भातुकलीचा डाव (भाग -२)

भातुकलीचा डाव (भाग -१) वरुन पुढे चालू.


प्रशांतची गोष्ट


हनीमून नंतर आठवड्याभरातच प्रशांत आणि प्राची अमेरिकेला परतले. नवा देश, नवा संसार, नवं घर पाहायला प्राची फार उत्सुक होती. पूर्ण प्रवासात तिची बडबड चालली होती. तिच्या उत्साहाच प्रशांतला फार कौतुक वाटत होतं. एअरपोर्टवर प्रशांतचा एक मित्र त्यांना आणायला आला होता. नवे रस्ते, परिसर पाहून प्राची अगदी हरखून गेली होती. प्रशांत तिला जुजबी माहिती पुरवत होता. नवीन घरात कधी पोहोचतोय अस प्राचीला होऊन गेलं होतं.

घरात शिरता क्षणीच मात्र प्राचीचा सगळा उत्साह गळून पडला.

"हे काय? असं रिकामं घर? फर्निचर नाही, भांडी नाहीत, ओक्याबोक्या भिंती," प्राची हिरमुसली होऊन म्हणाली.

"अगं, इतके दिवस मित्रांबरोबर अपार्टमेंट शेअर करत होतो. लग्न होणार म्हणून भारतात यायच्या थोडे दिवस आधीच हे  अपार्टमेंट ठरवलं. फर्निचर खरेदी करायला वेळच मिळाला नाही. मग म्हटलं तू आलीस की सगळं तुझ्या पसंतीच येऊ दे. आता करूया ना दोघे मिळून खरेदी. आणि काय भिंती, भांडी बघत बसलीयेस, चल तुला बेडरूम दाखवतो," डोळे मिचकावत प्रशांत म्हणाला तशी प्राची खुदकन हसली.

 फर्निचर खरेदी करण्याच्या वेळेस, "आपण सेकण्ड हॅंड फर्निचर घेतलं तर थोडी बचत करता येईल," असं प्रशांतच मत होतं. पण, "ईईई!!!  दुसऱ्यांनी वापरलेलं फर्निचर आपण वापरायचं, काहीतरीच काय, मला नाही बुवा आवडत असलं काही," प्राचीने त्याला तिथेच तोडलं. घरासाठी एकदम इतका खर्च करणं प्रशांतच्या जीवावर आलं होत पण त्याला प्राचीच मन मोडवलं गेलं नाही. पुढचे काही दिवस खरेदी, घर सजवणे यात व्यस्त गेले.



------



त्या दिवशी प्रशांतला ऑफिसातून यायला थोडासा उशीरच झाला. प्रोजेक्टच टेस्टिंग सुरू झालं होतं, उशीरा पर्यंत बसणं भाग होतं. त्याने दरवाजा ठोठावला पण आतून काहीच उत्तर आलं नाही. आश्चर्य वाटून त्याने आपल्याकडच्या चावीने दार उघडलं. घरात अंधार होता.

"प्राची ए प्राची! कुठे आहेस तू," असं म्हणत तो घरात शिरला पण प्राची कुठेच दिसली नाही. त्याने आपला मोर्चा बेडरूम कडे वळवला. प्राची पलंगावर उशीत डोकं खुपसून झोपली होती.

"काय झालं गं? अशी या वेळेला झोपली का आहेस? बरं वाटत नाहीये का?"

"बरयं, पण खूप कंटाळा आला होता. तू ही उशीरा आलास. मला एकटं एकटं वाटत होत."

"हो गं! होतं असं कधीतरी. चल जेवायला बसायचं का? मी घेतो ताटं."

"मी आज जेवण नाही केलं."

"असं होय? बरं असू दे तुला कंटाळा आला होता ना आज बाहेर जाऊया का? की मी जाऊन काहीतरी घेऊन येऊ?" प्रशांतने समजुतीच्या स्वरात विचारलं.

