हृदयविकार-२५ व्यसनमुक्ती

हृदयविकार-२५ व्यसनमुक्ती


प्रस्तावनाः इथे केवळ हृदयधमनीअवरोध ह्या विकारासंदर्भात चर्चा केलेली आहे. तरीही तिचा उपयोग इतर अवनतीकारक रोगांकरितासुद्धा होऊ शकेल.
श्रेयअव्हेरः हा वैद्यकीय सल्ला नाही. तशी माझी पात्रता नाही. हे केवळ वाचनातून आलेले शहाणपण आहे.
टीपः इथे अनेक मते, आधाराविना मांडलेली दिसून येतील. ती आधार असल्यामुळेच अस्तित्वात आलेली आहेत. त्यांचेवर चर्चा होऊ शकेल. इथे चर्चेचे प्रयोजन नाही.


व्यसन म्हणजे वाईट परिणाम असणाऱ्या गोष्टींची अनिवार आसक्ती. दारू, सिगारेट, सुपारी, तंबाखू इत्यादी नशा आणणाऱ्या पदार्थांची व्यसने लागू शकतात. अशी सारीच व्यसने हृदयविकारास पोषक ठरतात. चौदाव्या प्रकरणात सांगितलेल्या सात जीवनशैलीगत परिवर्तनांचा स्वीकार केल्यावरही व्यसने असल्यास हृदयविकारापासून सुटका होत नाही. मात्र तंबाखूचे व्यसन बंद करताच पुन्हा शरीर पूर्वस्थितीत परत येऊ शकते. कायमस्वरूपी हानी हृदयविकारासंदर्भात होत नाही (पण कर्करोगासंदर्भात कायमची शारीरिक हानी होऊ शकते). म्हणून हृदयरुग्णांनी तरी व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करताच त्यांना नि:संशय लाभ होतो.

 

"हृदयविकार माघारी परतविण्याचा डॉ.डीन ऑर्निश ह्यांचा कार्यक्रम" ह्या नावाचे १९९० साली प्रसिद्ध झालेले एक पुस्तक फार छान आहे. त्यातील अकरावे प्रकरण केवळ 'धूम्रपान कसे सोडावे' ह्याचाच विचार करते. त्याच प्रकरणाच्या स्वैर मराठी अनुवादाचा सारभाग खाली देत आहे.

 

"अमेरिकेतील धूम्रपान हे असे सर्वात महत्त्वाचे मृत्यूचे कारण आहे, ज्याचा प्रतिबंध शक्य आहे." - अमेरिकन सर्जन जनरल (१९८९), द हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्मोकिंग.

 

त्याचे व्यसन लागते आणि त्यामुळे मृत्यू लवकर येतो, याव्यतिरिक्त निकोटिन हे एक आश्चर्यकारक औषध आहे. तुम्ही तणावग्रस्त असता निकोटिन तुम्हाला शांत करते आणि थकलेले असता तेव्हा जागे करते. ते स्मरणशक्ती वाढविते, भयोत्सुकता कमी करते, दु:ख सहन करण्याची शक्ती वाढविते, नैराश्य हटविते, जैवगती वाढविते (ज्यामुळे वजन घटते), भूक घटविते आणि कर्तबगारी, एकाग्रता आणि समस्यानिरसन वाढविते. त्यामुळे लोकांना धूम्रपान सोडणे फारच कठीण वाटते ह्यात आश्चर्य कसले! विड्या ओढणे वस्तुत:, क्रॅक, कोकेन अथवा हेरॉईन टोचून घेण्याइतपतच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या व्यसनासक्त करणारे आहे. काही वैज्ञानिक तर समजतात की ते त्यांच्याहूनही व्यसनासक्त करणारे आहे. सर्जन जनरलचा एक अलीकडील अहवाल म्हणतो की निकोटिन राष्ट्रीय स्तरावर खूप जास्त महाग आणि जीवितहानीकारक आहे. हिरॉईन, कोकेन अथवा अल्कोहोल यांहूनही जास्त. आणि कोकेन, हेरॉईन खरीदणे, विकणे अथवा वापरणे गुन्हा आहे, तरीही विड्या मात्र बाजारातील प्रत्येक कोपऱ्यावर उपलब्ध असतात. तुम्ही हे ऐकले असेल की क्रॅकचे केवळ काही झुरके घेतल्यानेच व्यसन लागू शकते. मात्र जे फारसे माहीत नसते ते हे की केवळ काही विड्या ओढल्यानेही तुम्हाला निकोटिनचे व्यसन लागू शकते. दोन विड्यांतक्या कमी विड्या फुंकणाऱ्या कुमारवयीनांपैकी दोन तृतियांश व्यक्ती, सवयीने धूम्रपान करणाऱ्या होऊ शकतात. पहिली विडी ओढणे पहिल्या क्रँकच्या झुरक्याप्रमाणे, किंवा पहिल्या हेरॉईनच्या टोचण्याप्रमाणेच बहुधा तुम्हाला भयोत्सुक, गोंधळलेले आणि निरस वाटायला लावू शकते; एवढेच काय पण तुम्हाला उलटीही होऊ शकते.

