शुद्धलेखन नियमाची दहशत (शुभानन गांगल यांची लेखमाला) लेख क्रमांक १

शुद्धलेखन नियमाची दहशत

मराठी भाषक मराठी बोलतो ते कशासाठी? १) त्याला मराठी बोलून विचार व भावना व्यक्त करता येतात म्हणून! २) मराठीत मौखिक-नियम नाहीत म्हणून! ३) तो जे बोलतो ते चुकीचे आहे असे सांगून कोणताही नियम त्याचे बोलणे अडवत नाही म्हणून!

समजा मराठीत 'शुद्धलेखन-नियमावली'सारखी 'शुद्धमौखिक-नियमावली' आहे. ते पाळण्याचे बंधन लादलेले आहे. ते नियम भाषकाला पाळता येत नाहीत. तर काय होईल? १) भाषा भाषकाची नसून नियम बनवणार्यांची ठरेल! २) भाषकाच्या संवादातील वैयक्तिक प्रामाणिकपणा, सहजता व नैसर्गिक सौंदर्य लोप पावेल! ३) 'प्रमाणीत व प्रतिष्ठीत' भाषा बनवण्याच्या नादात, 'भाषक व भाषा' यात दरी निर्माण होईल! ४) भाषकाला मराठी भाषेबाबत आत्मियता वाटणार नाही! ५) दूसर्या भाषेचा आधार घेण्याची वृत्ती बळावेल!

जर..... 'अशा मौखिक-नियमांबाबत, १) व्याकरणकारांनी विद्वत्ताप्रचूरतेने त्याच्या योग्यतेची खात्री दिली! २) 'मराठी भाषेच्या विकासासाठी त्याची गरज आहे', असे सरकारने सांगितले! ३) शाळाशाळातून घेतलेल्या तोंडी परिक्षेत मुले 'मौखिक-नियमांमुळे' नापास होऊ लागली! ४) स्वतःचीच भाषा बोलताना भाषकाला नियम सहजतेने पाळता येत नाहीत, म्हणून 'बोललेली मराठी' अशुद्ध ठरू लागली!..... तर 'मराठी-भाषक, १) मराठीचाच त्याग करतील! २) मौखिक-नियमांना उधळवून लावतील! ३) असे नियम बनवणार्यांना 'वाळीत टाकतील'!,.... असे आपल्याला वाटते का?

अगदी असेच 'शुद्धलेखन-नियमावली'मुळे घडत आहे का? आपल्याला काय वाटते? आमंत्रण-पत्रिका, लेख, निबंध, दुकानावरील पाट्या, ट्रक मागील वाक्ये, टीव्ही सिरीयल मधील नामावली, वर्तमानपत्रातील बातम्या,.... किती किती गोष्टी (! ), 'शुद्धलेखन-नियमावलीची' 'कला' अवगत असणार्यांकडून, तपासून घ्याव्या लागतात का? 'लिहिले की तपासून घ्यायचे'.... 'लिहिले की तपासून घ्यायचे'.... 'लिहिले की तपासून घ्यायचे', यात तुमची भाषा कोणती? तुम्ही लिहिलेली की तपासून घेतलेली? 'सूखी माणसाचा सदरा' या म्हणीपेक्षा 'शुद्धलेखन पाळता येणारी व्यक्ती' हल्ली जास्त विरळा ठरते! अहो अगदी एका 'तज्ञा'कडून तपासून घेतलेली वाक्ये दूसर्या 'तज्ञा'ला चुकीची वाटतात! गंमत सांगू का, 'शुद्धलेखन' या विषयासाठी दोन दिवस भरलेल्या एका चर्चासत्रातील लिखीत फलकातच (याला आपण सामान्यपणे बॅनर म्हणतो! ) चुक होती आणि दोन दिवसात टिपलेल्या प्रत्येक छायाचित्रात ती चुक टिपली गेली!

