वारी २०

              त्यादिवशी संध्याकाळी आम्ही घरी परतलो. जयवंत तेथेच थांबला. ती ऑक्टोबरची तीन तारीख होती म्हणजे प्रणव बरोबर तीन आठवड्यांचा झाला होता. त्यानंतर एक आठवड्यानंतर  पुन्हा आम्ही चॉपला गेलो. यावेळी आम्ही सगळेच गेलो.. चॉप हे लहान मुलांचेच हॉस्पिटल असल्यामुळे हॉस्पिटल आणि गेस्टहाउस दोन्हीकडे वेगवेगळी खेळणी होती. हॉस्पिटलमध्ये तर त्यासाठी वेगळा विभागच होता, तेथे जाऊन हवी ती खेळणी काढून मुले खेळत होती त्यामुळे प्रथमेशला तेथील गेस्टहाउसमध्ये आणि हॉस्पिटलमध्येही वेळ जाण्याची काही अडचण नव्हती. त्याला बेबाजीकडे नेण्याचे धाडस काही आम्हाला झाले नाही. कारण तश्या अवस्थेत त्याला पाहून त्याला काय वाटेल याविषयी आम्हास शंका होती. त्यामुळे आम्हीच आळीपाळीने प्रणवकडे जाऊन आलो.त्याची परिस्थिती अजूनही काळजी करण्याच्या अवस्थेतच होती. पण डॉक्टर मंडळी आम्हाला धीर देत होती. 
            जयवंत भाग्यश्री प्रथमेश याना तेथेच सोडून आम्ही घरी आलो.
           दुसऱ्या दिवशी प्रणवच्या प्रकृतीची माहिती जयवंतकडून किंवा care page वरून मिळत होती. फारसा फरक नसल्यावर त्याची तब्येत कालच्यासारखीच आहे अशी नोंद आढळायची. १२ तारखेस तो एक महिन्याचा झाला. जयवंतलाही दररोज तेथे राहून आणि थोडेबहुत तरी ऑफिसच्या कामाकडे लक्ष द्यावे लागत असल्याने कधी सर्दी कधी ताप कधी खोकला. फ्ल्यू होतेच. भाग्यश्री आणि प्रथमेशचे तेथे राहणे ही आणखीच एक जबाबदारी होती. तरी तेथील वाहतूक व्यवस्थेशी परिचित झाल्यामुळे दोघे स्वतंत्रपणे गेस्टहाउस ते हॉस्पिटल अंतर पार करू शकल्यामुळे जयवंतला थोडाफार हातभार मिळाला. इतके करून प्रणवच्या प्रकृतीत जशी व्हावी तशी सुधारणा घडत नसल्यामुळे कुणालाच उत्साह वाटत नव्हता. एक दिवस त्याची लक्षणीय प्रगती व्हायची, डॉक्टर आता तो स्वतंत्रपणे लघवी करू लागेल उद्या कॅथेटर काढून टाकू म्हणेपर्यंत दुसऱ्या दिवशी त्याचा रक्तदाब वाढल्यामुळे ते रद्द करावे लागे. त्यामुळे सूज येत असे. २१ तारखेस त्याचा रक्तदाब कमी झाल्यामुळे रात्रभर डॉक्टर त्याच्याजवळ बसून होते, असे जयवंतने फोन केला तेव्हा सांगितले.
        २२ तारखेस प्रथमेशला घेऊन तो घरी आला पण फार उत्साहात वाटला नाही. प्रथमेशला सोडून तो परत गेला. मला त्यावेळी त्याच्या(जयवंतच्या) जन्माच्या वेळची आठवण झाली. त्याचा जन्म आजोळी झाल्यामुळे मी त्यावेळी त्याच्याजवळ नव्हतो. पण जन्मताच त्याच्या आजोबांचा टेलिग्राम आला होता कारण त्यावेळी फोन हीसुद्धा फार चैनीचीच बाब होती, आणि त्यानंतरही मी बराच उशीरा सासुरवाडीस गेलो होतो. त्याच्या जन्माच्याही वेळी डॉक्टरनी लगेच पेढे आणू नका असे आमच्या सासऱ्यांना सांगितले होते इतका तो बारीक होता(मी पाहिला तेव्हांही बारीकच होता )असे नंतर सासऱ्यांनी मला सांगितले. पण नंतर अशी काळजी करावी लागली नव्हती.
       २४ तारखेस प्रणवची लघवी बंदच झाली आणि लिव्हर पण बिघडायला लागली आहे असा जयवंतचा फोन आला आणि आता हा काही आम्हाला लाभत नाही अशी माझी खात्री झाली. त्याची जीवनज्योत आता केवळ बाहेरील प्राणवायूवर धुगधुगत होती. तो आधार काढून घेतला की त्याचे अस्तित्व केवळ पार्थिव शरीरापुरतेच उरणार होते. पुढ्यात ज्ञानेश्वरी ठेवून मी मूकरूदन करत होतो. चॉपच्या डॉक्टर्सनीही आशा सोडली आणि सपोर्ट सिस्टिम्स काढायच्या की नाही याचा निर्णय घ्यायला सांगितले.
