रुखवत

             नुकतंच माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलं आणि इतर चर्चांप्रमाणे रुखवताची चर्चा देखील सुरु झाली. तिच्या स्वत:च्या मताप्रमाणे- '' मी काहीही या गोष्टीत पैसे आणि वेळ वाया घालवणार नाहीए त्या पेक्षा मी होणार्‍या नवर्‍याला फोन करुन तासं तास गप्पा मारीन त्यामुळे आमच्यात विचारांची देवाण घेवाण होईल आणि आमचे भावनिक बंध पक्के व्हायला मदत मिळेल, त्या भरतकामाच्या आणि विणकामाच्या चिटूक मिटूक वस्तूंचं काही महत्व उरणार नाही. बाकी भांडीकुंड्‍यांचे पैसे आई देणारच आहे ते लग्न झाल्यानंतर नवरा आणि मी ज्या गावाला राहू तिथेच विकत घेईन. इथून ओझं कोण नेणार!!!  आणि अगदी इथेच भांडी घेतली तरीही त्याचं रुखवताच्या नावानी प्रदर्शन का करायचं. ''
  हे झालं तिचं वैयक्तिक मत. पण माझ्या दृष्टीनी रुखवत ही गोष्ट जरा वेगळीच आहे. रुखवत करायचं म्हणजे नुसतंच वस्तू करायच्या आणि मांडायच्या असं नसतं. त्या वस्तूंच्या मागे काही भावना असतात. एखादी मैत्रिण तिची आठवण म्हणून काही विणून देते. मावशी स्वत:च्या हातानी भरतकाम करुन ड्रेसचं कापड देते. एखाद्या काकूला ‍आपला आवडता रंग सांगितला की ती चादर पेंट करुन देते किंवा ''लग्नाच्या लाडवांसाठी आईला सांग मला हाक मारायला'' असं एखादी आत्या म्हणते तेव्हा तिच्याशी नाही का आपले काही वेगळे बंध निर्माण होतं. लग्न ठरलं म्हणजे आपले संबंध फक्त होणार्‍या नवर्‍याशी सांभाळण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच आपल्या विद्यमान नातेवाईकांशी सुद्धा सांभाळले पाहिजेत.  यासाठी जर रुखवत एक माध्यम ठरत असेल तर त्यात नकार देण्यासारखं काय असतं. 
  एकदा का लग्न होवून गेलं की कधीकधी वर्षानुवर्ष भेटीगाठी होत नाहीत. त्यावेळी आपली आठवण ही 'तिच्या' लग्नाशी निगडीत असतेच.  घरात सजावटीसाठी लावलेली, एखाद्या ताईने करुन दिलेली फ्रेम पाहून कुणी कौतुक केलं की त्या बरोबर ‍ताईची आठवण येतेच की नाही. पण '' आम्ही इंटीरीयर करुन घेणार आहोत हे फालतू फ्रेम वगैरे काही करत बसू नका.'' असंच पहिल्यांदा ऐकलं की कुणी हौशीनी करायला जाणारं मनुष्य ही दूखावतंच.  एखाद्या थकलेल्या आजी बाईंना कुणी '' मालत्या काय छान करायचात पमाताई तुम्ही.'' असं म्हटलं की त्याही सुखावत म्हणतात '' आताशा फारसं दिसतं नाही गडे पण आमच्या पणतीच्या लग्नाच्या अगदी रंगीत मालत्या करुन दिल्या होत्या हो... त्याच शेवटच्या आठवताएत केलेल्या. '' आता या मालत्यांबरोबर पणतीच्या लग्नाच्याही चार आठवणीत पणजीबाई रमतात. जरा आणखी गोडी गुलाबीनी घेतलं तर देतीलही करुन याही लग्नात.  पण जर आधीच पणती म्हणाली की '' काय त्या मालत्या बिलत्या करायच्या नाहीत.'' मग...    
 शेवटी रुखवत करणं, ते मांडणं आणि सासरच्या लोकांकडून त्याचं कौतुक होणं या सगळ्या प्रत्येक कुटुंबानुसार हौशीच्या गोष्टी आहेत. ज्यांना हौस असेल त्यांनी रुखवत करावं आणि ज्यांना नसेल त्यांनी करु नये असं जरी म्हटलं तरी लग्नातून हा प्रकार अगदी कालबाह्य होता कामा नये असं मला वाटतं. आपले काय मत आहे?