वारी २२

थोड्या वेळाने नेहमीप्रमाणे सर्वांना मोसंबीचा रस देण्यात आला. हा इतका आंबट रस एअर इंडियावाले कोठून पैदा करतात कोणास ठाऊक. त्यानंतर येणाऱ्या शीतपेयात बरेच पर्याय असतात पण या रसाला मात्र तो न घेणे हा एकच पर्याय असतो. विमान सुटण्यापूर्वी समोरील पडद्यावर कठिण प्रसंगात सुरक्षातरतुदी कशा वापरायच्या याविषयी माहिती देण्याचे काम सुरू झाले. हल्ली त्याचबरोबर एक कर्मचारीही त्याचे प्रत्यक्ष दिग्दर्शन करतो. विमान सुटण्यापूर्वी हा भाग पूर्ण झाल्यावर बेल्ट बांधणे. मोबाइल बंद करणे, वगैरे सूचना न होताच एकदम विमान हलू लागले आणि मी आश्चर्यचकित झालो पण नंतर ती हालचाल थांबली ध्वनिक्षेपकातून विमानातील बिघाडामुळे विमान सुटण्यास विलंब होत असल्याचे सांगून प्रवाशांना होणाऱ्या गैरर्सोयीबद्दल त्यांची क्षमा मागून झाली आणि तरीही ईजिनाची दुरुस्ती शक्यतो लवकर करून लवकरच निघू अशी आशा पण दाखवण्यात आली. तासाभरात निघू असा दिलासा देण्यात आला.

आमच्या शेजारी एक फ्रेंच युवती पॅरिसला उतरणारी बसली होती. आत शिरल्यावर लगेच तिच्या लॅपटॉपवर काम करण्यात गुंगून गेली तिला या घोषणा ऐकू गेल्याच नाहीत. पण थोड्या वेळाने तिला जाग येऊन ती अजून विमान का सुटत नाही असे मला विचारू लागली त्यावर मी तिला दिलेल्या उत्तरावर तिचा विश्वास बसला नाही बहुधा एअर इंडियाच्या विमानात प्रवास करण्याआ हा तिचा पहिला अनुभव असावा. त्यामुळे ती विमानकर्मचाऱ्यापैकीच एकाला विचारण्यासाठी त्यांच्या बसण्याच्या जागेवर गेली, ते तिला काय सांगतात या उत्सुकतेने मीही तिच्या पाठोपाठ गेलो आणि त्यांच्या सांगण्याचा मतितार्थ ऐकून मी गारच झालो. त्यांच्या सांगण्यानुसार प्रवाशांचे सामान विमानात चढवणाऱ्या ट्रकनेच विमानाला जोरदार धडक दिल्यामुळे इंजीन नादुरुस्त झाले आहे हे ऐकल्यावर माझ्या अभियांत्रिकी शिक्षणानुसार अशा दुरुस्तीला कमीतकमी १५ ते २० तास लागतील म्हणजे आपल्याला विमानतळावर मुक्काम करण्याची आणखी एक संधी आली आहे याची मला खात्री पटली. मागे पिटसबर्गला आमची संधी चुकली होती ती आता भरून निघणार असे वाटले तेवढ्यात घोषणा झाली, " विमान उद्या चार वाजेपर्यंत निघू शकणार नाही. (म्हणजे त्यानंतर केव्हा निघू शकेल याचा नेम नाही) प्रवाशांना विमानात जेवण करून हॉटेलमध्ये नेण्यात येईल. ज्यांना हॉटेलमध्ये जेवायचे असेल त्यांना जेवण्याचे तिकिट देण्यात येईल. ज्यांना घरी जायचे असेल त्यांनी आपले संपर्क दूरध्वनी एअर इंडिया च्या खिडकीवर देऊन घरी जावे. "

आम्ही आपल्या केबीन बॅगा घेऊन खाली उतरलो आणि मी घरी फोन करून ही सुवार्ता सांगितली. आम्हाला सोडून ते नुकतेच घरी पोचून जेवायला बसले होते. आमचा फोन मिळाल्यावर सुजितने तुम्ही तेथेच थांबा मी तुम्हाला न्यायला येतो असे सांगितले. टिकेटिंग कौंटरवर जाऊन आमचे बोर्डिंग पासेस परत केले आणि त्याना आमचे संपर्क दूरध्वनी देऊन सुजितबरोबर घरी परत आलो. आमचे मुख्य सामान विमानतळावरच राहू देण्यात आले कारण आमचे सर्व सामान विमानात चढवल्यानंतर विमानात बिघाड झाला होता. आम्हाला पुढे मिळणाऱ्या उड्डाणात सामान चढवले जाईल अशी अपेक्षा होती.

