ह्यासोबत
- आखाती मुशाफिरी (१)
- आखाती मुशाफिरी (२)
- आखाती मुशाफिरी (३)
- आखाती मुशाफिरी (४)
- आखाती मुशाफिरी (५)
- आखाती मुशाफिरी (६)
- आखाती मुशाफिरी (७)
- आखाती मुशाफिरी (८)
- आखाती मुशाफिरी (९)
- आखाती मुशाफिरी (१०)
- आखाती मुशाफिरी (११)
- आखाती मुशाफिरी ( मध्यंतर )
- आखाती मुशाफिरी (१२)
- आखाती मुशाफिरी (१३)
- आखाती मुशाफिरी (१४)
- आखाती मुशाफिरी (१५)
- आखाती मुशाफिरी (१६)
- आखाती मुशाफिरी (१७)
- आखाती मुशाफिरी (१८)
- आखाती मुशाफिरी (१९)
- आखाती मुशाफिरी (२०)
- आखाती मुशाफिरी (२१)
- आखाती मुशाफिरी (२२)
- आखाती मुशाफिरी (२३)
- आखाती मुशाफिरी (२४)
- आखाती मुशाफिरी (२५)
- आखाती मुशाफिरी ( २६ )
- आखाती मुशाफिरी ( २७ )
- आखाती मुशाफिरी ( २८ )
- आखाती मुशाफिरी ( २९ )
- आखाती मुशाफिरी ( ३० )
मी बॅटीला भांडाराकडे पिटाळले आणि मुख्यालयाला फोन करून कामाची आणि लागणार्या साहित्त्याची कल्पना दिली.
-------------------------------------------------------------------------------------------------
बॅटी गेल्यानंतर मी जुन्या डक्ट्स काढण्याच्या कामाचा आढावा घेतला. काम पूर्णपणे आटोक्यात होते. उरलेल्या डक्ट्स काढण्याचे काम आज साय़ंकाळपर्यंत पूर्ण होतील आणि नवीन डक्ट्सचा संच लावण्याचे काम उद्या सकाळी सुरू करता येईल असा मी विचार करीत होतो. या कामाच्या पूर्वनियोजने प्रमाणे कंपनीच्या कारखान्यात नवीन डक्ट्स तयार झालेल्या आहेत असा निरोपही आलेला होता. माझ्या कामाच्या अंदाजाबाबत सुर्वेचे काय म्हणणे आहे ते जाणून घेण्यासाठी मी त्याला बोलावले,
" काय सुर्वे, कसं काय चाललंय काम? कधी संपतंय हे डक्ट्स काढण्याचं काम?"
" साहेब, काम तसं बरं चाललं आहे. काम संपायला अजून तीन चार दिवस लागतील."
" तीऽन चाऽर दिवस? सुर्वे हे काम आज संपायला हवं. नवीन डक्ट्स तयार झाल्या. त्या उद्या किंवा परवा येऊन पडतील. ए-एच-यू (संयंत्र) पण आला आहे. कसं काय करायचं?"
" साहेब, काय करणार? म्हणायला आपली चार माणसं आहेत पण मी आणि गजाभाऊ (सावंत) दोघेच काम खेचतो आहे. वामन (महाडिक) जरा बरा, निदान सांगेल तेवढा करतो तरी, पण कांबळी (महादू) काय कामाचा नाही साहेब. काय सांगायला जावे तर काय ते उरफाटेंच करून ठेवतो. एक तर जाग्यावर कधी थांबत नाही. कधी तंबाखू खायालाच जाईल तर कधी पाणी पियाला. आन् गेला की तिकडेच टाइम पास करीत राहातो."
" अरे, पण हें तुम्ही मला कधी बोलला नाहीत"
" काय बोलाचा साहेब. आपलेच दात आणि आपलेच ओठ. माझा गांववाला लागतो तो. सांभालून घ्यावा लागतो."