 

पण जेव्हा ह्या संकेतांकडे तुम्ही दुर्लक्ष करून धूम्रपान सुरूच ठेवता, तेव्हा तुम्हाला लवकरच व्यसन लागू शकते. ते तसे झाल्यास धूम्रपान थांबविल्यावर तुम्हाला वाईट वाटते. शिरेतून टोचल्यास निकोटिनला अथवा दुसऱ्या औषधांना तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचण्यास कमी वेळ लागतो! जेव्हा तुम्ही विडीचा धूर ओढता, तो तुमच्या मेंदूपर्यंत सहा सेकंदात पोहोचतो, हेरॉईन टोचून घेतल्याच्या मानाने दुप्पट जलद. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मधील एका लेखात डॉ.बिल बेनोविट्झ लिहितात,  निकोटिनमुळे येणाऱ्या परावलंबित्वाची अनेक वैशिष्ट्ये हेरॉईन, दारू व कोकेन यांच्या व्यसनाधीन असलेल्या लोकांत दिसून येतात त्याप्रमाणेच असतात. स्वत:स मन:सक्रिय औषधाच्या शेकडो मात्रा (दररोज दोन पाकिटे धूम्रपान करणारा दिवसाला चारशे झुरके ओढत असतो) दररोज देण्याचा विड्या ओढणे हा सोयिस्कर आणि सामाजिदृष्ट्या स्वीकारार्ह मार्ग आहे. डॉ.रिचर्ड पॉलीन, डायरेक्टर, नॅशनल इंस्टिट्यूट ऑन ड्रग ऍब्युज, म्हणतात विड्या ओढणे हे आजकाल जगातील सर्वात गंभीर आणि सर्वात जास्त प्रसारित व्यसन आहे.  हेरॉईनहूनही वाईट. ते विड्या ओढण्याला, अमेरिकेतील वाढत्या मृत्यूंचे सर्वात आघाडीचे प्रतिबंधक्षम कारण म्हणतात.

 

नाही म्हणणे कठीण असते

 

निकोटिन हे एवढे व्यसनासक्त करणारे द्रव्य आहे की, धूम्रपान थांबविणे फार कठीण असते. जगभरातील देशांतून शेकडो वर्षांपासून तंबाखू वापरात आहे. आणि यांपैकी प्रत्येक देशातील लोकंना निकोटिनचे व्यसन लागलेले आहे.

जेव्हा धूम्रपान करणारे, ते सोडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते पुन्हा सुरू होण्याचे प्रमाण फार असते, सरासरी तीन महिन्यात सत्तर टक्के. हे प्रमाण हेरॉईन आसक्त आणि दारुडे यांच्यात पाहण्यात आलेल्या प्रमाणासारखेच असते. सर्वेक्षणे दर्शवितात की धूम्रपान करणाऱ्यांपैकी ९० टक्के लोकांना ते सोडायचे असते पण त्यांना ते फारच कठीण वाटते. बव्हंशी लोकांनी कधी ना कधी ते सोडायचा प्रयत्न केलेला असतो. म्हणतात त्याप्रमाणे,  "धूम्रपान सोडणे सोपे आहे. मी अनेकदा केलेले आहे!" निकोटिन सोडविणे सुखद नसते. ते सोडणाऱ्यांपैकी ८० टक्के लोकांना त्याची उणीव जाणवत राहते आणि धूम्रपानाची तीव्र ओढ असते. सोडवितांना आढळणाऱ्या लक्षणांमध्ये अस्वस्थता, चिडचिड, भयोत्सुकता, बुडत असल्याची भावना, डोकेदुखी, आतड्यातील व्यवधाने, वाढत्या प्रमाणातील झोपेतून जाग येणे, असहनशीलता, गोंधळ आणि एकाग्रता साधण्यातील अडचणी असतात. काही कर्तबमापने जसे की, प्रतिक्रियाकाल, तात्पुरते मोडीत निघतात. जैवगती मंदावते म्हणून अन्नग्रहण तेवढेच राहूनही वजन वाढण्याकडे कल राहतो. शरीरातील लक्षणे शेवटल्या धूम्रपानापासून चोवीस ते अठ्ठेचाळीस तास सर्वात तीव्र असतात. आणि दोन आठवड्यांपर्यंत हळूहळू कमी तीव्र होतात. मात्र, मानसिक व्यसनाधीनता खूप काळपर्यंत टिकून राहते. धूम्रपानाची इच्छा, विशेषत: तणावपूर्ण स्थितीत, महिनेच काय पण अनेक वर्षांपर्यंतही राहू शकते. काही धूम्रपान सोडलेल्या लोकांना रंगीबेरंगी स्वप्नेही पडतात, ज्यात ते धूम्रपान सोडल्यानंतरही बऱ्याच काळानंतर धूम्रपान करीत असतात.