आम्ही घरी आल्यावर खरा खूष झाला असेल तर तो प्रथमेश. कारण आम्ही विमानतळावर त्याला घेऊन गेलो नव्हतो त्यामुळे आम्ही असेच कुठेतरी खरेदी करावयास गेलो असू असा त्याचा गैरसमज झाला होता किंवा करून देण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला एअर इंडियाच्या ऑफीसकडून फोन येईल अशी अपेक्षा होती पण ती पूर्ण न झाल्यामुळे आम्हीच फोन लावल्यावर त्यांनी उत्तरादाखल एक ध्वनिफीतच लावून ठेवली होती आणि त्यावर " दहा जानेवारीची एअर इंडियाचे संध्याकाळी सहा वाजता होणारे उड्डाण विमान नादुरुस्त झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे आणि प्रवाशांशी संपर्क साधण्यात येईल. " अशी उद्घोषणा ध्वनिमुद्रित करून ठेवली होती. त्यामुळे आम्हाला दिवसभर तीच ऐकण्याचे काम करावे लागले. मध्येच एकदा त्यांचा फोन आला, वाटले चला निघावे लागणार पण त्याच्याकडून विचारणा झाली की आमची ग्रीनकार्डे आहेत का. बहुधा लंडनमार्गे जाणाऱ्या उड्डाणात आम्हाला समाविष्ट करण्याचा त्यांचा विचार असावा. पण ती नाहीत असे कळल्यावर तो विचार त्यांनी रद्द केला. अशा रीतीने तो दिवस काहीच न होता गेला. आता मानसिक तयारी निघण्याची झाल्याने आणि महत्वाचे सामानही बरोबर नसल्यामुळे ( अगदी ज्ञानेश्वरीही मुख्य सामानात गेली होती. ) आमची अवस्था त्रिशंकूसारखी झाली होती. अकरा जानेवारीचा दिवस असाच गेला.

१२ तारखेस सकाळपासून काहीच हालचाल नाही, आम्ही बेचैन. मुलांना कामावर जाणे भागच होते. ते गेल्यावर जर अचानक एअर इंडियाला जाग आली तर काय करायचे म्हणून एका टॅक्सीच्या एजन्सीला फोन करून ठेवले. तशात एकदम दुपारी फोन आला की लुफ्तान्साने जाण्यास तयार आहात का, फ्लाइट संध्याकाळी ५-४५ ला होती. आम्ही सुजितचा फोन नंबर देऊन त्याच्याशी बोलायला सांगितले. त्याचा नंतर तयार राहा असा फोन आल्यावर आम्ही पुन्हा तयार झालो. नेवार्क विमानतळावर पोचलो तेव्हां दुपारचे ४ वाजले होते. सामानाचे काम नसल्याने वेळ कमी लागेल असे वाटत होते पण तेथे सगळा सावळा गोंधळ होता. एअर इंडियाच्या कौंटरला अगदी एकाद्या एस. टी. स्टॅंडची कळा आली होती. त्या उड्डाणाने मुख्यत्वे १४ जानेवारीच्या संक्रांतीसाठी जाणाऱ्या गुजराती बंधू भगिनींची गर्दी होती. त्यातले बरेच ग्रीन कार्डधारक कालच लंडनमार्गे उडून गेले होते पण अजूनही त्यांच्यापैकी बरेच शिल्लक होते. त्या सर्वांचा गुजराती कलकलाट चालू होता आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपआपले लगेज ताब्यात घ्या अशी उद्घोषणा झाली आणि आमच्या पायातले अवसानच गळाले. म्हणजे सामान ताब्यात घेऊन पुन्हा चेकिंग होणार होते आणि ते सामानही विमानतळाच्या तळमजल्यावर ट्रकमधून आणून टाकण्यात ( अक्षरश: टाकण्यातच येत होते हे पुढे कळले) येत होते. ते आपले आपले शोधून घ्यायचे, ते घेऊन तीन मजले वर येऊन मग त्याचे चेकिंग व्हायचे आणि त्यानंतर आम्ही विमानात चढायचे म्हणजे आमच्यासारख्या पैलतिरी नेत्र लागलेल्यांना ते मिटण्याचीच वेळ होती.

