मराठी माणसाचे हिंदी केव्हा सुधारणार?

आजचा सकाळ पाहताना एका विधानाने लक्ष वेधून घेतले. मुंबईतील घटनेत माध्यमांशी बोलताना आर. आर. पाटील यांनी काही विधाने केली आणि त्यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले. त्यांचे बोलणे हिंदीत होते. मात्र हिंदी कच्चे असल्याने त्यांनी काही चुकीचे शब्द वापरले नि गोंधळ झाला. येथे मला संसदेतील (दूरदर्शनच्या कृपेने) पूर्वीची काही ऐकलेली भाषणे आठवली. शरद पवारांसह  (निदान प्रारंभीच्या काळात) अनेक मराठी नेते चुकीचे व अशुद्ध हिंदी वापरत असत. प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर त्यांच्यावरील लेख वाचताना त्यांनी दिल्लीत गेल्यावर जाणीवपूर्वक हिंदी शिकून घेतले व त्यांच्या हिंदीवरील प्रभुत्वामुळे ठसाही चांगला पडत असे अशा प्रकारचे निरिक्षण वाचनात आले होते. या चुकीच्या भाषाप्रयोगात आजही फारसा बदल झालेला नाही हेच आर. आर. पाटलांच्या रूपाने पुन्हा समोर आले. मागे भारताच्या क्रिकेट संघात महाराष्ट्राचे (क्रिकेटमध्ये महाराष्ट्र नि मुंबई असे दोन विभाग (कशासाठी?की मुंबई महाराष्ट्रापासून फोडण्याच्या फसलेल्या प्रयत्नाचे तसेच राहून गेलेले एक बीज ? जे पुन्हा फळेल असे वाटावे?)अस्तित्वात आहेत) खेळाडू केवळ हिंदी नि इंग्रजी नीट येत नसल्यामुळे निवडले जात नाहीत असेही वाचनात आले होते. येथेही महाराष्ट्राच्या नशिबी भाषाभोग आहेच. आर. आर. पाटलांच्या निमित्ताने मनात विचार आला, खरोखर महाराष्ट्राच्या हिंदीला काही वळण मिळणार की नाही? राष्ट्रभाषा सभा पुण्यात असूनही,दहावीपर्यंत हिंदी पूर्ण महाराष्ट्रभर अनिवार्य असूनही किंवा गांधी वगैरे अनेक नेते बराच काळपर्यंत महाराष्ट्रात राहूनही मराठी माणसाला हिंदी परकी का वाटते?