 

धूम्रपान आणि तुमचा मेंदू

 

निकोटिनचा एक लक्षणीय गुणधर्म हा की त्यामुळे तुमच्या मेंदूतील अनेक संप्रेरके प्रभावित होतात. ही संप्रेरके ज्यांना  मज्जानियमक  (न्युरोरेग्युलेटर्स) असेही म्हणतात, त्यांच्यात ऍसिटिलकोलाईन, नोरेपाईनफ्राईन, ऍड्रेनलिन, डोपामाईन, बिटा-ईन्डोर्फिन आणि व्हासोप्रेसिन ह्यांचा समावेश होतो. ही मेंदूतील रसायने तुम्हाला बरे वाटवतात, आणि परितोष व खुशालीच्या भावना घडविण्यात त्यांचा मोठा हात असतो. ह्या रसायनांचे मेंदूतील प्रमाण बदलून निकोटिन, व्यक्तीला त्याच्या तणावांची चांगली हाताळणी करू देते. निकोटिनचे त्वरित कार्य आणि विविधांगी मज्जानियामक प्रभाव त्याला एखाद्या व्यक्तीस दैनंदिन जीवनाच्या गरजा भागविण्यास मदत करण्यासाठी विशेष प्रभावी बनवते. धूम्रपान करणारे अभावितपणे त्यांचे निकोटिनग्रहण कमीजास्त करून जुळवून घ्यायला शिकतात. वरील प्रभाव निवडकपणे वाढविण्यासाठी किती विड्या ओढाव्यात व दुसरी ओढण्याआधी किती काळ काढावा हे ते शिकून घेतात. मात्रेनुसार, निकोटिन तुम्हाला शांत अथवा उत्तेजित करू शकते. ह्याप्रकारे, धूम्रपान करणारे, मेंदूतील रसायने कमीजास्त करून जास्त उत्तेजित अथवा अधिक शिथिल वाटवून घेतात. लघु, जलद झुरके (निकोटिनची अल्प मात्रा) मेंदूचे कार्य उत्तेजित करण्याकडे कलतात. ज्यामुळे मनुष्यास विचार करण्यात मदत होते आणि एकाग्रता चांगल्याप्रकारे साधते. दीर्घ, खोल झुरके (जास्त मात्रा) मनुष्यास शिथिल होण्यास मदत करतात. दुसऱ्या शब्दात, धूम्रपान करणारे त्यांच्या मनस्थितीचे नियंत्रण करण्यासही विड्यांचा वापर करतात.

 

निकोटिन काय करते

 

कधीकधी धोका पत्करणे गंमतीचे ठरू शकते. सरासरी इसमाहून बहुधा मी जास्तीच धोका पत्करत असतो. उदाहरणार्थ माझ्या व्यक्तिगत जीवनात मी  आकाशउडी  (स्कायडायव्हिंग) आणि  जलडुबकी  (स्कूबा डायव्हिंग) यांचा आनंद उपभोगला आहे; माझ्या व्यावसायिक जीवनात हा संशोधन अभ्यास चालवणे धोकादायक होते. बहुतेक सर्वच उपयोगी साहसांमध्ये धोका पत्करावा लागतो. बव्हंशी तंबाखू ओढणारे जाणतात की धूम्रपान त्यांना अपायकारक असते, पण बहुधा ते त्याच्याकडे आकाशउडीसारख्या इतर साहसी वर्तनांप्रमाणेच पाहतात. म्हणजे, ते जाणतात की काही तरी वाईट घडते आहे, ते विनाशकारी असू शकते, पण जर ते नशीबवान असतील तर कोणतेही धोकादायक प्रभाव न सोसावे लागता ते आयुष्य कंठू शकतील. दुर्दैवाने, तसे होत नाही. ओढलेली प्रत्येक विडी तुमच्या आरोग्यास इजा पोहोचविते. जरी तुम्हाला उत्तरायुष्यात कधीच हृदयविकार अथवा कर्करोग झाला नाही तरी, तुम्ही ओढलेली प्रत्येक विडी तुमच्या आरोग्याला प्रभावित करते. तुम्ही आताच फरक अनुभवू शकता. पुढे कधीकाळी कर्करोग होईल ह्या भीतीपेक्षा, ह्या अल्पमुदतीच्या प्रभावांवर लक्ष देण्याने तुम्ही धूम्रपान सोडण्यास जास्त प्रवृत्त होऊ शकाल. ह्या प्रभावांपैकी काही प्रभाव कोणते आहेत? निकोटिनचे बव्हंशी प्रभाव हे तुमच्या मेंदू व मज्जासंस्थेवर होणारे त्याचे थेट प्रभाव आहेत. भावनिक तणावाप्रमाणेच निकोटिन स्वसंवेदी मज्जासंस्थेस उत्तेजित करते आणि तुमच्या शरीरास जास्त तणाव संप्रेरकांची निर्मिती करण्यास भाग पाडते. या संप्रेरकांत ऍड्रेनलिन, जास्त थ्रोम्बोक्सेन आणि कमी प्रोस्टॅसायक्लिन असतात. हे बदल तुमचा हृदयस्पंदनदर व रक्तदाब वाढवितात, रक्त जलद साखळू लागते, आणि शरीरभरातील धमन्या आक्रसतात.