सुजित सामान आणण्यासाठी ट्रॉली घेऊन गेला. वरचा भाग वातानुकूलित होता पण तळमजला अगदी उघडाच होता आणि तो जानेवारी महिना होता त्यामुळे तेथे कडाक्याची थंडी होती त्यामुळे तेथे उभे राहून त्याचे पाय गारठून गोठण्याची वेळ आली, तरी सामान ट्रकने हळूहळू येतच होते. आणून ते गॅसची सिलिंडरे ज्या पद्धतीने मजूर ट्रकमधून वाटेल तशी फेकत असतात तसेच सामान फेकण्यात येत होते, काही प्रवाशांच्या बॅगांची दोन भागात विभागणी होऊन सामान बाहेर डोकावू लागले. असा एक प्रवासी संतापाने एअर इंडियाच्या अनेक कुळांचा उद्धार करत होता आणि याविषयी तक्रार करणार असा दम भरत होता पण त्याचा परिणाम त्या फेकणाऱ्यांवर जवळजवळ होतच नव्हता म्हटले तरी चालेल. सुजितचे पाय गोठून जाण्याची पाळी आली तरी आमचे सामान येतच होते. शेवटी त्याने जयवंतला फोन करून लवकर येण्याचा आग्रह केला आणि तो आल्यावर त्याला तेथे उभा करून तो वर आमची परिस्थिती काय आहे पाहण्यास आला.

वर आम्ही आमच्या मूळ तिकिटाच्या ऐवजी बदललेल्या उड्डाणाचे तिकीट किंवा बोर्डिंग पास यापैकी जे काही मिळेल ते घेणाऱ्यांच्या रांगेत उभे राहण्याचा प्रयत्न करत होतो आणि शेवटी कंटाळून बसकण मारून बसलो होतो तरी रांग पुढे सरकत नव्हती. उड्डाण संध्याकाळी ५-४५ चे होते आणि पाच तर वाजून गेले आणि त्या उड्डाणातील जागा संपल्याचे घोषित करण्यात आले. अजून आमचे सामानही आमच्या ताब्यात मिळाले नव्हते. तेवढ्यात खालच्या मजल्यावरून जयवंतचा मोबाइल वाजला तो आमच्या बॅगा सारख्या दिसणाऱ्या बॅगा आमच्याच आहेत किंवा नाहीत ही विचारणा करत होता. त्यावर चर्चा हो ऊन त्या आमच्याच आहेत असा निष्कर्ष निघाल्यावर सुजितने इकडे घुसखोरी करत एअर इंडियाच्या कौंटरवरील कर्मचाऱ्याला बराच दम दिल्यावर शेवटी दुसऱ्या दिवशीच्या उड्डाणात जागा मिळवली. ते उड्डाण फ्रॅंकफर्टवरून जाणारे होते. जे मिळेल ते घे असा निर्वाणीचा सूर मी काढला आणि दुसऱ्या दिवशीच्या त्या उड्डाणाचे तिकीट मिळवले.

तोपर्यंत आमचे सामान ट्रॉलीवर घालून हलवण्यासाठी जयवंतने त्याचा धावा केला आणि तिकिटाबदली दिलेला कागद आमच्या ताब्यात देऊन सुजित खाली गेला. संयुक्ता आमच्यासोबत होती. अशा प्रकारे १२ तारखेचाही दिवस वाया गेला होता तरी आता निदान १३ ला तरी निघण्याची निश्चिती झाली या विजयानंदात आम्ही आमचे वीर सामानाच्या गाड्या घेऊन वर आल्यावर विमानतळावरील खानपानसेवेचा लाभ घेत आमचा विजय साजरा केला. जयवंत ऑफीसमधून तडक आलेला होता आणि सगळेच दमलेले होतो. सर्वांनी थोडीफार पोटपूजा करून आमच्या बॅगा बऱ्याच सुरक्षित राहिल्याबद्दल आमच्या भाग्याचे मनात व उघडपणेही कौतुक करत आमची वरात पुन्हा एकदा हिडन वॅलीत तोंड लपवायला आली.