" सांभाळून घ्यावा लागतो म्हणजे काय? कामाची खोटी नाही होत? "
" कामाची खोटी होऊन देणार नाही साहेब. आज तुम्हाला सांगितलां. कां? तर तुम्ही जरा त्याला बोला. माझा काय नाय. मी खेचून घेईन काम. पण तो नवीन साहेब (बॅटी) आला आहे. फार डेंजर माणूस आहे साहेब. सगला काम येतो त्याला. त्याने याचा कोठे रिपोर्ट केला तर नांव तुमचे खराब होईल. साहेब."
" सुर्वे, आलं लक्षांत. मी असं करतो, महादूला माझ्याकडे घेतो. नाही तरी मशीन आलेलं आहेच. आता माझं काम चालू होईलच. त्यात त्याला घेतो. पण तुम्हाला चालेल ना?"
" चालेल साहेब. पण जरा दमानं घ्या साहेब. मीच त्याला इकडे आणला आहे. येत नव्हता. पण म्हटले लायनीला लागेल हा. लागला तर बरंच आहे. हाताखाली घ्याच तुमच्या. काय शिकेल तरी. उपकार होतील साहेब तुमचे. "
" सुर्वे, कमाल आहे तुमची. महादूची तुम्ही तक्रारही करताय आणि तरफदारीही. नवल आहे."
" काय करणार साहेब. साला लागतो माझा !" सुर्वे खाली मान घालून पुटपुटला.
तो काय म्हणाला हे क्षणभर माझ्या ध्यानांत आलेच नाही आणि ध्यानांत आले तेंव्हा मी उडालोच. साला म्हणजे बायकोचा भाऊ! कांही न बोलता सुर्वेला कोपरापासून नमस्कार करावा असं वाटलं, पण पदाच्या जाणिवेने मी तसं करू शकलो नाही. मात्र विषय बदलण्याच्या उद्देशाने मी विचारले,
" सुर्वे,तें जाऊ द्या. तें बघू नंतर. पण हे काम संपायला आणखी तीन चार दिवस लागतील म्हणालात. तें कसं काय? महादूमुळे तर नक्कीच नाही. काय कारण आहे?"
" साहेब, आता एंड पीसेस् (शेवटचे भाग) राहिले आहेत. एक तर साईझला मोठे आहेत आणि एंट्री, त्यामुळे स्लिपा गंजलेल्या आहेत. लवकर निघत नाहीत. वेळ लागतो. एकेक स्लिप अर्धा अर्धा तास खाते."
सुर्वेने सांगितलेली अडचण बरोबर होती. एंट्री म्हणजे मुख्य वातवाहिकेचा (मेन-डक्ट्चा) सुरुवातीचा भाग. या भागावरील तापमान-विरोधक-आवरणाला (thermal insulaation) एकतर तडे जातात किंवा ते नीट झालेले नसते त्यामुळे थंड झालेली हवा संयत्रातून बाहेर पडून या भागातून पुढे जाते त्यावेळी वातावरणातील आर्द्रतेचे धातूच्या डक्ट्च्या बाहेरील पृष्ठ्भागावर सांद्रिभवनामुळे (condensation) पाण्याच्या थरात रुपांतर होते आणि डक्ट बाहेरील बाजूने गंजते. सहाजिकच डक्ट्सचे जोड (slip joints) गंजतात.
एवढ्यात बॅटी तिथे येऊन दाखल झाला. मला शुभप्रभात म्हणत आणि हस्तांदोलन करीत त्याने संयंत्र हलविण्यासाठी लागणार्या सामग्रीची जुळवाजुळव झालेली आहे आणि फॉर्कलिफ्ट तासाभरांत हजर होईल अशी खबर दिली. सुर्वेने सांगितलेली अडचण मी बॅटीला सांगितली. बॅटीने डोळे अगदी बारीक करीत मिस्किल चेहर्याने एकदा माझ्याकडे पाहिले आणि एकदा सुर्वेकडे पाहिले. तो तसाच कांही काळ आळीपाळीने आम्हा दोघांकडे पहात राहिला. आणि मग एकदम ओरडला,
" सोपं आहे. कापून टाका."
