कंपूबाजी!

काही महिन्यांपूर्वी काहीसा चुकूनच मी मनोगतावर पोहचलो... आणि येथेच रेंगाळलो. असो! चर्चेचा प्रस्ताव माझे हे रमणे सांगण्यासाठी नाही तर आहे एका वेगळ्याच शंकेचे निरसन करून घेण्यासाठी.


ही शंका आहे मनोगतावरील कंपूबाजीबद्दल! ही कंपूबाजी बऱ्याचदा मनोगतावर उपटताना दिसते असे अगदी पहिल्या दिवसापासून वाचतो आहे.


"कंपूबाजीचे" अप्रत्यक्ष तसेच प्रत्यक्षही आरोप/प्रत्यारोप; त्यातून होणारे गंभीर वादविवाद; तसेच त्याची हलकीफुलकी टिंगलटवाळी; त्यावरून झडणाऱ्या काही अपवादाने विचारप्रवर्तक किंवा बऱ्याचशा मजेशीर चर्चा/लेख/कविता... एक ना अनेक पण ह्या साऱ्यासाऱ्यातून कंपूबाजी हा मनोगताचा जणू एक अविभाज्य भाग झाला आहे. काहीजण तर हा मराठी माणसाचा स्थायीभाव आहे असेही सांगतात! असेलही किंवा नसेलही पण मनोगतींच्या वास्तव आणि काल्पनिक संमेलनातून येणारा किंवा उगाचच दरवळत ठेवला जाणारा कंपूबाजीचा वास जाणवला नसेल तरच आश्चर्य! अलिकडे तर कंपूबाजीच्या शेरेबाजीला जणू उधाण (की उत) आलेला आहे.


पण खरोखर येथे कंपूबाजी आहे काय? की असा केवळ आभास आहे? एव्हढा वेळ (की किडा!) कोणाला आहे काय? प्यार किया नही जाता हो जाता है सारखे कंपूबाजीचेही आहे काय? की हे सारे matrix style मायाजालच आहे? ... असे अनेक प्रश्न गटबाजी करून डोके वर काढत आहेत.


हे सारे मनोगताच्या चावडीवर मांडून काही गवसते का हे पाहण्यासाठी हा चर्चाप्रस्ताव! दोन साध्या प्रश्नांची उत्तरे देऊन काही आश्चर्यकारक सापडते का ते पाहण्याचा हा एक खटाटोप!!



  1. मनोगतावर कंपूबाजी आहे असे आपल्याला वाटते काय?

  2. आपण स्वतः कोणा कंपूत सहभागी आहोत काय?

माझ्यासाठी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे "नाही" अशी आहेत.



  • आपणही या प्रश्नांची उत्तरे द्यावीत ही विनंती.

  • कोणी "माझी उत्तरे/किंवा इतर मनोगतींची उत्तरे अमान्य" असे म्हणूही शकतात.

  • पण प्रत्येकजण स्वतःला कंपूबाजीच्या चष्म्यातून कसे पाहतो हे शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

  • तसेच हे सारे प्रकरण दिसते तितके/ किंवा येथे मांडले आहे तितके साधे सोपे नसून काही इतिहास, तत्वज्ञान मांडावेसे वाटले तरी ना नाही.

अंदाज - जवळपास सर्वांना (९०% +) असे वाटते की ते average वाहनचालकापेक्षा चांगली गाडी चालवितात. असाच काहीसा स्वतःच्याच पायात खोडा घालणारा निष्कर्ष वरील प्रश्नांच्या उत्तरांवरून मिळेल.


खुलासा - कंपूबाजी चर्चाचर्विणाच्या पापपुण्यात माझाही खावा आहेच. एक फालतू नामांतर चर्चा अशा एका कंपूबाजीच्या सदरात बसविता येईल उपहासात्मक प्रस्तावाची भर पूर्वी टाकली होतीच. त्याची कबुली! किंवा "पुनःप्रस्ताव"!!


योजना - जर चर्चा रंगली तर त्याचा आधार घेऊन, याच अनुषंगाने समाजशास्त्रातील, अर्थशास्त्रातील काही सूत्रे कधीतरी मांडण्याचा मानस आहे.