त्या तिकिटाचीही जरा भानगडच होती म्हणजे नेवार्कपासून फ्रॅंकफर्टपर्यंत ते लुफ्तान्साचे होते. तेथे आम्ही १४ तारखेस सकाळी सात वाजता पोचणार होतो आणि तेथून एअर इंडियाचे विमान १४ तारखेस संध्याकाळी चार वाजता सुटून पुढे मुंबईस जाणार होते शिवाय या पुढच्या प्रवासाचा बोर्डिंग पास आम्हाला फ्रॅंकफर्टलाच मिळणार असे फक्त आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आम्ही फ्रॅंकफर्टला नऊ तास निराधार अवस्थेत लटकणार होतो. त्या काळात विमानतळावरून मुलांशी संपर्क साधता यावा म्हणून त्यांनी एक प्रिपेड कार्ड घेऊन त्या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे प्रशिक्षण इंटरनेटच्या सहाय्याने आम्हाला ( म्हणजे मला) दिले आणि काही अडचण आली तर किंवा न आली तरी तेथून संपर्क साधावा असे आम्ही ठरवले कारण त्यानाही आम्ही पुढे बरोबर जात आहोत की नाहीत याची माहिती मिळणे आवश्यक होतेच.

. १३ तारखेचा दिवस बॅगांची डागडुजी करण्यात गेला कारण फेकाफेकीत आमच्या बॅगा थोड्याफार जायबंदी झाल्या होत्या. एका बॅगेचे कुलुप तुटले होते. या वेळी मात्र आम्ही सर्व बॅगांना अगदी मौजे खबालवाडी किंवा वाकळवाडीचे लोक वळकटी बांधतात तसे सर्व बाजूनी बळकट नाड्यानी बांधून टाकले हो पुन्हा फेकाफेकी झालीच तर बॅग द्विभाजित व्हायला नको. शिवाय आपल्या बॅगा ओळखू याव्यात म्हणून त्यावर लेबलांशिवाय पुन्हा क्रेयॉनच्या कांड्यांनी नावे लिहिली होती त्यात प्रथमेशनेही आपले हात साफ करून घेतले. अशा प्रकारे दहा तारखेस निघालेले आम्ही प्रत्यक्षात १३ तारखेस संध्याकाळी मुंबईस जावयास निघालो.

१३ जानेवारीच्या संध्याकाळी तिसऱ्यांदा आम्ही नेवार्क विमानतळावर गेलो. पुन्हा सामानाची तपासणी, बोर्डिंग पास मिळवणे आमची तपासणी या सर्व गोष्टींना तोंड देऊन आम्ही एकदाचे लुफ्तान्सा विमानकंपनीच्या विमानात शिरलो. त्यात एक गोष्ट बरी झाली होती ती म्हणजे ही फ्लाइट अहमदाबादला १५ तारखेस म्हणजे अगदी संक्रांतीच्याच दिवशी पोचणार असल्यामुळे पतंगोत्सवात भाग घेणाऱ्या बऱ्याच गुजराती बंधूनी आपले उड्डाण आदल्या दिवशी मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्याना तो जमला नव्हता त्यांनी आपला जाण्याचा बेतच रद्द केला होता त्यामुळे या विमानात बरेच कमी प्रवासी होते आणि त्यामुळे विमानकर्मचाऱ्यांनी पहिला पेयपान वगैरे उपचार झाल्यावर जादा बैठका अडवून खुशाल झोप काढा असा प्रेमळ सल्ला दिला. अर्थात उद्या आपल्याला बोर्डिंग पास मिळतो की नाही या चिंतेत मग्न असणाऱ्या मला जागा भरपूर मिळाली तरी झोप लागली नाहीच. सौ. ने मात्र या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला.

लुफ्तान्सा जर्मन कंपनी असल्यामुळे उद्धोषणा प्रथम जर्मन भाषेत आणि नंतर इंग्रजीत होत होत्या. सिनेमाही जर्मन भाषेतील आणि अगदीच टाकाऊ होता. उड्डाण सुरू होताच विमान गदगदा हालू लागले आणि आता याचे काय होते या चिंतेने मला ग्रासले पण या वेळी कारण वेगळे होते म्हणजे जोराच्या वाऱ्याने ते हालत होते असे सांगण्यात आले पण शेवटी त्याने हालणे थांबवून थोडेसे माझ्या छातीचे ठोके सामान्य स्थितीत आणले आणि रात्र कशीबशी पार पडून फ्रॅंकफर्ट विमानतळावर आमचे विमान सकाळी सात वाजता पोचले.

