माझा मांसाहार

"काय वैभ्या, साल्या दर रविवारी बोकड कापतोस, एखाद्या दिवशी हाक मारा की आम्हाला पण.. आनंदानं येऊ आम्ही.. "

"काय सांगतो काय तू? अरे तू ब्राम्हण ना? तरी खातोस का तू? जान्हवं कुठेय? "

"का रे भावा? असा काही नियम आहे की काय की ब्राम्हणांनी खाऊ नये? आणि जान्हव टाकलंय खुंटीला कधीच! "

अरे मग येत जा बिनधास्त! दर रविवारी असतं आमच्या इथे!  

आता वैभ्या तू इतका आग्रह करतोयस तर मी नाही कसा म्हणणार!.. भेटूच येत्या रविवारी!  

त्या रविवार पासून जो सपाटा लागला, तो काही थांबायचं नाव घेईना! जवळपास दर रविवारी मांसाहार ग्रहण करायचा हा नित्यक्रम झाला.  

कधी ऑफिस मधले मित्र मिळून बाहेर खास फक्त मटण/ चिकन खायला   जाणे, किंवा कधी इतर मित्रांबरोबर बाहेर जेवायला गेलोच तर आवर्जून मांसाहारी हॉटेल मध्ये जाणे असे प्रताप चालू झाले.  

"साल्या बामनांनो, मटण महाग करून ठेवलाय तुम्ही" असा बऱ्याचदा ऐकायला मिळायला लागलं.

"तुम्हाला नसेल परवडत तर नका खाऊ हो, आम्हाला परवडतं, आम्ही खाणार.. " सडेतोड उत्तर देऊन समोरच्याला गप्प नाही केला तर आमच्या जीवाला शांती कशी लाभेल.

अनेक जणांनी सांगितलं, अरे नको खात जाऊ. पण ऐकतोय कोण? आमच्या जिभेची हाव सुटेल तर ना!

एखादी व्यक्ती खाऊ नको सांगतीये म्हणून "न खाणे" हे कुठे पटतंय?

गुरुवार सोडून इतर कोणताही दिवस मांसाहार ग्रहण करण्यास योग्य. कारण गुरुवार हा स्वामींना जायचा वार. स्वामींना नमस्कार करून हव्या असलेल्या असंख्य गोष्टी त्यांना मागताना आपण "इतके" तरी पथ्य पाळूयात ही त्यामागची "भावना".

मंगळवार ते शुक्रवार "मी मराठी" वर अनुक्रमे गजानन महाराज आणि स्वामी समर्थ यांच्या जीवनावरील दोन मालिका लागतात, अनुक्रमे "ब्रम्हांडनायक" आणि "कृपासिंधू".

आता हा धार्मिक विषय आईच्या अतिशय जिव्हाळ्याचा. त्यामुळे स्वाभाविकपणे (जबरदस्तीने) ते पाहणे आलेच.  

प्रत्येक भागातून काहीतरी बोधपर तात्पर्य देणाऱ्या त्या मालिका मला पण आवडायला लागल्या आणि मी त्या अगदी नियमित पाहणे सुरू केलं.

आता माझ्या मांसाहाराचा आणि ह्याचा काय संबंध?.. तर संबंध आहे.  

एकदा गजानन महाराजांकडे एक भक्त प्रार्थना करतो,   "महाराज, मी खरंतर स्वामीभक्त आहे. मला तुमच्यामध्ये जर स्वामींचे दर्शन झाले तर मी धन्य होईल".

त्या भक्तानं पापण्यांची उघडझाप करतो न करतो तोच समोर पहिले, आणि समोर साक्षात स्वामी उभे होते. तो धन्य झाला.  

गजानन महाराज परत मूळ रूपात आले. ते म्हणाले की भक्ती हि निर्मळ असावी. भक्ती करावी ती त्या अनाकलनीय शक्तीची. ना की कोणत्या ठराविक व्यक्तीची.

अजून एका एपिसोड मध्ये एक घमंडी सावकार गजानन महाराजांना फसवायचा प्रयत्न करतो. त्यांना घरी बोलावतो आणि मटणाचा बेत करतो. गजानन महाराज त्याला सांगतात की मी मांसाहार करत नाही. त्यामुळे मी जेवणार नाही.

आता हे इतकं पाहिल्यानंतर स्वतः:ची च लाज वाटावी. अनेकांना स्वामींना घेऊन गेलो होतो. पण त्या भक्तीचा काय उपयोग? काय कळले स्वामी आपल्याला?

झालंतर, असा आता आमच्या मांसाहारावर आळा बसला. गेले अनेक महिने तरी हे पथ्य पाळतो आहे. पुढे मागे संयम सुटणार नाही ह्याची काळजी नेहमी च घेत राहीन.