माझ्या आणि सुर्वेच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. गंजलेले जोड काढायचे तरी कशाला? सरळ कापून काढायचे. अर्थात् त्यासाठी कापण्याची साधने उपलब्ध करून द्यावी लागणार होती. पण त्या कामाची आता मी काळजी करणार नव्हतो. तें मी बॅटीवरच सोपवणार होतो. बॅटीनेही तें आनंदाने मान्य केले.
फॉर्कलिफ्ट येईपर्यंत बॅटीने व्यवस्था केलेल्या वस्तू पाहाव्यात आणि संयंत्र हलविण्याची रूपरेषा जुळवावी या हेतूने मी बॅटीची परवानगी घेउन बाहेर निघालो.
" तूं संयंत्र कसें हलवणार आहेस तें मलाही बघायचे आहे, बरं कां!. मिरवणूक निघाली की मला बोलवायला विसरू नकोस माझ्या प्रिय मित्रा. " बॅटी मागून ओरडला.
" हो, हो, नक्कीच. नक्की बोलावीन मी तुला." मी देखील ओरडूनच प्रत्युत्तर दिले.
५८
बॅटीने उपलब्ध केलेले सामान मी तपासू लागलो. बाहेर ऊन चांगलेच तपलेले होते पन आज मला उन्हातच काम करायचे आहे याची कल्पना होती म्हणून घरून येतांनाच मी माझी उन्हांत घालायची टोपी आणलेली होती. माझ्या पाठोपाठ हातांत दोन शीतपेयाचे डबे (can) घेउन इदीही मला सामील झाला. इदीचे हें एक बरें होतें. कांहींना कांहीं पाहुणचार त्याचा सतत चालूच असायचा. मी साहित्त्याची पाहाणी करीत होतो त्यावेळी माझी एक चूक माझ्या लक्षात आली. मी वस्तू आणि अवजारे मागवली होती पण काम करण्यासाठी अतिरिक्त माणसें? त्याचा मी विचार केलेलाच नव्हता. मी सुर्वे आणि कंपनीच विचरांत घेतलेली होती. पण त्या माणसांना या कामाचा अनुभव असण्याची शक्यता कमीच होती. इतक्यात मुदीर तेथे येऊन पोहोचला. मी मुदीरची क्षमा मागून माझी अडचण सांगितली. मुदीरच्या चेहर्यावर नेहमीचे मिश्किल हसूं विलसले.
" मला याची कल्पना होतीच. तुझे कांहीं मित्र तुला या कामात मदत करण्यासाठीं येणार आहेत. काळजी करू नकोस"
असें म्हणुन मुदीर नवे संयंत्र न्याहाळण्य़ासाठी निघाला आणि इदी मुदीरसाठी शीतपेयाचा डबा आणण्यासाठीं पळाला. एवढ्यात दोन फॉर्कलिफ्ट येतांना दिसले. ते जवळ येतांच त्यावरील माणसे पाहून मी हर्षातिरेकाने ओरडलोच,
" वाह् झक्कास! काय आश्चर्य आहे!’
एका फॉर्कलिफ्टवर नुरूलखान होता आणि दुस्रर्यावर कादरखान. कादरखानने फॉर्कलिफ्ट थांबवून बंद करत खाली उडी घेतली आणि माझ्याशी हस्तांदोलन करीत ओरडला,
" मरहब्बा या हबीबी! कैफ हालूक?" ( किती आनंद आहे मित्रा. कसा आहेस तू?)