"फक्त आजच नाही, मला रोजच जेवण करायचा कंटाळा येतो. हे काय आयुष्य आहे? काम करा, जेवण करा, भांडी घासा, साफसफाई करा. कार शिवाय कुठे जाता येत नाही. कारही एकच, तू ऑफिसला घेऊन गेलास की मी इथे कैदेत. घरी बसून वेड लागायची पाळी आली आहे. माझ्या घरी दोन नोकर आहेत. शिवाय स्वैपाकाला बाई. मी कध्धी बाथरुम, कमोड धुतले नाही आयुष्यात. इथे येऊन मात्र हे सगळं करावं लागतंय. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर माझ्याच्याने हे फार काळ जमणार नाही. इथे नोकरी करणं शक्य नाही. निदान मला पुढे शिकायला मिळेल असं काहीतरी कर ना प्रशांत."

"प्राची, अगं या सर्वाची कल्पना मी तुला आधीच दिली होती की. सर्वांनाच या चक्रातून जावं लागत. एकदा का ग्रीन कार्ड झालं की अशी बंधनं नाही राहणार, आपलं लहान गाव आहे इथे मनासारख्या नोकऱ्या तशाही कमीच आहेत. थोडी कळ काढ. आणि कामाच म्हणशील तर मी तुला प्रत्येक कामात मदत करतोच की गं. तू इथे यायच्या आधी ऑफिस सांभाळून सगळी कामं मी करतच होतो. आता तू घरी असतेस तेव्हा मी घरच्या जेवणाची अपेक्षा केली तर चुकीच आहे का? मी ही एक स्पष्ट सांगू का, तुला इथे आत्ताच शिकवण्याची माझी अजिबात ऐपत नाहीये. दुसरी कार घेण्याचीही सध्या नाहीये. हे घरभाडं, इलेक्ट्रिसिटी, केबल, फोन, विमा, क्रेडिट कार्डांवर घेतलेलं हे फर्निचर यांचे हप्ते भरताना माझा पगार कसा उडून जातोय ते मला माहित्ये."

"थोडी म्हणजे किती कळ, मला वाटलं होत की ६-८ महिन्यात होतं ग्रीन कार्ड पण इथे सगळाच सावळा गोंधळ आहे. माझी उमेदीची वर्ष वाया जाताहेत. उगीच लग्न केलं असं झालंय मला. फसवणूक झाली माझी."

"काय? काय बोलतेस तू?" प्रशांतचा आवाज आता चढला होता, "प्रत्येक गोष्टीची मी तुला कल्पना दिली होती. अमेरिकेत राहणं तितकंसं सोपं नाही हे सांगितलं होत. पण तू त्यावेळी सगळ्याला तयार होतीस. प्रेक्षणीय स्थळी काढलेले अमेरिकेचे चकचकीत फोटो पाहून इथे कराव्या लागणाऱ्या कष्टांची कुणालाच कल्पना येत नाही. स्वच्छंदी आयुष्य भोगायला मिळत एवढंच दिसत त्याच्या मागचा एकटेपणा जाणवत नाही. भरभक्कम पगाराचा आकडा दिसतो पण त्या पैशाला फुटणारे खर्चाचे अमाप पाय दिसत नाहीत. जाऊ दे झालं. मला खूप भूक लागली आहे. चल बाहेर जाऊया," असं म्हणून प्रशांत उठला आणि दाराबाहेर पडला.

त्यादिवसानंतर प्राची थोडीशी बिथरल्यासारखी वागायची. मनात आलं तर जेवण बनवलं, साफसफाई केली नाहीतर टीव्हीच्या समोर ठिय्या मांडून बसलं. प्रशांतने तिच्या कलाने घेऊन पाहिलं. रोजच्या कामातली आपली मदत वाढवली, तिला दररोज संध्याकाळी फिरायला घेऊन जायला सुरुवात केली. पण प्राचीच्या वागण्यात बदल होत चालला होता. कधी मूड असला तर त्याच्याशी प्रेमाने वागायची नाहीतर काहीतरी कारण उकरून भांडण काढायची आणि भांडण तिच्या एकाकीपणावर व नोकरी करता न येण्याच्या प्रश्नावर येऊन थांबायचं. मग प्रशांतही जेवढ्यास तेवढं अंतर ठेवून वागायला लागला. दिवसें दिवस दोघांमधला दुरावा वाढत चालला होता. घरात फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं.

असाच एक दिवस प्रशांतला त्याच्या आईचा भारतातून फोन आला. इकडची तिकडची चौकशी झाल्यावर आईने सरळ मुद्द्याला हात घातला.

"अरे प्रशांत, तुला काहीतरी विचारायचंय बाबा. काल प्राचीचे वडील आले होते. तुम्हा दोघांबद्दल सांगत होते. धास्तावलोय रे आम्ही."

"असं काय सांगत होते?" प्रशांतने विचारलं.

"अरे, तू मारतोस का रे तिला? तिने फोन करून घरी सांगितलं की तू तिला मारतोस, कोंडून घालतोस, तिला घालून पाडून बोलतोस, तिला खरेदीला नेत नाहीस. कित्ती सांगत होते रे. आमची अगदी पंचाईत होऊन गेली त्यांच्यासमोर. खूप रागात होते ते, आम्हाला तर काहीच माहीत नव्हतं रे यातलं, आम्ही काही बोलूही नाही शकलो."

"काहीतरीच काय आई?" प्रशांतला आश्चर्याचा धक्का बसला,"प्राचीने असं सांगितलं? मी फोन तिच्याकडे देतो. तूच विचार तिला खरं काय आणि खोट काय ते," प्रशांतने फोन प्राचीच्या हातात दिला. प्राची काहीच बोलली नाही, फक्त मुसमुसून रडायला लागली. प्रशांतने हलकेच फोन ठेवून दिला.

"रडू नकोस. असं का सांगितलंस तू तुझ्या आई बाबांना? काय वाटलं असेल त्यांना इतक्या लांब बसून अस ऐकल्याने याचा विचार केलास का?" शांतपणे प्रशांतने तिला जवळ घेऊन विचारलं.

"मला खूप कंटाळा आलाय. आपली माणसं नाहीत. मित्र मैत्रिणी नाहीत. वेळ घालवायला साधन नाही, मला वेड लागेल अशाने," प्राची काकुळतीला येऊन म्हणाली.

"अगं पण काय वाटलं असेल त्या सर्वांना. माझं नाव का असं खराब करतेस? तूच ठरव काय ते की असं करतेस, काही दिवस भारतात जाऊन राहा. सर्वांना भेट. तुलाही बरं वाटेल आणि त्यांनाही. काही दिवसांनी घरची आठवण आली की ये परत," थोडंसं वैतागूनच प्रशांतने तिला सल्ला दिला.

प्राची भारत फेरीला एका पायावर तयार होतीच. प्रशांतनेही आपल्या आई वडिलांशी बोलून ती तिथे आली की सामोपचाराने घेऊन तिची समजूत काढा, तिच्या आई वडिलांशीही बोलून घ्या असं सांगून ठेवलं होतं. पण प्राची भारतात परतल्यावर प्रकरण आणखीनच वाढीस गेलं. प्राचीचे आई वडील म्हणायला लागले की तुमचा मुलगा आमच्या मुलीला मारहाण करतो. तिचा छळ करतो, कुणास ठाऊक त्याला हे लग्न पसंतच नसावं. आमची एकुलती एक मुलगी आम्हाला काही जड झालेली नाही. जन्मभर तिची काळजी उचलायला आम्ही समर्थ आहोत आणि मग एक दिवस प्राचीने सरळ फोन करून आपल्याला अमेरिकेत राहणं जमणार नाही म्हणून प्रशांतकडे सामोपचाराने घटस्फोटाची मागणी केली.


------


प्रशांतची गोष्ट संपलीतरी मी काहीच न बोलता रिसीव्हर हातात धरून बसले होते.

"लग्न नाही, भातुकलीचा डाव झाला बघ, सगळ्या गावात नातेवाईकात उगीच नको ती चर्चा सुरू झालीये. आई बाबांच वाईट वाटत. त्यांना या वयात लोकांना कसली उत्तरं द्यावी लागताहेत कुणास ठाऊक. मी हल्ली त्यांच्याशीही बोलत नाही, मनातलं काही सांगायला गेलो तर आई रडते. मलाही इथे मित्र विचारतात की झालं तरी काय असं? नको वाटत या चौकशांना उत्तर देणं, थोडासा डिप्रेस्ड झालोय मी."

हमसाहमशी रडण्याचा आवाज कानावर पडला आणि मलाही गलबलून आलं. हातात रिसीव्हर पकडून मी काहीही न बोलता तशीच बसले होते. भावनावेगाने रडणाऱ्या पुरुषाला कसं सावरायचं ते अजूनही मला शिकायचं आहे.


(समाप्त)