'आमची भाषा मराठी. आम्ही मराठीतून विचार करतो. मराठीतून सर्व भावना बोलून दाखवतो. मराठी अक्षराचा उच्चार व मराठी अक्षराचे लिखीत रूप, यात विलक्षण साम्य असल्याचे अनुभवतो. आमच्या मनातील विचार व भावना आम्ही कागदावर उतरवतो. म्हणजे आमच्या दृष्टीने त्यात चुक नसते. त्यात चुक आहे असे वाटते ते 'शुद्धलेखन-नियमावली'ला! आम्हाला नाही! '.... हे आजच्या सामान्य मराठी माणसाचे मनोगत आहे असे म्हणता येईल का? जर बहुतेक मराठी व्यक्तींबाबत असे घडत असेल तर ती 'चुक' न ठरता तोच भाषेचा 'नियम' ठरतो. असे आपल्याला वाटते का?

मराठी व संस्कृत या दोन भिन्न भाषा आहेत. मराठी व संस्कृत भाषा देवनागरी लिपी वापरतात. लिपी हा भाषेच्या उच्चारांचा कागदावरील अविष्कार ठरतो. मराठी भाषा मौखिक आहे. मराठी लिपीच्या चित्रचिन्हांना उच्चारांची अचूक सूचकता निर्माण करता आली पाहीजे. 'मराठी व संस्कृत भाषांनी वापरलेली लिपी भिन्न आहे', असे मला या लेखातून ठामपणे सांगायचे आहे. त्याची काही उदाहरणं सांगता येतील.

मराठीत 'ळ' आहे. 'ळ' चा वापर सर्व मराठी भाषक करतात. आजच्या संस्कृतमध्ये 'ळ' नाही. 'ळ' हे चिन्ह देवनागरी आहे का? असेल तर त्याचा स्विकार आजच्या संस्कृतने केलेला नाही हे कळून येते. संस्कृतमध्ये 'ऋ' हा स्वर आहे. मराठीत 'ऋ' स्वर नाही. मराठीत 'ऋषी', 'ऋग्वेद' असे शब्द आहेत. संस्कृत मध्येही 'ऋर्षी', 'ऋग्वेद' असे शब्द आहेत. यातील 'ऋ' या चिन्हाचा केलेला मराठीतील व संस्कृतमधील उच्चार भिन्न आहे. 'ऋ' चा मराठी उच्चार 'रु' वा 'रू' केला जातो. इतकेच काय अगदी स्टाईल म्हणून 'र्हू' वा 'र्हू' असाही केलेला आढळतो. पण तो संस्कृतसारखा 'ऋ' या स्वरासारखा केला जात नाही. म्हणजेच मराठीने 'ऋ' हे चिन्ह 'ज्ञ', 'क्ष', 'द्य',... वगैरेंप्रमाणे जोडाक्षरासारखे विशेष चिन्ह म्हणून स्वीकारलेले दिसतं.

संस्कृतने 'च' चिन्ह स्वीकारले. संस्कृतच्या 'वाचा', 'चाणक्य' अशा शब्दांचा उच्चार 'चमचा' मधील 'च' सारखा होत नाही. तो उच्चार मराठीत अंदाजे 'च्य' मध्ये होतो तसा काहीसा होतो. मराठीने सुद्धा 'च' चिन्ह स्वीकारले आहे. पण त्याचा उच्चार 'चमचा' शब्दातील 'चा सारखा होतो.

मला परदेशातील 'मराठी-मंडळा'चा फोन आला होता.... 'आम्ही नाटक बसवत आहोत. यात भाग घेणारे मराठी बोलतात. त्यांना मराठी लिहिण्या-वाचण्याचा सराव नाही. सर्व मराठी शब्द त्यांना माहीत नाहीत. प्रत्येकाला स्क्रिप्ट लिहून दिले आहे. स्क्रिप्टमधल्या 'चमचा' मधील 'च' उच्चार कोणता व 'चहा' मधील 'च्य' उच्चार कोणता ते त्यांना न कळल्याने गंमतशीर गोंधळ उडत आहे. तसेच 'जहाज' मधील 'ज' व 'जास्त' मधील 'ज्य' उच्चार कोणता हे कळत नाही. उपाय सांगा. '.... त्यांना त्यांच्या स्क्रिप्टमध्ये 'चहा' सारखे शब्द 'च्यहा' व 'जास्त' सारखे शब्द 'ज्यास्त' लिहा म्हटल्यावर उच्चार बरोबर आले. नाटक व्यवस्थित पार पडले. यालाच खरे मराठी म्हणावे का? त्यातून उच्चारासारखे लिखाण साधता येते असे म्हणता येईल का?