 

जेव्हा तुम्ही धूम्रपान करता तेव्हा:

१. तुमच्या त्वचेच्या रक्तधमन्या आक्रसतात. म्हणून तुमच्या त्वचेस सहज सुरकुत्या पडतात. (हेच कारण आहे ज्यामुळे निकोटिन अथवा तणाव तुम्हाला लवकर वृद्ध करतात.)
२. तुमच्या हृदयधमन्या आक्रसतात. हृदयशूळ आणि हृदयाघात उद्भवू शकतात.
३. तुमच्या मेंदूतील धमन्या आक्रसतात. ज्यामुळे पक्षाघात येऊ शकतो.
४. तुमच्या हातापायातील धमन्या आक्रसतात. ज्यामुळे किमान हातपाय गार पडतात. काही वेळा, विशेषत: मधुमेहींमध्ये ह्यामुळे गँगरिन होऊ शकते. आणि हात वा पाय काढूनही टाकावा लागू शकतो.
५. लैंगिक अवयवांचाही रक्तप्रवाह घटतो. जरी विडीच्या जाहिराती, धूम्रपान करणे, पुरूषार्थाचे लक्षण असल्याचे सुचवित असल्या तरी  मार्लबोरोचा  पुरूष नपुंसकही असू शकतो.

६. निकोटिन नि:संदिग्धपणे तुमची चव, स्पर्श आणि गंध ह्या तीन सवात महत्त्वाच्या आनंद अनुभवण्याच्या संवेदना क्षीण करते. धूम्रपान हा काही तरल अनुभव नाही.
७. धूम्रपान करणाऱ्या स्त्रिया, न करणाऱ्यांपेक्षा प्रजननक्षम न राहण्याची शक्यता तिप्पट असते. त्यांना इतरांपेक्षा रजोनिवृत्ती दोन वर्षे आधीच येते. पुरूषांत शुक्राणूंची संख्या (काऊंट) आणि सक्रीयता (मोबिलिटी) धूम्रपानाने घटते.
८. दीर्घ कालावधीत, तुमच्या हृदय व शरीरभरातील धमन्यांच्या अस्तरांस निकोटिनमुळे इजा पोहोचते. ज्यामुळे अडथळे सहज तयार होतात आणि रक्तप्रवाह आणखीनच घटतो.
९. बद्धमूल तणावाप्रमाणेच निकोटिनही शरीरास अतिरिक्त कॉर्टिसॉल निर्माण करावयास लावते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारप्रणाली दडपल्या जाते आणि धमन्यांतील अडथळे वाढतात.
१०. निकोटिन तुमच्या हृदयाचा अनियमित स्पंदने करण्याचा कल वाढविते, ज्यामुळे अचानक हृदयाघाताने मृत्यूचा धोका वाढतो.
११. तुम्ही अनेक विषारी वायू श्वसनाद्वारे शरीरात घेत असता, ज्यात कार्बन मोनॉक्साईड, फॉर्माल्डिहाईड, ऍसिटोन, व्हिनिल क्लोराईड, हायड्रोजन सायनाईड, हायड्रोजन सल्फाईड, अमोनिया आणि इतर अनेकांचा समावेश असतो. ह्यापैकी काही, जसे की पोलोनियम हे किरणोत्सारीही असतात.

 

कर्करोगाच्या दीर्घकालीन धोक्यांव्यतिरिक्त प्रत्येक झुरका तिहेरी माघार घडवितो:

१. हे वायू फुफ्फुसांना प्रक्षुब्ध करतात, ज्यामुळे जास्त चिकटा तयार होतो.
२. धूम्रपानाने तुमच्या रोगप्रतिकारप्रणालीची हानिकारक जंतू आणि विषाणूंवर हल्ला करण्याची क्षमता क्षीण होते.
३. निकोटिन तुमच्या फुफ्फुसांची नैसर्गिक स्वच्छता यंत्रणा पांगळी करते. म्हणून चिकटा वाढतो व तुम्ही जंतू आणि विषाणूंच्या संसर्गास जास्तच उघडे पडता.

 

बहुधा, हजारो छोटे केस, ज्यांना सिलिआ म्हणतात ते समोरमागे हलत असतात. जणू काय चिकटा वर चढविण्यासाठीच. ज्यामुळे चिकटा फुफ्फुसातून घशाकडे चढतो जिथून तुम्ही तो खाकरून काढून टाकू शकता. निकोटिन सिलिआना पांगळे करत असल्यामुळे चिकटा खोल फुफ्फुसातच राहतो. जिथे तो जंतू व विषाणूंच्या वसन व संवर्धनासाठी घर करतो. फक्त जेव्हा तुम्ही झोपेत असता (आणि बहुधा धूम्रपान करीत नसता) तेव्हा सिलिआ जागतात आणि पुन्हा स्पंदू लागतात. म्हणूनच बव्हंशी विड्या ओढणारे सकाळी उठताच खोकतात. मात्र, सिलिआ चोविस तासाचे काम केवळ आठ तासात काही पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून, बव्हंशी विड्या ओढणाऱ्यांत श्वसनदुर्गंध, बद्धमूल खोकला आणि अल्प श्वसनक्षमता याचा प्रादुर्भाव असतो आणि धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा त्यांचा लवकर थकण्याचा कल असतो.

