ह्यासोबत
हिडन व्हॅलीच्या आमच्या वास्तव्यातच सदनिकांची तपासणी करण्यात येणार आहे असे समजले. त्या काळात संकुलाचे कार्यकारी सभासद शिवाय फायर ब्रिगेड वीजमंडळ इत्यादींचे काही सभासद यांची एक समिती प्रत्येक सदनिकेची पाहणी करून आगीच्या, विद्युतजोडणीच्या दृष्टीने सदनिकेच्या सुरक्षिततेची पाहणी करतात. याशिवाय सदनिका व्यवस्थित ठेवली आहे अथवा नाही, अडगळ कोठेही साठवत नाहीत याची कसोशीने पाहणी करतात. सदनिकेच्या बांधकामात लाकडाचा वापर जास्त असल्याने आगीचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो त्यामुळे इतकी कडक तपासणी केली जाते. तरीही आगीची जराही शक्यता असेल तर धूर दर्शक (स्मोक डिटेक्टर ) लगेच शिट्टी वाजवतात. आणि थोड्याच वेळात आगीचे बंब घटनास्थळावर धाव घेतात. त्यामुळे सौ. ला भाकरी करण्यात बरेच कौशल्य वापरावे लागे किंवा नवरात्रामध्ये दिवसरात्र दिवा लावणे अवघड काम झाले होते. कारण त्यामुळे काही कारण नसताना आगीए बंब घरासमोर यायची भीती!
याशिवाय सदनिकेत किती व्यक्तींनी राहावे याविषयीही नियम आहेत. त्यानुसार एक शयनकक्ष असणाऱ्या सदनिकेत नवराबायकोचे एक कुटुंब आणि त्यांचे एक मूल एवढ्याच व्यक्ती राहू शकत होत्या. एक आणखी मूल झाले की दोन शयनकक्ष आवश्यक! पण न्यू जर्सी मध्ये भारतीय आणि त्यातही गुजराती बहुसंख्य असल्यामुळे हे नियम थोडे शिथिल झले आहेत. व्हरांड्यात कपडे वाळत घातलेले चालत नाही मात्र आमच्या या सदनिकासंकुलाशेजारीच गुजरातीबहुल संकुलात कपडेच काय पण घरी लाटलेले पापडही बाहेर वाळत घातलेले असत त्यामुळे आमच्या घरात सध्या नियमापेक्षा जास्त व्यक्ती राहत असल्या तरी (त्यातील आम्ही पाहुणे असल्यामुळे) त्याकडे काणाडोळा करण्यात येईल असे आम्हाला वाटत होते, तरीही या समितीच्या भेटीच्या वेळी शक्यतो जास्तीत जास्त व्यक्ती घराबाहेर वेळ काढून घरात नियमाएवढ्याच व्यक्ती राहतात असा आभास निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला.
प्रत्यक्षात पाहणी समितीने मात्र आग आणि वीज यांच्या दृष्टीने सुरक्षितता आणि अडगळ या गोष्टींच्या पाहणीकडे अधिक लक्ष दिले. त्यादृष्टीने वॉशिंग मशीनच्या खोलीतील अडगळ काढण्याची सूचना त्यानी केली कारण मशीनमध्ये तपमान जास्त असते पण बाकी घरातील व्यक्तींची मोजणी काही त्यांनी केली नाही. सदनिकेच्या तपासणीसाठी दिलेल्या वेळी ती उघडी ठेवणे बंधनकारक असते. ज्या सदनिकेतील नवराबायको नोकरी करतात त्यानी सुद्धा त्या वेळी कोणाकडे किल्ली ठेवून का होईना तपासणी करून घेणे आवश्यक असते. अर्थात सदनिकेच्या तक्रारनिवारणाचे बाबतीतही मंडळ दक्ष असते. याचा अनुभव आमच्या वास्तव्यातही आला.