'चहा जास्त चांगला जमला नाही' हे वाक्य जर मराठी लिहिण्या-वाचण्याचा सराव नसलेल्या माणसाला वाचायला लावले तर तो 'च्यहा ज्यास्त चांगला जमला नाही' या ऐवजी 'चहा जास्त च्यांगला ज्यमला नाही', असे म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'आपण सवयीने प्रत्येक शब्दातल्या चिन्हाचा उच्चार मनात साठवत असतो', असे यातून कळून येते. कोणत्या शब्दातील कोणत्या 'च' चा उच्चार 'च्य' वा 'च' आहे हे मनात साठवणे याला लिपी म्हणता येईल की 'च्य' वा 'च' मधून अचूक उच्चार सुचवणे याला लिपी म्हणता येईल? शेवटी लिपी म्हणजे उच्चार सुचवणारे चिन्हच असते ना? 'लिहिल्यासारखा आपण उच्चार करत नाही', याचे महत्त्वाचे कारण 'संस्कृतची देवनागरी' व 'मराठीची देवनागरी' यात आपण आजपर्यंत फरक मानला नाही', हे ठरते.

'मराठीतील उच्चार व त्यांना दिलेली देवनागरीतील चिन्हे' आणि 'संस्कृतमधील उच्चार व त्यांना दिलेली देवनागरीतील चिन्हे' यात भिन्नता आहे. गर ती तशी आहे तर 'संस्कृत-देवनागरी' आणि 'मराठी-देवनागरी' अशा दोन भिन्न लिपी ठरतात. मराठीने आता तरी हे स्वीकारले पाहिजे आणि 'मराठमोळी-देवनागरी' स्वीकारली पाहिजे.

प्रत्येक भाषेने स्वतःचा वेगळा विचार केला पाहिजे. भाषांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद नसतो. संस्कृत जर मराठीपेक्षा श्रेष्ठ असती तर आज ती केवळ 'देवघरातील भाषा' राहिली नसती आणि मराठी जर कनिष्ठ असती तर आज जगात सर्वात जास्त बोलल्या जाणार्या भाषांमध्ये सोळावी भाषा ठरली नसती.

घरातील संवादात, कुटुंबातील सर्व सभासद जी भाषा सर्वाधिक बोलतात त्याला मातृभाषा म्हणतात. 'मातृभाषा संस्कृत असलेले कुटुंब', याची बातमी बनेल! संस्कृत बोलण्यातून त्यांच्या आर्थिक गरजा भागतील?

'सर्व व प्रत्येक उच्चारांत' आणि त्यांच्या लिखीत चिन्हांत समानता असेल तरच दोन्ही भाषा समान लिपी वापरतात असे म्हणता येते. जर त्यांच्या उच्चारात व त्या उच्चारांच्या लिखीत चिन्हात फरक असेल तर त्या दोन भिन्न लिपींना वेगवेगळी नावे देणे गरजेचे ठरते. त्या त्या भाषकाला आपली भाषा कशी आहे हे निश्चितपणे समजण्यासाठी असे करणे गरजेचे आहे.

मराठी देवनागरी लिपीला 'मराठमोळी' म्हणायला तुम्हाला आवडेल का? /मराठमोळी' शब्दात 'ळ' येतो! व्याकरणासाठी भाषा नसून भाषेसाठी व्याकरण असते, हे खरे आहे का? मराठीने व्याकरणात असा बदल केला तर कोणाचे काय नुकसान होईल? यातून मराठीचा स्वाभिमान जपला जाईल का? प्रत्येक मराठी भाषकाला याबाबत स्वतःचे मत नोंदवण्याचा अधिकार आहे. आपला विचार जरूर कळवा.

आपला, शुभानन गांगल