 

धूम्रपानाचे आरोग्यावरील प्रभाव

 

अमेरिकेत प्रतिवर्षी ३,५०,००० हून जास्त लोक धूम्रपानासंबंधित आजारांनी अकाली मृत्यू पावतात. हा आकडा पहिल्या महायुद्धात, कोरियात व हिएटनाम मध्ये मिळून मारल्या गेलेल्या सर्व अमेरिकनांहून जास्त आहे. हृदयधमनी विकारांमुळे ओढवणाऱ्या एकूण मृत्यूंच्या ३० टक्के अथवा १,७०,००० मृत्यू प्रतिवर्षी धूम्रपानामुळे होतात असे अनुमान आहे. जे दररोज किमान एक कट्टा विड्या ओढतात त्यांना इतरांपेक्षा हृदयाघाताचा धोका अडीचपट जास्त असतो. धूम्रपान इतर आरोग्यधोक्यांनाही तीव्र करते. उदाहरणार्थ, धूम्रपान करणाऱ्यांत इतरांपेक्षा वाढत्या कोलेस्टेरॉल पातळीमुळे हृदयधमनीविकाराचा धोका खूपच जास्त असतो.

 

धूम्रपान करणाऱ्या ज्या स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेत असतात -विशेषत: चाळीसपेक्षा जास्त वय असलेल्या- त्यांना इतरांपेक्षा, पक्षाघात वा हृदयाघात होण्याचा धोका खूपच जास्त असतो. चाळीस वर्षे वयाहून जास्त वय असणाऱ्या ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेत असतात त्यांना धूम्रपान न करणाऱ्यांच्या मानाने मृत्यूचा धोका दसपट जास्त असतो. शिवाय, कर्करोगाने झालेल्या मृत्यूतील ३० टक्के म्हणजे १,२५,००० मृत्यू प्रतिवर्षी धूम्रपानामुळे होतात. फुफ्फुसाच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूतील ८० ते ८५ टक्के मृत्यू हे थेटपणे धूम्रपानाशी जोडता येतात. फुफ्फुसाचा कर्करोग हा उपचारासाठी एक सर्वात कठीण असा रोग आहे. बद्धमूल श्वसनप्रणालीदाह (ब्रॉन्कायटीस) आणि श्वसनावरोध व श्वसनसंसर्गसुलभता (एम्फिसेमा) यामुळे आणखी ६०,००० धूम्रपानसंबंधित मृत्यू होतात. धूम्रपान याशिवाय पक्षाघात, परिघीय अभिसरणविकार, अस्थिसच्छिद्रता, बुबुळांतर्गत द्रवदाब वाढल्याने येणारा दृष्टिदोष; तोंड, गळा श्वसननलिका, मूत्राशय, स्वादुपिंड आणि गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग यांचा धोकाही वाढविते. धूम्रपान करणाऱ्यांत अन्ननलिकाव्रणाचे प्रमाणही दुप्पट असते. त्यांच्यात अस्थमा, ऍलर्जी, हिरडीचे रोग, डोकेदुखी आणि खोकला यांचे प्रमाणही जास्त असते. धूम्रपान करणाऱ्या मधुमेहींमध्ये इतर मधुमेहींपेक्षा गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आठपट असते.

 

धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांच्या बालकांमध्ये कमी वजन असण्याची शक्यता दुप्पट असते, कारण गर्भावस्थेतील वाढ मंदावते. तसेच त्यांच्यात जन्मविकृती आणि अचानक बालमृत्यूचे प्रमाणही जास्त असते. धूम्रपान करणाऱ्या पालकांच्या बालका व मुलांमध्ये अधिक वेळा श्वसनप्रणालीदाह आणि न्युमोनियाचे प्रसंग येतात. आश्चर्यकारकरीत्या, ज्यांचे पालक धूम्रपान करतात त्यांच्या उत्तरायुष्यात, ते स्वत: जरी धूम्रपान करीत नसले तरी, श्वसनाच्या आजारांचे प्रमाण जास्त असते. आणि धूम्रपान न करणाऱ्या लोकांच्या धूम्रपान न करणाऱ्या साथीदारापेक्षा, धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या धूम्रपान न करणाऱ्या साथीदारांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता २५ टक्के जास्त असते. ही माहिती असूनही, आणि सर्जन जनरलचा इशारा प्रत्येक पाकीटावर लिहिलेला असूनही, ह्या देशातील एक तृतियांश स्त्री-पुरूष धूम्रपान करतातच.

 

धोके न पत्करता धूम्रपानाचे फायदे तुम्ही कसे मिळवू शकाल?

 

प्रतिवर्षी ३३ लाख अमेरिकन धूम्रपान थांबवितात. त्यांच्यापैकी तुम्हीही असू शकाल. धूम्रपान सोडविण्याच्या अनेक पद्धती आहेत. आणि आमचा कार्यक्रम त्या सगळ्यांना जास्त प्रभावी करू शकतो.

