉलमधील पांढऱ्याशूभ्र फरशीवर काळे काळे मध्येच पांढरे पण असे असंख्य डाग पडलेले दिसत होते.हा काय प्रकार आहे काही लक्षात येत नव्हते.टॅक्सीचा चालक आमच्याबरोबर आला होता तो म्हणाला,"बहुतेक कबुतरांनी घाण केलेली दिसते." पण दारे खिडक्या बंद असताना कबुतरे आत येण्याची शक्यता नव्हती किंवा आमची सदनिका सर्वात वरच्या मजल्यावर नसल्याने छताला भोक पाडून येण्याचीही शक्यता नव्हती. पण तेवढ्यात माझ्या पायाजवळून काहीतरी जोरात सरकत गेले आणि मी उडी मारून खाली पहातो तर एक टोलेजंग उंदीर.आणि मग त्याच्यामागून अनेक उंदरांचे लेंढारच पळाले.टी.व्ही.आम्ही जाताना त्यावर चादर टाकून झाकून ठेवला होता ती बाजूला करताच त्यातून पाच पंचवीस उंदरांची टोळी बाहेर पडली.आमची कामवाली तिला फोन करून ठेवल्यामुळे बरोबर त्याच वेळी आत आली आणि तिचे स्वागत उंदरांच्या एका टोळीने केले.मी संगणकाच्या कपाटाकडे पाहिले तर त्यात एका मूषक कुटुंबाने वास्तव्य केलेले दिसले.आम्हाला पहाताच त्यांची पळापळ सुरू झाली.स्वयंपाकघरातील कपाटात त्यांच्या अनेक कुटुंबांनी वास्तव्य केले होते.हॉलमधील बिछाइतीचा पुरा निकाल लागलेला होता.सुदैवाने बेडरूमचे दरवाजे बंद होते त्यामुळे त्यांचा मोर्चा तिकडे वळला नव्हता.फ्रीज आम्ही बंद करून ठेवला होता पण मागील कॉंप्रेसर वरील जाळीत काही उंदरांनी बिऱ्हाड थाटले होते.
   गाडीच्या चालकाला पैसे देऊन मी वाटेला लावले आणि त्यानंतर मी,सौ.आणि आमची कामवाली अशा तिघा जणांनी प्रथम घरावर धाड घालणाऱ्या  सर्व अतिरेक्यांची हकालपट्टी करण्याचे काम सुरू केले.त्यांना दरवाजातून बाहेर काढणे शक्य नव्हते कारण इतरांच्या घरात शिरून त्यांनी त्यांचेही नुकसान केले असते आणि त्यांचे शिव्याशाप आम्हाला मिळाले असते.म्हणून सर्व दारे बंद करून फक्त संडासचा दरवाजा उघडा ठेवून सर्व उंदरांचा शोध व पाठलाग सुरू केला.इतके दिवस घरात राहून त्यांनी बराच पाहुणचार घेतल्यामुळे अगदी चांगले पोसून ते गलेलठ्ठ झाले असल्यामुळे ते आमच्यावरच हल्ला करतात की काय अशी भीती वाटत असली तरी मोठ्या धाडसाने तिघांनीही हात धुवून त्यांच्या पाठीमागे लागून त्यांना प्रथम घरातून संडासमार्गे बाहेर पाठवले.त्यात आमचे जवळजवळ दोन तास गेले.
  त्यानंतर घरात त्यांनी जी घाण करून ठेवली होती त्याची सफाई करण्याचे काम सुरू केले.सगळ्या घरात एक अतिशय घाणेरडा वास भरून राहिला होता तो कितीही सफाई केली तरी जाणे अवघडच होते..आमच्या कामवालीला यापूर्वीच्या आमच्या दौऱ्यानंतर ती साफसफाई करायला आली तेव्हा तासाभरात सफाई होते असा अनुभव असल्यामुळे ती बिचारी जेवणही न करता आली होती.आम्ही बरोबर जे खाद्यपदार्थ आणले होते ते त्या दुर्गंधी वातावरणात खाणेही शक्य नव्हते त्यामुळे आम्ही आणि आमच्याबरोबर तीही उपाशी राहूनच संध्याकाळी चार वाजेपर्यंत स्वच्छता करीत राहिलो.मध्ये मी एकदा बाहेरून चहा घेऊन आलो आणि त्या दोघींनाही प्यायला दिला तेवढाच काय तो पोटाला आधार.
   संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत आम्ही केवळ आवश्यक तेवढीच सफाई करू शकलो..टी.व्ही.लावून पाहिला आणि आश्चर्य म्हणजे तो शाबूत होता.बहुधा दररोज रात्री मूषकसेना कार्यक्रम पहात असावी.फ्रीज वॉशिंग मशीन मी चालू केलेच नाही न जाणो कोठे शॉर्ट सर्किट झाले असेल तर आग लागायची. दुसऱ्या दिवशी आमचे एक माहीतगार तंत्रज्ञ मित्र आले आणि त्यानी पहाणी केल्यावर फ्रीज ठाकठीक आहे असा निर्वाळा दिला आणि मग तो चालू केला.वॉशिंग मशीनची मागील एक दोरी उंदरांनी कुरतडून ठेवली होती ती बदलल्यावर ते चालू झाले.
  उंदरांनी संगणकाच्या छपाई यंत्राचा निकाल लावला होता.सगळ्या तारा तोडल्या होत्या.प्रोसेसरची काय गत आहे हे पहाण्यासाठी तज्ञाला बोलावून पाहिले.उंदरांनी सर्व उपकरणांना आपले स्वच्छतागृह बनवले होते तसेच संगणकालाही केल्यामुळे त्याला हात लावायलाच तो तयार होईना.शेवटी तो सुटा करून आम्ही दिल्यावर आपल्या केंद्रात नेऊन पहाण्याचे व दुरुस्त होत असेल तर करण्याचे त्याने मान्य केले.
  सुदैवाने मायक्रोवेव्ह ओव्हन व त्यासाठीचा इन्व्हर्टर दोन्ही शाबूत होते.उंदरांनी,हॉल आणि स्वयंपाकघर यामधील विभाजक पडदा आणि खिडक्यांचे पडदे यावर ताव मारला होता त्यामुळे ते ताबडतोड उतरून ठेवणे भाग पडले.त्यानंतर कित्येक दिवस सौ̮ ला घरात जेवण  जात नव्हते.
        खरेतर आम्ही यापूर्वीही एकदा घर पूर्णपणे बंद करून अमेरिकेस सहा महिने गेलो होतो पण त्यावेळी असा प्रकार झाला नव्हता मग याच वेळी असे कसे झाले याचा शोध घेता मध्यंतरी आमची एक नातेवाईक  जी त्यावेळी पुण्यात शिकत होती .तिच्यासाठी आम्ही किल्ली शेजाऱ्यांकडे ठेवून गेलो होतो ती आपल्या मैत्रिणींना घेऊन एक दिवस आमच्या घरात मुक्कामास होती.त्या मैत्रिणी परत जाताना स्वच्छतागृहाचे दार उघडे राहिले आणि त्यातून या उंदरांनी प्रवेश केला होता असा अंदाज आला..त्याशिवाय या वेळी पुण्यात पाऊस जोरदार पडला होता आणि आमच्या सदनिकासंकुलाला लागून असलेल्या एका मोठ्या शेताचा ताबा घेऊन तेथे एका नव्या मोठ्या संकुलाचा आरंभ आम्ही अमेरिकेत जायला निघताना झाला होता त्या शेतातील निर्वासित झालेल्या उंदरांपैकी काहीनी आमच्या सदनिकेची निर्वासित छावणी केली होती.त्यांच्या शेतावर आम्ही आक्रमण केल्यावर त्यांना तरी दुसरा काय पर्याय होता?   वाघांच्या अरण्यावर माणसाने अतिक्रमण केल्याने तेही आता घरात शिरू लागले आहेतच ना. या अनुभवावरून बोध घेऊन पुढच्यावेळी स्वच्छतागृहाची दारेच काय पण भोकेही बंद ठेवायची आणि तशी सूचना कोणी घरात रहावयास येणार असेल तर त्यांना करायची दक्षता आम्ही घेऊ लागलो. आमच्या तिसऱ्या वारीची सांगता ही अशी झाली.