ह्यासोबत
- हृदयविकारः १-झटका का येतो?
- हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना
- हृदयविकारः ३-श्वसनक्षमता
- हृदयविकारः ४-रक्तदाब
- हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा
- हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव
- हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष
- हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली
- हृदयविकारः ९-पहिला दिवस
- हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा
- हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १३-पुनर्वसन
- हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन
- हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान
- हृदयविकार-१६ आहार
- हृदयविकार-१७ विहार
- हृदयविकार-१८ व्यायाम
- हृदयविकार-१९ प्राणायाम
- हृदयविकार-२० शिथिलीकरण
- हृदयविकार-२१ तणाव व्यवस्थापन
- हृदयविकार-२२ मनोव्यवस्थापन
- हृदयविकार-२३ धमनी स्वच्छता उपचार
- हृदयविकार-२४ वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार
- हृदयविकार-२५ व्यसनमुक्ती
- हृदयविकार-२६ दुसरा वसाहतवाद
- हृदयविकार: २७-अ-प्रकारचे व्यक्तीमत्व
- हृदयविकार: २८-एकाकीपणा
- हृदयविकार: २९-एकाकीपणावर उपाय
- हृदयविकार: ३०-कल्पनाचित्रण
'हृदयविकार-१८ व्यायाम
प्रस्तावनाः
इथे केवळ हृदयधमनीअवरोध ह्या विकारासंदर्भात चर्चा केलेली आहे.
तरीही तिचा उपयोग इतर अवनतीकारक रोगांकरितासुद्धा होऊ शकेल.
श्रेयअव्हेरः
हा वैद्यकीय अथवा व्यायामविषयक सल्ला नाही.
तशी माझी पात्रता नाही. हे केवळ अनुभवातून आलेले शहाणपण आहे.
शरीर लवचिक राहावे ह्याकरता नियमित व्यायाम करण्याची गरज असते. शरीराची स्वस्थता शारीरिक हालचालींवरच कायम टिकते. शरीराची स्वस्थता वाढविणेही नियमित व्यायामाच्या आधारेच शक्य असते. उपजीविकेसाठी शाऱीरिकदृष्ट्या अहोरात्र कार्यरत राहण्याची गरज पडत असते, अशा लोकांना कृत्रिमरीत्या व्यायाम करत बसण्याची मुळीच गरज नसते. मात्र आपले आजचे जीवनात, उपजीविकेसाठी शाऱीरिकदृष्ट्या अहोरात्र कार्यरत राहण्याची गरज मुळात राहूच नये अशा प्रेरणेने आपले सर्व नियोजन चाललेले असते. म्हणूनच कृत्रिमरीत्या व्यायाम करण्याची गरज अपरिहार्य होते.
हात, पाय, मान इत्यादी मोठ्या स्नायूंच्या किमान हालचाली दररोज व्हायलाच हव्यात. त्याकरता उभे राहून, बसून आणि शवासनस्थितीत असतांना पर्वतासन अवश्य करावे. म्हणजे हातापायांचे स्नायू ताणल्या जातात. दररोज किमान शंभर पावले टाचांवर आणि तेवढीच पावले चवड्यांवर अवश्य चालावित. त्याने पावलांचे स्नायू ताणल्या जातात. पाय जुळवून उभे राहून, हात शरीरास चिकटून ठेवावेत आणि एका वेळी एक एक पाय सरळ ताठ वर उचलावा व तसाच मागेही नेण्याचा प्रयत्न करावा. हात समोर जमिनीसमांतर ठेवून एका वेळी एक एक पाय सरळ ताठ वर उचलून हाताच्या तळव्यास टेकविण्याचा प्रयत्न करावा. तसेच पाय बाजूला ताठ वर करून, विमानाच्या पंखांप्रमाणे जमिनीसमांतर पसरलेल्या हाताच्या तळव्यास टेकविण्याचा प्रयत्न करावा. मग सरळ उभे राहून, हात सरळ समोर ताठ जमिनीसमांतर ठेवून, तळवे जमिनीकडे करून, चवड्यांवर, श्वास सोडत उकिडवे बसावे आणि नंतर श्वास घेत पूर्ववत उभे राहावे. पद्मासनात बसून ब्रह्ममुद्रा कराव्यात. म्हणजे मान दोन्ही बाजूंस, समोर मागे सावकाश वाकवून पाहावी. कुठल्याही एका खांद्यावर कान टेकवून मग हनुवटी छातीला टेकवत दुसरा कान दुसऱ्या खांद्यावर आणावा. असेच विरुद्ध बाजूनेही सावकाश करावे. उजव्या तळव्याने डाव्या खांद्यावर आणि डाव्या तळव्याने उजव्या खांद्यावर एकाच वेळी थोपटावे. भीमरूपी म्हणातांना जसा समोर नमस्कार करतो, तसा नमस्कार हात मागे नेऊन, तळवे एकमेकांस पूर्णपणे चिकटवून करावा. वरील सर्व हालचाली सावकाश कराव्यात आणि अंतिम अवस्थेत काही क्षण स्थिर राहावे. ह्या हालचाली दिवसातून किमान दोनदा केल्यास लवचिकता सांभाळता येते.
प्रतीक्षेत राहिल्याने, उत्सुकता ताणल्या गेल्याने, अनिश्चिततेने, भीतीने, आणि तासचे तास अवघडून उभे अगर बसून राहिल्याने शरीरात ताण निर्माण होतात. ते ताण साठविण्याच्या विवक्षित जागा शरीरात ठरलेल्या आहेत. त्या म्हणजे मान, खांदे, पाठ, कंबर गुढघे आणि घोटे. लवचिकतेसाठी केलेले व्यायाम ह्या सहाही जागा मोकळ्या करण्यात मदत करतात.
शरीराची स्वस्थता टिकवून ठेवण्याचा हल्लीच्या परिसरांमधिल उत्तम व्यायाम म्हणजे जिने चढणे आणि उतरणे. 'ताठ कणा' ह्या आपल्या आत्मचरीत्रात सायन शुश्रुषालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. रामाणी स्वतःचे स्वास्थ्य टिकवून धरण्याचे रहस्य म्हणून जिने चढणे आणि उतरणे ह्या व्यायामाचा दाखला देतात. ते स्वतः हा व्यायाम दररोज अनेकदा स्वखुशीने करतात. चढतांना गुढघ्यांवर शरीराच्या वजनाच्या सहापट भार पडत असल्याने, खूपसारी ऊर्जा खर्च होतेच शिवाय म्हातारपणी लवकर सांधेदुखी होत नाही. चार-पाच मजले दररोज चार-पाचदा चढ उतार केल्यास प्रकृती निरोगी राहते ह्या कारणामुळे पाचव्या मजल्यावर गच्चीसकट घरे घेणारे अनेकजण मी खरोखरीच आरोग्यपूर्ण जीवन जगतांना पाहिलेले आहेत. यामुळे असेल तिथेही उद्वाहकाचा उपयोग न केल्यास जास्त ऊर्जस्वल वाटतेच आणि उत्साहही कायम राहतो.
मात्र, स्वस्थतेत वाढ करायची असेल तर ह्याहूनही जास्त आणि अवघड व्यायाम करण्याची गरज भासते. मैदानी खेळ खेळणे, सायकल चालविणे, पोहोणे, धावणे, वजने उचलणे इत्यादी. डॉ. अभय बंग ह्यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' ह्या पुस्तकात, त्यांनी त्यांची हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रिया झाल्यानंतर, स्वस्थता कशी कशी वाढवत नेली ते सविस्तर लिहीले आहे. ते अवश्य वाचावे. ह्या सर्व व्यायामाचे उद्दिष्ट विश्रांत हृदयस्पंदनदर कमी करणे, परिश्रमापश्चात वाढलेला हृदयस्पंदनदर, कमीत कमी वेळात विश्रांत हृदयस्पंदनदर गाठण्याची क्षमता निर्माण करणे आणि एकूण जास्तीत जास्त अवघड काम लवकरात लवकर साधण्याची हातोटी कमावणे ह्या तीन निकषांवर आधारलेले असायला हवे. हे तीनही निकष सहज समजता येण्याजोगे, सहज मोजता येण्याजोगे आणि कष्टसाध्य आहेत.
स्वस्थता वाढविण्याच्या नादात, त्यासाठी दिवसाकाठी किती वेळ आपण देत आहोत ह्याचे भान अवश्य ठेवायला हवे. शरीरश्रमांवर आधारित व्यवसाय करणारे, जसे की व्यावसायिक खेळाडू, मजूर, कुस्तीगीर इत्यादिकांना त्याखातर जास्त वेळ देणे आवश्यकच असते आणि तसा तो उपलब्धही असतो. सामान्य माणसांनी स्वस्थतासाधनेत दिवसाकाठी दोन तासांहून अधिक वेळ दिल्यास त्या प्रमाणात लाभ वाढतोच असे नाही.
'डॉ. ऑर्निशस प्रोग्रॅम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिसीज' ह्या पुस्तकात ते लिहीतात की 'रोज एक ते दीड तास चालण्यामुळे आयुष्य दीड वर्षे वाढते असे लक्षात आलेले आहे. मात्र सरासरी आयुष्यात त्यासाठी तुम्ही जो वेळ चालण्यात गमावता तोही त्यासारखाच (दीड वर्षे) असतो. म्हणून आयुष्य वाढविण्यासाठी चालू नका. चालल्यामुळे दिवसाच्या उर्वरित वेळात जर तुम्हाला ऊर्जस्वल वाटत असेल, उत्साही वाटत असेल तर चाला.' सारांश काय की आपल्या आयुष्यात काय साध्य करायचे आहे ते साधण्यास लागणारी स्वस्थता मिळवण्यासाठी आवश्यक तेवढाच व्यायामात वेळ घालवा.
आणि सर्वात मुख्य म्हणजे, आपले आयुष्य आपल्या निसर्गनियमित दिनक्रमाच्या शतप्रतिशत मिळते जुळते असेल तर आपल्याला व्यायाम करण्याची मुळीच गरज राहत नाही. तेव्हा हे कसे साधता येईल ह्याचा निरंतर शोध घ्या! आपला निसर्गनियमित दिनक्रम काय असावा ह्याचा प्रामाणिकतेने शोध घ्या. मानवनिर्मित कृत्रिम आयुष्यापासून पूर्वपदावर येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा.
उत्तम आयुरारोग्य कमवा.
टीपः
इथे अनेक मते, आधाराविना मांडलेली दिसून येतील.
ती आधार असल्यामुळेच अस्तित्वात आलेली आहेत.
त्यांचेवर चर्चा होऊ शकेल. इथे चर्चेचे प्रयोजन नाही.
मात्र ती साधकबाधक चर्चा इतरत्र चर्चाविषय उघडून करावी.