 

निकोटिनचे लाभ पुरवू शकेल अशी दुसरी गोष्ट असल्याशिवाय धूम्रपान सोडविणे कठीण असते. उदाहरणार्थ जर धूम्रपान तुम्हाला शिथिल होण्यास मदत करत असेल तर, तणावव्यवस्थापनाचे विडीकेंद्रित नसलेले इतर मार्ग उपलब्ध असल्याखेरीज, धूम्रपान सोडाल तेव्हा तुम्हाला जास्तच तणाव जाणवेल. तुमचे हृदय मोकळे करा कार्यक्रम, धूम्रपानाचे हानिकारक परिणाम न होऊ देता लाभकारक परिणाम तेवढे घडवून देऊ शकतो. हा कार्यक्रम, लोक धूम्रपान का करतात त्यामागच्या कारणांचा विचार करून धूम्रपानाच्या बदल्यात काहीतरी चांगला पर्याय देऊ शकतो.

 

विरोधाभास असा की ह्यामुळे सर्वंकश जीवनशैली परिवर्तन स्वीकारणे, केवळ काहीच परिवर्तने स्वीकारण्यापेक्षा जास्त सोपे ठरते. प्रथमदर्शनी, तुम्ही म्हणाल की,  धूम्रपान सोडणे फारच कठीण आहे. तुम्ही मी धूम्रपान सोडावे, तणाव-व्यवस्थापनतंत्रे वापरावित, व्यायाम करणे सुरू करावे, आहार बदलावा आणि कॅफेनचाही त्याग करावा अशी अपेक्षाच कशी करू शकता?  पण प्रत्यक्षात थोड्या बदलांपेक्षा मोठे बदल करणे सोपे असते. धूम्रपानाचे काही लाभ तपासू या आणि ते इतर मार्गांनी कसे मिळवू शकाल तेही पाहू या. धूम्रपान मला वजन कमी राखण्यास मदत करते. धूम्रपान करणाऱ्यांचे वजन इतरांपेक्षा सरासरी तीन ते पाच पौंड कमी असते कारण निकोटिन शरीराची जैवगती वाढविते, म्हणून कॅलरीज जलद जळतात. शिवाय, निकोटिन भूकही घटवत असल्याने धूम्रपान करणाऱ्यांचा कल इतरांपेक्षा कमी खाण्याचा असतो. आमचा कार्यक्रम तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत करू शकतो. माघारीचा आहार जास्त अन्न खाऊनही कमी कॅलरीज वापरू देतो, तुम्ही भूक लागेल तेव्हा खाऊ शकता. आणि तुमची जैवगती माघारीच्या आहारावर असतांना, निकोटिन न घेताही वाढते.

 

धूम्रपान मला एकाग्रता साधण्यास आणि कर्तबगारी उंचावण्यास मदत करते. ध्यानधारणा आणि तणावव्यवस्थापनतंत्रेही हेच साध्य करतात. शिवाय जास्त कार्यक्षमतेने. निकोटिन खरोखरीच लोकांना एकाग्रता साधणे सोपे करते व विचलित न होता हातातील काम पूर्ण करणे सोपे करते. मात्र, हे एकाग्रतेचे र्वाधत सामर्थ्य आणि  दक्षतापूर्ण शिथिलीकरण  जे ध्यानधारणेने साधते तेच निकोटिनने साधते तसेच असते. धूम्रपान मला राग व शत्रुत्त्व यांचे नियमन/ नियंत्रण करण्यात मदत करते. ब्रिटीश धूम्रपान-संशोधक हिथर ऍश्टन व रॉब स्टेपनी यांच्या एका अहवालानुसार, निकोटिन मेंदूच्या रागासंबंधी प्रणालीची उत्तेजना कमी करू शकते. ध्यानधारणा आणि तणावव्यवस्थापनतंत्रेही असेच काहीतरी साध्य करतात. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे, आमच्या कार्यक्रमातील अनेक सहभागी व्यक्ती ज्या हल्ली दररोज ध्यानधारणा करतात त्या म्हणतात,  मी अगदी सहज भडकत असे. माझ्या फटाक्याची वात फारच तोकडी असे. पण हल्ली माझ्या फटाक्याची वात खूपच लांब झालेली आहे. परिस्थिती बदललेली नसली तरी त्या परिस्थितीला तोंड देण्याच्या माझ्या प्रतिसादात बदल झाला असावा.  पण जास्त महत्त्वाचे हे की आमचा कार्यक्रम औषधांनी राग दडपून टाकण्याहून खूपच जास्त साध्य करतो. तो तुमच्या रागाचे मूळ कारण शोधून त्यात परिवर्तन घडवू देतो. धूम्रपान माझ्या आयुष्याचे जास्त चांगले नियंत्रण मी करीत असल्याचे भासवून देते. अंशत: हे अशामुळे आहे की दिवसात शेकडो वेळा निकोटिनमात्रा घेत राहून ते मनस्थिती जुळवून घेऊन ठीक राखू शकतात. मात्र धूम्रपान नियंत्रण असल्याचा केवळ आभास निर्माण करते, कारण बव्हंशी लोकांना धूम्रपान त्यांनी करावे की नको हे ठरविणे फारच अवघड जाते. याउलट जीवनशिली परिवर्तन  कार्यक्रम तुम्हाला तुमच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर खरेखुरे नियंत्रण मिळवून देतो.