त्याच काळात सुजितने घरच विकत घेण्याचा विचार सुरू केला, कारण दरवर्षी भाड्यापोटी बारातेरा हजार डॉलर्स घालवण्यापेक्षा एकदाच बरेच पैसे घालवून ते विकत घेणेच जास्त फायदेशीर होण्याची शक्यता वाटली. शिवाय आता त्याला ग्रीन कार्ड असल्यामुळे त्याला कर्ज मिळू शकत होते. घर विकणे आणि विकत घेणे ही कामे येथे बहुतांशी पूर्णपणे एजंटांमार्फतच केले जाते. काही एजंटही अतिशय माहीतगार असतात आणि विक्रेता आणि खरीददार दोघांनाही फायदा होईल अशा पद्धतीने ते व्यवहार करतात. एजंटामार्फत विकल्या जाणाऱ्या घरासमोर एका पाटीवर त्या एजंटचे किंवा एजन्सीचे नाव व फोन नंबर लिहिलेला असतो. मालकच घर विकणार असेल तर फॉर सेल बाय ओनर अशी पाटी असते. सेंच्युरी २१ ही एक मोठी एजन्सी आहे आणि सुजितचे घर त्याच एजन्सीच्या एका एजंटकडून आम्ही घेतले पण पण अमेरिकेत गेल्यावर सुरवातीचे बरेच दिवस सेंच्युरी २१ ही काय भानगड आहे हे मला माहीत नव्हते त्यामुळे एकदा माझी फजिती झाली होती. मी फिरायला जाताना नवे नवे मार्ग धुंडाळायचा प्रय्त्न करायचो तेव्हां काही खुणा लक्षात ठेवायचो. एके दिवशी जरा नवीन मार्ग पकडून एक खूण म्हणून मी सेंच्युरी २१ ही पाटी लक्षात ठेवली आणि माझा घात झाला कारण तशा पाट्या जी घरे विक्रीस होती अशा बऱ्याच घरापुढे होत्या आणि परतीच्या वाटेवर मी त्याच प्रकारच्या दुसऱ्या पाटीचा वेध घेतल्यामुळे मी भलत्याच रस्त्यावर गेलो. मात्र फार दूर गेलो नसल्यामुळे मी योग्य मार्गाला फारसा न भटकता लागलो.
सुजितने प्रथम जवळच्याच एका एजंटाकडे आपल्याला घर पाहिजे असल्याची मागणी केल्यावर त्याने काही घरे सुचवली. खरी पण त्याचबरोबर सुजितने थोडाकाळ थांबावे असा सल्लाही त्याने दिला ह्या एजंटाला सुजित घर घेईल याविषयी शंका असल्यास नकळे! कदाचित दोघांची वेव्हलेंग्थ जुळली नसावी. शिवाय सुजितने घरासाठी आपली खर्च करण्याची जी मर्यादा सांगितली तिला अगदी घट्ट पकडून तो घरे दाखवत होता. आम्हीही सुजितबरोबर काही घरे पाहवयास गेलो. काही घरात अजून मालक राहत असल्याचे दिसले पण एजंटाबरोबर आम्ही गेल्यावर मालक मध्ये काही लुडबुड न करता एजंटास आमच्यासमवेत घराची पाहणी करू देई. काही घरे मात्र ओपन हाउस अशी पाटी लावलेली असत तेथे वेगवेगळे एजंट आपआपल्या गिऱ्हाइकाना त्या विशिष्ट वेळेत घेऊन येताना दिसत त्यामुळे त्या काळात त्या घराला एकाद्या म्यूझियमचे स्वरूप येत असे. काही घरांच्या चाव्या एजंटांकडे असत आणि ते घर विकत घेऊ इच्छिणाऱ्या आमच्यासारख्या व्यक्तीस फोन करून त्यांना योग्य वाटणाऱ्या वेळी पत्ता देऊन बोलावून घेत आणि ते घर उघडून त्यातील सर्व सुखसोयींची कल्पना पूर्णपणे देत. आमच्या परत निघण्याच्या काळातच अशी बरीच घरे आम्ही पाहिली. बहुतेक घरात गॅस वॉशिंग मशीन. फ्रीज, ओव्हन, मायक्रोवेव्ह, ए. सी. व हीटर या गोष्टी असतच. मग त्यांच्यात काही कमी ज्यादा सोयी असत आणि सामान ठेवण्यासाठी कपाटे, माळे या गोष्टी कमी अधिक प्रमाणात असत. काही घरांना तळघर असे
आपल्याकडेही अलीकडे फर्निचरसह घरे विकण्याची पद्धत निघाली असली तरी बहुधा आपल्याला विकत घ्यावयाचे घर हे केवळ भिंती, दारे, खिडक्या आणि छत एवढ्याच ऐवजानिशी मिळते कारण घर विकणारा आपला सुतळीचा तोडादेखील घरात राहणार नाही याची काळजी घेतो. मीसुद्धा घर विकताना हेच केले. सरकारी सामान हलवण्याची अथवा विकण्याची " आहे तेथून आणि आहे तशा परिस्थितीत" जशी निविदा मागवण्यात येते तसेच या घराबाबतीत विकणाऱ्याचे धोरण असते.
येथे मात्र घर विकताना सर्व फर्निचरसह आणि शक्यतो सुस्थितीत आणून विकण्याची प्रथा आहे. अर्थात काही मोडकळीला आलेली घरे विकत घेऊन ती व्यवस्थित सुस्थितीत आणून परत चांगल्या किंमतीस विकणारेही काही लोक येथे आहेत, त्यांचा तोच व्यवसाय असतो आणि त्यातून प्राप्ती पण चांगली होते. आपल्याकडे आता बंगला हा प्रकार मोठ्या शहरात हळूहळू लुप्तच होत आहे आणि सदनिका घेणेच इष्ट ठरत आहे. याचे एक महत्वाचे कारण बंगल्याची देखभाल करणे जिकिरीचे होत आहे. आमच्यासारख्या ज्यानी बंगले बांधून हौसेने बाग केली त्यांना बागेत काम करण्यासाठी अंगात त्राण नाही आणि त्या बागेकडे दुर्लक्ष होऊन झाडे वाळत चाललेली पाहवत नाही. बंगल्याभोवती आपण हौसेने केलेल्या बागेकडे लक्ष द्यायला नव्या पिढीला फुरसत आणि उत्साह नाही. एकीकडे हरित क्रांतीचा नारा लावायचा आणि घरात मात्र त्याच्या उलट परिस्थिती, त्यामुळे कित्येक लोकांनी नाइलाजाने बंगले विकले आणि ते सदनिकेत राहू लागले असे आढळते. शिवाय राहण्याच्या जागेचे क्षेत्र जसजसे आक्रसू लागले तसे बंगल्यांभोवती उंचउंच इमारती उभ्या राहून बंगल्यांची हवाच बंद होऊ लागली.
अमेरिकेत अजून तरी जागेचा दुष्काळ जाणवू न लागल्यामुळे बंगल्यांच्या रांगा दिसतात. पण पहिल्या एजंटाने बऱ्याच जागा दाखवूनही आम्हास एकही पसंत पडली नाही. सुजितच्या सुदैवाने लवकरच एका चांगल्या एजंटाचा पता त्याला लागला. आंटोनिओ ही अतिशय उत्साही बाई होती ती मूळ इटालियन. मूळ देश सोडून येथे स्थायिक झाल्यावर इंग्लिश शिकून तिने हा व्यवसाय सुरू केला. प्रथम संयुक्ता तिच्याकडे गेली. तिच्याकडे गेल्यावर लगेचच तिने एक घर दाखवायलाच तिला नेले. हे घर खरे तर एका गिऱ्हाइकाला पटले होते. तसे पटले की लगेच खरेदीदार आपला किंमतीचा आकडा मालकाला कळवतो, आणि तो मालकाला पटल्यास पुढील कार्यवाही सुरू होते. दोघतिघानी जर घर पसंत असल्यामुळे आपले आकडे कळवले तर जास्तीतजास्त बोली करणाऱ्यास बहुधा मालक पसंत करतो. जर दोघांचा आकडा सारखाच असला तर जो अगोदर मालकाला कळवतो त्यालाच प्राधान्य द्यावे लागते. या घराचे बाबतीत पहिल्या खरेदीदारास कर्ज मिळण्यास अडचण उत्पन्न झाल्यामुळे ते घर पुन्हा बाजारात आले होते. अंटोनिओचे वैशिष्ट्य हे की तिला आमची अपेक्षा काय आहे याचा बरोबर अंदाज आला होता त्यामुळे तिने आमच्या मर्यादेपे़क्षा बरीच जास्त किंमत असलेले हे घर आम्हाला दाखवले.. तिच्या मते हे भारतीय कुटुंबाला योग्य घर होते. घराचे स्थान ही गोष्ट महत्वाची होती. न्यू जर्सी मधील आमचा एडिसन भाग शिक्षणाच्या दृष्टीने प्रसिद्ध होता, येथील शाळा सगळ्याच उत्तम होत्या त्यामुळे या भागातील घरांचे भावही जास्त होते. त्यामुळे सुजितच्या मर्यादेपेक्षा जवळजवळ एक लाख डॉलर अधिक किंमत