हृदयविकारः १-झटका का येतो?

हृदयविकारः १-झटका का येतो?


शरीर निकास करू शकते त्यापेक्षा जास्त, मेदयुक्त पदार्थ सतत खात राहिल्यास, शरीर त्यांची विल्हेवाट लावू शकत नाही. त्यामुळे त्यांचे साठे शरीरात साचू लागतात. धमनीच्या भींतींवर मेदाची पुटे चढतात. ह्या पुटांना धमनी अस्तर म्हणतात. हृदयधमनीत अशाप्रकारे साचणाऱ्या सांख्यांमुळे धमनीची रुंदी कमी होते.


धमनी अस्तर जर पुरेसे कठीण नसेल तर कधीकधी पुंजक्यांच्या स्वरूपात सुटते आणि रक्तात उतरते. अडचणीच्या ठिकाणी, म्हणजे निरुंद झालेल्या हृदयधमनीत जाऊन तिला आणखीनच निरूंद करते.


जखम झाल्यास ती त्वरीत बंद व्हावी म्हणून शरीररचनेतच रक्ताला साखळण्याचा गुणधर्म दिलेला असतो. मात्र शरीरांतर्गत जखमांच्या प्रकरणात रक्त साखळल्यास त्याची गुठळी होते. अशी गुठळी अडचणीच्या ठिकाणी, म्हणजे निरुंद झालेल्या हृदयधमनीत जाऊन तिला आणखीनच निरूंद करते.


आपले स्नायू सतत आकुंचन-प्रसरण पावतच असतात. मात्र अनेकदा ते मनोव्यापारांवर अवलंबूनही आक्रसतात. त्याचप्रमाणे धमन्याही आक्रसतात. उदाहरणार्थ, समजा गाडी सुटते आहे तेंव्हा ती पकडण्याची निकड शरीरात अनेक घडामोडी घडविते. त्यातीलच एक म्हणजे हृदय धमनीचे आक्रसणे. ह्याला धमनीआकष म्हणतात. निरुंद झालेल्या हृदयधमनीत, धमनीअस्तर सुटून लोंबकळत आहे, काही कारणांनी निर्माण झालेली रक्तगुठळी येऊन ठेपलेली आहे अशाच अवघडलेल्या क्षणी जर काही कारणाने रुग्णाच्या मनात तीव्र घडामोडी घडल्या (तणाव उत्पन्न झाले) तर धमनीआकष होतो. आणि उरलीसुरली हृदयधमनी पूर्णतः बंद होऊन हृदयविकाराचा झटका येतो.