 

धूम्रपान शारीरिक व भावनिक दोन्ही प्रकारचे दु:ख नियंत्रित करण्यास मदत करते. अभ्यासकांनी दाखवून दिले आहे की प्रत्यक्षात धूम्रपान, ते करणाऱ्याची शारीरिक व भावनिक दु:खाप्रतीची जागरुकता कमी करत असते. या पुस्तकात सर्वत्र मी वर्णन केले आहे त्याप्रमाणे शारीरिक व भावनिक दु:खाप्रती जागरुक होणे ही आपले आयुष्य बदलून टाकण्यातील पहिली पायरी आहे. उदाहरणार्थ, ध्यानधारणा तुम्हाला दु:खाप्रती जास्त जागरूक होणे शक्य करते, ते चांगल्या प्रकारे सोसणे शक्य करते आणि बरे करण्यासाठी त्याचा उपयोग उत्प्रेरक म्हणूनही करू देते.

 

धूम्रपान मला सैलावण्यास आणि ताणतणावाशी जुळवून घेण्यास मदत करते. हे पुस्तक शिथिलीकरणाचे आणि तणावव्यवस्थापनाचे धूम्रपानाव्यतिरिक्तचे इतर मार्ग इतर अनेक मार्ग वर्णन करते. जास्त महत्त्वाचे हे की ते मार्ग तुम्हाला तणावाच्या जास्त मूलभूत कारणांची दखल घेण्यास मदत करते. विड्यांना त्यांचेवर मात करू न देता. केवळ धूम्रपानासारखी वर्तने बदलणे फारच अवघड असते, त्याव्यतिरिक्त भावनिक आणि आध्यात्मिक पैलूंचीही तुम्ही दखल घेणार नसलात तर. हे पैलू असतात एकटेपणा, एकाकीपणा आणि असमाधान. अनेक लोक कौमार्यातच धूम्रपान सुरू करतात. मित्रांना स्वीकारार्ह ठरावे म्हणून. काही वेळा हे एक दुष्टचक्रच असते. व्यक्तीला एकाकी वाटते. स्वत:बद्दल आदर कमी होतो. आयुष्यावर आपले काहीच नियंत्रण नाही असे वाटते. त्या वाईट भावना दडपून टाकत असल्यामुळे धूम्रपान लोभावते आणि नियंत्रण मिळवून दिल्याचा आभास निर्माण करते. मात्र दुर्दैवाने, जेव्हा तो धूम्रपान सोडतो, तेव्हा लक्षात येते की त्याच्या आयुष्याचे नियंत्रण विडीच करीत होती. मग शक्तीहीनता वाढते आणि स्वत:बद्दलचा आदर खालावतो. धूम्रपान ह्या भावना दडपण्यास मदत करू शकते. आणि दुष्टचक्र सुरूच राहते.

 

धूम्रपान सोडण्याचे अल्पकालिन लाभ

 

धूम्रपानकर्त्यास सोडण्याची प्रेरणा देण्यासाठी बहुधा धूम्रपानाच्या हृदयविकार, कर्करोग वगैरे दीर्घकालीन धोक्यांवर लक्ष केंद्रित केल्या जाते. पण आपण त्यास सामोरे जाऊ या. एक बुद्धिवान व्यक्ती म्हणून बहुधा तुम्ही दीर्घकालिन धोके जाणतच असाल. मग जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते केवळ धूम्रपानाचे अल्पकालीन लाभ तुम्हाला दूरस्थ धोक्यांपेक्षा जास्त अर्थपूर्ण वाटत असावेत म्हणून असू शकेल. जर तुम्ही स्वत:स धूम्रपान सोडण्याने मिळणाऱ्या अल्पकालिन लाभांची आठवण करून दिली तर तुम्हाला धूम्रपान सोडणे सोपे होईल.

 

१. अन्न तुम्हाला चवीला आणि वासाला चांगले लागेल.
२. रक्षापात्राच्या चवी आणि वासाऐवजी तुम्ही चांगल्या चवी आणि वास घेऊ लागाल.
३. जर तुम्ही पुरूष असाल, तर तुमचे लैंगिक कार्य बहुधा सुधारेल.