     आता प्रणवने शेवटचा श्वास सोडल्यावर त्याचे शरीर घेऊन पुढे काय करावयाचे कोठे करावयाचे, याचा विचार सुरू झाला. आमच्याजवळपासचे सर्वच भारतीय आमच्यासारखेच या प्रकारास अनभिज्ञ होते. आमच्या परिचयाचे एक डॉक्टर येथेच फिलाडेल्फियातच गेली दहा पंधरा वर्षे स्थायिक होते त्यामुळे त्याना माहिती असेल म्हणून फोन केला पण त्यानीही या बाबतीत आपणही तेवढेच अनभिज्ञ आहोत असे सांगितले. काही हिंदू मंदिरांच्या व्यवस्थापनाकडे चौकशी केली पण त्यांच्याकडे या प्रकारची व्यवस्था नाही असे कळले.
      आमच्या अशा चौकश्या चालू असताना संयुक्ताने मात्र मुकाट्याने संगणक चालू करून महाजालावर पहायला सुरवात केली, आणि निरनिराळ्या पद्धतीने शोध घेतल्यावर तिला India Funeral  चा शोध लागला. त्या संस्थेची संचालिका ऍना नावाची ख्रिश्चन स्त्री होती. तिला फोन केल्यावर अतिशय कनवाळूपणे चौकशी करून पुढची सगळी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
         शेवटी २६ ऑक्टोबरला म्हणजे प्रणवच्या जन्मानंतर दीड महिन्यानी पुन्हा एकदा मी सुजितबरोबर फिलीला चॉपमध्ये गेलो. आता ही आपली शेवटचीच फेरी अशी माझी खात्री होती. सकाळी साडेदहा वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो. पहिल्या वेळी जो उत्साह होता तो दुसऱ्या वेळी कमी झालाच होता पण यावेळी मनात दु:खाचा कल्लोळ माजला होता. प्रणवकडे पाहण्यासारखी त्याची स्थिती नव्हती, शरीरावर सर्वत्र सूज आलेली आणि त्याचा सुंदर चेहराही पाहण्यासारखा राहिला नव्हता. काळजावर दगड ठेवून त्याच्या सपोर्ट सिस्टिम्स बंद ठेवायला आम्ही संमती दिली. आणि त्याच्या एक एक नळ्या काढून टाकत शेवटी व्हेंटिलेटर काढून टाकल्यावरही त्याच्या नाडीचे ठोके चालू राहिले आणि एकदम काहीतरी चमत्कार होऊन प्रणव पुन्हा हुंकारू लागणार की काय अशी अंधुक आशा मनात जागृत झाली पण ती दिवा विझण्यापूर्वीची फडफड होती. त्यानंतर पंधरा मिनिटात प्रणव आम्हाला कायमचा सोडून गेला.
     तेथील डॉक्टर्स किंवा नर्सेस यांची वागण्याची पद्धत खरोखरच अशी होती की आमच्या मनास जराही यातना होऊ नयेत याविषयी ते फारच दक्ष होते. थोडा वेळ असाच जाऊन दिल्यावर त्यांनी हलकेच जयवंतला विचारले अशा प्रकारच्या रोगात काय गुंतागुंत होते याचा अभ्यास करता यावा म्हणून प्रणवची ऍटोप्सी करण्याची आमची इच्छा आहे पण तशी तुमची जर इच्छा नसेल तर  तशी जबरदस्ती आम्ही करणार नाही. प्रणव तर आम्हाला सोडून गेलाच होता पण त्याच्यामुळे पुढे काही बालकांचा फायदा होणार असेल तर काय हरकत आहे असा विचार करून आम्ही त्यास अनुमती दिली.
     आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंडिया फ्यूनरल्सच्या ऍनाचा हॉस्पिटलला अगोदर फोनही आला होता त्यामुळे ऍटोप्सीनंतर प्रणवचा देह तीच घेऊन जाईल आणि पुढे काय करणार याचे मार्गदर्शन तीच आम्हाला करेल असे आम्हाला सांगण्यात आले. अमेरिकेत इतके भारतीय असून अशा प्रकारची कोणतीही भारतीय संस्था नाही हे पाहून आश्चर्य वाटले. कारण ऍनाच्या संस्थेचे नाव जरी इंडिया फ्यूनरल्स असले तरी ती अमेरिकन संस्थाच होती. ऍनाची छोटी मुलगी अशीच मरण पावली आणि त्यानंतर तिने आपले जीवितकार्यच हे असे ठरवले त्यामुळे लहान मुलांच्या फ्यूनरलसाठी शवपेटीचाच खर्च ती घेत असे इतर कोठलेही खर्च ती घेत नाही असे कळले.
