आखाती मुशाफिरी (३)

आजवरचे संस्कार मनाला फटकारीत होते. मी उद्याही असाच वागणार होतो का?
------------------------------------
 दुसऱ्या दिवशी कामाची जुपी झाली तेंव्हा कांही पठाण आपसूक कामाला लागले.कांही मात्र अजूनही घोळका करून आपसात बोलत होते. नुरुलही त्यांच्यातच होता. मी नुरुलला हांक मारली. ती काठी माझ्या हातातच होती.आज माझा आवाज जरा करडा झलेला आहे हे माझा ध्यानात आलं. पण मला त्याचा विचार करावासा वाटला नाही. केवळ काम व्यवस्थित झालेले मला पाहायचे होते.
             नुरुल समोर येऊन उभा राहिला. मी गरजलो, " हो क्या हो रहा है नुरुल ? तामिली क्यूं हो नही रही ? " नुरुल अधोवदनाने म्हणाला, 
           " पठान कलकी फसात अफसोस कर रहा है साब." मी म्हणालो,
" कोई ज़रूरी नही! फसातकी वज़ह काम मुश्तमाम (बिघडले) हो गया. उसका अफसोस करो. जाव, सबको बोलो कामकी फिकर करो. रेहमत-उल्लाही रहीम !" (जग दयाळू देवाची दया आहे).
नुरुल त्या घोळक्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच घोळका कामाच्या ठिकाणाकडे सरकू लागला होता. त्यांना समजले होते की नाही देव जाणे, पण त्यांनी माझे बोलणे बोलणे ऐकले होते. त्याचा मतलबही समजला असावा असें मला वाटले. निदान शेवटचे शब्द तरी समजले असावेत.

             टळटळीत उन्हात मी कामाची देखरेख करू लागलो. डोक्यावर फेल्ट हॅट, कमरेला ती काठी तलवारी सारखी खोचलेली. त्या अवतारांत माझा फोटो काढला गेला असता तर करमणूकीला एक विषय झाला असता. मी, केबीन मधे न जाता कामाची पाहाणीच करीत राहण्याचे ठरविलेले होते.
            यंत्राच्या साहाय्याने जमीनीत चर खोदायचा, चराच्या तळाशी सीमेंटच्या विटांची ओळ मांडायची, त्यावर केबल ओढून घ्यायची, तिच्यावर आणखी एक विटांचा थर द्यायचा आणि बुलडोझरने वर माती (वाळूच) लोटायची. लोटलेल्या मातीवरून रोलर फिरला की झाले काम. ही सारे एका क्रमाने चालायचची. खोदकाम करणारे यंत्र पुढे चालायचे, त्या मागून केबलचा रीळ असलेली गाडी, तिच्यामागून तळाशी विटा मांडणारे मजूर, मांडलेल्या विटांवर गुरुत्वाकर्षणाने पडत जाणारी केबल, त्यावर दुसरा विटांची ओळ मांडणारे मजूर, त्यानंतर माती ढकलणारा बुलडोझर आणि सरते शेवटी माती दाबणारा रोलर. या क्रमात जराही खंड पडला तरी सारे काम ठप्प व्हायचे. कामचुकार पठाण ही सांखळी खंडित करण्याचा प्रयत्न करीत आणि सारे काम ठप्प झाले की आराम, मौज करीत.
           जेवणाच्या सुटीला एक तास रहिला होता इतक्यात केबल सोडणारी/ओढणारी गाडी बंद झाली. चालवणारा इसम मोठ्या मोठ्याने ओरडा करत खाली उतरला. मातीत गडाबडा लोळू लागला. मी त्याच्या पर्यंत पोहोचेपर्यंत गदारोळ झालेला. जो तो पुश्तु भाषेत आरडत होता. गडाबडा लोळणारा मजूर पोटदुखीने विव्हळत होता असे समजले. मी त्याला माझ्या केबीनमधें नेण्याचा हुकूम सोडला. इतक्यात नुरूल माझ्या कानाजवळ " जूठा तमाशा करता है हरामी" असें कांहीसे पुटपुटला. मी साईटवरच्या ट्रक ड्रावव्हरकडे माझा गाडीची चावी फेंकत त्या पोटदुख्या पठाणाला इस्पितळांत घेऊन जायला सांगितेल. आणि ’ चला कामाला लागा परत ’ अशा अर्थाने जोरात ओरडू लागलो. अचानक चेहरा पार उन्हाने करपलेला, आडदांड असा पठाण माझ्यासमोर उभा ठाकला. हातवारे करत तावा तावाने कांहीतरी सांगू लागला. मी चमकून नुरुलकडे पाहिले. नुरुल पुढे येऊन सांगू लागला, त्या पोट दुखी झालेल्या मोईनचा हा भाऊ आहे आणि त्याला इस्पितळात पाठवल्यामुळे तो संतापला आहे.  इस्पितळात गेलेल्या माणसाचे नांव मोईन आहे इतके समजले, पण याला कां राग आला ते नाही समजले. पण माझ्या दृष्टीने योग्य वाटले ते मी केले यात मला तरी शंका नव्हती.  मला तो वाद नकोच होता. मला काम पूर्ववत चालू कसे होईल याची काळजी होती. पण या गोंधळात जेवणाची सुटी झाली आणि सारा जथ्था ’ हैया हो ’ अशा गर्जना देत ट्रक मधे बसून जेवणासाठी लेबरकँपवर गेला. माझी त्यांनी टर उडवली हे नक्कीच. मोईनची पोटदुखी खोटी होती, काम टाळण्याचा बहाणा होता हे समजलं होतं. मी खजील झलो होतो. मुख्यालयाला हा सारा प्रकार कळवावा आणि काम पुन्हा सुरू होई पर्यंत विसावा घ्यावा म्हणून केबीनकडे वळलो आणि या राक्षसांची कशी जिरवता येईल याचा विचार करू लागलो.