असलेले हे घर आम्हाला पसंत पडले. अर्थात आम्हा दोघांना त्या किंमतीशी काही देणे घेणे नव्हते पण सर्वांना पसंत पडल्यावर किंमतीबाबत सुजितला हात आखडता घेणे अवघड गेले. १० हेदर ड्राइव्ह या आज आम्ही राहत असलेल्या घराच्या प्रथमदर्शनीच आम्ही प्रेमात पडलो. या घराचा दरवाजा पश्चिमाभिमुख होता. १०, ००० चौरस फुटाच्या प्लोटवर हे घर उभे होते. खालच्या मजल्यावर मोठा हॉल, स्वयंपाकघर, भोजनासाठी जागा, अधिक थोडी मोकळी जागा आणि अर्धी बाथरूम, तर वरच्या मजल्यावर तीन शयनगृहे आणि दोन पूर्ण स्नानगृहे अशी रचना होती. अर्ध्या स्नानगृहात फक्त कमोड आणि बेसीन असते. जिना लाकडी आणि हॉलमधून वर जाणारा होता. घरमालकाने अगदी हौशीने निरनिराल्य़ा सोयी करून घेतल्या होत्या आणि त्याची पूर्ण कल्पना अंटोनिओला होती, त्यामुळे आम्हाला घर दाखवताना त्या सर्वांचे यथायोग्य प्रदर्शन तिने केले. नोकरीसाठी मालकाला टेक्साससारख्या बऱ्याच दूरच्या भागात जावे लागल्यामुळे त्याला हे घर विकावे लागत होते. ज्या दिवशी संयुक्ता अंटोनिओकडे गेली त्याच दिवशी हे घर परत बाजारात आले होते आणि ते लगेच विकले जाईल याची खात्री असल्याने तिने घर दाखवण्याची घाई केली. त्यावेळी सुजित नव्हता तेव्हा त्याला त्याच दिवशी रात्री घर दाखवून मालकाला आपला आकडा कळवण्यास ऍंटोनिओने जवळजवळ भागच पाडले. हे घर महाग असले तरी या भागात तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारे असे घर मिळणार नाही असे तिने त्याला बजावून सांगितल्यामुळे त्याचाही नाइलाजच जणू झाला आणि त्याने त्याची बोली मालकाला कळवली आणि खरेच अंटोनिओचा अंदाज बरोबर होता कारण दुसऱ्य़ाच दिवशी आणखी एका व्यक्तीस ते घर पसंत पडले आणि त्याचा देकार सुजितपेक्षा थोडा जास्तच होता पण अंटेनिओने काय जादू करून मालकाला पटवले कुणास ठाउक पण त्याने सुजितचा देकार मान्य केला.
त्यापुढील पायरी म्हणजे दोन्ही बाजूंनी आपापले वकील नेमून त्यांनी घराविषयी बोलणी करायची यात कायदेशीर बाजू संभाळल्या जातात. याशिवाय घराची पाहणी इन्स्पेक्टर करतात आणि पाहणीचा अहवाल खरेदीदारास देऊन घरात कायकाय त्रुटी आहेत याची माहिती देतात. आश्चर्य म्हणजे हे इन्स्पेक्टर दोन्ही बाजूकडून पैसे घेऊन हवा तसा अहवाल सादर करणारे नसतात. ते खरोखरच बारकाईने पाहणी करतात. इन्स्पेक्टरने पाहणी करायला जातो असा सुजितला फोन केल्यावर सुजित घराकडे उशीरा गेला पण इन्स्पेक्टर मात्र आलेला होता आणि अगदी बारकाईने पाहणी करत होता. या पाहणीनुसार घरातील त्रुटी त्याने दाखवल्या आणि त्या मालकाने पूर्ण करून द्यायच्या असतात किंवा सुजितला त्यासाठी योग्य तेवढी भरपाई मिळावी असे त्याने सांगितले. या भ्ररपाईविषयी वकील चर्चा करतात आणि तसे मालकाला कळवले जाते.