         प्रणवला मग तेथेच सोडून आम्ही गेस्ट हाउस मध्ये जाऊन सर्व सामान गोळा करून निघायचे ठरवले. जयवंत भाग्यश्री तेथे बरेच दिवस राहिल्यामुळे गेस्ट हाउसमधील बऱ्याच लोकांना त्यांची आणि प्रणवची माहिती झाली होती, त्यामुळे सगळ्यांनी काय झाले याची आवर्जून चौकशी केली आणि काय झाले हे कळल्यावर सगळ्यांनी दोघांनाही उराशी धरून त्यांचे सांत्वन केले. त्यात नाश्त्याच्या वेळी भेटलेली आणि गप्पा मारणारी मुलीची आई पण होती. सगळ्यांनी प्रणव किती गोड मुलगा होता याची आवर्जून आठवण काढली आणि जयवंत भाग्यश्रीचे अश्रू पुसले.
    घरी यायला जवळजवळ संध्याकाळचे साडेसात वाजले. प्रथमेश अर्थातच घरात होताच पण त्याने बेबाजीविषयी एक शब्दही उच्चारला नाही जणू तो हॉस्पिटलमध्येच तो राहणार असे त्याने मनोमन ठरवून टाकले होते.
    दुसऱ्या दिवशी ऍनाला फोन केल्यावर तिने फ्यूनरल शुक्रवारी म्हणजे २९ ऑक्टोबरला करायचे असे सांगितले, त्याचबरोबर वैदिक मंत्र वगैरे म्हणायचे असल्यास एक फोन नंबर देऊन त्यावर संपर्क साधावयास सांगितले. लहान मुलाच्या बाबतीत दाहसंस्कार करत नसल्यामुळे  शवपेटी ठेवण्यासाठी खोदून ठेवले जाईल हे पण सांगितले. आशचर्य म्हणजे आम्ही अजून ऍना या व्यक्तीस पाहिलेही नव्हते. तिच्या सांगण्याप्रमाणे कौशिकशास्त्रीना फोन केला आणि त्यानीही त्यादिवशी येण्यास मान्यता दिली.
      शुक्रवारी फ्यूनरलला मी, जयवंत, सुजित आणि सौ. असे चौघे जायचे ठरले. त्याप्रमाणे आम्ही साडेदहा वाजता फ्रँकलीन पार्कच्या सीमेटरीत पोचलो. हे एक चर्चच आहे आणि त्याच्या आवारात स्मशानभूमी आहे. कौशिकशास्त्री अगोदरच आले होते. जयवंतचे आठ दहा मित्रही आले होते. थोड्या वेळाने ऍनाही आली. तिने एका पेटीतून प्रणवला आणले होते आणि ती पेटी चॅपेलमध्ये ठेवल्याचे सांगून त्याचे अंत्यदर्शन घ्यायला सांगितले. इतका छान तो जन्मानंतर एकदाच पाहिला होता. जणू "कर ले सिंगार चतुर अलबेली साजनके घर जाना होगा" याची जाणीव ठेवूनच ऍनाने त्याला इतक्या चांगल्या स्वरुपात आणले होते. आता अंगावर सूज नव्हती. पहिल्यानेच त्याच्या अंगावर छान कपडे घालून शालीमध्ये गुंडाळून त्याला ठेवले होते. पेटीत काही छोटी खेळणी ठेवली होती. आम्ही सर्वानी एकदा प्रणवचा निष्कलंक देह प्रथमच डोळा भरून पाहिला. त्याचेजवळ ठेवलेली फुले सर्वानी त्याच्या पार्थिवावर वाहिली.
