शुद्ध लेखना संबंधी थोडेसे

ROSE म्हणजे गुलाब की R-O-S-E ?

मी आता पर्यंत लिहिलेल्या प्रत्येक लेखावर आलेल्या कॉमेंटस वाचून मला पु. लं. च्या बिगरी मधल्या ह्या वाक्याची आठवण झाली.

लेखन शुद्ध असावे ह्यात वाद नाही. पण त्याचे किती अवडंबर माजवायचे? एक तर नव्यानेच मराठी लिहू लागलेल्या माणसासाठी मराठी टाईप करणे सोपी गोष्ट नाहिये. आता पर्यंत चॅट करताना माझा maza असे लिहीलेले असताना आता अचानक त्याच माझा ची शब्दरचना maajhaa अशी करावी लागते. ३००-४०० शब्द लीहीताना एखाद्या शब्दला aa टाकायचा राहू शकतो. आणि शुद्धीचिकित्सकाची मदत घ्यायची म्हटलं तर तो स्वतःच गंडलेला आहे. त्याला बरेच शब्द गेले नाहीयेत. आणि बऱ्याचवेळा तो बरोबर शब्द सुद्धा चुक दखवून पुन्हा तोच 'हे बदला' मध्ये देतो.

लेखन शुद्ध असावे ह्यात वाद नाही. पण त्याला अवास्तव महत्त्व दिले की जुन्या काळच्या रिती रिवाजांचे जसे झाले तसेच त्याचे होते. एखादी गोष्ट करण्याचा मूळ हेतू बाजुला राहून कर्मकांडाचेच जास्त अवडंबर  माजवले जाते. नि ह्यामुळे नवीन लेखक इथे आपले लिखाण टाकायला घाबरू शकतात. जे लिहीलंय त्याचे रसग्रहण करायचे सोडून लोकं इथे आपल्या शुद्धलेखनाचे पोस्ट मॉर्टेम करतात ह्या भावनेनी लिखाण बंद होउ शकतं. मुळ लिखाण वाचून त्याचा आनंद घ्यायचं सोडून त्यात शुद्धलेखनच्या चुका काढण्यातच अनेकांना मजा येते असं मला वाटतंय. 

असो. हा प्रकार माझ्या तर बाबा लै म्हंजे लैच्च डोक्यात जातो. त्यामुळे आता इथल्या बहुसंख्य जनते प्रमाणे मी सुद्धा ह्यापुढे मनोगत वर नवीन काहीही न लिहीता लोकांच्या लिखाणातल्या शुद्धलेखनाच्या चुका काढण्याचे संतकर्म करणार आहे.

आता पर्यंत माझे (अशुद्ध) लेखन वाचण्याचा जो त्रास आपल्याला दिला त्या बद्दल क्षमस्व.