येथे घराचे पूर्ण वर्णन येथील नगररचना कार्यालयात उपलब्ध असते त्यामुळे त्या जागेची भूकंपप्रवणता, जमिनीतून पाणी येण्याची शक्यता इ. गोष्टींचे पूर्ण ज्ञान खरेदीदारास अगोदरच मिळते. काही घरांवरून उच्चदाब विद्युत्वाहक तारा जात होत्या, त्याचा परिणाम आत राहणाऱ्या व्यक्तींवर विशेषत: लहान मुलांवर होण्याची शक्यता असल्यामुळे अशी घरे कमी किंमतीत उपलब्ध होत असूनही आम्ही टाळली. या बाबतीत एकूणच जागरुकता असल्यामुळे अशी घरे अनेक दिवस For sale च्या पाट्या लावलेल्या असून मोकळीच पडलेली आढळली. माझ्या फिरायच्या मार्गावरील एक घर असे विक्रीसाठी असल्याची पाटी लावलेले मी भारतात येऊन परत पुढच्या वेळी गेलो तरी तसेच मोकळे पडलेले दिसले.
सुजितच्या घराचा व्यवहार आम्ही तेथे असेपर्यंत पूर्ण झालाच नाही. पण तो पुरा होऊन ताब्यात आल्याचे आम्ही पुण्यात जाऊन स्थिरस्थावर झाल्यावर आम्हाला समजले. आमचे ओपन तिकीट असल्याने आणि इमिग्रेशन अधिकाऱ्याने दिलेल्या तारखेपूर्वी केव्हाही आम्ही निघू शकत असल्याने सर्व जण जरा जास्तच निश्चिंत होते, पण त्यामुळे मी तगादा लावूनही परतीचा दिवस ठरवून त्याची एअर इंडिया कडे बोलून निश्चिती करण्याकडे मुलांचे म्हणजे त्यातही सुजितचे जरा दुर्लक्षच झाले, त्याला बऱ्याच आघाड्या संभाळाव्या लागल्याचा परिणाम! जयवंत तसा सध्या पाहुणाच होता. शेवटी ज्यावेळी प्रत्यक्ष निश्चिती करण्याची वेळ आली तेव्हां काही ठराविक तारखांनाच जागा उपलब्ध होत्या शेवटी १० जानेवारीच्या उड्डाणात जागा उपलब्ध असल्याचे एअर इंडियातर्फे सांगण्यात आले आणि आमचे त्या दिवसाचे तिकीट निश्चित झाले.
नेवार्क विमानतळ आता परिचित झाला होता आणि आज त्याचा अधिकच परिचय होणार होता. कारण नेहमीचे उपचार पटकन व्यवस्थित पार पडले. पण मी दारातून आत शिरताना संकेतध्वनी झाल्यामुळे माझ्या बॅगेत काहीतरी आक्षेपार्ह वस्तू असल्याचे सुरक्षा पाहणी करणाऱ्याच्या बरोबर लक्षात आले, निघण्याच्या घाईत एक चूक माझ्याकडून झाली होती ती म्हणजे दाढी करून ब्लेडचे पाकीट मी केबीन बॅगमधील पाउचमध्येच ठेवले होते आणि तेच कारण त्या बझर होण्यामागे होते. पण मला मात्र आपण खात्रीने काही घेतले नाही असे वाटत असल्याने मी माझ्याकडे आक्षेपार्ह काही नाही असे सांगू लागलो पण माझी केबिनबॅग उघडल्यावर त्यातून ब्लेडचे पाकीट बाहेर पडल्यावर मात्र मी ओशाळलो, पण तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याने मात्र त्याचे भांडवल न करता अशा चुका होतातच असा उलट मलाच धीर दिला एवढेच नव्हे तर मला ते पाकीट बरोबर आलेल्या कोणाला द्यायचे असेल तर ते देण्याचीही परवानगी दिली पण आम्हाला सोडायला आलेल्या व्यक्तींना सोडून जवळजवळ ३-४ शे मीटर इतके अंतर परत चालत जाऊन आमच्या मुलांना उपयोगी नसणारे पाकीट त्यांच्या हवाली करण्याऐवजी ते तेथेच फेकून देणे मी पसंत केले. पुढे मात्र काहीही अडथळा न होता आम्ही पुढे गेलो आणि तेथून फक्त विमानातच चढायचे बाकी असताना मुलांना फोन करून सगळे व्यवस्थित आहे आता तुम्ही घरी जायला हरकत नाही असे सांगितले. थोड्याच वेळात रांग आणि क्रमांकानुसार विमानाच्या आत आम्हास सोडण्यात आले आणि आम्ही आत जाऊन स्थानापन्न झालो.