           केबिनमध्ये पोहोचतो न पोहोचतो तोंचा रेडिओ फोन घणघणला. फोन रब्बानीचाच होता. कामाची प्रगती विचारत होता. त्याचे बरोबर होते, खरा प्राधिकारी तोच होता. माझी नेमणूक तशी तात्पुरतीच होती. मी काम व्यवस्थित चालले आहे असे सांगितले. कारण त्याच्या विचारण्यात कांही खोच असावी असें वाटून गेले. त्याला लेबरकॅंपवरून  कांही खबर लागली असण्याची शक्यता होती. पण त्याचे बोलणे इतर विषयाकडे वळले तसा मी सुस्कारा सोडला. त्या राक्षसांची कशी जिरवता येईल याचा विचार आता मागे पडला. कांहीही करून काम सुरळीत चालणे महत्वाचे होते.
 तीन वाजतां कामगारांची गाडी येऊन दाखल झाली तसा मी त्यांना सामोरा गेलो. ते आपापसात बोलत उभेच होते. मी काम सुरू करण्याचा इशारा दिला त्यासरशी तो मोईनचा भाऊ माझ्या पुढ्यात येऊन गरजला,
              " क्या काम करेगा ? मकिना क्या तेरा बाप चलाएगा ?"
               (म्हणजे यालाही उर्दू येत होते) त्यासरशी नुरूल त्याच्यावर धांवला. बाकी पठाणांमधे हंशा पिकला होता. मी नुरूलला हातानेच शांत रहाण्याचा इशारा केला. शांतपणे त्या पठाणाच्या पुढ्यात जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो,
             " मकिना तेरा बाप चलाएगा! बर्रा (चालता हो)! जाव अपना काम शुरू करो" असें म्हणुन मी त्या यंत्राच्या दिशेने सरकलो. आता मी कुणाकडे पाहातही नव्हतो. सरळ त्या यंत्रावर चढलो, चालकाच्या जागेवर बसलो आणि यंत्र चालू केले. मगच वर पाहिले. भयचकित झालेले पठाण लगबगीने कामाला लागत होते. तो पर्यंत मी त्या यंत्राच्या आवश्यक त्या कळा दाबून ते मला नीट चालावता येते की नाही याची खातरजमा करून घेतली. त्या सायंकाळी अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्याने तोपर्यंत बिनबोभाट काम झालेले पाहिले.
                काम संपवून लेबरकँपवर जाण्यासाठी गाडीवर चढण्यापूर्वी तो उग्र पठाण पुन्हा माझ्यासमोर ठाकला आणि म्हणाला,
          "याद रक्खो, तुम पठानका बच्चाका चालीन किया. कल देखेगा. तुम क्या साबूत रहेगा और क्या काम करेगा. खुदा हाफीज़ !"
पण मी इतका थकलो होतो की तो नक्की काय म्हणाला त्याचे आकलन होण्या पलिकडे गेलो होतो.
                         
 ते मला उद्या कळणार होते. ' चालीन ' म्हणजे काय तेंही समजणार होते.

क्रमश: