हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव

हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव


निराश झालेल्यास हिंदीत अशी तसल्ली देतात की 'दिल छोटा न करो'. मात्र उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णाच्या हृदयाचा आकारच त्या दाबाने वाढतो आणि तो रुग्ण 'दिल बडा' करून बसतो. पण ही स्थिती वस्तुतः निराशाजनक असते. कारण मोठे हृदय मोठ्या रक्तप्रवाहास आणि त्यानुषंगाने आलेल्या थकव्यास कारणीभूत ठरते. द्विमितीय प्रतिध्वनी चाचणीने (टू डी. इको टेस्टने) ह्याचा शोध घेतात.


उच्च रक्तदाबाचा मूत्रपिंडांवरील प्रभाव शोधण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफी करतात. दोन्हीही मूत्रपिंडे खराब झाल्यास सारखे रक्तबदल (डायलिसिस) किंवा मूत्रपिंडबदल शस्त्रक्रिया करावी लागते. ही सारीच प्रक्रिया मनस्तापाची, खर्चिक आणि संसर्गप्रवण असते.


उच्च रक्तदाबाचा बुबुळांवरील प्रभाव फंडुस्कोपी नावाच्या चाचणीने हुडकतात.


उच्च रक्तदाबाचा रक्ताभिसरणावरील प्रभाव विद्युत हृदयालेखाने तपासतात. रक्तातील मेदाच्या रूपरेषेने निश्चित करतात. हृदयधमनीतील अडथळे ताणचाचणी आणि हृदयधमनी आलेखनाने स्पष्ट होतात.


उच्च रक्तदाब शरीराच्या असंख्य चयापचयांशी जवळून निगडीत असल्याने, त्याचे असणे म्हणजे शरीरात कली शिरला असावा तसे आहे.