फ्रॅंकफर्ट विमानतळ बराच मोठा होता पण तेथे नऊ तासाचा मुक्काम असूनही जर्मनीचा व्हिसा नसल्यामुळे आम्हाला बाहेर पडणे शक्य नव्हते. अर्थात व्हिसा असता तर लगेच आम्ही शहरात फेरफटका मारला असता असे नाही पण निदान विमानतळाबाहेरील भाग कसा आहे याचा तरी थोडा अंदाज आला असता. आमच्यापैकी निम्मेअधिक गुजराती प्रवासी होते त्याना अशा प्रवासाचा बराच अनुभव असल्याने त्यांच्या मागोमाग राहून पुढे जे काय करायचे ते ठरवू असा आम्ही विचार केला. प्रथम पुढील प्रवासाचा बोर्डिंग पास मिळण्यासाठी एअर इंडियाचा कौंटर हुडकू लागलो तो एका कोपऱ्यात पण बंद अवस्थेत दिसला आणि तेथील कर्मचारी केव्हा येईल ( किंवा येणार का नाही )याचा जवळच्या कौंटरवरील कोणालाच माहीत नव्हते. आम्हाला मुलांना फोन करायचा होता म्हणून आम्ही फोनचा अड्डा शोधू लागलो. सुदैवाने तो रेस्ट रूमच्या बाहेरच सापडला आणि मी मुलांनी दिलेला नुंबर हुडकून फोन करण्याचा प्रयत्न करू लागलो. निघताना केलेल्या सरावानुसार मी सगळे क्रमांक फिरवले तरी तो मला चार आकडी कसलातरी क्रमांक मागू लागला आणि तो काही आमच्याकडे नव्हता अर्थातच फोन करण्याचा विचार रद्दच करावा लागला कारण त्या फोनशेजारी लिहिलेल्या सगळ्या सूचना जर्मन भाषेत होत्या. आशर्य म्हणजे आमच्या सहप्रवाशांपैकी कोणालाही या फोनवरून फोन कसा लावायचा याचे ज्ञान नव्हते, त्यामुळे बऱ्याच जणांना विचारूनही काही फायदा झाला नाही.

अगोदरच धास्तावलेल्या मला या दूरध्वनीतील अपयशाने अधिकच खचल्यासारखे झाले आणि घशास कोरडही पडली. एवढ्या मोठ्या एअरपोर्टमध्ये पिण्याच्या पाण्याचा फौंटन मात्र कोठेही दिसत नव्हता. अमेरिकेतच काय पण भारतातही पाणीसुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती पण इतक्या पुढारलेल्या देशाने मात्र माझ्या तोंडचे पाणी पळवले. तेवढ्यात मला तेथे संगणक केंद्र दिसले आणि तेथून मुलांना एमेल करून आपला ठावठिकाणा कळवता येईल आणि आपल्या अडचणींची त्याना कल्पना देता येईल म्हणून एका टर्मिनलवर जाऊन पाहिले तर त्यात मेल करण्यासाठी तीस युरो सेंटस लागतील अशी सूचना होती आणि त्यात पाच मिनिटाचा संगणक अवधी उपलब्ध होणार होता. माझ्याकडे असलेल्या डॉलरचे युरोत रूपांतर करण्यासाठी विनिमयकेंद्र मात्र जवळच उपलब्ध झाले आणि आता आपल्याला पाणीही विकत घ्यावे लागणार याचा अंदाज येऊन मी पाण्यातही काही युरो घालवण्यासाठी डॉलरचे रूपांतर करून घेतले आणि पाच डॉलरचे रूपांतर करण्यात एक डॉलर वटणावळ घालवून जवळजवळ अडीच युरो डॉलर्स मिळवले पण नंतर आपण ही चूक केली असे वाटले कारण पाण्याची बाटली अमेरिकन डॉलरमध्ये पण विकत मिळत होती पण तिच्यावर लिहिलेल्या किंमतीपेक्षा विक्रेतीने काही सेंटस ज्यादा घेतले असे वाटून मी विचारणा केल्यावर रिकामी बाटली परत केल्यास ते परत मिळतील असे सांगण्यात आले. रिकामी बाटली इतकी मौल्यवान असते हे प्रथम कळले पण नंतर प्रवाशांनी रिकाम्या बाटल्या कोठेही फेकून विमानतळावर घाण करू नये यासाठी ही तरतूद असल्याचे कलले.