       त्यानंतर ती पेटी तेथून ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करावयाचे त्या जागी आणली. त्या ठिकाणी अगोदरच पुरेसे खोल खणून त्यावर एक लाकडी फळी ठेवलेली होती. त्या फळीवर एक कपडा टाकून त्यावर प्रणवचे नाव लिहिलेली पाटी लावलेली होती. पेटी तिकडे नेऊन कौशिक शास्त्र्यांनी त्या जागेची गंगाजल, दूध नारळ, मीठ टाकून यथासांग समंत्र पूजा केली. नंतर पेटीतील पार्थिवावर योग्य ते मंत्र म्हणून गंध फुले वाहिली काही मंत्र म्हटले. आम्ही सर्वांनीपेटीवर फुले वाहिली आणि मग जड अंत; करणाने पेटी खड्ड्यात ठेवून तेथील दोन कर्मचाऱ्यांनी त्यावर माती लोटून ती जागा पूर्ण सपाट केली आणि त्यावर प्रणवच्या नावाची पाटी लावली. या सर्व घटनेत ऍनाची भूमिका तिच्याच घरातील व्यक्ती मरण पावल्यासारखी होती. आश्चर्य  म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी खड्डा तयार केला आणि त्यानंतर माती लोटली त्यांनी जयवंतने देऊ केलेले पैसेही घेण्यास प्रथम नकार दिला पण मग ऍनाच्या सांगण्यावरून त्यांनी ते घेतले. स्मशानातही अडवणूक करणाऱ्या आपल्याकडील काही व्यक्तींची त्यावेळी आठवण झाली. अशा रीतीने १२ सप्टेबरला संध्याकाळी सात वाजता सुरू झालेला प्रणवाध्याय २९ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता संपला.  
         कोणतीही गोष्ट बरी की वाईट योग्य की अयोग्य हे शेवटी परिणामावर ठरते. भारतातून जयवंत भाग्यश्री गेले त्यावेळी प्रसूती भारतात करून मग अमेरिकेत जावे असे मला वाटत होते. पण अमेरिकेत जन्म झाल्यावर तेथील नागरिकत्व त्याला आपोआप प्राप्त होते, शिवाय त्याच्या जन्मानंतर जायचे म्हणजे पुन्हा त्याचा पासपोर्ट व्हिसा या सगळ्या भानगडी भाग्यश्रीलाच कराव्या लागल्या असत्या. म्हणजे बराच उशीर झाला असता या विचाराने त्यानी त्या वेळी जाण्याचा निर्णय घेतला. त्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे हे कळल्यावर तर इकडे आलो तेच बरे केले असे वाटले कारण अशा प्रकारची शस्त्रक्रिया इतक्या व्यवस्थित भारतात झाली असती की नाही शंकाच होती. शस्त्रक्रिया चांगली झाल्यावर तर जे होते ते बऱ्यासाठीच असे वाटले. कारण अशा प्रकारचा दोष असणारी बालके जगणे शक्यच नसते अशी अमेरिकेतील डॉक्टरांचीही कल्पना होती परंतु अलीकडेच त्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य आहे आणि अशी मुले जगतात असा अनुभव आला होता.
     माझ्या भावालाच पंचवीस तीस वर्षापूर्वी मुंबईत झालेल्या मुलात असाच दोष होता आणि तो झाल्यावर लगेचच काळानिळा पडू लागला आणि त्यावेळी डॉक्टरांनी त्यावर काही उपाय नाही असा निर्वाळा दिल्यावर काही काळातच तो गेला होता. प्रणवच्या बाबतीतही त्याचा जन्म भारतात झाला असता तर कदाचित असेच झाले असते, आता जे झाले ते पाहता या चिमण्या जीवावर शस्त्रक्रिया करून आपण त्याला मोठी शिक्षाच दिली असे वाटले. अर्थात आपण कोणतीही गोष्ट चांगल्या उद्देशानेच करतो.
      आता जे झाले ते चांगले की वाईट? हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे पहिल्या वारीच्या वेळीचा आमचा हिडन व्हॅलीतील चांगला शेजारी (याचा उल्लेख पहिल्या भागात आला आहे)एकदा नंतर भेटला. त्याने ओळख दाखवली, म्हणून मी त्याच्याशी बोलू लागल्यावर त्याने आमच्या घरातील दु:खद घटना कळल्याचे सांगून माझे सांत्वन केले. पण पुढे त्याने सांगितले की त्याच्या भावालाही मुलगा झाला आणि त्याच्या हृदयात असाच दोष आढळला. त्याचा जन्म मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये झाला होता आणि त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर अशीच शस्त्रक्रिया केली आणि तो वाचला पण पुढे तो थोडा मोठा झाल्यावर पुन्हा तशाच प्रकारचा दोष उत्पन्न झाल्यामुळे बंगलोरला नेऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. ती शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली आणि तरी शेवटी तो वाचला नाहीच. पण अशा मुलांच्या बाबतीत ती वाचली तरी ऑक्सिजनचा  पुरवठा सुरवातीस न झाल्यामुळे त्याच्या मेंदूवर  दुष्परिणाम झाल्यामुळे ती मंदबुद्धी होण्याची शक्यता असते. असेही त्याने सांगितले. त्यामुळे असे मंदबुद्धी मूल पाहिले की त्या जागी प्रणव असता तर असा विचार मनात येऊन अंगाचा थरकाप होतो. त्याचबरोबर जयवंतचे कौतुक अशासाठी वाटते की असा धोका असूनही त्याने प्रणवसाठी काहीही करण्याची कसूर ठेवली नाही.