४. जर तुम्हाला आधीच हृदयविकार असेल, धूम्रपान सोडण्याने बहुतेकदा हृदयशूळाची वारंवारता आणि तीव्रता अगदी लगेचच कमी होते. आणि प्रत्येकाकरताच, हृदयविकार असलेल्या आणि नसलेल्याही, धूम्रपान सोडण्याने तुमची स्वस्थता, टिकून राहण्याची क्षमता आणि कसरतकर्तब सुधारते.
५. धूम्रपान करणे सामाजिकदृष्ट्या कमी स्वीकारार्ह होत आहे. अलीकडेच, अमेरिकेतील बव्हंशी विमाकंपन्यांमध्ये धूम्रपान वर्ज्य करण्यात आलेले आहे. अर्ध्याहून जास्त अमेरिकन व्यवसायांमध्ये कामाच्या जागी धूम्रपान वर्ज्य केलेले आहे आणि ही संख्या वेगाने वाढत आहे. काही धूम्रपान पूर्णपणे वर्ज्य करतात. तर काही, जशा की अटलांटामधील टर्नर ब्रॉडकास्टिंग, मध्ये धूम्रपान करणाऱ्यांना नोकरीत घेतच नाहीत. अनेक शहरांत सार्वजनिक इमारतीमध्ये आणि उपाहारगृहांमध्ये धूम्रपान करण्यावर निर्बंध आहेत. जर तुम्ही धूम्रपान सोडाल तर, शरमून, निरुपयोगी माणसाप्रमाणे प्रसाधनगृहात आश्रय शोधावा लागणार नाही.
६. तुम्ही पैसे वाचवाल. दररोज अडीच पाकिटांची सवय वर्षाला हजार डॉलर्स खर्ची पाडते. पैशांचा धूर. गेल्या पाच वर्षांत विडीच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत, म्हणून धूम्रपानाची किंमत आणखीही वाढतच राहणार आहे.
७. तुम्हाला सर्दी आणि जंतुसंसर्ग कमी होतील.
८. तुमचा बद्धमूल खोकला नाहीसा होण्यास सुरूवात होईल.

 

धूम्रपान सोडण्याचे दीर्घकालीन लाभ

 

धूम्रपान थांबविण्याच्या अनेक अल्पकालिन लाभांव्यतिरिक्त काही दीर्घकालीन लाभ इथे दिले आहेत.
१. सोडल्यानंतर पाच वर्षांनी, पूर्व-धूम्रपानकर्त्यास आजी धूम्रपानकर्त्याचे मानाने, फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यूचा धोका ६० टक्के कमी असतो.
२. सोडल्यानंतर पंधरा वर्षांनी, पूर्व-धूम्रपानकर्त्यास आजी धूम्रपानकर्त्याचे मानाने, फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यूचा धोका मुळीच जास्त नसतो.
३. सोडल्यानंतर केवळ एक वर्षाने, पुरूष पूर्व-धूम्रपानकर्त्यास हृदयाघाताने मृत्यूचा धोका ५० टक्के कमी असतो.
४. सोडल्यानंतर दहा वर्षांनी, पुरूष पूर्व-धूम्रपानकर्त्यास आजी धूम्रपानकर्त्याचे मानाने, हृदयविकाराने मृत्यू होण्याचा दर त्यांचेसारखाच असतो. डॉ.ल्यन्न रोझेंबर्ग यांच्या एका अलीकडील अभ्यासात असे आढळले आहे की स्त्री पूर्व-धूम्रपानकर्त्यास आजी धूम्रपानकर्त्याचे मानाने, हृदयविकाराने मृत्यू होण्याचा दर, धूम्रपान सोडल्यानंतर दोन ते तीन वर्षांतच इतरांसारखा असतो.

 

सोडावे कसे

 

बव्हंशी लोक जे विडी सोडतात ते तसे स्वत:हूनच करतात, कोणत्याही औपचारिक  धूम्रपान थांबवा  कार्यक्रमात रुजू न होता. ज्यांनी यशस्वीरीत्या धूम्रपान सोडले त्यांच्याकरता एक सर्वात महत्त्वाचा गुणक होता दृढ विश्वास आणि ते साध्य करू शकतील असा आत्मविश्वास. आणि तुम्हीही ते साध्य करू शकता. पण तिथे काही जादूचा दिवा नाही. तुम्ही सिद्ध होईपर्यंत सोडू नका. तुमच्या पद्धतीने आणि तुम्हाला हवा तेवढा वेळ लावून ते साध्य करा. धूम्रपान सोडणे ही एक प्रक्रिया आहे, एकदम घडणारी एखादी घटना नव्हे. अल्कोहोलिक्स ऍनॉनिमस, लोकांना एका वेळी एक दिवस पिणे टाळण्यास शिकविते. पण धूम्रपान करणारे, धूम्रपान सोडल्यावर एका तासात अनेकदा, धूम्रपान सोडल्यावर येते तशी धूम्रपानाची विलक्षण ओढ अनुभवतात, म्हणून धूम्रपान सोडणे आव्हानात्मक ठरते.

 

ज्यांनी शेवटास धूम्रपान सोडले अशा लोकांपैकी बव्हंशी लोकांना पहिल्याप्रथम ते सोडणे शक्य झालेले नव्हते. १,००० धूम्रपान करणाऱ्या व ते सोडू इच्छिणाऱ्यांच्या एका अभ्यासात केवळ १७२ लोक पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाल्याचे दिसून आले. आणखी ५३ लोक दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले. आणखी ४८ लोक तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले. इत्यादी. एकूणात, १,००० पैकी ३८७ लोक यशस्वी झाले, पण काहींना ते अंतिमत: यशस्वी होण्यापूर्वी सात वा अधिक प्रयत्नांची गरज पडली. आपणही चालण्याचे वा दुचाकी चालविण्याचे शिकतांना अंतिमत: यशस्वी होण्यापूर्वी अनेकदा पडलेलो आहोत. नाही का?