हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा

हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा


उच्च रक्तदाब हा सुप्त, प्रगतीशील आणि प्राणघातक विकार समजल्या जातो.


सुप्त या अर्थाने की त्याची लक्षणे शरीरावर दिसू लागतात तोपर्यंत तो आहे अशी शंकाही रुणाला अथवा त्याच्या नातेवाईकांना येत नाही. स्वतः काही बोलू नये असे वाटणे, इतरांनीही फार बोलू नये असे वाटणे, साध्या साध्या आवाजांची कलकल सहन न होणे, चिडचिड होणे अशी कारणे हळूहळू प्रकट होऊ लागतात. मात्र पावलांवर सूज येणे, प्रचंड थकवा, श्वसनहीनता जाणवणे ही प्रगत लक्षणे दिसू लागेपर्यंत रक्तदाब खूपच (१६०/१००) वाढलेला असू शकतो.


प्रगतीशील या अर्थाने की एकदा वाढू लागलेला रक्तदाब 'सम्यक जीवनशैली परिवर्तनाव्यतिरिक्त' इतर उपायांनी (म्हणजे रक्तदाब कमी करणाऱ्या गोळ्यांनी) क्वचितच नियंत्रणात येतो. दिसामासी वाढतच राहतो. कारण शरीरावर त्याच्या उत्सर्जक शक्तीबाहेर टाकलेला खाद्यपदार्थांचा भार. विशेषतः तेल, तूप, साखर आणि मीठ यांचा.


प्राणघातक यासाठी की असाच अनियंत्रित वाढू दिल्यास रक्तदाबाने अचानक मृत्यू संभवतो.


रक्तदाब शरीरात किती दिवसांपासून, महिन्यांपासून अथवा वर्षांपासून ठाण मांडून बसलेला आहे याचे निदान आवश्यक असते. मग करायला सांगतात रक्ततपासणी. रक्तातील मेदाची रूपरेषा (लिपीड प्रोफाईल).


रक्तात तीन प्रकारची कोलेस्टेरॉल आढळतात. चांगलीः उच्च सघन लिपो प्रथिने (गुडः हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन्स), वाईटः कमी सघन लिपो प्रथिने (बॅडः लो डेन्सिटी लिपो प्रोटीन्स) आणि ओंगळः ट्रायग्लिसेराईडस् (अग्लीः ट्रायग्लिसेराईडस्, ह्यांना ओंगळ म्हटलेले आहे कारण ती सूक्ष्मदर्शकाखाली ओंगळ, कुरूप दिसतात). चांगली कोलेस्टेरॉल बदाम, आळशी इत्यादींपासून मिळतात. इतर सर्व तेले, तूप इत्यादी अपायकारक सदरात मोडतात. साखरेपासून मानसिक तणावाच्या परिस्थितीत शरीर, ओंगळ लिपोप्रथिने तयार करते, ज्यांमुळे हृदयधमनीविकार बळावतो. ही कोलेस्टेरॉल मिलीग्रॅम टक्क्यांमध्ये मोजतात. चांगलीः ३०-६० असतात, जेवढी जास्त तेवढी चांगली. वाईटः १९० पर्यंत असतात, जेवढी कमी तेवढी चांगली. ओंगळः ६०-१६० असतात, जेवढी कमी तेवढी चांगली.


शरीरातील कोलेस्टेरॉलच्या ७५ टक्के कोलेस्टेरॉल शरीरच तयार करते. कच्चा माल म्हणजे शरीरात खाद्यपदार्थातून येणारी, व विल्हेवाट लावण्यास कठीण असलेली साखर. तेव्हा 'मला मधुमेह आहे का असे विचारू नका'. साखर त्वरीत कमी करा. हल्लीच्या आपल्या आहारात साखरेचा वापर खूपच जास्त झालेला आहे.


रक्तात गुठळ्या होण्यास पोषक वातावरण म्हणजे रक्त दाट असणे, होणे. तेव्हा विनाऔषध, रक्त पातळ ठेवणारा आहारच पत्करा. काळ्या मनुका रक्त पातळ करतात. सकाळी त्या थोड्याशा जरूर खाव्यात.