प्रिय अण्णा,
भारताच्या तथाकथित स्वातंत्र्यदिनाच्या तुम्हाला, तुमच्या पाठीशी असणाऱ्या लाखो करोडो भारतियांना कोटी कोटी शुभेच्छा...........
उद्यापासून तुम्ही उपोषणाला बसणार. कितवी वेळ आहे हो ही? तुम्हाला असं नाही वाटत, हे जरा जास्तच होतंय? कशासाठी, कोणासाठी हे सर्व करताय? आपल्या ढोंगी देशवासियांसाठी? राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पुतळे बसवून, सर्व कार्यालयात तसविरी लावून त्यांच्या प्रत्येक मताला केराची टोपली दाखवणाऱ्या आणि त्यांच्या तसविरींनी नटलेल्या नोटांनाच सर्वस्व समजणाऱ्यांसाठी??????
तुमची मतं बरीचशी योग्य आहेत. भ्रष्टाचार संपायलाच हवा, असं प्रत्येकालाच वाटतं. पण तो दुसऱ्याचा. आपण मात्र वेळ आली तर भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारायचा. त्याला तात्त्विक मुलामा द्यायचा. तुमच्या पाठीशी असणाऱ्या, तुम्हाला लाखो-करोडोंच्या संख्येने एस.एम.एस., मेल्स पाठवणाऱ्या आणि सशक्त जनलोकपाल बिलाचे बाजूने मतदान करणाऱ्या लोकांची चरित्रे कोणी तपासायची. आयुष्यात एकदाही भ्रष्ट मार्गाचा अवलंब न करणारी किती माणसे तुमच्या पाठीशी आहेत? आणि आपल्या ढोंगी देशबांधवांसाठी आमरण उपोषण करुन सशक्त जनलोकपाल विधेयक संमत होवून देशासमोरचे सर्व प्रश्न सुटतील, अशी तुम्हाला खात्री आहे का? आम्ही असे कर्तुत्ववान लोक आहोत की तुमच्या सशक्त लोकपालाला (मग तो एकटा असो, दुकटा असो, की सात जणांचे मंडळ असो) असे काही गुंडाळून ठेवू की कुठून आपण लोकपाल पद स्विकारले असे त्याला/त्यांना वाटेल.
भ्रष्टाचार हा व्यवस्थेत नसतो. तुमच्या-आमच्या मनात असतो. तुमची-आमची मनं स्वच्छ केल्याशिवाय कितीही लोकपाल नेमले तरी भ्रष्टाचार नष्ट होणार नाही, असं मला वाटतं. आपल्या देशात नैतिक शिकवण देणारे हजारो संत-बाबा-महाराज-अम्मा-धर्मगुरू-मुल्ला-मौलवी-पाद्री हे सर्व मिळून आमची नीतिमत्ता उंचावू शकले नाहीत आणि तशी शक्यताही मुळीच दिसत नाही. तुमचा मार्ग चुकीचा वाटत असला तरी सुद्धा तुमचा प्रामाणिक प्रयत्न बघून मला तुम्हाला शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. तुमच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला हार्दिक शुभेच्छा!!!!
अतुल सोनक