कादरखान जरी एक कामगार असला तरी आज इथे तो जणूं माझा मित्र बनून आला होता. त्यामुळे त्याने दाखवलेली जवळीक मला खटकली नाही. त्याच्या बरोबर आलेल्या आणखी दोन पठाणंची त्याने ओळख करून दिली. त्यातला एक मुदस्सरखान होता आणि दुसरा इम्तियाजखान. मी कादरखानला माझी योजना समजावून सांगत होतो तेवढ्यात मुदीर आमच्या रोखाने येत असलेला दिसला. सगळे पठाण आदबीने दोन पावले मागे सरकले आणि त्यांनी मुदीरला अभिवादन दिले. मुदीरने हात उंचावुन त्याचा स्वीकार केला आणि गाडीत बसून निघून गेला. मी कादरखानला नवीन संयंत्र दाखवले तर तो गमतीने म्हणाला,
" वय् ये तो बच्चा है । इसको तो पठान जेबमें लेके घूम सकता."
मला हसूं आले. तें पठाणाच्या विनोदालाही होते आणि समाधानाचेही होते.
आमच्या कार्यवाहीला सुरुवात झाली. ती पाहाण्यासाठी मी बॅटीला बोलावून घेतले. एक फॉर्कलिफ्ट कारागृहाच्या दरवाजातून आंत येऊन धांबली आणि दुसर्या फॉर्कलिफ्टने संयत्र मालमोटारीतून उतरवून दरवाज्यालगत आणून ठेवले आणि ते मागे सरकून उभे राहिले. संयंत्र सरळ जमीनीवर न उतरवता दोन मोठ्या आणि लांब पाईपावर उतरवून घेतले गेले होते. आंत आलेली फॉर्कलिफ्ट आणि ज्यांत संयंत्र बंदिस्त केले गेले होते त्या खोक्याला मिळून पोलादी दोर (slings) बंधल्या गेले. दोर बांधून होताच नुरुलखानने फॉर्कलिफ्ट चालू करून ते खोके आंत ओढून घेतले. खोके पुरेसे आंत आल्यानंतर बांधलेले दोर सोडवून घेतले आणि फॉर्कलिफ्ट बाजूला नेऊन उभी केली गेली. त्यानंतर ते खोके पाईपावरून पहारींचा उपयोग तरफेसारखा करीत, कटवत कटवत संयंत्रासाठी बांधलेल्या जोत्यापर्यंत नेले गेले. आता सुमारे गुडघाभर उंचीच्या त्या जोत्यावर संयंत्राचे खोके चढवावयाचे होते. जोत्यापासून खोक्यालगत जमीनीवर दोन तगडे पाइप तिरपे ठेवले गेले आणि त्यांना खालून आधारासाठी लाकडी ठोकळे लावले. जोत्याच्या पलिकडल्या बाजूला जमीनीत एक पहार खोचून तिला एक दोर-कप्पी (rope hoist) बांधली आणि तिचा दोर संयंत्राच्या खोक्याला बांधून कप्पीच्या सहाय्याने खोके हळूहळू जोत्यावर ओढून घेतले गेले. या सगळ्या कार्यक्रमाला सुमारे तीन तास लागले. संयंत्र सुखरुप जोत्यावर स्थानापन्न झाले. फॉर्कलिफ्ट, साहित्त्य आणि पठाण परत गेले.
ही सगळी मोहीम पाहून बॅटी विस्मय-चकित झाला. त्याने अवजड वस्तू हलविण्याचा हा असा प्रकार प्रथमच पाहिला होता. पण ही पद्धत कांही नवीन नव्हती. क्रेन नांवाचे यंत्र जन्माला येण्यापूर्वी इजिप्तमधील पिरॅमिडचे अवजड दगड आशाच प्रकारें हलवले गेले होते हा इतिहास मी वाचला होता. तीच युक्ति वापरुन मी या आधीही अशी हलवाहलव केली होती आणि आजही तीच युक्ति कामाला आली.
आता उद्यापासून संयंत्र कार्यान्वित करण्याचे (commissioning) आणि नवीन डक्ट्सचे उभारणीचे काम सुरु होणार होते. संयंत्र कार्यान्वित करण्याच्या कामी मला एक नवीन मदतनीस मिळणार होता.
क्रमश: