हृदयविकारः ९-पहिला दिवस

हृदयविकारः ९-


कुणा एका हृदयरुग्णाच्या हृदयधमनीरुंदीकरण शस्त्रक्रियेनंतरचा पहिला दिवस, प्रथम पुरूषी एक वचनी


ताणचाचणी सकारात्मक आली. ती हृदयधमनीतील अडथळ्यांकडे संकेत करीत असल्याचे सांगण्यात आले. हृदयधमनीआलेखन करून घेण्याचा सल्ला दिल्या गेला. ते केल्या गेले. डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत एकच अडथळा होता. ७० टक्के धमनीला व्यापून टाकणारा. तो त्याच शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. डॉक्टरांची ख्याती एवढी जबर होती की मला आणि नातेवाईकांना वेगळा विचार करण्याची आवश्यकताच वाटली नाही. त्यांचा सल्ला मानून तो अडथळा लगेच काढून टाकण्यात आला. तिथे कलंकहीन पोलादाचा १६ मिलीमीटर लांबीचा व २.२५ मिलीमीटर व्यासाचा, औषधवेष्टित विस्फारकही बसविण्यात आला. एका दिवसानंतर मला घरी सोडण्यात आले.


मग मला हे कळले की हृदयधमनी रुंदीकरण झाल्यानंतर, पुन्हा अडथळे होण्याचा धोका टाळण्याकरीता जन्मभर औषधे घ्यावी लागतात. त्यानंतर समजले की ती औषधे रु.७५०/- दरमहा याहूनही महाग असतात. आणि उर्वरित आयुष्यात माणूस लक्षावधी रुपये औषधकंपन्यांना बिनबोभाट देतो. हे औषधांच्या दावणीला बांधलेले आयुष्य आणि हृदयाघाताचा कायमच असणारा धोका यांपासून सोडवणूक करून घेणे हे माझ्या जीवनाचे प्रथम कर्तव्य झाले.


यानंतरही जवळजवळ महिनाभर माझा रक्तदाब १४०/१०० ते १३०/९० असा, म्हणजे जास्तच राहत असे. आमच्या रुग्णालयात मला असेही सांगण्यात आले की रक्तदाब जर असाच राहिला तर औषधे वाढवून द्यावी लागतील. 


दरम्यान मला अनेक प्रश्न त्रस्त करू लागले होते. मी तर संपूर्ण शाकाहारी, निर्व्यसनी, निरोगी, निरुपद्रवी, वरणभाताची गोडी असलेला, पापभिरू मध्यमवर्गीय होतो. मी कुणाचेच, कधीच, काहीही वाईट केलेले सोडाच पण चिंतिलेलेही नव्हते. मग मला हृदयविकार का झाला? कशामुळे झाला? आता हृदयधमनी शस्त्रक्रिया तर झाली, मग रक्तदाब आदर्शवत १२०/८० का होत नाही? माझा रक्तदाब कशाने कमी होईल? हृदयधमनीत बसवलेला विस्फारक (stent), गरज संपल्यावर काढून टाकता येतो का? विस्फारकाचे आयुष्य किती असते? एक आणि अनेक.


त्यानंतरचे अनेक दिवस मी अक्षरशः निकरानी उपायांचा शोध घेण्यात घालविले. यापुढील कोणतीही ताणचाचणी नकारात्मक यावी आणि उर्वरित आयुष्य औषधविरहित जगता यावे हीच दोन प्रमुख उद्दिष्टे मी ठरविली. ही खरोखरीच साध्य आहेत का, हे मला माहीत नव्हते.


लोक भेटायला येत. नाना प्रकारचे उपाय सुचवित. त्यात वरील प्रश्नांची उत्तरे मुळीच नसत. उलट ते; फिरायला जात जा (इथे उपजीविकेपाठी बांधलेले मध्यमवर्गीय जीवन वाट्याला आलेले आहे, नाही तर सकाळ-संध्याकाळ, बायकामुलांसकट, कुत्रा हाताशी धरून, बागबगीचे फिरलो असतो), व्यायाम करा (अहो, हे सारे करायला अतिरिक्त वेळ कुठून आणू?), प्राणायाम करा (निवांत श्वासोच्छवास करत बसायला, इथे वेळ कुणाला आहे?), दुधीचा रस प्या (दर दिवसाआड आम्ही दुधीचीच तर भाजी खातो की हो, मग तर मला हृदयविकार होऊच नये!), तणाव बाळगू नका (मला काय तणाव बाळगायची हौस आहे?), संतापू नका (लोक संताप आणतात!), आराम करा (आणि माझी कामे कोण तुम्ही करणार?), अशा प्रकारचे सल्ले जरूर देत.


माझ्या याआधीच्या दिनःचर्येत मला ते सारे साधण्यास मुळीच वेळ मिळत नव्हता, म्हणून तर ही परिस्थिती उद्भवली ना? मग आता मला झालेला आजार, माझी झालेली शस्त्रक्रिया, औषधयोजनेमुळे बांधल्या गेलेला माझा आहार ह्या साऱ्यांच्या उपस्थितीत मी त्यांच्या सल्ल्यांचा उपयोग कसा करू शकणार होतो, ते मला समजत नव्हते. भेटीला येणारे माझेच जवळचे सुहृद असत, नातेवाईक असत. त्याना माझ्या आरोग्याबाबत वाटणारी काळजी खरी असे. हेतू प्रामाणिक असल्याचीही माझी खात्री असे. ते सांगत असलेल्या उपायांनी, लोक बरे होत असल्याचे दाखलेही ते देत असत. माझी प्रतिक्रिया मात्र वर कंसात दिल्याप्रमाणे, त्या उपायांवर अविश्वास दाखविणारी आणि नकारात्मकच असे. ते सल्ले मला परस्परविरोधी वाटत. निरर्थक वाटत. माझ्या खऱ्या प्रश्नाची उत्तरे त्या उपायांनी कधीच मिळणार नाहीत, असा माझा समज झाला होता. मला माझ्या उद्दिष्टांकडे नेणारा उपाय दिसेना!