हृदयविकार: ३०-कल्पनाचित्रण

हृदयविकार: ३०-कल्पनाचित्रण


प्रस्तावनाः इथे केवळ हृदयधमनीअवरोध ह्या विकारासंदर्भात चर्चा केलेली आहे. तरीही तिचा उपयोग इतर अवनतीकारक रोगांकरितासुद्धा होऊ शकेल.
श्रेयअव्हेरः हा वैद्यकीय सल्ला नाही. तशी माझी पात्रता नाही. हे केवळ अनुभवातून/वाचनातून आलेले शहाणपण आहे.
टीपः इथे अनेक मते, आधाराविना मांडलेली दिसून येतील. ती आधार असल्यामुळेच अस्तित्वात आलेली आहेत. त्यांचेवर चर्चा होऊ शकेल. इथे चर्चेचे प्रयोजन नाही. ह्यापूर्वीही एक
 कल्पनाचित्रण मी मनोगतावर लिहिलेले आहे. तेही अवश्य वाचावे.


लोकांचे मला माहीत नाही, पण मला ती फारच हवीहवीशी वाटते. तिच्यात काय आहे एवढे? अहो, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडली पाहिजे असे कुठे आहे? मला मात्र ती आवडते. विशिष्ट वेळ झाली, संकेत झाला की मला तिच्या येण्याचे वेध लागतात. मन अनावर होते. शरीर बंड करू लागते. अर्थात, मी काही तिला मोबाईल उचलून हाक घालत नाही. केवळ तशी प्रथा नाही म्हणून. एरव्ही तेही आवडले असते. तिचे वर्णनच करायचे झाले तर फार बहारीचे होईल. मात्र हल्ली इंग्लिशमध्ये जर वर्णन केले नाही तर त्याला फारशी 'व्हॅल्यू' नसते. म्हणून मी म्हणेन की:


शी इज ब्युटिफुल, ब्युटिफुल, ब्युटिफुल, ब्युटिफुल, ब्युटिफुल ।
आय लव्ह हर, लव्ह हर, लव्ह हर, लव्ह हर, सो विल यू ।
शी इज ब्युटिफुल, ब्युटिफुल, ब्युटिफुल, ब्युटिफुल, ब्युटिफुल ।।


पण मग, अनुवाद हा माझा स्वभावच असल्याने मी लगेचच म्हणेन:


ती सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे ।
तिला मी चाहतो, चाहतो, तुम्हीही चाहाल, जिवापाड हो ।
ती सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे ।।


तर अशी एवंगुणविशिष्ट, सद्-गुणसुंदरी जेव्हा खरीखुरीच मला भेटायला येते तेव्हाचा सुखसंवाद काय वर्णावा? तो काहिसा खालीलप्रमाणे होत असतो.


मी:  गडे, सप्तरंगांच्या, स्वप्न दुनियेत नेशील का?
      (चाल: तुझ्या पंखांवरूनीया, मला तू दूर नेशील का?)
ती:  गड्या, जनरहाटीच्या, विसर सव्यापसव्यांना!
मी:  जिथे, कटकटींचा ह्या, सर्वही नाश होईल का?
ती:  हो. हो. खरेच हो!
ती:  तिथे, सर्वही सुखे, हात जोडुनी येतील ना!
मी:  हो का? खरेच का?
ती:  हो. हो. खरेच हो!


ती जाते तेव्हा मन प्रफुल्लित झालेले असते. चित्त प्रसन्न झालेले असते. सांसारिक व्यापांना सामोरे जाण्यासाठी मन सज्ज झालेले असते. तिच्या सहवासाचा महिमाच अगाध आहे.


दिवस उगवतो. निरनिराळ्या कामांमध्ये मन गुंतत जाते. धकाधकीच्या आयुष्यात धावपळ करून थकवा येतो. कामे होत नाहीत तेव्हा क्वचितप्रसंगी नैराश्यही येते. आणि मग तिची आठवण येते. तिच्यात अशी काय जादू आहे? तिच्या सहवासातच सौख्य सामावलेले आहे. तिच्या भेटीची ओढ अनावर असते. ती ओढ न रात्र पाहते, न दिवस पाहते. तीही फारच मोकळी आहे. माझ्यावर मेहेरबान आहे. 'भेट' म्हटल्यावर अजिबात आढेवेढे घेत नाही. खळखळ करत नाही. प्रतीक्षा करायला लावत नाही.


जगावेगळ्या अनुभवाची मोहिनी सोबत घेऊनच येते ती.


तुम्ही जर मला विचारलत की तुमच्या आरोग्याचे रहस्य काय आहे? तर मी सांगेन 'ती'च आहे, माझ्या आरोग्याचे रहस्य. मात्र हे माझ्या लग्नाच्या बायकोजवळ बोलू नका. अहो कुणाला आपल्या नवर्‍याचे दुसर्‍या एखादीशी असलेले संबंध रुचतील? विशेषत: ते संबंध जर नवर्‍याला गौरवास्पद वाटत असतील तर!


हे बघा, तुम्ही माझ्या मागे लागू नका. नाव सांगा, म्हणून. नाव फक्त लग्नाच्या बायकोचेच घेतात. मी तिचे नाव कसे घेऊ? माझे काय तिच्याशी लग्न झालेले आहे? काय म्हणता?


"हवं तर उखाण्यात घ्या. पण, परदा नही जब कोई खुदा से,
बंदों से परदा करना क्या, जब प्यार किया तो डरना क्या?"


बरं बरं ठीक आहे. मी काही घाबरत नाही. मी नाव घेतो ऽ ऽ. पण मग हा कसला पुरातन उखाणा? असे मात्र म्हणू नका हं!


"डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कान्ही, पदी चालतो ।
जिव्हेने रस चाखतो मधुरही, वाचे आम्ही बोलतो ॥
हाताने बहुसाळ, काम करितो, विश्रांती ही घ्यावया ।
घेतो 'झोप' सुखे, फिरूनी उठतो, ही ईश्वराची दया ॥"


 


************* पूर्णविराम **************