हिंदी चित्रपटातील मराठी पात्रे

कित्येक हिंदी चित्रपटांत हिरो किंवा कुठलेसे दुय्यम पात्र चक्क मराठी दाखवतात. पण ते पात्र आपल्या मराठी नावाला शोभेल अशी भाषा, हेल वगैरे काढायच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे कित्येकदा ते अत्यंत हास्यास्पद वाटते.
काही उदाहरणे तेजाबमधे अनिल कपूर काहीतरी देशमुख नावाने वावरत असतो. गुलाममधे अमीर खान आणि त्याचा बाप दलीप ताहिल दोघे मराठी! बापतर म्हणे मध्यमवर्गी शाळामास्तर. कुठल्याही प्रकारे हे लोक मराठी वाटत नाहीत. गर्दिशमधे अमरीश पुरी पुरुषोत्तम साठे असे नाव बाळगून असतो! अगदी अगदी विसंगत. मुंबईत वाढलेला मराठी नावाचा हवालदार अस्सल पंजाबी ढंगाचे हिंदी का बोलेल?
कुठल्याशा सिनेमात शक्ती कपूर इन्स्पेक्टर भेंडे की कायसासा बनला होता. "पण मी आहे इन्स्पेक्टर भेंडे" हे वाक्य शेकडो वेळा मोडक्या मराठीत बोलण्यापलीकडे मराठीपण नाही. असो. अशी अनेक उदाहरणे आहेत.


 



आता ह्या लोकांची मराठी पात्र उभे करायची शक्ती आणि वकूब लक्षात घेऊन दिग्दर्शक त्यांचे योग्य नामकरण का नाही करत? देव जाणे.
अर्थात इतका विचार करता येत असता तर बरेच लोक हिंदी चित्रपटात शिरलेच नसते म्हणा.

काही अपवाद: परेश रावल हेराफेरीमधे मराठी बनण्याचा खूप चांगला प्रयत्न करतो. बॉबी देवलच्या कुठल्यातरी पोपट पिक्चरमधे आशिष विद्यार्थी आयला मायला टाईपचे मराठी ढंगाचे हिंदी बोलतो.

अजून एक मासलेवाईक नमुना म्हणजे वागले (वागळे नाही) की दुनिया नामक एक जुनी मालिका होती त्यातला वागळे इसम शर्मा, गुप्ता किंवा मिश्रा बनायच्या लायकीचा होता. ज्या माणसाला वागळे हा शब्द उच्चारता येत नाही हा रोल का दिला देवास ठाऊक.


एक गंमत म्हणून बघा कुठल्याकुठल्या हिंदी सिनेमात असले विनोदी प्रकार दिसतात ते. याउलट कुणी तमिळ किंवा दक्षिणी दाखवला की तो हमखास मद्रासी ष्टाईलचे हिंदी बोलतो. मेहमूद आणि तत्सम लोक आठवा.