पावसाची धार का भिजवून हल्ली जात नाही?
एव्हढा दुष्काळ पडला, थेंबही नयनात नाही
शेवटी आच्छादलो होतो कधी त्या कुंतलांनी ?
शेवटी भिजलो कधी तेही मला लक्षात नाही
तापल्या मातीस वाटे, लांबला पाऊस यंदा
पावसाला काळजी, अद्याप ती सुस्नात नाही
आजही घडतात भेटी, आजही फुलतात गात्रे
भाग सवयीचाच जादा, अंतरी बरसात नही
आज अर्धोन्मीलितेचे लाजणे ते लुप्त झाले
आज भ्रमराला मधाचा स्वादही अज्ञात नाही
बोट नियमांवर धरा ठेवून पुसते पावसाला
बरसण्याआधी तुझी आली कशी दरखास्त नाही?
रीत प्रीतीची फुलांवर रासवट ह्या पावसाची
हा दवाचा पाकळ्यांना मखमली प्रणिपात नाही