मिळालेले युरो सेंटस वापरून मी मेल करण्याचा प्रयत्न केला पण माझा कंजूसपणा नडला म्हणजे मी फारच आत्मविश्वासाने तीस सेंटमध्येच काम होईल म्हणून तीस सेंट वापरले पण मिळालेल्या वेळात मला मेल करणे जमले नाही कारण येथील कीबोर्ड थोडा वेगळा होता त्यामुळे माझा मिळालेला वेळ एक ओळ कशीबशी लिहिण्यातच खर्च झाला आणि वेळ संपला असा संदेश आला. मग नंतर जरा जास्त सेंटस वापरून अधिक वेळ विकत घेतला यावेळी मात्र वेळ पुरला एवढेच नव्हे तर उरलाही म्हणून दुसरा मेल करायला घेतला पण तो मात्र पूर्ण होऊ शकला नाही. पण एकदा अंदाज आल्यावर नंतर मेल करणे सोपे झाले.

बरोबर आणलेले खाद्यपदार्थ खाऊन विकत घेतलेल्या पाण्याने तहान भागवली. या सर्व प्रकाराने वैतागून मी " हाणकाबिगार पुन्हा अमेरिकेत पाऊल टाकणार नाही" अशी प्रतिज्ञा केली पण माझ्या प्रतिज्ञेत किती भीष्म आहे हे माहीत असणाऱ्या माझ्या सहधर्मचारिणीने त्यावर भाष्य करण्याचे टाळले. विमानतळ इतका दरिद्री की बसायला सुद्धा चांगली जागा नव्हती. खाद्यपेयांचे स्टॉल्स जेमतेम उभे राहण्याइतकीच जागा ठेवलेले होते. पुढे त्या विमानतळावरून अनेक वेळा प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून उच्च वर्गाचे लाउंज चांगले असते आणि इतर प्रवाशानाही तेथे बसता येते अशी माहिती मिळाली पण त्यावेळी ते माहीत नव्हते आणि त्यानंतर या माहितीचा खरेपणा पडताळून पाहता न आल्यामुळे फ्रॅंकफर्ट विमानतळाविषयीचे माझे मत अजून सुधारले नाही.

आम्हाला विमानतळावर येऊन पाच सहा तास झाले तरी एअर इंडियाचा कौंटर बंदच होता. शेवटी एका सहप्रवाशाने बातमी आणली की बोर्डिंग पासेस संध्याकाळच्या उड्डाणासमयीच मिळतील आणि आम्ही कसाबसा वेळ घालवण्याचा प्रयत्न करू लागलो. शेवटी आमच्या उड्डाणाची घोषणा होऊन अडकलेल्या प्रवाशांनी कोणत्या क्रमांकाच्या गेटमधून जावे हे सांगण्यात आले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे प्रवेशद्वारापाशीच उभ्या असणाऱ्या कर्मचारिणीने आमच्याकडे असणारा कागद पाहून आम्हाला पुढील एअर इंडियाच्या उड्डाणाचे बोर्डिंग पासेस दिले आणि आम्ही लाउंजमध्ये जाऊन बसलो.

चार वाजण्यास अर्धा तास असताना विमानात प्रवेश देण्यात आला आणि याही वेळी प्रवाशांची संख्या बरीच कमी असल्याने आम्हाला प्रत्येकाला झोपायला जागा मिळाली. हवाई कर्मचाऱ्यांनीच आम्हाला गुपचुप झोपून जा असा सल्ला दिला आणि या वेळी मात्र मी चिंतामुक्त होऊन खरोखरच तीन आसनांची जागा अडवून झोपी गेलो ते सकाळी एकदम मुंबईतच पहाटे पाच वाजता जागा झालो. अशा रीतीने आमची दुसरी वारी तब्बल पाच दिवस घेऊन समाप्त झाली. आमच्याबरोबर एक हैद्राबादचे नवरा बायको आणि मूल असणारे कुटुंब होते त्यांना मुंबईतही पुढचे उड्डाण लगेच नव्हतेच ते त्या दिवशी संध्याकाळी होते त्यामुळे त्यांच्या तीन आठवड्याच्या सुट्टीतील एक आठवडा त्यांना प्रवासातच घालवावा लागला. एअर इंडिया झिंदाबाद!